अथांग.. भाग २

कथा एका मुलीची. तिच्या असामान्य लढ्याची.
अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
अंतिम फेरी
कथेचे नाव:- अथांग..
© अनुप्रिया..

अथांग.. भाग -

सान्वीने बाजूच्या रांगेतल्या समोरच्या सीटवर बसलेल्या इसमाकडे बोट दाखवलं. केदार तिकडे बघू लागला. त्या सीटवर बसलेल्या इसमाला दरदरून घाम फुटला होता. त्याचं जोरजोरात श्वास घेणं सुरू होतं. श्वास घेण्याच्या धडपडीमुळे तो हात पाय जोराने आपटत होता. त्याच्या अंगावर लांब बाह्यांचा, पांढऱ्या रंगाचा, पायापर्यंत असलेला लांबलचक घोळदार सदरा, डोक्यावर सुती टोपी आणि त्याभोवती विशिष्ट पद्धतीने कापड गुंडाळलं होतं आणि त्याचे दोन्ही पदर खांद्यावर रूळतील असे राखून कपाळाच्या वरच्या बाजूने काळ्या लोकरी पट्टीने ते शिरोवस्त्र बांधलेलं होतं. गळ्यात दोरीसारख्या जाडसर सोन्याच्या चैन, हाताच्या बोटात हिरेजडीत अंगठ्या होत्या. त्याच्या पोशाखावरून तो इसम अरबी असावा हे केदारच्या चटकन लक्षात आलं. त्याने पटकन एअर हॉस्टेसला बोलवण्यासाठी समोरचं बटण दाबलं. केदार आणि सान्वी पटकन सीटवरून उठून त्याच्याजवळ गेले. आजूबाजूचे प्रवासी बघ्याची भूमिका घेऊन आपापल्या जागी उभे होते.

“सर, काय होतंय तुम्हाला? आर यू ओके?”

केदार त्या इसमाला विचारू लागला. सान्वी त्याचे हात चोळत होती. त्या इसमाचे हात अगदी थंडगार पडले होते आणि कोणाला काही समजण्याच्या आतच दुसऱ्या क्षणाला तो इसम बेशुद्ध झाला. एअरहोस्टेसही तिथं आली होती.

"केदार, ह्यांना झोपवावं लागेल. पल्स लागत नाहीये. चल पटकन. वेळ दवडू नकोस.”

सान्वी घाईने म्हणाली. केदार तिच्याकडे आश्चर्याने बघत होता.

"केदार अरे, असा माझ्याकडे बघतोस काय? असं वेळ दवडून चालणार नाही. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. एअरहॉस्टेसला मदतीला बोलव.”

सान्वी केदारकडे पाहून म्हणाली. केदारने पटकन एअरहोस्टेस आणि एका पॅसेंजरच्या मदतीने त्या इसमाला खाली झोपवलं. सान्वीने त्या इसमाच्या छातीवर दाब देत सीपीआर सुरू केला. तेवढ्या वेळात दुसऱ्या एअरहॉस्टेसने घडणारा प्रकार पायलटला कळवला. पायलटने जवळच्या विमानतळाशी संपर्क करून तिथे इमर्जन्सी विमान उतरवण्याची परवानगी घेतली. सान्वी त्या इसमाला सीपीआर देत होती. काही वेळातच त्या इसमाचा श्वास पूर्वपदावर आला. एअरहोस्टेसने विमानातला इमर्जन्सी ऑक्सिजन मास्क त्याला लावला.

“ह्यांच्या सोबत कुणी आहे का?”

सान्वीने प्रवाशांना उद्देशून विचारलं. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. कुणीच काही बोललं नाही.

“मॅडम, हे एकटेच आहेत.”

दुसरी एअर होस्टेस प्रवाशांची यादी बघत बोलली.

थोड्याच वेळात विमान परदेशी लॅण्ड झाले. विमानतळावर इमर्जन्सी टीम हजर होती. ते पटकन विमानात आले, त्या इसमाला स्ट्रेचरवर झोपवलं आणि हॉस्पिटलमध्ये नेऊ लागले.

"केदार, आपण जायचं का हॉस्पिटलमध्ये? माणुसकी म्हणून म्हणतेय.”

सान्वीला त्या इसमाची काळजी वाटत होती. तिचा काळजीने भरलेला चेहरा पाहून केदारलाही तिला नकार देता येईना. दोघे विमानातून खाली उतरून त्या इसमासोबत हॉस्पिटलमध्ये गेले. सान्वीने विमानात घडलेला सगळा प्रकार डॉक्टरांना सांगितला. तिने त्या इसमाला सीपीआर दिल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी ताबडतोब त्या इसमाला आयसीयूमध्ये दाखल केलं. सान्वी आणि केदार आयसीयूच्या बाहेर मांडलेल्या खुर्चीत बसले. थोडया वेळ्याने डॉक्टर बाहेर आले. त्या दोघांकडे पाहून म्हणाले,

