अथांग.. भाग १३

ही कथा एका मुलीची. तिच्या असामान्य लढ्याची.
अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
अंतिम फेरी
कथेचे नाव:- अथांग.
© अनुप्रिया.

अथांग.. भाग - १३

“केदार, तू खरंच आलास? मी स्वप्नात तर नाही नं? माझी तर तुला भेटण्याची आशाच संपून गेली होती रे! केदार, कुठे गेला होतास? मी किती आवाज दिला तुला! किती रडले मी! आक्रोश केला, तुझ्या नावाचा धावा केला पण तू आलाच नाहीस. त्या दिवशी तू मला म्हणाला होतास, आली मोट्ठी, घाबरत नाहीस म्हणे! बघूया घोडं मैदान समोरासमोर आहेचं. मी सोडून जातोच एकदा, मग नंतर रडत बसू नकोस, मला आवाज देऊ नकोस; पण केदार मी खरंच खूप घाबरले होते रे! तुझ्याशिवाय मी कशी जगले असेन माझं मलाच ठाऊक!”

सान्वीचे डोळे निरंतर वाहत होते. केदारचे डोळेही वाहू लागले होते. केदारने तिला शांत व्हायला सांगितलं.

“सानू, आता मी आलोय नं? आता तुला काही होणार नाही. मी तुला काही होऊ देणार नाही पण मला सांग, तू अचानक कुठे गायब झालीस? इतके दिवस तू कुठे होतीस? आणि ती व्यक्ती?”

“सांगते, सगळं सांगते केदार.”

तिने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि बोलायला सुरुवात केली. तुला आठवतं? आपण दोघं त्यादिवशी शेखच्या त्या पॅलेसवर गेलो होतो. केदार, तीच आपली खूप मोठी चुक होती. आपण तिथे जायलाच नको होतं. त्यानेच आपल्याला फसवलं.“

असं म्हणून सान्वी बोलू लागली. साऱ्या घटना तिच्या डोळ्यासमोर फेर धरू लागल्या. डोळे बरसत होतेच पण त्याचबरोबर ती भीतीने थरथरतही होती.

“केदार, त्यादिवशी आपण दोघं त्या समारंभाला शेखच्या घरी गेलो. तू शेखसोबत बाहेर हॉलमध्ये गेलास आणि ती कनिज मला पॅलेसच्या मागच्या बाजूने आत घेऊन गेली. अरुंद, अंधुकशा गल्लीतून आम्ही आत जात होतो. दोन्ही बाजूनी पिवळ्या रंगाचे मंद दिवे जळत होते. एक वेगळाच सुगंध दरवळत होता. ती स्त्री मला जनानखान्यात घेऊन आली. तो एक मोठा हॉल होता. चारी बाजूनी बसण्यासाठी बैठकीची सोय केली होती. मोठ्या टेबलावर खाण्याची वस्तू, फळं, सुखामेवा, उंची सरबते मांडली होती. तिथल्या दालनात मध्यभागी मांडलेल्या मोठ्या खुर्चीत एक गोऱ्या रंगाची एक जाड स्त्री बसली होती. तिथे येताच त्या स्त्रीने त्या जाड बाईला सलाम केला. तिने इशाऱ्यानेच कनिजला खोलीबाहेर जायला सांगितलं तशी ती झुकून सलाम करत खोलीबाहेर निघून गेली. आतमध्ये बसलेल्या बायकांनी आपला बुरखा काढून ठेवला होता. इतक्यात ती स्त्री माझ्याकडे पाहून मला म्हणाली,

“सलाम वालेकुम मोहतरमाँ, व अहलन व सहलन (माझ्या लाडके, नमस्कार, तुझे इथे स्वागत आहे.) हम हमीदा शेख, सुलतान की पहली बीवी और बाकी जो बैठी है वोभी उनकी बीवीयां है। अब आप अपना हिजाब निकाल दिजीये। यहाँ हम सब जनानीयांही है। कोई मर्द आदमी नही है। बेफिक्र रहिये।”

मी चौफेर नजर फिरवली. आत सगळ्या बायकाच होत्या. साऱ्यांनी आपला बुरखा काढून ठेवला होता. मग मीही माझा बुरखा काढला तशी हमीदा उद्गारली.

“या हबीबती, सुभानअलाह, क्या रूप पाया है!”

हमीदा मला अलिंगन देत होती. माझ्या गालावर गाल चोळत. गालावर चुंबन घेत होती. मला खूपच अवघडल्यासारखं झालं. मी हसून तिच्या मिठीतून स्वतःची सोडवणूक करत त्या सर्वांना नमस्कार केला आणि तिथेच एका खुर्चीत बसले. तिने मला खाण्यासाठी एका मोठ्या परातीत काही फळं आणि सुका मेवा मांडून ठेवला. नंतर त्याच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांची भाषा मला मुळीच समजत नव्हती; पण मला उगीच वाटलं की, त्या माझ्याकडे फारच विचित्र नजरेने बघून कुजबुजत आहेत. पण मग मी विचार केला, माझाच भ्रम असेल म्हणून मी शांत बसून राहिले. त्यानंतर मग सर्वांची जेवणं सुरू झाली. सर्वजण दावतचा छान आस्वाद घेत होते. हसणं खिदळणं सुरू होतं. थोड्या वेळात सर्वांची जेवणं झाली आणि बायका त्यांच्या खोलीत जाऊ लागल्या. मीही उठून उभी राहिले आणि खोलीच्या बाहेर जाऊ लागले. इतक्यात हमीदाने मला रोखलं. टाळी वाजून तिने दासीला बोलवून घेतलं.

