आसुसलेले मन...❤️भाग 2

Tyachya manachi vyatha

आसुसलेले मन... ❤️भाग 2

आधीच्या भागात आपण पाहिले की,

सारंगच्या ऑफिसमध्ये त्याच्या कलीगच्या वर्तवणुकीमुळे तो खूप दुःखी होता. इतके वर्ष होऊनही रमाला मूल होत नव्हतं. म्हणून दोघेही खूप अपसेट असायचे.


असेच दिवस सरकत होते. एक दिवस अचानक सारंगची तब्येत खूप खराब झाली. त्याचा ताप काही उतरेना. बऱ्याच दिवसानंतर तो बरा झाला पण डॉक्टरांनी सांगितले त्याला काही स्ट्रेस देऊ नका. रमा त्यांच्या फॅमिली डॉक्टरला जाऊन भेटली. त्यांना त्यांच्या सगळ्या रिपोर्ट दाखवल्या. त्या बोलल्या की आपण काहीतरी मार्ग काढू. रमाला आशेचा किरण दिसत होता.


आता पुढे,

सारंग सकाळी उठून फ्रेश झाला, ऑफिसला जायला निघाला.
रमाने त्याच्यासाठी डबा बनवला, त्याच्या हातात देत म्हणाली.
“अहो, तुम्ही जरा शांतह रहा ह, ऑफिसमध्ये जास्त कोणाशी काही बोलू नका. आणि कुणी काही बोललं तर तुम्ही मनाला लावून घेऊ नका आणि ऑफिस संपल्यानंतर इकडे तिकडे न बसता लवकर घरी परत या.”

“अग किती सूचना देशील.” तो तिच्या हातातला डबा घेत बोलला.
दोघांनी स्मितहास्य केलं.

सारंग ऑफिसला गेला, तो त्याच्या जागी जाऊन बसला. हळूहळू एक एक करून ऑफिसचे सगळे लोक येत होते. सारंगच्या ऑफिसमध्ये काम करणारा त्याचा बेस्ट फ्रेंड मनीष त्याच्या जवळ येऊन उभा राहिला.

“काय सारंग बरा आहेस ना आता? तब्येत वगैरे बरी आहे ना तुझी?” सारंगने होकारार्थी मान हलवली.

“हो मी बरा आहे.” असं म्हणून त्याने खाली मान घालून त्याच्या कामाला सुरुवात केली.

“काय झालं सारंग असा चुपचाप का आहेस? शांत शांत का बसलायस?”


“नाही रे काही नाही.”


“ओके मी काय म्हणतो, उद्या सकाळी माझ्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे तर तुम्ही दोघेही नक्की या. एकटाच येऊ नकोस वहिनीला पण घेऊन ये.” मनीष ने त्याला बजावून सांगितलं.
त्यावर सारंगने फक्त मान डोलावली. काही वेळाने ऑफिसचे बाकीचे लोक जमा झाले. मनीषने सगळ्यांना हातवारे करून आवाज दिला. त्यांनाही सांगितलं,“उद्या सकाळी तुम्ही सगळे माझ्याकडे सत्यनारायणाच्या पूजेला नक्की या आणि सोबत तुमच्या परिवाराला देखील घेऊन या.”

“अरे वा मनीष अचानक कशी काय पूजा ठेवलीस रे.” त्यातल्या एका व्यक्तीने विचारलं.

“काही नाही रे माझ्या मुलाचा उद्या वाढदिवस आहे ना त्यानिमित्ताने म्हटलं सत्यनारायणाची पूजा करून घेऊ. सगळं कसं छान छान होईल.” त्यांचं सगळ्यांचं बोलणं सुरू असताना त्यातील एक व्यक्ती हळूच बोलला.“काय रे सारंगला बोलवलस का?”

“हो..”

“का अरे अश्या शुभ कार्याला त्याला कशाला बोलवतो? उगाच काही अशुभ घडायला नको.” सगळ्यांची एकमेकांमध्ये कुजबुज सुरू झाली.

“तुम्ही सगळे असे का बोलताय? असं काही नसतं शुभ अशुभ वगैरे. असं काही होत नाही आणि तसही सारंग माझा चांगला मित्र आहे. सो मी त्याला जर बोलावलं नाही तर त्याला वाईट वाटेल.” त्यांच्या सगळ्यांचं बोलणं सारंगच्या कानावर पडत होतं.

एकेक शब्द त्याच्या हृदयाला लागत होता पण तरीही तो शांत होता.

मनीषला वाईट वाटू नये म्हणून तो दुसऱ्या दिवशी रमाला घेऊन मनीषच्या घरी गेला. त्यांच्याकडे पोहोचल्यानंतर तिथे सत्यनारायणाची कथा सुरू होती. सारंग आणि रमा आत मध्ये जाऊन बसणार तोच एक बाई तिथे आली.

“अरे तुम्ही दोघे इथे काय करताय तुम्ही या ना इकडे बसा, या इकडे एका बाजूला.” असं म्हणून त्या बाईने त्यांना दूर बसवलं. सारंग आणि रमाला खूप वाईट वाटलं तरीही इथे कार्यक्रम भंग व्हायला नको म्हणून ते दोघे शांत होते.


काही वेळाने त्यांना कळलं की ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून मनीषची आई आहे. मनिषची आई असं वागू शकते,त्यांनी विचारही केलेला नव्हता.


