अथांग.. भाग १५ (अंतिम )

ही कथा एका मुलीची. तिच्या असामान्य लढ्याची.
अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
अंतिम फेरी
कथेचे नाव:- अथांग.
© अनुप्रिया.

अथांग.. भाग - १५ (अंतिम)

सान्वी सांगत होती आणि सर्वजण कानात प्राण आणून तिचं बोलणं ऐकत होते.

“ट्रक भरधाव वेगाने पुढे जात होता. अचानक एका ठिकाणी ट्रक मुख्य रस्त्यावरून आड वळणाच्या वाटेने वळला. माझा संशय खरा ठरत चालला होता. मनात मी देवाच्या धावा करत होते. मग अचानक एका ठिकाणी गाडीचा वेग कमी झाला. मी लगेच मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्यांना काही कळण्याच्या आत चालत्या गाडीतून उडी मारली. उडी मारल्याने मला हातापायांना लागलं होतं. तशाच रक्तबंबाळ अवस्थेत मी उठून उभी राहिले. लपत छपत पुढे मार्ग शोधत चालत राहिले. थोडं अंतर पार केल्यावर तशा रक्तबंबाळ अवस्थेतही मी धावू लागले. अगदी ऊर फुटेपर्यंत मी धावत राहिले. मी कुठे चालत होते, कोणते शहर होते हे मला काहीच माहीत नव्हतं. पोटात भुकेने आगीचा डोंब उसळला होता. प्यायला पाणी नव्हतं. माझा जीव कासावीस होत होता. मी धावत होते, चालत होते. हळूहळू माझ्या शरीरातली चालण्याबोलण्याची शक्ती संपत चालली होती. अंगात अजिबात त्राण उरलं नव्हतं. काय करावं समजेना. पोटाच्या भुकेने मी लाचार झाले आणि मग रस्त्यावर भर उन्हात अन्नासाठी भीक मागू लागले. मी आजूबाजूला पाहिलं, तिथे काही भारतीयांची दुकानं मला दिसत होती. त्यांना माझं हिंदी बोलणं कळत होतं. त्या लोकांना माझी दया आली. त्यांनी मला थोडं खायला आणि प्यायला पाणी दिलं. त्यापैकी एका भारतीयांने मला विचारलं,

“तुम्ही इथे कशा आलात?”

मी त्या प्रश्नावर माझी खरी कहाणी सांगू शकले असते पण मला भीती वाटली. मी पळून आलेय हे सांगितलं तर कोणीतरी शेखच्या माणसांना माझ्यापर्यंत नक्की पोहचवलं असतं म्हणून मग मी हरवल्याचं सांगितलं. माझ्याकडे पासपोर्ट व्हिजा काहीच नव्हता. शिवाय प्लेनच्या तिकिटाइतकेही माझ्याकडे पैसे नव्हते. काय करावं समजेना.

“मॅडम, तुम्ही इंडियन एम्बेसीच्या ऑफिसला जा. ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. तुमच्या घरच्यांशी संपर्क साधतील आणि मग तुम्ही तुमच्या घरी सुखरूप जाऊ शकाल.”

त्यातल्याच एकाने मला इंडियन एम्बेसीबद्दल सुचवलं. मी त्यांचे आभार मानले. त्यांच्याकडून पत्ता घेऊन मी ऑफिसवर आले. रात्रीचं ऑफिस बंद झालं होतं. पोटात पुरेसं अन्न नसल्यामुळे मला भोवळ आली आणि मी दारातच चक्कर येऊन पडले.”

