Login

अथांग.. भाग ११

ही कथा एका मुलीची. तिच्या असामान्य लढ्याची.
अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
अंतिम फेरी
कथेचे नाव:- अथांग..
© अनुप्रिया..

अथांग.. भाग - ११

“व्हॉट ईज धिस मिस्टर केदार? आपने हम सबको गुमराह करने की कोशिश की है। ये देखिये केदार साहब, आपके बीवीके कारनामे।”

असं म्हणत आशिष यांनी काही फोटोज त्याच्या दिशेने टेबलावर भिरकावले. केदारने त्यातला एक फोटो उचलून पाहिलं आणि त्याचा चेहरा एकदम पांढरा फटफटीत पडला. सान्वी एका पुरुषाच्या बाहुपाशात दिसत होती. अंगावर लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेला होता. त्याच्या हातातून फोटो गळून पडला.

“नाही सान्वी असं करू शकत नाही. माझी सानू अशी नाही.”

केदारच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने पटापट दुसरे फोटो उचलून पाहिले. ती सान्वीच होती. त्यानंतर इब्राहिमने खिश्यातून मोबाईल बाहेर काढला आणि त्याने एक व्हिडिओ दाखवला. त्यात सान्वीचा निकाह समारंभ सुरू होता. ती वधूच्या वेषात होती. केदारच्या हातापायातलं अवसान गळून गेलं. कोणीतरी उंच कड्यावरून कडेलोट करावा आणि कपाळमोक्ष व्हावा असं त्याला वाटून गेलं. काय बोलावं त्याला काहीच सुचत नव्हतं. एकदम त्याला शेखच्या जनानखान्यात जाताना तिचं मागे वळून पाहताना गूढ हसणं आठवलं.

“हे सगळं पूर्वनियोजित होतं? शेखच्या घरी जाताना तिला आलेला कॉल आणि तिने मला हसून खोलीबाहेर जायला सांगितलं होतं. अक्षरशः ढकलून दिलं होतं.”

नाना विचार केदारच्या मनात घोळू लागले. इतक्यात आशिष म्हणाले,

“मिस्टर केदार, मला वाटतं, आतापर्यंत ही संपूर्ण केस तुमच्या लक्षात आलीच असेल. तुमच्या पत्नीने अन्सारीसोबत मिळून हे सगळं कारस्थान केलंय. त्या आधीपासूनच अन्सारीला ओळखत होत्या. हा कट भारतातच शिजला होता. तुम्हाला कुवेतमध्ये चांगल्या पगाराची नोकरीची ऑफर येणं, तुम्ही तुमच्या पत्नीसोबत कुवेतला येणं हा सुद्धा त्याच कटाचा एक भाग असू शकतो. तुमच्या पत्नीनेच तुम्हाला फसवलं आहे. आता केस पुढे वाढवण्यात काय अर्थ? त्यांना शोधण्याचा प्रयत्न करणं खरंच गरजेचं आहे का?”

केदारचे डोळे आपोआप वाहू लागले. तो ढसाढसा रडू लागला. युसूफने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. युसूफलाही त्याची ती अवस्था पाहून वाईट वाटत होतं. केदारच्या हातावर हलकेच थोपटत आशिष पुढे म्हणाले,

“मिस्टर केदार, तुमच्या सोबत जे घडलं ते फार वाईट होतं पण आता ते सारं तुम्हाला स्वीकारायला हवं. एक भयाण स्वप्न म्हणून विसरून जायला हवं. मला वाटतं, आता तुम्ही इथे राहून काहीच उपयोग नाही. पैसा, वेळ आणि शक्ती सगळं वाया घालवण्यासारखं आहे. तुम्ही आपल्या मायदेशी, भारतात परत जा. आपल्या नातेवाईकांत राहिलात तर तुम्हाला हे सगळं विसरण्यात मदत होईल.”

“जी हाँ सर, आशिष सर बिलकुल सही फर्मा रहे है।
घटी हुई इन सब बातोंको भूल जानाही आपके लिए बेहतर होगा। सर, आप चिंता मत किजीये, केदार साहब हमारे देश के मेहमान है। इनका खयाल रखना और सहीसलामत अपने देश छोडना ये हमारी जिम्मेदारी है। हम खुद इन्हें एअरपोर्ट तक छोडने जायेंगे।”

इब्राहिम केदारला सहानुभूती दाखवत म्हणाला. केदारला काय बोलावं समजत नव्हतं. आशिष यांनी युसूफला खुणावलं. त्याने मान डोलावली.

