रडायच नाही लढायच ३
अशा परिस्थितीत मला दिवस गेले. मला वाटलं आतातरी जाच संपेल. पण तसं काहीही घडलं नाही.
पाहुया पुढे.....
निधीच्या रुपाने एक गोड परी माझ्या आयुष्यात आली. असं वाटलं आता तरी हे सगळ थांबेल पण तसं काहीच घडलं नाही. उलट या सुभानरावाने गोड बोलून माझं घर स्वतः च्या नावावर करून घेतले आणि मला सतत घराबाहेर काढायच्या धमक्या देऊन मला चूप करत होता. मी कुठे जाणार होती ? एवढ्या मोठ्या मुंबईत तुला घेवून घराच्या बाहेर राहणे शक्य नव्हते. माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे चूप राहून मी हे काम स्वीकारले. नंतर विवेकचा जन्म झाला आणि परत पहिले पाढे पंचावन्न अशी माझी अवस्था झाली."
"आई तू काही तरी सत्य सांगणार होतीस ना."
"हो, तू म्हणतेस ना. की हे गलिच्छ काम सोडले का नाही. तर सुभानरावाने मला आणखी एक धमकी दिली होती. जर मी हे काम नाही केले तर ... तो तुम्हा दोघांना मारून टाकेल. कारण त्यांना असं वाटतय की तुम्ही दोघेही माझी मुलं नाही. "
'मग तू पोलिसांकडे का नाही गेली."
"विवेक बाळा तुम्हांला असं का वाटतंय की मी तेही प्रयत्न केला नसेल. पण या मुंबईसारख्या मायानगरीत मी त्याच्या भूलथापांना बळी पडले. अगं, माझ्या कुटुंबाची घडी विस्कटून गेली होती. मी हतबल झाले आणि जे आहे ते स्वीकारले. पण मी आता तुम्हाला इथे ठेवणार नाही. चांगल्या होस्टेलमध्ये तुम्हाला शिकायला पाठवणार आहे."
"पण ते कसं शक्य होईल आई. "
"अगं हा निर्णय मी घेतला आहे. कारण हे जर केलं नाही तर तुझा बाप तुला सुध्दा धंद्यावर बसवून पैसा कमावेल आणि ते मला नको आहे. तुझ्या बापाच्या मनात तुझ्याविषयी आकस आहे ग."
"आई असं जर ते वागले तर मी त्यांचा खून करेल."
"विवेक शांत हो. असा अयोग्य विचार करून आपले आयुष्य बरबाद कशाला करायचे. मी एका एनजीओ संसथेशी संपर्क साधला आहे. आता निधी आणि तुझी परीक्षा झाली की ते तुम्हाला येथून घेऊन जाणार आणि सुरक्षित ठिकाणी ठेवणार . तुम्ही तिथेच राहून पुढचं शिक्षण पूर्ण करायचे. पण तोपर्यंत तुम्ही शांत रहा."
"आई, मला माफ कर. आतापर्यंत आम्ही तुलाच चुकीचे समजत आलो ग."
"अगं निधी रडतेस कशाला? माफी तर अजिबात मागू नको. खरंतर चूक माझीच होती. मी सुरूवातीलाच हे पाऊल उचलले असते. तर आज ही वेळ आली नसती."
'आई, अजुनही वेळ गेली नाही. आम्ही तुझ्या सोबत आहोत. यापुढे आपली एक टीम असेल."
आज संध्याच्या मनावरचं ओझ कमी झालं होतं. मुलांसमोर स्वतः ची आपबिती सांगितली आणि मनातलं साचलेल मळमळ दूर केले होते.
"आई, आता रडायच नाही तर लढायच."
"निधी, आज खरंच मला तुझाअभिमान वाटत आहे ."
तिघेही आनंदाने घरी आले. ठरल्याप्रमाणे सगळ घडत गेलं. सुभानरावाला अडकविण्यासाठी पोलिसांची मदत घेतली आणि गिऱ्हाईक बनून आलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी त्याला पैसे घेतांना रंगेहाथ पकडले."
चौकशी अंती त्याने केलेल्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली. बरेच वर्ष केस चालू होती. पण बरेच पुरावे त्यांच्या विरूध्द असल्याने त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली. पण यावरच तिचा संघर्ष संपला नाही. शेजारी आणि समाजात सगळीकडे तिच्याविषयी माहिती झाले होतेच. पण तिने हार मानली नाही. तिने राहते घर विकले आणि एका चांगल्या वस्तीत घर घेतले. तिथे स्वतःची खानावळ सुरू केली. सुरूवातीला खूप संघर्ष करावा लागला. कारण एकटी स्त्री म्हटली की अवतीभवती मुंगळे जमा होणारच. पण यावेळी ती खंबीरपणे उभी राहिली. निधी बारावीला ९०% पास झाली . इंजिनीअरिंगचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तिने चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. विवेक सुध्दा आता चांगला अभ्यासाला लागला.
खरंतर आज त्यांचे वडील सोबत नव्हते. वडील म्हणजे घराचा पाया, आधार. वडील म्हणजे आभाळासारखे छत्र. वडील म्हणजे सुख दुःखाची नाव आणि या दुःखातून त्यांना सावरायला बरेच दिवस लागले. पण आज ते सुखात आहे. त्यांच कुटुंब अपुर्ण आहे. पण तरीही आनंदी.
आज तिच्या मुलांनी संध्याला रडायला नाही तर लढायला शिकवलं.
समाप्त.
अष्टपैलू स्पर्धा २०२५
अश्विनी मिश्रीकोटकर
अष्टपैलू स्पर्धा २०२५
अश्विनी मिश्रीकोटकर