सान्वी बोलता बोलता थांबली. एक नजर सर्वांवर टाकत तिने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली,

“मी नशीबवान होते म्हणून कशीबशी मी इथंवर पोहचू शकले. अथक परिश्रमानंतर मी पुन्हा केदारला पाहू शकले. माझ्या वाटयाला जे आयुष्य आलं, ते कोणाच्याही वाट्याला कधीही येऊ नये. शेखच्या तावडीतून माझी सुटका व्हावी म्हणून शबनमने मला मदत केली. देवासारखी ती माझ्या मदतीला धावून आली. तिचं पुढे काय झालं असेल, शेखच्या माणसांनी तिला मारून टाकलं असेल का? देवालाच ठाऊक! मी आयुष्यभर तिची ऋणी राहीन. ज्या ज्या लोकांनी मला इथंवर येण्यास मदत केली; त्यांचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. केदार, माझं नशीब आणि आईबाबांची पुण्याई माझ्या पाठीशी होती म्हणून शेखच्या तावडीतून माझी सुटका झाली. मी पळून जाण्यात यशस्वी झाले पण अजून कितीतरी भारतीय स्त्रीया त्या दृष्ट लोकांच्या कारागृहात मदतीची अपेक्षा करत पैशांच्या अभावी कुढत बसल्या असतील. त्यांची सुटका कोण करणार? त्यांच्यावरचा अत्याचार कसा थांबेल? त्यांना मदत नाही मिळाली तर त्या मरून जातील अरे! कोणीतरी त्यांना वाचवा. ईश्वरा! त्यांची सुटका कर.”

सान्वी मोठमोठ्याने रडत होती. तिचं ते रुदन मन हेलावून टाकणारं होतं. तिची कहाणी ऐकून भीतीने सर्वांच्याच अंगाचा थरकाप उडाला होता. केदारने तिला कुशीत घेतलं. लहान मुलाला शांत करावं तसं तो तिला प्रेमाने गोंजारत होता. सान्वी आता थोडी शांत झाली होती. अचानक केदारने आशिष यांच्याकडे चमकून पाहत विचारलं,

“सर, याचा अर्थ अन्सारी शेखचा माणूस होता. मग सर, ही गोष्ट ऑफिसर इब्राहिम सरांच्याही लक्षात कशी नाही आली?”

”अन्सारी आणि सान्वीचे एकत्र असलेले फोटोज आपल्यापर्यंत पोहचवणं हा आपली दिशाभूल करण्यासाठीचा शेखचा प्लॅन होता आणि दुर्दैवाने या प्लॅनमध्ये स्पेशल फोर्स ऑफिसर इब्राहिम याचाही हात होता. ते फोटोज, व्हिडिओ आपल्याला दाखवून इब्राहिमने आपली दिशाभूल केली. तुमच्या मनात तुमच्या बायकोविषयी संशय निर्माण केला जेणेकरून या केसवरून तुमचं लक्ष विचलित व्हावं. तुम्ही ही केस सोडून भारतात परत जावं आणि नेमकं घडलंही तसंच. तुम्ही भारतात परत गेल्यानंतर मला थोडा इब्राहिमचा संशय आला म्हणून मग मी गुप्तपणे पुन्हा शोध, तपास सुरू केला आणि मग हळूहळू सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. काही दिवसांपूर्वीच इब्राहिमला कामावरून निलंबित करण्यात आलंय. रजाक शेख या शहरातले प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने अजून तरी त्यांच्यावर पुराव्याअभावी काहीच कारवाई करण्यात आली नाही; पण आता सान्वीच्या लिखित जबानीनंतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. तुमची पत्नी खरंच खूप धाडसी आहे. त्यांनी मोठ्या हिंमतीने सगळ्या संकटातून मार्ग काढला आणि सुखरूप आमच्या पर्यंत पोहचल्या. इथंवर पोहचत असताना त्यांना कोणत्या दिव्यातून जावं लागलं याची कल्पना करवत नाही पण जे झालं ते आता मागे टाकून तुम्ही आपल्या देशी परत जा. यापुढे कोणत्याही अनोळखी माणसांशी बोलताना, आपले डिटेल्स देताना एकदा तरी विचार करा. सान्वी मॅडम, आम्ही तुमचं दुःख वाटून घेऊ शकत नाही पण समजू शकतो. जे घडलं ते खरंच खूप भयंकर होतं. एक वाईट स्वप्न होतं असं समजून विसरण्याचा प्रयत्न करा. मी तुमची फ्लाईटने भारतात परत जाण्याची व्यवस्था करतो.”

