Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

अथांग.. भाग ३

Read Later
अथांग.. भाग ३
अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
अंतिम फेरी
कथेचे नाव:- अथांग..
© अनुप्रिया..

अथांग.. भाग - ३

केदार आनंदून सांगत होता. सर्वजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते.

“काय! सव्वा चार लाख रुपये!”

केदारची आई जवळजवळ किंचाळलीच. त्याचे बाबा आणि सान्वीसुद्धा अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागली. मग केदारने त्यांना त्याचं ऑफर लेटर दाखवलं. सर्वांनाच खूप आनंद झाला. केदारने त्याच्या बाबांना आणि सान्वीलाही पेढा भरवला.

“म्हणजे तू आम्हाला एकटं सोडून परदेशात जाणार?”

या विचारांनी केदारच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं.

“काय आई डोळ्यात पाणी आणतेस! अगं मी काय कायमचा जाणार आहे का? दोन वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. दोन वर्षे असे निघून जातील. मग पुढे आपल्याला चांगलं वाटलं तर आपण कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं नाहीतर परत भारतात रिटर्न यायचं.”

केदार तिला समजावणीच्या सुरात म्हणाला.

“मग सुनबाईंचं काय?”

केदारच्या वडिलांनी त्याला प्रश्न केला. केदारने आईकडे आणि सान्वीकडे पाहिलं.

“विचार करण्यासारखं काय आहे त्यात? ती तिच्या नवऱ्यासोबतच राहील. नुकतंच लग्न झालंय त्यांचं. सुनबाईंना असं एकटं सोडून तो कसा जाईल?”

केदारची आई म्हणाली.

“अहो पण आई, मी तिकडे गेले तर इकडे तुमची काळजी कोण घेईल?”

सान्वी काळजीने म्हणाली.

“काही नाही गं. इथे सगळ्या कामांना बाई आहे. आणि आम्ही आमची काळजी घेऊ; पण तिकडे केदार एकटा असेल. त्याचे खूप आबाळ होतील. दुसरी गोष्ट म्हणजे तुला त्याच्याबरोबरच राहायला हवं. तू इथे तो तिथे हे काही आम्हाला पटणार नाही. त्यामुळे तुला त्याच्याबरोबर जावंच लागेल.”

केदारच्या आईने तिचा निर्णय सुनावला आणि केदारच्या वडिलांनीही त्याला दुजोरा दिला. अखेर नाही, होय करत सान्वी केदारसोबत जाणार हे निश्चित झालं. केदारच्या आईने तसं फर्मानच सोडलं होतं.

अखेर केदारने सान्वीला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. पुढचे काही दिवस नातेवाईकांचे, शेजाऱ्यापाजाऱ्यांचे कौतुकांचे शुभेच्छाचे फोन येऊ लागले. सर्वांकडून कौतुक होत होतं. केदार या दरम्यान तिकिट व्हिजा, राहण्याची सोय हे सारं पाहत होता. सगळं छान जमून आलं होतं पण राहण्याचा प्रश्न अजून सुटत नव्हता. तसं कंपनीने त्यांच्याच कंपनीच्या जवळपास बाहेरून नोकरीसाठी आलेल्या नोकरदार बॅचलर मंडळीसाठी राहण्याची सोय केली होती पण केदार सान्वीला घेऊन म्हणजेच कुटुंबासहित राहणार होता. त्यामुळे तो कुटुंबासाठी योग्य असंच घर शोधत होता. एकदम त्याला विमानात भेटलेल्या त्या अरब इसमाची आठवण झाली आणि त्याने सान्वीला आवाज दिला. सान्वी पटकन किचनमधून बाहेर येऊन केदारच्या शेजारी येऊन बसली.

“काय झालं? का आवाज देतोस?”

नॅपकिनला हात पुसत तिने विचारलं.

“सानू, तुला ती व्यक्ती आठवतेय का गं, जी मागे आपल्याला विमानात भेटली होती? ते पण तिकडेच सौदी अरेबियात राहायला होते. हो नं?”

केदारच्या प्रश्नासरशी सान्वीने त्याच्याकडे चमकून पाहिलं.

“हो बरोबर, त्यांनी आपल्याला तसंच सांगितलं होतं. आणि आठवतं तुला? त्यांनी तुला त्यांचं विझिटिंग कार्ड दिलं होतं. तुझ्या वोलेटमध्ये असेल, बघ बरं. कदाचित ते आपल्याला काही मदत करू शकतील.”

