Feb 25, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

अथांग.. भाग १२

Read Later
अथांग.. भाग १२
अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
अंतिम फेरी
कथेचे नाव:- अथांग..
© अनुप्रिया..

अथांग.. भाग - १२


केदार आत आला. सैरभैर नजरेने तो घराकडे पाहू लागला. रस्त्यात घरी पोहचेपर्यंत एका शब्दानेही तो कोणाशीही बोलला नव्हता. जणू काही हा देश, हे शहर, त्याचं घर आणि त्याचे आईबाबासुद्धा आता त्याला अनोळखी वाटू लागले होते. एका नवख्या जगात तो वावरत होता. सर्वस्व हरवलेल्या, भेदरलेल्या कोकरासारखी त्याची अवस्था झाली होती. थोड्याच वेळात केदार फ्रेश होऊन बाहेर हॉलमध्ये येऊन बसला. आईने पटकन सर्वांसाठी चहा आणि कांदेपोहे बनवले. कोणीच काही बोलत नव्हतं. सर्वजण गुपचूपपणे नाष्टा करत होते. कसेबसे दोन घास पोटात ढकलून तो आराम करण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. त्याला असं तडक उठून गेलेलं पाहून केदारची आई काळजीने म्हणाली,

“किती सुकलंय माझं बाळ! आणि किती शांत झालाय नं? काय त्याच्या मनात सुरू आहे देव जाणो! मला तर खूप काळजी वाटू लागलीय ओ. आपण त्याला चांगल्या डॉक्टरांना दाखवूया का?”

“अगं काहीही काय बोलतेय! किती मोठ्या धक्यातून गेलाय तो! सावरायला थोडा वेळ तर लागेलच ना? तू त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दे. हळूहळू त्याची गाडी रुळावर येईल. तू काळजी करू नकोस.”

केदारचे बाबा समजावणीच्या सुरात म्हणाले. ‘केदारला सावरायला वेळ द्यायला हवा.’ हे त्यांचं म्हणणं केदारच्या आईला पटलं. केदार मात्र वेगळ्याच विश्वात गुंग झाला होता. कायम स्वतःच्या बंद खोलीत, कसल्यातरी विचारात, एकटक शून्यात नजर, मनावर प्रचंड दडपण असल्यासारखं वागत होता. रात्री अचानक झोपेतून सान्वीच्या नावाने ‘सानू सानू‘ करत ओरडत उठायचा. कधी कधी चार चार दिवस काहीच बोलायचा नाही आणि कधी जर बोलायला लागला तर असंबंध एकटाच बडबडत राहायचा. कधी मोठमोठ्याने रडायचा तर कधी उगीच भ्रमिष्टासारखा हसत सुटायचा. ना त्याला खाण्यापिण्याचं भान होतं; ना अंगावरच्या कपड्यांची काळजी. केदारचे आईबाबा त्याला त्याच्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. केदारच्या मनाप्रमाणे वागत होते पण त्याची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली होती. अखेर एक दिवस केदारचे बाबा स्वतःहूनच केदारच्या आईला म्हणाले,

“तू म्हणत होतीस तेच बरोबर होतं. केदारला खरंच मानसोपचाराची गरज आहे. लवकरात लवकर आपल्याला त्याच्यावर उपचार करण्याची गरज आहे. आपण उद्याच मनसोपचारतज्ञाकडे जाऊया. त्यांच्या उपचारानेच हा बरा होईल.”

केदारच्या बाबांचा स्वर पोटच्या गोळ्यासाठी हळवा झाला.

“एवढा रुबाबदार, देखणा, अतिशय हुशार मुलगा, त्याच्या असण्याने कायम घरात सळसळतं चैतन्य असायचं आणि आता बघा काय त्याची अवस्था झालीय. खरंच आहे ते म्हणतात ना, एखादी मुलगी जेंव्हा सुन बनून घरी येते तेंव्हा एकतर त्या घराचा स्वर्ग होतो किंवा मग उभ्या घराचा सत्यानाश तरी होतो.”

आईचा जीव कळवळला. दुसऱ्या दिवशी केदारचे आईबाबा केदारला घेऊन डॉक्टर नाडकर्णी यांच्याकडे आले. ते खूप मोठे नावाजलेले मानसोपचारतज्ञ होते. केदारची ट्रीटमेंट सुरू झाली. औषधोपचारासोबत वेगवेगळ्या थेरेपीज घेतल्या, दोन चार सेशननंतर हळूहळू केदार त्यांच्या ट्रीटमेंटला प्रतिसाद देऊ लागला. मनातल्या कप्प्यात दडून राहिलेल्या गोष्टी तो डॉक्टरांना सांगू लागला. हळूहळू केदारची प्रकृती सुधारत होती. सारं काही पूर्वपदावर येऊ लागलं होतं.

