अथांग.. भाग ६

ही कथा एका मुलीची. तिच्या असामान्य लढ्याची.
अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
अंतिम फेरी
कथेचे नाव:- अथांग..
© अनुप्रिया..

अथांग.. भाग - ६

युसूफने गाडी स्टार्ट केली. आता टॅक्सी पोलीस स्टेशनच्या दिशेने धावू लागली. समोरचा काळाकुट्ट अंधार जणू त्याला गिळू पाहत होता. केदारचे डोळे आपोआप वाहू लागले.

“किती स्वप्नं घेऊन आलो होतो या शहरात आणि हे काय होऊन बसलं! ज्या माणसाला मी भला माणूस समजत होतो तोच राक्षस निघाला. त्याने आम्हाला गोड बोलून घरी पाहुणचार करण्याचं निमंत्रण दिलं आणि माझ्या सानूलाच गायब केलं? सान्वी कुठे आणि कशी असेल? त्या शेखने तिच्यासोबत काय केलं असेल? तो तिला मारून तर टाकणार नाही ना? आईबाबांनी माझ्या जबाबदारीवर सानूला माझ्यासोबत पाठवलं होतं. आता त्यांना काय उत्तर देऊ?”

अनेक प्रश्न केदारच्या मनात थैमान घालत होते. डोळे निरंतर वाहत होते. युसूफने त्याच्याकडे पाहिलं. त्यालाही खुप वाईट वाटत होतं.

“भाईजान, खुदापे भरोसा रखो। यहाँ की पुलिस हमारी जरूर मदद करेगी। प्लिज, आप चिंता मत किजीये। थोडा सब्र रखिये। सब ठीक होगा। ऐसे डर गये तो कैसे चलेगा भाईजान?”

युसूफ त्याला समजावणीच्या सुरात म्हणाला. केदार हात जोडत म्हणाला,

“या अनोळखी देशात तुच काय तो माझ्यासाठी देवासारखा धावून आलास. जगात अजूनतरी थोडी फार माणुसकी शिल्लक आहे म्हणायची. युसूफ, मला माझ्या बायकोला शोधण्यात मदत कर. आता मला तुझ्याशिवाय ना कोणावर विश्वास आहे आणि ना कोणाचा आधार! प्लिज युसूफ, तुझे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. मरते दम तक तुम्हारा ये एहसान मुझे याद रहेगा।”

त्याच्या खांद्यावर हात ठेवत युसूफ म्हणाला,

“आपको मैने भाई बोला है और भाई कभी भाईपर एहसान नही करते। दोबारा कभी एहसान की बात मत किजीये वरना हम..”

केदारला गलबलून आलं. त्याच्या डोळ्यातलं पाणीच कृतज्ञता व्यक्त करत होतं. थोड्याच वेळात युसूफची गाडी तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन थांबली. युसूफने केदारला आयडी प्रूफ घ्यायला सांगितलं. युसूफ आणि केदार आत गेले. युसूफने त्यांच्या भाषेत तिथल्या ऑफिसरला सगळी कहाणी सांगितली. त्या ऑफिसरने सगळं ऐकून घेतलं आणि केदारकडे संशयाने पाहत विचारलं,

“इंडियन?”

केदारने होकारार्थी मान डोलावली.

“युवर पासपोर्ट?”

केदारने त्याचा पासपोर्ट दाखवला. पासपोर्ट चेक करता करता त्याने प्रश्न केला.

“व्हाय डिड यु कम टू अवर कंट्री?”

“फॉर जॉब.”

केदारने उत्तर दिलं. केदारचा पासपोर्ट परत करत तो ऑफिसर पुन्हा युसूफशी बोलू लागला आणि युसूफ मान डोलवत त्याचं बोलणं कान लावून ऐकत होता. थोड्याच वेळात त्याने त्या ऑफिसरला सलाम केला आणि तिथून निघण्यासाठी केदारला खुणावलं. केदारने गोंधळून दोघांकडे पाहिलं.

