Feb 25, 2024
पुरुषवादी

आसुसलेले मन...❤️ भाग 3

Read Later
आसुसलेले मन...❤️ भाग 3

आसुसलेले मन... ❤️भाग 3 
आधीच्या भागात आपण पाहिले की,
रमा आणि सारंग मनीषच्या घरी पूजेला गेले होते. त्यात मनीषची आई सारंग आणि रमाशी खूप वाईट पद्धतीने वागली. त्या दोघांनाही खूप वाईट वाटले.
संध्याकाळी वाढदिवसाला जायचे नाही असं त्यांनी ठरवलं पण मनीषचा फोन आला आणि त्या आग्रहास्तव ते दोघेही वाढदिवसाला गेले. तिथेही काही बायांनी त्यांच्याविषयी चर्चा केली आणि सारंग बद्दल नपुंसक ह्या शब्दाचा वापर केला. तो शब्द ऐकताच रमाने पाणावलेले डोळे बंद केले. नकळत तो शब्द सारंगच्याही कानात गुंजला.

आता पुढे,


रमा लगेच तिथून उठली, जायला निघाली. दोन पाऊल समोर जात नाही तर तिचं लक्ष सारंगकडे गेलं. त्याच्या डोळ्यात दाटलेले अश्रू तिला दिसले, ती काहीही न बोलता निघून गेली.
रमा एकटीच घरी आली. आल्या आल्या तिने पर्स फेकली आणि सोफ्यावर बसून रडायला लागली. बराच वेळ हुंदके देऊन ती थकली, उठून पाणी प्यायली आणि पुन्हा तशीच येऊन बसली.

बराच वेळ झाला तरी सारंग अजून घरी आलेला नव्हता. तिने घड्याळाकडे बघितलं,
‘अजून आले कसे नाहीत, बराच वेळ झाला. मी यांना सोबत घेऊन यायला हवं होतं. मी एकटीच निघून आले, चूक माझीच आहे यांना फोन करू का? नाही नाही त्यांचा मूड नसेल तर, उगाच माझ्यावर चिडतील.’ ती मनातल्या मनात बोलू लागली.

मध्यरात्र झाली तरी सारंग घरी आलेला नव्हता. आता मात्र रमाला राहवेना, काय करू तिला कळत नव्हतं.
तिने त्याला फोन केला. बऱ्याचदा रिंग वाजूनही सारंगने फोन उचलला नव्हता, तिची काळजी वाढली.

तिने पायात चप्पल घातली आणि सपासपा चालायला लागली. तिने थेट मनीषचं घर गाठलं. गेटपर्यंत गेली तर सगळीकडे शांतता पसरली होती, काळोख दाटलेला होता. तिला कळलं की इथे कोणीच नाही आहे ती तशीच जड पावलांनी परत निघाली. चालता चालता अचानक तिचं लक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बाकाकडे गेलं तिथे सारंग बसलेला होता. ती त्याच्याजवळ गेली. त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा सारंग तिला बिलगला आणि हुमसून रडायला लागला.


रमाला काय बोलावं कळेना. तिने त्याला शांत केलं आणि त्याच्या बाजूला बसली.

“अहो जाऊ द्या ना, हे आजचचं आहे का? आपल्याला सवय आहे ना या सगळ्यांची, सोडून द्यायचं. किती दिवस मनाला लावून घेणार आहात. चला घरी, चला.” असं म्हणून त्याने तिला उठवलं.

तो उठला तेव्हा तिच्या लक्षात आलं की सारंग दारू प्यायला आहे. ( दारूचं व्यसन आरोग्यास हानिकारक आहे. इथे कुठलाही संबंध जोडू नये.)
“अहो हे काय तुम्ही दारू प्यायलात?”
“हो प्यायलो मी..”
“अहो पण का? काय गरज होती?”

“गरज होती ना, टेन्शनमध्ये होतो मी म्हणून दारू प्यायलो.”
“टेन्शनमध्ये?  टेन्शनमध्ये तर मी पण होते.”
“हो का मग मी दु:खात होतो म्हणून प्यायलो.”

“अहो दु:खात तर मी पण होते म्हणून मग मी पण प्यायले का?” तुम्ही का प्यायलात?”

“उगाच बडबड करू नकोस ग, चल घरी.”

रमा सारंगला घरी घेऊन गेली, त्याला लिंबू पाणी बनवून दिल. त्यानंतर तो झोपला. 

दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग झोपून उठला. रमा त्याच्यासाठी गरम गरम कॉफी घेऊन गेली.
“अहो कॉफी.”
त्याने हलक स्मितहास्य केलं.

“डोक दुखतंय का तुमचं अजून की बरे आहात आता.”

“नाही ग, मी बरा आहे.”

“अहो मी काय म्हणते मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी.”

“हो बोल ना, आपण माझ्या माहेरच्या फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांना भेटायचं का? म्हणजे मी बोलले होते त्यांना तर बोलल्या काहीतरी पॉझिटिव्ह होईल तर आपण.” ती बोलता बोलता थांबली.

“ठीक आहे बघू, जेव्हा जाऊ आपण तिकडे तुझ्या माहेरी, तेव्हा विचार करू.”
सारंग पेपर वाचत बसला.