आणि एक दिवस केदारच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने हॅलो म्हणताच समोरून रडण्याचा आवाज आला.

“केदार, मला वाचव. प्लिज मला इथून घेऊन जा. या नरकवासातून माझी सुटका कर. प्लिज केदार.”

ते ऐकून केदार स्तब्ध झाला. कॉलवर सान्वी रडत होती. मग कोणीतरी तिच्या हातातून फोन घेतला आणि बोलू लागले.

“हॅलो केदार, मी आशिष दुबे. तुमची पत्नी सान्वी सापडली आहे.”

तिकडून इंडियन एम्बेसी ऑफिसर आशिष दुबे बोलत होते.

“काय? काय सांगताय? बाबा..”

केदारच्या तोंडातून इतकेच उद्गार बाहेर पडले आणि तो मटकन खाली खुर्चीत बसला. त्याचा कापरा स्वर ऐकून आई बाबा धावतच त्याच्याजवळ आले.

“केदार बाळा, काय झालं? कोणाचा कॉल आहे.”

आईने केदारची भीतीने गाळण उडालेली अवस्था पाहून विचारलं. बाबांनी पटकन त्याच्या हातातला मोबाईल घेतला आणि बोलायला सुरुवात केली.

“हॅलो, कोण बोलतंय?”

“मी आशिष दुबे, कुवेतवरून इंडियन एम्बेसी ऑफिसर. आपण कोण?”

“मी केदारचा बाबा बोलतोय. काय झालंय?”

केदारच्या बाबांनी घाबरून विचारलं.

“केदारची पत्नी सान्वी आम्हाला सापडली आहे पण एकंदरीत परिस्थिती पाहता आता तुम्हाला सगळं फोनवर सांगणं कठीण आहे. तुम्ही इकडे या. इथे आल्यावरच तुम्हाला सगळी परिस्थिती समजेल. मी तुमची कुवेतला येण्याची सगळी सोय करतो. तुम्ही लवकरात लवकर या.”

आशिष यांनी सान्वी भेटल्याची खबर त्यांना सांगितली. थोडा वेळ बोलून त्यांनी कॉल कट केला. सान्वी सापडल्याची बातमी ऐकून केदार स्तब्ध झाला. त्याला क्षणभर काहीच समजत नव्हतं.

“काही गरज नाही कुठे जायची. तिच्यामुळे माझ्या सोन्यासारख्या पोराच्या आयुष्याची वाट लागली. आता मी माझ्या लेकाला कुठेच जाऊ देणार नाही. समजलं?”

केदारच्या आईने तिचा निर्णय स्पष्टपणे सांगितला. इतक्यात केदार खुर्चीतून उठला आणि म्हणाला,

“नाही आई, मी कुवेतला जाणार. सान्वीला भेटून ती माझ्यासोबत अशी का वागली? हे मला तिला विचारायचंय. मी तिकडे जाणारच.”

आईने आश्चर्यचकित होऊन केदारच्या बाबांकडे पाहिलं. त्यांनी खुणेनेच तिला शांत बसायला सांगितलं.

“ठीक आहे केदार, तुला तसं वाटत असेल तर जायलाच हवं. तिला जाब विचारणं गरजेचंच आहे.”

केदारने मान डोलावली. त्याच दिवशी केदार रात्रीच्या फ्लाईटने कुवेतला पोहचला. पुन्हा एकदा त्या अनोळखी शहरात पाऊल टाकताना केदारच्या जीवाचा थरकाप उडाला. त्याचे हातपाय लटपटू लागले. रखरखत्या उन्हातही त्याच्या डोळ्यासमोर भीतीचं सावट पसरलं होतं. एअरपोर्ट पोहचल्यावर युसूफ केदारला घ्यायला आला होता.

“सलामवालेकुम भाईजान.”

युसूफ केदारची गळाभेट घेत म्हणाला. नमस्कार करत केदारने त्याला कुवेतमध्ये येण्याचं प्रयोजन सांगितलं होतं. युसूफ केदारला घेऊन आपल्या घरी आला. त्याच्या बायकोने त्यांचं छान आदरतिथ्य केलं. युसूफने केदार त्याच्या मायदेशी, घरी परत गेल्यानंतर त्याच्या बायकोला केदारची वेदनादायी कहाणी सांगितली होती. केदारसाठी तिलाही खूप वाईट वाटत होतं.

