अथांग.. भाग १४

ही कथा एका मुलीची. तिच्या असामान्य लढ्याची.

अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
अंतिम फेरी
कथेचे नाव:- अथांग..
© अनुप्रिया..

अथांग.. भाग - १४

सान्वी तिची कहाणी सांगत होती. सगळेजण स्तब्ध होऊन तिचं बोलणं ऐकत होते. सान्वी पुढे सांगू लागली.

“त्या दासीने माझ्या कानाखाली मारली. मी चक्कर येऊन खाली कोसळले. मला शुद्ध आली तेंव्हा मी एका मोठ्या खोलीत मोठ्या बेडवर होते. माझ्या अंगावर भरजरी लेहंगा घातलेला होता. अंगभर दागदागिने चढवले होते. आजूबाजूला निरनिराळ्या अत्तराचा घमघमाट पसरला होता. बेडवर गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या होत्या. मी बेडवरून खाली उतरून दरवाज्याच्या दिशेने धावले. मी दार उघडण्याचा प्रयत्न करत होते पण दार बाहेरून बंद होतं. मी दार ठोठावत राहिले. जोरजोरात ओरडू लागले पण काहीच उपयोग झाला नाही. मग मी हतबल होऊन खाली बसून राहिले. बरीच रात्र उलटून गेल्यावर दार उघडलं गेलं. मी पळून बाहेर जाण्याच्या हेतूने दाराच्या दिशेने धावले पण शेखने मला अडवलं. त्याच्या तोंडातून दारूचा घाणेरडा दर्प येत होता. तो माझा हात धरून ओढू लागला. मी ऐकत नाही म्हटल्यावर त्याने मला उचलून त्याच्या खांद्यावर टाकलं आणि पलंगावर नेऊन आपटलं. मी जोरात त्याच्यावर ओरडले,

“छोड दो मुझे, वरना मै..।”

“क्या करोगी? चिल्लाओगी? चिल्लाओ.. यहाँ तुम्हारी पुकार कोई सुनेगा नही। ये देखो, अब हमारा निकाह भी हो गया है।”

हातातला मोबाईल माझ्यापुढे नाचवत तो म्हणाला. मी त्याच्या हातातून मोबाईल घेतला. त्यामध्ये एक व्हिडिओ सुरू होता. तो व्हिडिओ पाहून तर मला एकदम धक्काच बसला. त्यात बहुतेक शेख आणि मी समोरासमोर बसलो होतो. दोघांच्यामध्ये पर्दा होता आणि तिथे निकाह सुरू होता. आमच्या माथ्यावर फुलांचा सेहरा होता. कुणीतरी माझा सेहरा वर केला तर मी डोळे मिटलेल्या, गुंगीच्या अवस्थेत होते. मी स्वतःकडे पाहिलं तर माझ्या अंगात तोच लग्नातला लेहेंगा होता. तेवढ्यात शेखने माझ्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि छदमी हसत माझ्या जवळ म्हणाला,

“अब कायदेसे तुम हमारी बीवी हो। समझ गयी? अब ज्यादा नौटंकी करनेकी जरुरत नहीं, हमारे पास आओ और हमे खुश करो।”

“मी माझ्या पूर्ण ताकदीने विरोध करत त्याला दूर लोटून दिलं. तो धडपडला आणि पलीकडे जाऊन कोसळला. तो चवताळून पुन्हा उठला आणि त्याने जोरात माझ्या कानाखाली मारली. माझ्या तोंडातून रक्त येऊ लागलं होतं. खरंतर माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले होते पण मी त्याला विरोध करत होते; पण एका धिप्पाड पुरुषी शक्तीसमोर माझी ताकद अपुरी पडत होती. त्याने माझ्या अंगावरचे कपडे फाडले आणि अधाशासारखा माझ्या अंगावर कोसळला. मी स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी विरोध करत होते; पण त्याचा उपयोग होत नव्हता. त्यामूळे मी त्याला माझ्या सुटकेसाठी विनवण्या करू लागले पण त्या कसायाला माझी दया आली नाही आणि अखेर त्या निष्ठुर नराधमाने माझी अब्रू..”

असं म्हणून सान्वी मोठमोठ्याने आक्रोश करू लागली. तिचा गगनभेदी टाहो तिथे हजर असणाऱ्या सर्वांची काळीज चिरत होता. सान्वी रडत सांगू लागली.

“थोड्या वेळाने स्वतःची भूक शमल्यानंतर त्याने माझे अर्धनग्न अवस्थेतले फोटो त्याच्या मोबाईलमध्ये क्लिक करून ठेवले आणि मोबाईल सदऱ्याच्या खिश्यात टाकत तो म्हणाला,

“अगर ज्यादा होशियारी दिखानेकी या फिर यहाँसे भागनेकी कोशिश की, तो ये फोटोज सोशल मीडियापे व्हायरल कर दूंगा। समझी?”