केदारने मान डोलावली आणि आशिषकडे पाहून म्हणाला,

“सर, तुम्ही आणि युसूफने आम्हाला खूप मदत केलीत. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही तुमच्या आणि युसूफसारखी माणसं आमच्या सोबतीला होती. याचाच अर्थ अजूनही माणुसकी जिवंत आहे. सानू, मला तुझीही माफी मागायची आहे. मी तुझ्यावर संशय घेतला आणि तुला एकटीला इथे सोडून परत आपल्या घरी निघून गेलो. प्लिज मला क्षमा कर. आता आपण इथे अजिबात थांबायचं नाही. आपण लवकरच आपल्या घरी जाऊ.”

त्याला थांबवत सान्वी म्हणाली,

“पण केदार, शेखने माझ्यासोबत… मला खूप गिल्टी फील होतंय रे! माझ्याच नजरेतून मी पडलेय. नको केदार, तू मला फक्त भारतात घेऊन चल. मग पुढे काय करायचं ते ठरवेन. पण आता मला तुझ्यासोबत राहायचं नाही. माझ्यासारख्या चारित्र्यहीन बाईची सावलीही तुझ्यावर पडायला नको. तुच सांग केदार, मी आता तुझ्यासोबत कशी राहू? अशा चारित्र्यहीन स्त्रीसोबत तू कसा राहू शकशील? आईबाबा माझा स्वीकार करतील? आपला समाज माझा स्वीकार करेल?”

सान्वीच्या डोळ्यातून पाणी झरू लागलं. आता तिच्यासमोर एक उध्वस्त आयुष्य होतं. सान्वीच्या प्रश्नाने केदार क्षणभर थांबला. मनात विचारांचं वावटळ घुमू लागलं.

“खरंच आईबाबा, आपला समाज, आपले नातेवाईक तिचा स्वीकार करतील? आपली इज्जत, अब्रू, चारित्र्य गमावून तिला माझ्यासोबत पुन्हा पूर्वीसारखा संसार करता येईल? मला अशा स्त्रीचा स्वीकार करता येईल? साक्षात भगवंत श्रीरामालाही हे भोग चुकले नाहीत. त्यांनाही सीतामाईंनी अग्निपरीक्षा देऊनही त्यांचा स्वीकार करता आला नव्हता. एका धोब्याच्या बोलण्यावरून, प्रजेच्या सांगण्यावरून आपल्या निष्पाप, निष्कलंक पत्नीला त्यांनी वनवासात पाठवून दिलं. मग इथे तर सान्वीवर अनेकदा बलात्कार झालाय. आणि मी ईश्वर नाही. मी तर भावनांनी व्यापलेला मानवी देहाचा पुतळा! मला सान्वीला, एका बलात्कारी स्त्रीला कसं स्वीकारता येईल? मला तिच्यावर पूर्वीसारखं प्रेम करणं जमेल?”

केदार द्विधा मनःस्थितीत सापडला. मनात उडालेला गोंधळ त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागला होता. केदारला शांत बसलेलं पाहून सान्वी जे समजायचं ते समजून गेली.

“ठीक आहे केदार. मी तुझी अवस्था समजू शकते. माझी तुझ्याबद्दल किंबहुना कोणाबद्दलच काहीच तक्रार नाही.”

डोळ्यातलं पाणी टिपत सान्वी केदारकडे पाहत म्हणाली. तिने आशिष यांच्याकडे पाहिलं,

“सर, तुम्ही मला भारतात पोहचवण्याची व्यवस्था करू शकाल का? खूप उपकार होतील तुमचे.”

असं म्हणून सान्वी उठून बाहेर जाऊ लागली. इतक्यात केदारने तिला आवाज दिला.

“थांब सानू, मला काही बोलायचंय.”

त्याच्या आवाजासरशी सान्वी जागीच थबकली. केदारने दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.