केदारने मान डोलावली. वोलेटमधून रजाक शेखचं व्हिझिटिंग कार्ड शोधून काढलं. कार्डवर त्याचा मोबाईल नंबर होता. केदारने तो नंबर डायल केला. एक रिंग झाली आणि कॉल कट झाला.

“कॉल कट केला?”

त्याने आश्चर्यचकित होऊन सान्वीकडे पाहिलं. ती काही बोलणार इतक्यात केदारच्या मोबाईलची रिंग पुन्हा वाजली.

“वा अलैकुम अस्सलाम वराहमतुल्लाह जनाब। कैसे हो आप? सब खैरीयत?”

“नमस्ते शेख साहब, मै केदार परांजपे. याद है ना? वो हम फ्लाईटमे मिले थे।”

केदार हसून म्हणाला.

“जी केदार साहब, हमने आपका नंबर हमारे मोबाईलमे सेव किया है। आपने हमारी जान बचाई है जनाब, हम आपको कैसे भूल सकते है? कहिये हम आपकी क्या सेवा कर सकते है?”

केदारने त्याला सगळी कहाणी सांगितली.

“बस इतनीसी बात? आप बिलकुल चिंता मत किजीये। सब इंतजाम हो जायेगा। कुवेतमे हमारे बहुत रिश्तेदार है। वहाँ रेहने का इंतजाम करवा देंगे। आप बेफिक्र होके यहाँ आईये। हमारा देश आपको बहुत पसंद आयेगा। ना आप हमे कभी भूल पायेंगे ना हमारे देश को।”

रजाकने हसून उत्तर दिलं आणि थोडा वेळ बोलून केदारने कॉल कट केला. एक दोन दिवसांत रजाकने केदारच्या राहण्याची सोय केली आणि केदार आणि सान्वी कुवेतला जाण्याची तयारी करू लागले.

“केदार, कधी पासून आवाज देतेय अरे! कुठे लक्ष आहे तुझं?”

सान्वीने केदारला आवाज दिला तशी त्याची तंद्री भंग पावली. सान्वीने अंगावर हिबाज चढवला होता. त्यामुळे तिचं तोंड आणि छातीपर्यंतचा पूर्ण भाग झाकला गेला. तिचे काळेभोर डोळे फक्त दिसत होते.

“चला निघूया?”

केदारने विचारताच सान्वीने मान डोलावली आणि दार उघडून त्याच्या शेजारी बसणार इतक्यात ड्राईव्हर म्हणाला,

“मॅडमजी, आप पीछे बैठीए। आगे जनाब बैठेंगे।”

मागच्या सीटचा दरवाजा वरच्या दिशेने उघडला गेला. तिने आश्चर्यचकित होऊन केदारकडे पाहिलं. त्याने तिला मागे बसण्यासाठी खुणावलं. सान्वी आत येऊन बसली. दरवाजा आपोआप बंद झाला. पुढच्या सीटमध्ये आणि तिच्यामध्ये एक भक्कम लोखंडी पडद्याची तटबंदी होती. ती आत बसताच ड्राईव्हरने दार लॉक करून घेतलं. ती घाबरली पण तिला पुढे केदार बसलेला दिसत होता म्हणून ती थोडी निश्चिंत झाली. गाडी मुख्य रस्त्यावर धावू लागली. चारही बाजूंनी पसरलेली रेतीचे विस्तीर्ण वाळवंट. वाळूचे डोंगरच डोंगर दिसत होते. अधून मधून उंटावरून सैर करणाऱ्या सफरी आणि त्यावर बसलेली अरबी माणसं त्यांच्या उंटाना दिशा दाखवत पुढे जात होते. खाऊन सुस्त पडलेल्या अजगराप्रमाणे रहादारी वाहणारा काळाभोर रस्ता अगदी भयावह वाटत होता. संध्याकाळची वेळ असूनही उन्हाच्या झळा अंगावर येत होत्या. रस्त्याच्या कडेने अरबी संस्कृती जपत बनवलेली बुटकी मातीची घरं, काही तुरळक प्रमाणात अरबी पेहराव असलेली माणसं जाताना येताना दिसत होती. काळ्या रंगाचा बुरखा धारण केलेल्या बायका जाता येता तिच्याकडे पाहून काहीतरी कुजबुजताहेत असं तिला वाटलं.