असं म्हणत तो पलंगावर उताणा पडला आणि थोड्याच वेळात घोरू लागला. मी मात्र तशीच शरीराची वळकुटी करून तिथेच निपचित पडून राहिले. त्याने माझं सर्वस्व हिरावून घेतलं होतं. माझी अब्रू, इज्जत लूटली होती. त्यानंतर अशा कित्येक रात्री तो माझ्यावर बलात्कार करत राहिला. अत्याचार करत होता. दर चार आठ दिवसांनी तो माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून मला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचा. तिथे त्याला हवं तसं माझ्या शरीराशी खेळायचा. त्याचा आत्मा शांत होत नाही तोपर्यंत माझ्या शरीराचे लचके तोडत राहायचा. चार चार दिवस मला उपाशी ठेवायचा. त्याचं ऐकलं नाही तर मला सिगारेटचे चटके द्यायचा.”

हे बोलत असताना सान्वीने केदारला अंगावरचा झगा वर करत तिच्या मांडीवरचे, छातीवरचे शेखने तिला डागलेले सिगारेटच्या चटक्यांचे डाग दाखवले. केदारचा जीव हळहळला. ती पुढे सांगू लागली.

“माझ्या किंचाळण्याने, माझ्या विव्हळण्याने त्याला असुरी आनंद मिळायचा. माझ्या अंगावरच्या काळ्या निळ्या जखमा पाहून त्याला अजूनच चेव चढायचा. तो अतिशय क्रूर होता. कित्येक दिवस त्याने माझा असाच छळ सुरू ठेवला होता; पण त्यादिवशी मात्र तो माझ्याशी खूप चांगलं वागत होता. त्याने मला पोटभर जेवायला दिलं. उंची सरबत प्यायला दिलं. त्यानंतर त्याने त्याच्या कनिजला मला तयार करायला सांगितलं. त्यादिवशी त्यांनी मला नेहमीपेक्षा फारच वेगळं तयार केलं होतं. चेहऱ्यावर भडक मेकअप लावला. माझ्या अंगावर शॉर्ट कपडे घातले होते. पायात उंच हिलचे सॅन्डल घातले होते. मला त्या कपड्यात खूप अनकमफर्टेबल वाटत होतं. मी उभी राहण्याचा प्रयत्न करू लागले; पण मला खूप चक्कर येत होती. गरगरत होतं. त्यादिवशी काहीतरी वेगळं घडत होतं. रजाक खोलीतून निघून गेला होता. कोणीतरी वेगळाच पुरुष माझा हात पकडून दुसरा हात माझ्या कमरेत घालून मला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला ढकलून देत होते. पण गुंगीमुळे मला काहीच समजत नव्हतं. तो माझ्या अंगाशी लगट करत होता. माझ्या डोळ्यावर कसला तरी प्रकाश पडत होता. जसं की कोणीतरी माझे फोटो काढतोय. मला काहीच समजत नव्हतं. ते माझ्यासोबत काय करणार होते मला काहीच माहित नव्हतं.”

“अन्सारी?”

आशिष पटकन बोलून गेले. सान्वीने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. आशिषने लेडी ऑफिसरला डोळ्यांनीच खुणावलं. मान तुकवून ती पटकन बाहेर जाऊन एक फाईल घेऊन आत आली. फाईलमधले फोटो दाखवत तिने विचारलं.

“क्या ये आदमी था?”

सान्वीने फोटो हातात घेतला आणि निरखून पाहू लागली. फोटो पाहताच तिचे डोळे मोठे झाले.

“त्या दिवशी मी धुंदीत होते. डोळे आपोआप मिटत होते पण मी खात्रीने सांगू शकते की हा तोच माणूस आहे. त्यानंतरही तो बरेचदा शेखला भेटायला आला होता.”

तिचं बोलणं ऐकून आशिषने केदारकडे पाहिलं आणि म्हणाले,

“या फोटोजमुळे केसच्या तपासाची दिशाच बदलून गेली. किडनॅपिंगच्या केसला प्रियकरासोबत पळून गेलेली स्त्री असं रूप दाखवण्यात आलं. म्हणजे ही सुद्धा एक साजिशच होती.”

केदारने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि त्याला स्वतःच्याच विचारांची लाज वाटू लागली. मनात सान्वीविषयी अपराधीपणाची भावना दाटून आली. सान्वीचे डोळे पुन्हा पुन्हा झरत होते. ती पुढे सांगू लागली.