“चलो भाई, निकलते है।”

असं म्हणत युसूफने केदारचा हात पकडून त्याला एम्बेसी ऑफिसच्या बाहेर आणलं आणि आपल्या टॅक्सीत बसवून केदारला घरी घेऊन आला. केदारला फ्रेश व्हायला सांगून तो नमाजासाठी त्याच्या खोलीत गेला. थोड्याच वेळात दोघेही बाहेर येऊन बसले. युसूफच्या बायकोने दोघांसाठी जेवण वाढलं. केदारची जेवणाची मुळीच इच्छा नव्हती. युसूफच्या आग्रहाखातर त्याने कसेबसे दोन घास पोटात ढकलले आणि तो त्याच्या खोलीत जाऊन आडवा झाला. झोप लागत नव्हती. मनात सान्वीच्या आठवणी पिंगा घालत होत्या. बंद डोळ्यातून आपोआप पाणी झरू लागलं.

“खरंच सान्वी अन्सारीबरोबर पळून गेली असेल? रजाक शेखने पळून जाण्यासाठी तिला मदत केली असेल? पण तिचं माझ्यावर प्रेम होतं नं? माझी सौदी अरेबियामध्ये नोकरीची संधी मिळणं हे पण त्या गेमचा एक भाग होता? तिने मला फसवलं?”

प्रश्नांचा ससेमिरा केदारच्या मागे लागला होता. काही आठवणी मनात रुंजी घालू लागल्या. सान्वीला पसंत केल्यानंतर त्या दोघांनी एकदा एकांतात भेटायचं ठरवलं होतं.

“किती रम्य संध्याकाळ होती ती! आणि सान्वीही किती गोड दिसत होती! ”

तो स्वतःशीच पुटपुटला. तिचं लाजणं, तिचं ते मधाळ हसू आणि तो तिचा तिरपा दृष्टिक्षेप सारं त्याला आठवलं.

“केदार, आपण एका नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहोत. आपल्यातलं नातं पारदर्शी राहावं असं मला वाटतं. उद्या जाऊन आपल्यात कोणतंही वितुष्ट यायला नको. त्यामूळे नवीन नात्याला सुरुवात करण्याआधी मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत.”

तिने दीर्घ श्वास घेतला. एक आवंढा गिळत पुढे बोलायला सुरुवात केली.

“कॉलेजमध्ये असताना माझं एका मुलावर खूप प्रेम होतं. आम्ही लग्नही करणार होतो पण आमच्या घरच्यांना आमचं लग्न मान्य नव्हतं. आमचे धर्म वेगळे होते. त्यामूळे आम्ही समंजसपणे ब्रेकअप केला. आधी त्याची खूप आठवण यायची. मी खूप चिडचिड करायचे पण त्यानेच समजावलं, कधीकधी काही गोष्टी नशिबात नसतात म्हणून संपूर्ण आयुष्य झुरत राहायचं का? नाही ना! मग मीही आहे त्या परिस्थितीचा स्वीकार केला. तोही परदेशात सेटल झाला. आता तो माझ्या आयुष्यात नाही. मी तुला वचन देते, ‘माझ्या भूतकाळातल्या कोणत्याच गोष्टीचा आपल्या वर्तमानावर कधीच परिणाम होणार नाही. तो माझा भूतकाळ होता आणि केदार, तू माझा वर्तमान आणि भविष्यही. तो भूतकाळ मी केंव्हाच मागे टाकला आहे. तुझ्यासोबत मला नव्याने सुरुवात करायची आहे. केदार, मला साथ देशील ना? माझ्यासोबत कायम राहशील ना?”

सान्वीने डोळ्यात पाणी आणून विचारलं होतं आणि केदारनेही तिच्या भूतकाळासकट तिचा स्वीकार केला. आज त्याला सान्वीची आणि त्याची पहिली भेट आठवली. आणि त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.

“म्हणजे ‘अन्वर अन्सारी’ हा तर सान्वीचा एक्स बॉयफ्रेंड नसेल? तो परदेशात सेटल झाला असं सान्वी म्हणाली होती. धर्म वेगळे म्हणजे तो मुस्लिम? ओह्ह माय गॉड! किती सहज फसवलं तिने मला!“

केदारच्या मनातल्या सान्वीबद्दलच्या प्रेमाची जागा आता रागाने, संतापाने घेतली होती. तिचे फोटो, इब्राहिमने दाखवलेला व्हिडिओ पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागला. संशयाने त्याच्या मनावर, डोक्यावर हृदयावर संपूर्णपणे ताबा मिळवला होता.