गाडीने आता चांगलाच वेग धरला होता. समोरच्या काचेतून तो ड्राईव्हर अधून मधून त्यांच्याकडे पाहत होता. केदार ने मागे वळून पाहिलं. सान्वी बाहेरचं दृश्य पाहण्यात गुंग होती. केदार तिच्याकडे मागे वळून पाहत म्हणाला,

“सानू, किती मदत झाली नां, आपल्याला रजाक शेख साहेबांची! त्यांनी आपली इथे कुवेतमध्ये राहण्याची सोय केली आणि आता बघ सपत्नीक आपल्याला जेवणाचं आमंत्रण दिलंय. स्वतःची गाडीसुद्धा पाठवून दिली. किती भले माणूस आहेत ते!”

“हो रे, खरंच रजाकसाहेब चांगले माणूस आहेत. इतके मोठे श्रीमंत असूनही अजिबात गर्व नाही. आपल्या सारख्या सामान्य दुसऱ्या देशात राहणाऱ्या अनोळखी लोकांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्या विमानप्रवासात घडलेल्या प्रसंगामुळे ते आपल्याला मदत करायला तयार झाले असतील. हो नं?”

सान्वी त्याच्याकडे पाहून म्हणाली.

“हो गं. पण आजकाल कोण कोणाच्या उपकाराची जाण ठेवतं सांग? त्यांनी आपल्याला लक्षात ठेवलं. एअरपोर्टवर आपल्याला घ्यायला माणूस पाठवला. दोन चार दिवसांपासून ते आपल्यासाठी किती मदत करताहेत पाहिलंस ना? त्यांनी आपल्याला इथे भाड्याने घर मिळवून दिलं. माझ्या नवीन नोकरीच्या ठिकाणीही त्यांची ओळख सांगून ठेवली. माझ्या नवीन कंपनीच्या मालकाचा मला कॉल आला होता. म्हणत होते की, तुम्ही आधी का नाही सांगितलंत की, तुम्ही आमच्या शहरातील सर्वांत मोठे उद्योगपती रजाक शेख जनाब यांचे नातेवाईक आहात ते? आताही बघ नां, आपण कोण, कुठले! ना नात्याचे ना गोत्याचे! पण त्यांनी त्यांच्या घरच्या समारंभाला शाही दावतसाठी आपल्याला त्यांच्याकडे येण्याचं आमंत्रण दिलंय. एका अर्थी बरंच झालं एका अनोळखी शहरात इतकी भली माणसं आपल्याला भेटली. आता मी ऑफिसला गेल्यावर तुझी काळजी वाटणार नाही मला.”

तो सान्वीकडे पाहत हसून म्हणाला.

“माझी काय काळजी करायची? मी एकटी राहू शकते बरं! तुला भीती वाटायला नको म्हणून आईंनी मला तुझ्यासोबत पाठवलंय.”

असं म्हणत सान्वी खी खी करून हसू लागली.

“हो का? बरं पाहूया. घोडं मैदान समोरासमोर आहेच. मग मला हाक मारू नकोस. ये ना केदार. कुठे आहेस तू? आणि मुळूमुळू रडूही नकोस. समजलं?”

केदारला बोलताना मध्येच थांबवत सान्वी म्हणाली,

“प्लिज केदार, असं चुकूनही बोलू नकोस. मी स्वप्नातही तुझ्यापासून दूर जाणार नाहीये. तुझ्या पासून दूर जाण्याचा दिवस माझ्या आयुष्यात कधीही येऊ नये. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. प्लिज पुन्हा असं कधीही बोलू नकोस.”

हे बोलताना सान्वीचे सुंदर काळेभोर डोळे पाण्याने डबडबले होते.

“अगं मी चेष्टेने म्हणालो होतो. इतकं काय मनाला लावून घेतेस! बरं सॉरी, पुन्हा असं नाही बोलणार; मग तर झालं? आता डोळे पूस बरं. नाहीतर उगीच तुझा मेकअप खराब व्हायचा.”

तो पुन्हा तिला चिडवण्यासाठी हसून म्हणाला. तिने लटक्या रागाने त्याच्याकडे पाहिलं.

थोड्याच वेळात गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर येऊन थांबली.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© अनुप्रिया.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

निशा थोरे (शिवप्रिया - शब्दस्पर्श)

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.

//