“शेख माझ्या शरीराचे लचके तोडतच होता. रोज रोज होणारे अत्याचार मला सहन होत नव्हते. मी दोनदा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण शेखच्या माणसांनी मला पकडून पुन्हा त्या घरात कोंडून ठेवलं. त्यानंतर बरेच दिवस शेखच्या माणसांनी मला अन्नपाण्यावाचून उपाशी ठेवलं. मी पाण्यावाचून तडफडत होते पण त्यांना माझी दया आली नाही; पण म्हणतात ना! देव कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला भेटतो आणि आपल्याला संकटातून सुखरूपपणे बाहेर काढतो. त्या कनिजांमध्ये एक कनीज होती. तिचं नाव शबनम होतं. शबनमला माझ्याबद्दल वाईट वाटत असावं. ती मला चोरून बदाम अक्रोड खायला देत असे. माझे हाल पाहून तिच्या डोळ्यात पाणी यायचं पण तीही असाह्य होती. माझे हाल ती थांबवू शकत नव्हती. नंतर तिच्याकडूनच मला समजलं की, माझं आणि शेखचं लग्न झालेलं नाही. त्याने फक्त व्हिडिओ काढण्यासाठी कानिजांना मला दुल्हनच्या लिबासमध्ये तयार करायला सांगितलं होतं. मला फसवण्यासाठी शेखने मुद्दाम हा कट रचला होता. आणि मग एक दिवस शबनमने मला तिथून पळून जायला मदत केली. मध्यरात्री शेखची सर्व माणसं झोपलेली असताना दबक्या पावलांनी ती माझ्या खोलीत आली. त्या घरात एका भिंतीवर चार फूटाच्या उंचीवर एक भलं मोठं पोस्टर होतं. शबनम तिथल्या उंच टेबलावर चढली आणि ती सावकाश बावर्चीखान्यातल्या छोट्या चमच्याने त्या पोस्टरचे स्क्रू काढू लागली. काय आश्चर्य! बाहेर जाण्यासाठी खिडकीच्या आकाराची जागा उघडी दिसली. तिने माझ्या अंगावर तिच्या जवळचा बुरखा चढवला आणि मला मिठी मारत माझ्या कानात हळूच कुजबुजली. तिला हिंदीत बोलताना पाहून मला नवल वाटलं. मग तिनेच ती भारतीय असल्याचं सांगितलं.

“बहन, भाग जाओ, इस छोटी खिडकीसे निकल जाओ। यहाँ रहोगी तो एक दिन मर जाओगी। नही तो ये शेख तुम्हे किसी अमीर अरबको बेच देगा। जाओ बहन, जल्दी करो, भागो वरना कोई आ जायेगा। खुदा हाफिज।”

माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी कृतज्ञपणे तिच्यासमोर हात जोडले. त्या छोट्या खिडकीतून मी बाहेर उडी टाकली आणि तिथेच आडोश्याला बसून राहिले. धपकन काही पडल्याचा आवाज झाला. त्या आवाजाने दारावर पहारा देत बसलेली अर्धवट झोपेत असलेली शेखची माणसं जागी झाली आणि ती धावत घराच्या मागे आली. त्यांनी आजूबाजूला चौफेर नजर फिरवली पण तिथे कोणीच दिसलं नाही.

“अबे कोई नही, बिल्ली या कुत्ता होगा। चिंता करने की कोई बात नही। चलो आगे नजर रखते है।”

त्यांच्यातला कोणीतरी म्हणाला. ते सर्वजण पुढे जाऊन दारात उभे राहिले. थोडा वेळ गेल्यावर मी घराच्या त्या भिंतीकडे पाहिलं. शबनम पुन्हा ते पोस्टरचे स्क्रू पूर्वीसारखे लावून ठेवत होती. सगळं शांत झालं आणि मी तिथून निसटले. जीवाच्या आकांताने वाट फुटेल तिकडे पळू लागले. उंचच्या उंच पसरलेले वाळवंट पार करत मी नुसती चालत राहिले. चालता चालता मी मुख्य रस्त्याला लागले. एका ट्रकवाल्याला हात केला. आणि त्याला कुवेत एअरपोर्टला जायचंय असं सांगितलं. त्यांनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिलं. दोघं त्यांच्या भाषेत काहीतरी बोलत होते. मला समजत नव्हतं. त्यांनी मला गाडीत मागे बसायला सांगितलं. मी ट्रॅकच्या मागच्या बाजूला जाऊन बसले. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मला त्यांची शंका येऊ लागली. पुन्हा नवीन संकटाची चाहूल लागली. काहीतरी भयंकर घडणार असं वाटू लागलं.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©अनुप्रिया.

🎭 Series Post

View all