“सानू, तुझ्या मनात आता जे काही सुरू आहे ना ते मी समजू शकतो. तुला तसं वाटणं साहजिकच आहे. पण सानू, जे घडलं त्यात तुझा काय दोष होता? हे असं शापित आयुष्य आपण थोडीच मागून घेतलं होतं? कधी कधी आपली काही चुक नसताना असं भयंकर आयुष्य आपल्या वाट्याला येतं. आपल्या प्राक्तनाचे भोग असतात ते; भोगल्याशिवाय आपली सुटका नाही. सानू, जे घडलं त्यात तुझा काहीच दोष नव्हता. उलट तुझ्यावर अन्यायच झालाय. त्यामूळे तू स्वतःला अजिबात दोष देऊ नकोस गं. मला सांग, चारित्र्य हे शरीराच्या पवित्रतेवर अवलंबून असतं? मग पवित्रता म्हणजे नेमकं काय? शरीर इतकं महत्वाचं ठरावं की ज्यापुढे मनाच्या पवित्रतेला काहीच किंमत नाही? मला माहीत आहे, आपल्या बाबतीत जे घडलं ते फारच दुर्दैवी होतं. आपल्या दोघांनाही ते स्वीकार करणं इतकं सहज सोप्पं मुळीच असणार नाही. पण आपल्यालाच खंबीर व्हावं लागेल ना? नातेवाईक, मित्रपरिवार, आपला समाज यांना तोंड देण्यासाठी आपणच सज्ज व्हायला हवं ना? सानू, एक लक्षात ठेव सगळं जग बदललं तरी एक गोष्ट शाश्वत आहे ते म्हणजे माझं तुझ्यावरचं प्रेम. ते तसुभरही कमी झालेलं नाही. माझं तुझ्यावर, तुझ्या असण्यावर खूप प्रेम आहे आणि कायम असंच राहील. जे घडलं ते विसरणं इतकं सोप्पं नाही पण आपण प्रयत्न करूया. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया. सानू, मला साथ देशील ना? माझ्यासोबत राहशील ना?”

असं म्हणून केदारने प्रेमाने तिच्यासमोर आपला हात धरला. सान्वीचे डोळे पाण्याने गच्च भरले होते. तिने त्याचा हात हातात घेत मानेनेच होकार दर्शविला. अथांग मनाच्या गाभाऱ्यात बरीच उलथापालथ झाली होती; पण आता मनावरचं मळभ दूर झालं होतं. केदारने तिला जवळ घेतलं आणि तो सान्वीला घेऊन युसूफ सोबत आशिष यांच्या केबिनबाहेर पडला. साऱ्या गोष्टी, त्या दुःखद आठवणी तिथेच मागे सोडून तो सान्वीसोबत पुन्हा आपल्या घरी परत येणार होता. लवकरच एका नवीन आयुष्याचा शुभारंभ होणार होता.

समाप्त.
©अनुप्रिया


नमस्कार वाचक मित्रमैत्रिणींनो,

‘अथांग’ ही कथा साधारण २०१३-२०१९ या कालावधी दरम्यान घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित लिहलेली काल्पनिक कथा आहे. नोकरीसाठी सौदी अरेबियात गेलेल्या नवविवाहित दांपत्याची ही कथा. वाचकांच्या मनोरंजनासाठी कथेचा शेवट जरी सकारात्मक दाखवला असला तरी खऱ्या कथेत अजूनही त्या युवकाची पत्नी सापडलेली नाही आणि तो युवक भ्रमिष्ट झाला आहे. अशा कितीतरी घटना या कालावधी दरम्यान घडल्या होत्या. मानवी तस्करी केली जायची. स्त्रियांना श्रीमंत अरब लोकांना विकलं जायचं. चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून लोकांना फसवून अरेबीयन देशात नेलं जायचं आणि तिथे त्यांचा अमानुष छळ केला जायचा. त्या क्रूर छळामुळे कधी कधी त्यांचा मृत्यूही व्हायचा. अशावेळी त्यांना बेवारस मृत म्हणून घोषित केलं जायचं. त्यावेळी भारत सरकारनेही परदेशी प्रवास करणाऱ्या भारतीयांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता.

कथा कशी वाटली जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया माझं लिखाण प्रगल्भ करतील यात मुळीच शंका नाही.

मनःपूर्वक धन्यवाद.
©अनुप्रिया

🎭 Series Post

View all