“सिव्हीअर हार्टअटॅक होता. तुम्ही प्रसंगावधान राखून जे प्रथमोपचार केले त्यामुळे यांचा जीव वाचला. आता ते शुद्धीवर आलेत आणि ज्यांनी त्यांचा जीव वाचवला त्यांना भेटायचंय असं बोलताहेत. तुम्ही त्यांना वाचवलंत. तुम्ही त्यांना भेटू शकता पण जास्त बोलू नका.“

सान्वीने मान डोलावली. डॉक्टरांनी सान्वीचं कौतुक केलं आणि दोघांना आत जाण्याची परवानगी दिली. ते दोघे आत आले. त्या इसमाने डोळे किलकीले करून पाहिलं. दोन्ही हात जोडून कृतज्ञता व्यक्त करत तो हळू आवाज म्हणाला,

“बहुत शुक्रिया, आपने हमारी जान बचाई। अल्लाह आपको हमेशा खुश रखे। आपकी उमर सलामत रहे।”

त्या व्यक्तीला बोलताना धाप लागत होती.

“आप आराम किजीये। डॉक्टरने आपको बात करने के लिए मना किया है।”

केदार त्याला थांबवत म्हणाला. बोलता बोलता केदारला त्याच्याबद्दल समजलं की, त्या इसमाचं नाव रजाक अब्दुल शेख आहे आणि तो सौदी अरेबियातला श्रीमंत रहिवाशी आहे. कतारमध्ये त्याचा खूप मोठा पेट्रोलियमचा, तेल उत्पादनाचा बिझनेस आहे. केदारला त्याने सगळी माहिती सांगितली. त्याच्या कुटुंबाबद्दलही त्याने संपूर्ण माहिती दिली. त्याला थोडं बरं वाटू लागताच त्यानेच त्याच्या घरच्यांना फोन करून घडलेला सर्व वृतांत सांगितला असावा कारण तो फोनवर त्याच्या भाषेत बोलत होता. त्यामुळे केदार सान्वीने तसा अंदाज बांधला.

“आप क्या करते हो जनाब? आपका नाम?”

त्या इसमाने केदारला विचारलं.

“मेरा नाम केदार परांजपे और ये मेरी बीवी सान्वी।”

केदारने त्याला स्वतःविषयी सांगितलं आणि त्याच्या कंपनीचं कार्ड त्या व्यक्तीला दिलं. त्या इसमानेही केदारला त्याचं बिझनेसकार्ड दिलं आणि म्हणाला,

“आईये कभी हमारे अरबस्थानमे। आपकी खिदमत का हमेभी मौका दिजीये।आईयेगा जरूर।”

“जरूर शेख साहब, आना तो चाहते है पर कभी मौका नहीं मिला। अगर जिंदगीमे कभी सौदी अरेबिया आने का अवसर मिलेगा तो आपसे मिलने जरूर आयेंगे। अब हमे इजाजत दिजीये। हम स्वित्झर्लंड जानेके लिए निकले थे।”

केदारने त्याला पुन्हा भेटण्याचं प्रॉमिस केलं. थोडा वेळ बोलून ते दोघं हॉस्पिटलमधून बाहेर पडले.

"सान्वी, ग्रेट यार! मला माहित नव्हतं की, तुला हेही येतं? कुठे शिकलीस ग?"

केदार आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला. सान्वी हसून म्हणाली,

“केदार, आमच्या कॉलेजमध्ये नां, अशी इमर्जन्सी आल्यावर आपण कसं हँडल करायसाठी ते शिकवण्यासाठी डॉक्टरांचा एक वर्कशॉप झाला होता. सीपीआर वगैरे त्यात शिकवलं होतं. तेव्हा ते डॉक्टर म्हणाले होते की, या वर्कशॉपमुळे बऱ्याच लोकांचा जीव वाचायला मदत होईल. बस्स, आज मला तेच आठवलं आणि त्याचा परिणाम बघतोयस तू.”

“हो गं, खरंय तुझं.”

असं म्हणत केदारने तिच्याकडे मोठ्या कौतुकाने पाहिलं. थोड्याच वेळात ते दोघे एअरपोर्टला पोहचले. फ्लाईट यायला अजून बराच वेळ होता त्यामूळे केदार आणि सान्वी आजूबाजूचा परिसर पाहून आले. थोडीफार शॉपिंग केली. चांगल्या रेस्टोरंटमध्ये जेवण केलं. एकमेकांशी खूप गप्पा मारल्या. आणि मग ठरलेल्या वेळेनुसार फ्लाईट आल्यावर ते स्वित्झर्लंडला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये जाऊन बसले. झालेल्या प्रकारामुळे सान्वी फार दमल्याने विमानात बसताच तिचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी केदार आणि सान्वी स्वित्झर्लंडला पोहचले. एअरपोर्टवर त्या हॉटेलचा एक माणूस त्यांना न्यायला आला होता. तिथून कारने ते हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेलच्या मॅनेजरने त्यांचं स्वागत केलं. तो सगळा दिमाख पाहून सान्वी तर भलतीच भारावून गेली होती. केदारलाही आनंद झाला होता. रूमची चावी घेऊन दोघे रूममध्ये आले. प्रवासाने थकल्याने थोडा आराम करून ते फिरण्यासाठी हॉटेलच्या बाहेर पडले.

