त्या वळणावर..

Thoughts in mind..


त्या वळणावर...
त्या वळणावर सगळेच चांगले आहे.वळण येईपर्यंत वाट पाहायला हवी. धुकं आणि दुःखं हे क्षणीकच असतं. वाट पाहिली की जातं.
दवबिंदू येतात, ठराविक काळाने जातात, फुलें उमलतात सुगंध देतात आणि निर्माल्य होऊन आपली भूमिका झाली की संपून जातात. माणसांना आपली भूमिका संपली असं वाटतच नाही. भूमिका संपली की अस्तित्व संपतं. आपले अस्तित्व कायम राहावं ही माणसांची इच्छा असते.मन आहे म्हणून मनोव्यापार आहे.
कितीजणांना चांदण्यात फिरतांना हात हातात मिळतो. कितीजणांना मलमली तारुण्य पांघरायला मिळतं. किती जण पहाटे मोकळ्या केसात गुंतण्याचा अनुभव घेतात. चाफा बोलत नाही हे किती जणांनी अनुभवले आहे. त्यासाठी मन शांत हवं. किती जण मनाची स्पंदनं अनुभवली
आतलां आवाज कितीजण ऐकतात.मनात कुणी डोकावतंच नाही, सगळेजण जनात डोकावतात.
नेहमीच तुलनेचे आलेख कामाला येत नाहीत, कधी कधी ते प्रेरणा देतात, कधी कधी ते संपवतात.
कधीकधी वाटतं उध्वस्त झालों, सगळं संपलं, आता काहीच होणार नाही, पण एक दिवस असा येतो, सारा चेहरामोहरा बदलून जातो. होत्याचं नव्हतं होतं.आपल्यालाच कळत नाही, आपण त्याला चमत्कार म्हणतो, पण त्या दिवसाची वाट पाहणं ज्यांना जमलं तेच खरं जीवन जगलें. वाईट दिवस येतच राहतात , चांगल्याची वाट पाहावीच लागतें.
जीवन सुंदर ही असतं, थोडं थांबायचं असतं. प्रतीक्षेत उद्याची पहाट असते. प्रतीक्षा करायला फार संयम लागतों.
आवाक्यातले यश प्रत्येकालाच मिळतें, पण आवाक्याबाहेरचे यश प्रत्येकाला हवें असतं.दुसऱ्यांचे यश मिळवल्याशिवाय माणसे स्वस्थ बसत नाहीत. फोटो फ्रेम मध्ये बंदिस्त करता येतो, माणसांना नाही बंदिस्त करता येत. आठवणींना बंदिस्त करता येतं, वास्तवाचा कोलाज समोर असतांना व हातात विचारांचा ब्रश असतांना, मनात रंगाची उधळण असतांना, कुणाला चित्र हवंहवंसं काढावं वाटणार नाही.
एखाद्या सुंदर पहाटे सगळेच बदललेंल असावं, चाकोरी सोडून आकाशात विहार केल्याप्रमाणे मनसोक्त जगांव. ऐवढंच आकाश आणि एवढंच सुख असतं, असं नव्हे. आकाश मोकळं होणार आणि निरभ्र होणार तोपर्यंत वाट पाहायलाच हवी.
झाले मोकळे आकाश ही अवस्था सुखद असते, मनाचेही तसेच आहे, मन हे जेव्हा मोकळं होतं तेंव्हा मनाचा अनुभव हा प्रत्येकाचा अवर्णनीय असतो. आवाक्याबाहेरचे यश आपल्या पदरात कधीकधी पडतं, पण तें आपल्या क्षमतेची पावती असते. आपल्या क्षमता आपल्यालाच माहीत नसतात, आपलीच माणसें आपल्याला माहित नसतात. माणसात जसे सुप्त गुण असतात तसे क्षमतेत सुद्धा सुप्त गुण असतात. त्यासाठी स्वतःहून उमलायलां शिकायला पाहिजे.आत्महत्या करणारऱ्यांनीसुद्धा आत्महत्या कां करू नये याचे ऑनलाईन क्लासेस घेतलेले आहेत, पण ऑफलाईन मध्ये त्यांनी परिस्थितीपुढे नांगीच टाकलेली असते. संघर्ष माणसांना जिवंत ठेवतो.स्वप्नातही विचार केला नव्हतां, असं जेंव्हा माणसं म्हणतात, तेंव्हा त्यांची स्वप्नंही कोती असतात.