“मूल होत नाही म्हणून सासू-सासर्‍यांनी सुनेला जाळून टाकलं”
त्याने मोठी हेडलाईन वाचली आणि त्याचं मन सुन्न झालं.
‘अशी कशी लोकं असतात या जगात? मुल नाही म्हणून चक्क जाळून टाकलं. त्या बाईच्या मनाचा विचार केला नाही, आपल्या मुलाचा तरी विचार केला नाही की आपल्या मुलाला काय वाटेल.’ तो विचार करत होता.

‘या जागी जर तिचा मुलगा असता तर? तिने हेच केलं असतं?’ अचानक त्याला प्रश्न पडला. तो विचारात पडला अचानक त्याला विचित्र विचित्र प्रश्न पडायला लागले.

“माझ्यामुळे रमाचं आयुष्य उध्वस्त झालं, आज माझ्या जागी जर रमा असती तर मी काय केलं असतं? घरच्यांनी माझे दुसरे लग्न लावलं असतं? आज मी जर चांगला असतो तर रमाचं जीवन काहीतरी वेगळं राहिलं असतं. रमाने दुसरे लग्न केलं तर? तीच आयुष्य सुखकर होईल. तिला कोणी वांजोटी बोलणार नाही. माझ्यामुळे तिला दुःख भोगावे लागत आहे ते कमी होईल. खरंच असं जर केलं तर?” तो स्वतःशीच एकटाच बोलायला लागला.

त्याचा आवाज रमाच्या कानावर पडला, ती किचन मधून

“अहो काही हवंय का? बोलताय का तुम्ही कोणाशी? कुणी आलय का? अहो..” ती किचन मधूनच बोलत होती. पण सारंग त्याच्याच विचारात होता.


शेवटी ती किचन मधून बाहेर आली आणि जवळ येऊन विचारलं तरी तू त्याच्याच विचारात होता. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हलवलं. तेव्हा तो भानावर आला.

“अहो काय झाल? काय विचारते मी कुणाशी बोलताय तुम्ही? कुणी आलं होतं का?”

“ना.. नाही.” तो अडखळत बोलला.

मग काय झालं? कुठल्या विचारात गुंतलात? ऑफिसला जायचं नाही का तुम्हाला?”

“मी तयार होतो आणि निघतोय.” सारंग तयार झाला आणि ऑफिसला गेला. ऑफिसला गेल्यानंतर त्याच्या मनात तेच विचार घोळत होते. दिवसभराचं काम निपटवून सारंग घरी आला.

येताच त्याने रमाला आवाज दिला.
“रमा.. हॉलमध्ये ये मला तुझ्याशी  बोलायचंय.”

रमा हॉलमध्ये आली,
“काय हो आज लवकर आलात तुम्ही.”

“काम लवकर झालं म्हणून लवकर निघालो. तू बस ना मला जरा तुझ्याशी बोलायचं.”

“थांबा ना मी पाणी घेऊन येते तुम्हाला आणि पटकन चहा ठेवते.”

“नको नको चहा वगैरे नंतर घेऊ, आधी तू बस.” असं म्हणून सारंगने रमाचा हात धरला आणि तिला सोफ्यावर बसवलं. तोही तिच्या बाजूला बसला. ती खूप आश्चर्याने बघत होती.
‘आज काय झालं यांना, मला बाजूला का बसवत आहेत?’ असा मनोमन तिने विचारही केला.

“अहो काय झाले?”
त्याने रमाचा हात हातात घेतला. “मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय.”
“माझ्याशी? काय बोला ना.”
“रमा तू दुसरे लग्न कर.”
“काय? काय बोललात तुम्ही?”

सारंगने खाली मान घातली आणि पुन्हा बोलला.

“रमा तू दुसरं लग्न कर.”

“अहो तुम्ही काय बोलताय? भानावर आहात ना? कुणाचं दुसरं लग्न? कोण करतंय?”

“तू करतीयेस.”

“स्वप्न बघताय की काय? तुम्ही बरे आहात ना?”

“रमा मी खरंच बोलतोय, तू दुसरं लग्न कर. तू दुसरं लग्न केलंस ना की वर्षभरात तुझ्या पदरात मूल असेल.”

“म्हणजे माझ्या पदरात मूल असावं म्हणून मी दुसऱ्या कुणाशी लग्न करू? तुम्ही माझ्याबद्दल असा विचार करताय? तुम्ही मला एवढंच ओळखलंत का? माझ्याबद्दल असा कसा विचार करू शकता? मुलापेक्षा मला माझा नवरा महत्त्वाचा आहे. मला सांगा तुमच्या जागी जर मी असते तर तुम्ही दुसर लग्न केलं असतं? दुसरी बायको आणली असती.”

“माहित नाही ग, तू उलट मला प्रश्न विचारू नकोस. मी तुला जे सांगतोय ना ते तू कर.”

“नाही ते शक्य नाहीये. नाही ते खरच शक्य नाहीये. मी कधी असा विचार केलेला नाहीये आणि करणारही नाही. तुम्ही माझं सर्वस्व आहात, मी स्वतःला अर्पण केले तुमच्यासमोर, मी असं कधीच करणार नाही.” असं म्हणत ती तिच्या खोलीत निघून गेली आणि सारंग तसा स्तब्ध उभा राहिला.

क्रमश:

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//