अथांग.. भाग ५

कथा एका मुलीची. तिच्या असामान्य लढ्याची.
अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
अंतिम फेरी
कथेचे नाव:- अथांग..
© अनुप्रिया..


अथांग.. भाग - ५

केदारला काय करावं समजेना. एक अनोळखी शहर आणि इथली अनोळखी माणसं. मदत कोणाला मागावी काहीच कळत नव्हतं.

“इथे थांबण्यात आता काहीच अर्थ नाही. देवा, कोणत्या संकटात टाकलंस रे? काय करू? ईश्वरा, मार्ग दाखव रे!”

केदारने हात जोडले. तो ईश्वराच्या धावा करू लागला. इतक्यात एक टॅक्सी त्याच्यासमोर येऊन थांबली आणि साधारण पंचवीशीचा गोरगोमटा रंग, गळ्यात तावीज, डोळ्यात सुरमाँ लावलेला, डोक्यावर पांढऱ्या रंगाचा ‘ताकीयाह’ म्हणजेच मुस्लिम बांधवांची नमाज करतेवेळी घालायची गोलाकार टोपी आणि अंगावर पठाणी वेशभूषा असलेला एक तरुण युवक टॅक्सीतून खाली उतरला. धावत तो केदारजवळ आला आणि तिथल्या स्थानिक भाषेत काहीतरी बोलू लागला पण केदारला तो काय बोलतोय हे समजत नसल्याने तो फक्त त्याच्याकडे अनभिज्ञ नजरेने पाहत होता. कदाचित ती गोष्ट त्याच्या लक्षात आली असावी म्हणून त्याने विचारलं,

“पाकिस्तानी या इंडियन?”

“इंडियन.“

“हिंदी, इंग्लिश?”

त्याने प्रश्न केला.

“बोथ.. मतलब दोनो भाषा.“

केदारचं उत्तर ऐकून त्याने केदारला उठवत विचारलं,

“जनाब, क्या हुआ? आप ऐसे सडक पर क्या कर रहे है? कहाँ जाना है आपको? क्या आप रास्ता भटक गये है?”

त्याच्या बोलण्याने केदार अजूनच दुखरा झाला. तो मोठमोठ्याने रडू लागला आणि त्याने रडत रडत त्या ड्राईव्हरला सगळी कर्मकहाणी सांगून टाकली. ड्राईव्हरला केदारची अवस्था बघवत नव्हती. त्यालाही खुप वाईट वाटत होतं. तो केदारच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला,

“भाईजान, मेरा नाम युसूफ खान है। मै यहाँ दस सालसे टॅक्सी चला रहा हूँ और मैभी एक इंडियन हूँ। मै आपका दर्द समझ सकता हूँ। पर जिनके बारेमें आप बता रहे हो, वो जनाब इस शहरके सबसे अमीर, प्रतिष्ठित व्यक्ती है। सबुतो बिना ऐसे किसीपर इल्जाम लगना मतलब शेर के मुहंमे हाथ डालनेवाली बात हुई। आप अकेले उनका कुछ नही बिघाड सकते। इस मामलेमे आप यहाँके पुलिस की सहायता ले सकते है। वो आपकी सहायता करेंगे की नही पता नहीं लेकिन इसके अलवा आपके पास फिलहाल तो दुसरा कोई रास्ता नही है।”

त्याच्या बोलण्याने केदारला थोडंसं हायसं वाटलं. तो त्याच्यासमोर हात जोडून उभं राहत म्हणाला,

“अरे, हा विचार माझ्या डोक्यात आलाच नाही. मला इथल्या स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागेल. मला पोलिसांत जायला हवं पण पोलीस स्टेशन कुठे असेल? युसूफ, तू मला मदत करशील का? प्लिज भाई, मुझे पुलिस स्टेशन ले चलो। बडी मेहरबानी होगी। मी पोलिसांत तक्रार करेन. ते माझ्या सानूला नक्कीच या शेखच्या तावडीतून सोडवतील.”

केदारच्या मनात सान्वी सापडण्याची आशा पल्लवीत झाली. तो युसूफला विनवणी करू लागला.

“भाईजान, मुझसे जो बन पायेगा वो मै करुंगा। पुलिस स्टेशन जाकर कम्प्लेंट करनेके लिए सबसे पहले उन्हे आपके आयडी प्रूफ दिखाने पडेंगे। वो तो आपके पास है ना?”

युसूफने विचारलं.