”वॉव, मार्व्हलस! कसलं सुंदर आहे ना रे स्वित्झर्लंड!”

सान्वी थक्क होऊन उद्गारली. उंचच उंच बर्फाच्या पर्वतरांगा पाहून ती भलतीच खुष झाली.

“अगदी खरंय, स्वर्ग असेल तर तो इथेच, स्वित्झर्लंडमध्येच! बघ, किती सुंदर! सानू, माझं एक स्वप्नं होतं; एकदा तरी या भूमीवर पाऊल ठेवायचंच. आपल्या आत्याला ही गोष्ट चांगलीच ठाऊक होती. म्हणूनच त्यांनी आपल्याला इथे पाठवलं.”

केदार सान्वीला सांगत होता. जवळ जवळ सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहून झाली. नंतर ते सर्वात प्रसिद्ध ‘हॉल ऑफ फेम’ पहायला गेले. खूप भटकंती झाली. सान्वीने खूप सारी शॉपिंग केली. बाहेर खाणंपिणं झालं. दोघेही खूप आनंदात होते. केदारच्या सहवासात, त्याच्या प्रेमाच्या बरसातीत सान्वी सुखाने न्हाऊन निघाली. ते मंतरलेले दिवस, मोहरलेले क्षण, त्या आठवणी मनात रुजवत सान्वी केदारसमवेत परत भारतात, आपल्या घरी आली.

केदार आणि सान्वीचा सुखी संसार सुरू झाला. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे थोड्याच दिवसांत सान्वी सासरी सर्वांची लाडकी झाली. केदारचं तिच्यावर अगदी मनापासून प्रेम होतं. सान्वी आपल्या संसारात खूप आनंदी होती. केदारच्या आईबाबांनाही आपल्या सुनेचं फार कौतुक वाटायचं. केदारची आई तर घरी येणाऱ्या प्रत्येकाजवळ सान्वीचे गोडवे गायची.

“गुणाची आहे हो माझी सून! साऱ्याचं सगळं अगदी मनापासून करते. एवढी शिकलेली असूनही तिला कसलाच गर्व नाही. आमचा केदार खूप नशीबवान आहे बरं.”

सगळं छान सुरळीत सुरू होतं. बघता बघता त्यांचं लग्न होऊन सहा महिने उलटून गेले. एक दिवस संध्याकाळी केदार धावतच घरी आला. दारातूनच त्याने ओरडायला सुरुवात केली,

“सानू, आई.. बाबा लवकर बाहेर या. मला तुम्हाला काही सांगायचं आहे.”

केदारच्या आवाजाने सर्वजण बाहेर आले. केदारचे बाबा त्यांच्या खोलीतून बाहेर आले. केदारची आई आणि सान्वी स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. केदारच्या आईने केदारला विचारलं,

“काय झालं रे? का आल्या आल्या आमच्या नावाने शंख करतोयस?”

“आई, आई.. काय सांगू तुला! बातमीच तशी आहे.”

असं म्हणून त्याने आईचे हात पकडून गोलाकार गिरकी घेतली.

“अरे थांब, थांब. चक्कर येईल नां मला. काय झालंय पण तुला इतकं आनंदी व्हायला?”

आई त्याला थांबवत म्हणाली. केदारने त्याच्या बॅगेतून पेढ्याचा बॉक्स काढला आणि आईला एक पेढा भरवत म्हणाला,

“सांगतो, सगळं सांगतो. त्याआधी हा पेढा तर खा. अगं आई, मला नोकरीची एक छान संधी चालून आली आहे. परदेशात जाण्याचा योग आलाय. तू आहेस कुठे!”

“म्हणजे?”

केदारच्या बाबांनी प्रश्न केला.

“अहो बाबा, मला अतिशय चांगली ऑफर मिळालीय. कुवेतमध्ये एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीने मला प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून अपॉइंट केलंय. हे बघा ऑफर लेटर.”

बॅगेतून एक पांढऱ्या रंगाचं पाकिट काढून बाबांच्या हातात देत तो पुढे म्हणाला,

“गेल्या महिन्यात मला कुवेतमधल्या एका मल्टीनॅशनल कंपनीत ‘प्रोजेक्ट मॅनेजर’ या पदाच्या मुलाखतीसाठी मेल आला होता. मी सहजच ऑनलाईन मुलाखत दिली. त्यात मी उत्तीर्ण झालो. मग त्यानंतर मुलाखतीचे अजून तीन चार राऊंड झाले आणि ते यशस्वीपणे पार पडल्यानंतर त्या पदासाठी माझी निवड झाली. अहो बाबा, दोनशे उमेदवार होते. त्यापैकी फक्त वीस उमेदवार निवडले गेले आणि त्या वीस उमेदवारांत मी होतो. अगं आई, पन्नास लाख रुपयांचं पॅकेज मिळालंय. पन्नास लाख! म्हणजे किती माहितीये? महिन्याला साधारण चार, सव्वा चार लाख रुपये पगार असेल. इथल्या पेक्षा चारपट पगार होईल. भारीच नां!”

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© अनुप्रिया.

🎭 Series Post

View all