सत्यनारायण पूजा झाली, एकेक जण समोर पूजा करायला जात होते. रमा आणि सारंग दोघेही उठले, रमाने आरतीच्या ताटामधील मधले फुल आणि अक्षद घेतले, सारंगच्याही हातात दिले. रमा हळद-कुंकूवाचा करुंडा हातात घेणार तोच मनीषची आई बोलली.

“ये बाई काय करतेस तू?”

“काकू नमस्कार करते.”

“नाही नाही तू नमस्कार वगैरे करू नकोस, तू मागे जाऊन बस. बाकीच्यांना आधी पूजा करू दे. बसा तुम्ही दोघे ,बसा मागे.” काकूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून सारंगच्या रागाची तिडीक त्याच्या डोक्यात गेली. त्याने हाताच्या मुठ्या घट्ट केल्या तो काही बोलणार तेवढ्यात रमाने त्याचा हात पकडला आणि इशाऱ्याने नाही म्हणून सांगितलं.

दोघेही मागे जाऊन बसले, त्यानंतर काही वेळाने सारंग मनीषजवळ गेला आणि

“मनीष पूजा झाली आता आम्ही निघतो, आम्हाला थोडं बाहेर काम आहे.”

“अरे असं कसं निघताय? जेवण करून जा ना, बस झालच आहे आता जेवणाची तयारी सुरूच आहे.”

“नको, जेवण वगैरे नको. पूजा झाली ना त्याला महत्त्व. जेवण वगैरे नको.” बोलता बोलता सारंगचे डोळे पाणावले.

“काय रे काय झालं चेहरा का असा पडलाय तुझा?” सारंग डोळ्यातले अश्रू पुसत,

“नाही, काही नाही मी जेवायला थांबत नाही, येईन कधीतरी. यू एन्जॉय.” असं मनात दोघेही तिथून निघाले.


“अहो संध्याकाळच्या वाढदिवसाला बोलवले आहे, काय करायचं?”

“रमा माझी अजिबात इच्छा नाहीये तुला जायचं असेल तर तु जा.”

“अहो मी एकटीच गेले तर बरं दिसेल का? तुमचा खास मित्र आहे ना तो.”

“हो माझा खास मित्र जरी असला तरी त्याची आई आपल्याशी कशी वागली बघितलीस ना तू.”
“बघितलं, पण जाऊ द्या ना.”
“त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन कसा होता बघितलस ना तू? त्यांची एक एक नजर माझ्या हृदयाला चिरत होती. मी येणार नाहीये रमा, तुला जावसं वाटत असेल तर तू जा. आणि तू नेहमी गोष्टी सोडून द्या म्हणतेस कितीदा गोष्टी सोडून द्यायच्या. समोरचा व्यक्ती आपल्या मनाचा विचारच करत नाही. आपल्याला काय वाटेल याचा कुणी विचारच करत नाही. मी जाणार नाही.” सारंगची आता चिडचिड व्ह्यायला लागली होती.

“ठीक आहे तुम्ही जर जात नसाल तर मीही जाणार नाही.” दोघांनी ठरवलं जायचं नाही.

संध्याकाळी पुन्हा मनीषचा फोन आला.

“अरे सारंग निघाला नाहीस का अजून?”

“मनीष अरे मला जरा बरं वाटत नाहीयेस सो आम्ही नाही येत आहोत.”

“खोटं बोलतोयस ना.”

“नाही मनीष, अरे खोटं कशाला बोलू?”

“मला माहितीये खोटं बोलतोयस तू, मला सगळं कळलंय आई तुझ्याशी कशी वागली ते. मी बोलेन तिच्याशी पण तू आता मनावर घेऊ नकोस. ये रे मित्रा आईचं बोलणं जाऊ दे.” मनीष ने खूप आग्रह केला म्हणून दोघेही वाढदिवसाला गेले.

वाढदिवस हॉल मध्ये होता. पूर्ण हॉटेल बलूनने सजवलं होतं. चारही बाजूने रोषणाई होती. स्टेज बलूनने आणि मूलाच्या फोटोने सजवला होता. सगळं अगदी भव्य दिव्य होतं.

मुलाला ग्रे रंगाचा ब्लेजर घातलेला होता. सगळी तयारी छान झाली होती. सगळे पाहुणे जमा झाले, काही वेळाने केक कापला. सगळे छान एन्जॉय करत होते.सारंग ही त्याच्या मित्रांसोबत जाऊन बसला. रमा एकटीच बसली होती. काही वेळाने काही लेडीज रमाच्या बाजूच्या चेअरवर येऊन बसल्या. त्या रमाला ओळखत नव्हत्या आणि रमाही त्यांना ओळखत नव्हती. त्यांचं असंच इकडे तिकडे बघून चर्चा सुरू होत्या. कुणाबद्दल काही तर कुणाबद्दल काही असं बोलणं सुरू होतं.

“अरे तुम्हाला माहित आहे का? मनीषचा एक मित्र आहे, त्याच्या लग्नाला बरेच वर्ष झाले पण मुल नाही. सगळे बोलतात की त्याच्यातच दोष आहे.” त्यातली एक बाई बोलली.


“अग हो पण त्यात त्या बिचारीचा काय दोष, त्याच्यामुळे तिला किती सहन करावं लागत असेल.” दुसरी बाई बोलली.

“मी तर म्हणते अश्या नपुंसक माणसाने लग्नच करू नये.”

“नपुंसक” शब्द ऐकताच रमाने पाणावलेले डोळे बंद केले.
नकळत तो शब्द सारंगच्याही कानात गुंजला होता.

क्रमशः

🎭 Series Post

View all