“मोहतरमाँ, आप बेइंतिहा खुबसूरत हो। इसलिये तो हमारे सुलतानका दिल आप पर आया है और आपको हिंदुस्थानसे यहाँ अरबस्थानमें लाया गया है। अब आप हमारे साथही रहेंगी। बहुत जल्दही सुलतान आपसे निकाह कर लेंगे और आप इस परिवार का हिस्सा बनेगी।”

मला तिचं बोलणं नीट समजलं नाही.

“मतलब? हमारे शोहर बाहर बैठे है। इंतजार कर रहे होंगे। अब हमे चलना चाहिये।”

असं म्हणून मी घाईने बाहेर पडणार इतक्यात त्या कनीज स्त्रियांनी मला घट्ट धरून ठेवलं आणि माझे हातपाय बांधले. मी ओरडू नये म्हणून माझ्या तोंडात कापडी बोळा कोंबण्यात आला आणि माझं तोंड बांधून टाकलं. माझ्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. त्यानंतर त्या मला ढकलत ढकलत खोलीबाहेर घेऊन आल्या असाव्यात; कारण मला बाहेरचे आवाज ऐकू येत होते. अचानक गाडीचं दार उघडल्याचा आवाज आला मला काही कळायच्या आतच त्यांनी मला गाडीत ढकलून दिलं आणि जोरात दार लावून घेतलं. गाडी वेगाने धावत होती. मी सुटण्यासाठी धडपडत होते; पण माझी शक्ती अपुरी पडत होती. मी रडत होते. केदारला हाका मारण्याचा प्रयत्न करत होते; पण तोंडावर पट्टी असल्याने माझा आवाज बाहेर फुटत नव्हता. काय चाललंय मला काहीच समजत नव्हतं. अचानक एका ठिकाणी गाडी थांबली आणि त्या माणसांनी मला गाडीबाहेर काढून फरफटत एका जागी घेऊन गेले. मला जोरात आत ढकलून ते बाहेरून दाराला कुलूप लावून निघून गेले. मी तशीच तिथे पडून राहिले.”

सान्वी बोलता बोलता थांबली. समोर ठेवलेल्या ग्लासातलं पाणी घटघटा प्यायली. सगळेजण स्तब्ध होऊन तिची थरारक कहाणी ऐकत होते. ती पुढे सांगू लागली.

“दुसऱ्या दिवशी त्या बंद खोलीचं दार उघडलं गेलं. दोन चार माणसांच्या पावलांचा आवाज माझ्या कानावर पडला. त्यांनी दार लावून घेतलं. त्यातल्या एकाने माझ्या डोळ्यावरची पट्टी बाजूला केली. डोळ्यावर अचानक आलेल्या प्रकाशामुळे माझे डोळे आपोआप दिपले गेले. मी सावकाश डोळे उघडून पाहिलं, आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्यासमोर रजाक शेख उभा होता. माझ्याकडे वखवखल्या नजरेने पाहत होता. तो माझ्या जवळ आला. त्याची घाणेरडी नजर माझ्या सर्वांगावर फिरत होती. माझ्या अंगावरून हात फिरवत तो छद्मी हसत म्हणाला,

“मोहतरमाँ, हम कबसे तुम्हारा दिदार कर रहे थें। बडी खुबसूरत हो तुम। हमने उस दिन हॉस्पिटलमें तुम्हे देखा और तुम्हारे हुस्नके हम दिवाने हो गये। हमने उसी दिन फैसला किया था, किसीभी हालातमें हम तुम्हे अपना बनाकरही रहेंगे। और आखिर तुम हमारे शिकंजेमें आ गयी। तुम्हारे बेवकूफ शोहरको धोकेसे यहाँ कुवेत बुलाना ये हमारीही साजिश थी। वो उसकी कंपनी, वो इंटरव्हिव सब नकली था। धोकेसे उसे यहाँ बुलाना, तुम्हारे रहने का इंतिजाम, दावत का निमंत्रण, तुम्हे जनानखानेमें भेजना ये सब हमारे प्लॅन का हिस्सा था। हमने उसी दिन तुम्हारे बेवकूफ शोहर को धक्के मारकर हमारे घरसे निकाल दिया। हम तुमसे निकाह करके अपनी बेगम बनाना चाहते है। हम तुम्हे हर तरह का आराम देंगे। दौलत, गाडी बंगला, दासदासीयां तुम्हारी सेवामें हाजीर होंगी। आ जाओ हमे खुश करो। तुम्हे पानेकी तमन्ना पूरी करो। ये खुबसूरती हमे चखने दो। हमारी बात मान लो, इसमेही तुम्हारी भलाई है। समझ गयी? हम कनिजको भेजते है। वो तुम्हे अच्छेसे तैयार करेगी।”

मी काही बोलण्याचा प्रयत्न करतेय हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने माझ्या तोंडातला कापडी गोळा बाहेर काढला तशी मी जोरात ओरडले.

“नीच माणसा! अरे आम्ही तुला माणुसकीच्या नात्याने मदत केली आणि तू काय करतोयस? लाज कशी वाटत नाही तुला? पाहुण्यांना घरी कार्यक्रमाला बोलवून त्यांच्याशी असा वागवतोस? कुठे फेडशील हे पाप? शेख, मुझसे दूर रहो। मै शादीशुदा हूँ। केदार तुम्हे छोडेगा नही। वो जरूर मुझे ढुंढ लेगा। गपगुमान मला सोड नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. सांगून ठेवते तुला.”

माझ्या बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. त्याने कनिजांना बोलवून घेतलं आणि मला तयार करायला सांगितलं. मी विरोध करत होते. ते पाहून त्यांच्यातली एक स्त्री माझ्यावर खूप संतापली आणि तिने माझ्या कानाखाली एक लगावून दिली तशी मी बेशुद्ध झाले.”

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©अनुप्रिया.

🎭 Series Post

View all