“अशा स्त्रीसाठी मी जीवाचं रान करत होतो. जीवाच्या आकांताने तिला शोधण्यासाठी धडपडत राहिलो. तिने मला फसवलं. माझ्या प्रेमाचा तिने अपमान केला. आपल्या बॉयफ्रेंडसोबत ती मला एकट्याला या अनोळखी शहरात खुशाल सोडून गेली? मी तिला शोधण्यासाठी जंग जंग पछाडलं होतं. काय काय सोसलं होतं! पण तेंव्हा ती तिच्या यारासोबत मजा करत फिरत होती. अशा स्त्रीसाठी झुरण्यात काय अर्थ आहे! आता इथे राहण्यात राहण्यात काहीच अर्थ नाही. मला परत माझ्या घरी भारतात जावं लागेल. मी उद्याच ऑफिसर आशिष यांच्याशी बोलून घेतो.”

सान्वीने केलेली फसवणूक केदारच्या खूप जिव्हारी लागली होती आणि त्याने परत आपल्या मायदेशी भारतात जाण्याचा पक्का निर्णय घेतला.

दुसऱ्या दिवशी केदार ऑफिसर आशिष आणि इब्राहिमला भेटला आणि त्याने भारतात परत जाण्याचा निर्णय त्यांना सांगितला.

“मिस्टर केदार, तुम्ही परत मायदेशी जाण्याचा निर्णय घेतलात हे छान झालं. जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या कागदपत्राची एकेक झेरॉक्स कॉपी आणि तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स माझ्या सेक्रेटरीजवळ देऊन जा. आम्हाला काही खबर मिळाली तर तुम्हाला नक्की कळवण्यात येईल.”

केदार एखाद्या भ्रमिष्ट्यासारखा सैरभैर नजरेने त्यांच्याकडे पाहत होता. त्याने मान डोलावली. आशिष यांनी त्याचे सगळे डिटेल्स स्वतःकडे ठेवून घेतले. इब्राहिमने एअरपोर्टवरच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून त्याला सुखरूप विमानात बसवण्याचं आश्वासन दिलं. एक दोन दिवसांत केदार भारतात परत जाण्यासाठी निघाला. सर्वस्व गमावलेल्या माणसासारखी त्याची अवस्था झाली होती. इब्राहिम आणि युसूफ त्याला सोडायला विमानातळावर आले होते.

“युसूफ भाई, आपने जो मेरे लिए किया है, उसका एहसान मै जिंदगीभर नही भूल सकता। मै हमेशा आपका शुक्रगुजार रहूँगा। थँक्यू सो मच भाई।“

केदारने कृतज्ञता व्यक्त करत त्याचे आभार मानले. युसूफने त्याची गळाभेट घेतली आणि साश्रुपूर्ण डोळ्यांनी त्याला निरोप दिला. इंडियन एम्बेसी ऑफिसर आशिष यांनी दिल्लीतल्या एम्बेसी ऑफिसला तसेच केदारच्या आईवडिलांना तो भारतात परतत असल्याची बातमी दिली आणि अखेर इब्राहिम आणि युसूफचा निरोप घेऊन केदार भारतात परतला. एअरपोर्टवर केदारचे आईबाबा आणि काही नातेवाईक त्याची वाट पाहतच थांबले होते. केदारला पाहताच आईचा आसवांचा बांध फुटला.

“बाळा..”

असं म्हणत आईने त्याला उराशी घेऊन कवटाळलं. डोळे निरंतर वाहत होते. बाबांनी त्याला जवळ घेतलं.

“देवाचे आभार मानायला हवेत. सौदीत गेलेला माणूस सुखरूप परत येत नाही म्हणे! नशीब आपला केदार सुखरूप आला.”

कोणीतरी म्हणालं.

“पण त्याच्या बायकोचं काय झालं? कुठे गायब झाली? की खरंच पळून गेली?”

पुन्हा कोणीतरी कुजबुजलं. केदारच्या आईने रागाने मागे वळून पाहिलं आणि कठोर शब्दात म्हणाली,

“लोकांना तर काहीपण बोलायला आवडते. दुसऱ्याबद्दल नुसते वेडेवाकडे बोलत रहायचे बस्स! ज्याचं माणूस जातं त्यालाच खरे दुःख होतं. बाकीच्यांना नुसती चर्चा करायला हवी. वेडेवाकडे बोलणाऱ्या निरूद्योगी माणसांना काय महत्व दयायचं? अशी कशी काहीही अफवा पसरवतात? चल केदार आपण आपल्या घरी जाऊ.”

सान्वी गायब झाल्याची बातमी इथे भारतात तो येण्याआधीच धडकली होती. केदारच्या बाबांनी एअरपोर्टवरून घरी जाण्यासाठी टॅक्सी बोलावली होती. घरी पोहचल्यावर केदारच्या आईने दारातच त्याचं औक्षण केलं. मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत भरल्या डोळ्यांनी आई म्हणाली,

“ये बाळा.. ईश्वर तुला सदैव सुखी ठेवो. माझ्या बाळाला, त्याच्या सुखाला कोणाची दृष्ट लागू नये. ये, आत ये.”

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..