प्रत्येक दिवस वेगळां, प्रत्येक रंग वेगळा, प्रत्येक क्षण वेगळां हे समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक श्वास वेगळा. पहिल्या व अखेरचा श्वासाची नोंद होते.मधल्या श्वासावर आपण हुकूमत गाजवायची असते.
क्षणांना हव्या त्या रंगात बुडवतां आलं पाहिजे.
क्षणांनी आपल्याला बुडवू नये. क्षण एकच पुरेसा असतो प्रेमासाठी, जगण्यासाठी.
एक दिवस मानाचा असतो एक दिवस अपमानाचा असतो हे ही समजून घेतलं पाहिजे. पराक्रमासाठी पराभवाचा इतिहास ही कधी कधी संदर्भासाठी आवश्यक असतों. अपयशाला गाडून त्याच्या पायावर, यशाचा ध्वज उभा करण्यातच खरं कर्तृत्व असतं.
यश सहज नाही हे समजून घेतले पाहिजे. तत्वज्ञान कधी कधी कंटाळवाणं वाटलं तरी तेच माणसाला घडवतं.
माणसे एकमेकांपासून, मोजून अंतर राखतात.कुणांत किती मिसळायचं, कुणात किती रत व्हायचं, याबाबत ज्याची त्याची गणितं ठरलेली असतात. मनाची तार जुळल्या शिवाय पुढचां प्रवास सुरुच होतं नाही. केवळ शरीर जवळ आल्यानें मनाची आंदोलने, स्पंदने एकमेकांना कळतात असं नाही. मनाचा डोह फार खोल अथांग असतो.
माणसें मनाचा विचारच करत नाहीत. शरीर दिसतं, शरीर ऑफलाईन असतं. मन ऑनलाईन कार्यरत असतं. मनाचा प्रवास स्वप्नातही भरारी घेतो. शरीराला मर्यादा आहेत. वैचारिक मतभेद संवादाला फिरकूही देत नाहीत. पूर्वग्रहाची साथ सोडायला माणसे तयारच नाहीत.निसर्गाकडे पहा निसर्ग कुठे अंतर मोजून-मापून तुमच्याशी वागतो, तो तुम्हाला कवेत घ्यायला तयार असतो. तुम्हाला समजून घ्यायला तयार असतो. तुम्हाला अभिव्यक्त होण्यासाठी प्रवृत्त करतो, अनेक साहित्य निर्माण करण्यात निसर्गाचाच वाटा आहे. निसर्गाकडे पाहून,
एखादा सूर्योदय, एखादा सूर्यास्त, एखादा इंद्रधनुष्य, तो जगण्यासाठी प्रवृत्त करतो. मन तुमचं त्याठिकाणी रमतं, शांत होतं. शांत होणं आणि रमणं यासाठीच्या जागा खूप कमी होत चाललेल्या आहेत. मन भरकटण्याची अनेक ठिकाणें उपलब्ध आहेत.
जगण्याला प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी कमी होत चाललेल्या आहेत. जगण्यापासून परावृत्त करण्याची ठिकाणं वाढत आहेत.
मनाचा हळुवार कोपरा माणसांनी सेफ डिपॉझिट मध्ये टाकून दिला आहे. मनाला थोपटणं, समजावणं,
होतंच नाही. दागिने घालून मिरवावे तसं माणसे दुःख घेवुन मिरवत आहेत. दुःख दागिन्यां प्रमाणे लॉकरमध्ये ठेवायला हवं. दागिन्यांनी शरीर सजतं, मनाची श्रीमंती दागिन्या शिवाय असते. मन मोठं केलं की वळणा पर्यंतचा प्रवास सुसह्य होतो.
मनाच्या पलीकडे आनंदाचे झाड आहे, सौख्याचा धबधबा आहे.
एकच अट आहे, त्या वळणा पर्यंत जाता यायला हवं.
डॉ अनिल कुलकर्णी.