“अरे युसूफ, पण सानू? ती अजून कुठे सापडलीय? यांना सांग ना शेखच्या घरची झडती घ्यायला. ती तिथेच आहे अरे! आपण असा वेळ वाया घालवून चालणार नाही. तो माझ्या सान्वीला…”

त्याला मधेच थांबवत युसूफ म्हणाला,

“भाईजान, फिलहाल तो ये ऑफिसर्स कुछ नही कर सकते। पहले हमे इंडीयन एम्बेसीके ऑफिस जाना पडेगा। अभी तो मुमकिन नही है। इंडियन एम्बेसी का ऑफिस कल सुबह खुलेगा। वहाँ आपका वेरिफिकेशन होगा। उसके बादही ये हमारी कंप्लेंट दर्ज कर सकते है।”

“लेकिन तब तक मेरी सानू…”

केदारचे डोळे पाण्याने भरले. युसूफने केदारला समजावलं.

“जो प्रोसिजर है, वो तो हमे फॉलो करनी पडेगी ना भाईजान? यहाँ का कानून बहुत अलग और सक्त है। चलीये निकलते है।”

असं म्हणत त्याने अक्षरशः केदारला पोलीस स्टेशनमधून खेचून बाहेर आणलं आणि दोघे टॅक्सीत येऊन बसले. बरीच रात्र झाली होती. दुसऱ्या दिवशीच्या सकाळची वाट पाहण्यापलीकडे दोघांच्या हातात काहीच नव्हतं. युसूफ केदारला आपल्या घरी घेऊन आला. त्याच्या बायकोला म्हणजेच समिनाला केदारची ओळख करून देत त्याची कहाणी सांगितली. ती ऐकून तिलाही खुप वाईट वाटलं.

“भाईजान, जब तक आप के रहनेका दुसरा इंतजाम नही होता तब तक आप हमारे यहाँ रह सकते है। इसे अपनाही घर समझे। तकलूफ ना करे।”

युसूफच्या बोलण्यावर केदारने सद्गदित होऊन मान डोलावली. त्याला त्याची खोली दाखवून आराम करायला सांगून युसूफ टॅक्सी घेऊन पुन्हा आपल्या कामाला निघून गेला. केदार बिछान्यात पडला खरा पण डोळ्याला डोळा लागत नव्हता. सान्वीच्या काळजीने तो पुरता घाबरून गेला होता.

“इतक्यात आईबाबांना सांगायला नको. नाहीतर ते घाबरून जातील. आधी आपण सान्वीला शोधूया मग नंतर सांगता येईल. उद्या पहिलं इंडियन एम्बेसीच्या ऑफिसला जाऊन भेटायला हवं. त्याशिवाय पोलीस सानूला शोधणार नाहीत. लवकरात लवकर मार्ग काढायला हवा.”

केदार स्वतःशीच पुटपुटला. रात्रभराच्या दगदगीने पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला.

दुसऱ्या दिवशी सकाळी केदार आणि युसूफ इंडियन एम्बेसीच्या ऑफिसमध्ये पोहचले. ऑफिसच्या दारातच त्यांना हटकण्यात आलं. केदार रिसप्शनिस्टपाशी आला आणि त्याने एम्बेसी ऑफिसरला भेटण्याबद्दल सांगितलं.

“मॅडम आय वॉन्ट टू मीट एम्बेसी ऑफिसर. प्लिज मॅम, माय वाइफ.. माय वाइफ.. शी ईज मिसिंग.”

असं म्हणून केदार मोठ्याने रडू लागला.

“प्लिज काम डाऊन मिस्टर परांजपे. वुई विल डेफिनेटली ट्राय टू फाईन्ड युवर वाईफ. प्लिज हॅव सम वॉटर.”

असं म्हणत त्या रिसप्शनिस्टने केदारला शांत व्हायला सांगितलं. त्याचं सगळं बोलणं ऐकून घेतलं. आणि तिने बोलायला सुरुवात केली.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© अनुप्रिया..

🎭 Series Post

View all