“नाही घरी आहेत.”

“फिर पहले हम आपके घर जाते है। आपके आयडी प्रूफ जैसे की, आपका ड्रायविंग लायसन्स, पासपोर्ट, कंपनीका आयडी कार्ड या कोई लेटर ये सब पुलिस ऑफिसरको दिखायंगे ताकी वो जल्दही मिसिंग कम्प्लेंट दर्ज करके शिनाफ्त शुरू कर सकेंगे।”

केदारला त्याचं म्हणणं पटलं. तो टॅक्सीत जाऊन बसला. मनात सतत सान्वीचे विचार घोळत होते. तिच्या काळजीने त्याच्या मनावर काळजीचे सावट पसरले होते. विचारांच्या तंद्रितच केदार घरी पोहचला. टॅक्सीतून घाईने खाली उतरत तो युसूफला म्हणाला,

“युसूफ, मै मेरे आयडी प्रूफ लेकर आता हूँ। तुम यही रुकना।”

युसूफने मान डोलावली. केदार बंगल्याच्या दिशेने धावला. समोरचं दृश्य पाहून हैराण झाला. बंगल्याचा दरवाजा आधीच सताड उघडा होता. तो धावत खोलीत आला. खोलीतलं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. त्याला काही समजण्याच्या आतच कोणीतरी त्याची बॅग त्याच्या तोंडावर फेकली. केदारने घाबरून पाहिलं. समोर एक उंच, काळ्या रंगाचा धिप्पाड माणूस त्याच्या खोलीतलं सामान बाहेर फेकून देत होता. केदार काही बोलणार इतक्यात आतल्या खोलीतून तशीच अजून दोन माणसं बाहेर आली.

“हे काय चाललंय? सामान का बाहेर फेकताय?”

केदार त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार इतक्यात त्यातल्या एका माणसाने त्याच्या जोरात कानाखाली वाजवली. केदार धडपडून खाली पडला. ती माणसं सामान फेकत होती आणि अरबी भाषेत जोरजोरात मोठ्याने त्याला काहीतरी बोलत होती. केदारला त्यांची भाषा समजत नसल्याने तो फक्त असाह्य नजरेने त्यांच्याकडे पाहत होता. इतक्यात युसूफ बाहेर टॅक्सीत असल्याचं केदारला आठवलं. तो तिथून उठून पळत बाहेर टॅक्सीपाशी आला.

“युसूफ, प्लिज मेरे साथ अंदर चलो। अंदर कुछ लोग मेरा सामान घरके बाहर फेक रहे है। वो लोग क्या बोल रहे है, मुझे कुछ भी समझ नही आ रहा। प्लिज युसूफ।”

केदारचं बोलणं ऐकून युसूफ पटकन टॅक्सीतून खाली उतरला. दोघे धावतच घरात आले. युसूफने त्यांना त्यांच्या भाषेत विचारलं. ती माणसं तशीच तावातावाने बोलत होती आणि ते ऐकून युसूफचा चेहरा गंभीर झाला. युसूफ केदारकडे पाहून म्हणाला,

“शेखजनाबने आपको घरसे निकाल दिया है। अब आपको खुदके रहनेका इंतजाम करना पडेगा। अपना सामान ले लिजिए और यहाँसे चलिये।”

केदारचा नाईलाज झाला. त्याने त्याच्या दोन बॅगा उचलल्या आणि बाहेर आला. केदार बाहेर येताच त्या माणसांनी घराला कुलूप लावलं आणि ते तिथून निघून गेले. केदारची अवस्था खूपच वाईट झाली. एकतर सान्वी सोबत नव्हती आणि आता तर डोक्यावर छप्परही राहिलं नव्हतं. काय करावं त्याला समजेना.

“भाईजान, कभी कभी मुसीबते आती है तो झुंडके साथही आती है। कोई बात नही। पहले हम पुलिस स्टेशन जाकर अपनी कंप्लेंट देते है। उसके बाद सोचेंगे क्या करना है। अब हमे यहाँसे निकलना चाहिये।”

असं म्हणून युसूफने त्याच्या दोन्ही बॅगा उचलल्या आणि टॅक्सीच्या डिक्कीत टाकल्या. केदार सुन्न झाला होता. डोळ्यातलं पाणी आवरत तो निमूटपणे युसूफच्या मागे चालू लागला.

पुढे काय होतं? केदारला सान्वी सापडेल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© अनुप्रिया.

🎭 Series Post

View all