“युसूफ, लवकरात आपल्याला इंडियन एम्बेसीच्या ऑफिसला पोहचायला हवं. ती अशी का वागली? तिने माझा विश्वासघात का केला? याचा जाब मला तिला विचारायचा आहे.”

केदारच्या मनात तिच्याविषयी राग, संताप आणि चीड साऱ्या भावना उफाळून येत होत्या. थोड्याच वेळात युसूफच्या टॅक्सीतून केदार आणि युसूफ इंडियन एम्बेसीच्या ऑफिसला पोहचले. ऑफिसर आशिष त्यांच्या येण्याची वाटच पाहत बसले होते. ते दोघे आशिष यांच्या केबिनमध्ये आले. आशिष यांनी त्यांना बसायला सांगितलं. त्यांचा चेहरा काहीसा चिंतीत वाटत होता. त्यांनी दीर्घ श्वास घेत बोलायला सुरुवात केली.

“मिस्टर केदार, आता मी जे सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. तुमच्या पत्नी सान्वी आम्हाला दोन दिवसापूर्वी ऑफिसच्या गेटबाहेर बेशुद्ध अवस्थेत सापडल्या. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. आमच्या इथल्या सहकारी स्टाफने त्यांना आत आणलं डॉक्टरांना बोलावून त्यांच्यावर ट्रीटमेंट केली. आता त्या ठीक आहेत. तुम्ही त्यांना भेटू शकता.”

असं म्हणत त्यांनी त्यांच्या असिस्टंटला आत बोलावून घेतलं आणि ते त्या तिघांना शेजारच्या खोलीबाहेर घेऊन आले. दार पुढे ढकललं गेलं. समोरचं दृश्य पाहून केदार जागच्या जागी थबकला. एक कृष झालेली स्त्री बेडवर बसली होती. अंगावर मळकट, फाटलेला जीर्ण झालेला पायापर्यंत घोळदार असलेला काळा झगा, चेहरा काळवंडलेला, पिंजारलेले केस, शून्यात हरवलेले तिचे निस्तेज डोळे, हातापायावर काळे निळे डाग पाहून तो भयभयीत झाला. तो थोडा पुढे येऊन निरखून पाहू लागला.

अरे, ही तर सान्वी! अशी का दिसतेय? काय झालंय?”

असं म्हणत तो सान्वीच्या जवळ आला आणि त्याने सान्वीच्या खांद्यावर हात ठेवला. तशी ती जोरजोरात ओरडू लागली. मोठमोठ्याने रडू लागली.

“दूर हो माझ्यापासून. सोड मला. नको, प्लिज नको. केदार.. केदार वाचव मला. कुठे आहेस केदार?”

ती उद्विग्न झाली होती. केदारला दूर ढकलून देत ती बेडवरून उठून एका कोपऱ्यात जाऊन बसली. ती प्रचंड घाबरलेली होती. तिची ती अवस्था पाहून ती अशी का वागतेय केदारला काहीच समजत नव्हतं. तिच्या भेदरलेल्या वागण्याने सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. केदारचा राग, संताप, चीड सारं एका क्षणार्धात गळून पडलं. त्याचे डोळे पाण्याने डबडबले. तो सावकाश सान्वीपाशी गेला. तिचा हात हातात घेत म्हणाला,

“सानू, मी केदार. बघ मी आलोय ना! आता तू अजिबात घाबरू नकोस. तुला काही होणार नाही. शांत हो शोना. प्लिज, ये माझ्या कुशीत ये.”

सान्वीने डोळे किलकीले करून त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर हळूहळू आनंद पसरू लागला. तिने केदारला ओळखलं होतं.

“केदार, तू खरंच आलास? केदार, माझा केदार.”

असं म्हणत तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि ती रडू लागली. केदार तिच्या केसांवरून हात फिरवत तिला गोंजारत होता. त्याने तिला रडू दिलं. तिला शांत होऊ दिलं. ती शांत झाल्यावर तिथल्या लेडी ऑफिसरने पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरला. पाणी प्यायल्यावर तिला थोडं बरं वाटू लागलं. केदारने तिला जागेवरून उठवून बेडवर बसवलं आणिकाय तो तिच्या शेजारी बसला. सान्वीने बोलायला सुरुवात केली.

पुढे होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
© अनुप्रिया.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

निशा थोरे (शिवप्रिया - शब्दस्पर्श)

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.

//