आसुसलेले मन...❤️ भाग 1

Tyalahi man asat

आसुसलेले मन... भाग 1

“अहो, काय झालं? आज ऑफिसमधून लवकर आलात.” त्याच्या हातातली बॅग घेऊन टेबल वर ठेवत तिने विचारलं.

“काही नाही, आज दमल्यासारखं होतयं.” तो नजर चुकवत आत गेला.

पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कळायला तिला वेळ लागला नव्हता.

तो आत जाऊन बेडवर बसला. 
ती त्याच्या बाजूला जाऊन बसली.

“अहो सोडून द्या ना, का इतकं मनाला लावून घेताय? आता सवय करून घ्या. मला माहित आहे, मी बोलते ते करणं सोपं नाही. मी रडून मोकळी होते पण तुम्ही आतल्या आत कुढत असता.  अहो एकदाची त्या अश्रूंना वाट मोकळी करून घ्या. त्यांनाही सळसळ वाहू द्या. का आतल्या आत इतकं दाबून ठेवताय?” तिने त्याच्या हात हातात घेतला. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागली.
तसा तो तिच्या कुशीत जाऊन ढसाढसा रडला... 

बाई रडून तिचं दुःख व्यक्त करते पण माणूस तो कधीच डोळ्यात अश्रू आणत नाही. म्हणून त्याला भावना नसतात असं मुळीच नाही.
खर तर सगळ्यांचा खूप गोड गैरसमज असतो की पुरुषांना मन नसतं, त्यांना दुसऱ्यांच्या भावना कळत नाही, त्याच्या हृदयाला कधीच पाझर फुटत नाही. पण तो पुरुष असला तरी शेवटी तो ही एक माणूसचं आहे.
रमा आणि सारंग, लग्न होऊन दहा वर्षे झालीत. पण रमाच्या पदरात मूल नव्हतं. घरचे तसे सगळे चांगले होते. पण वेळप्रसंगी सगळेच बोलतात. बरेच प्रयत्न करूनही त्यांच्या प्रयत्नाला यश मिळत नव्हतं. देवधर्म, नवस सगळं करून झालं पण रमाच्या पदरात मूल आलं नव्हतं.
याचा जेवढा त्रास रमा व्हायचा ना तेवढाच त्रास सारंगलाही होत असे..पण तो कधी बोलून दाखवत नव्हता.

आज ऑफिसमध्ये खुप विचित्र प्रकार घडला. त्याने  सारंग फार तुटून गेला. एरवी हसण्यावारी नेणारा सारंग आज हुमसून हुमसून रडला.

त्याला असं रडताना बघून रमालाही खूप रडायला येत होतं.
“अहो सांगा ना काय झालं? कुणी काही बोललं का?” ती त्याच्या केसांवरून हात फिरवत त्याला विचारत होती.

तो तिच्या मांडीवरून डोकं काढून उठून बसला. डोळे पुसले आणि बोलायला लागला.

“अग आज ऑफिसमध्ये  धीरजला सगळे अभिनंदन करत होते.”
“अभिनंदन? का?” रमाने  आश्चर्याने विचारलं.
“त्याच्या घरात लक्ष्मी आली म्हणून.” बोलता बोलता सारंगचे डोळे पाणावले.
तिने प्रश्नार्थक चिन्हाने विचारलं,

“त्याचं लग्न कधी झालं?”
“मागच्या वर्षी झालं, आपली दृष्ट लागायला नको म्हणून आपल्याला बोलावलं नव्हतं त्याने.” सारंग हातात मोबाईल घेत सांगितलं.

“काय? असे विचार करतात तुमच्या ऑफिसमधले लोक?”
“तेच तर.”

“किळसवाण आहे जे सगळं, आपण कधीही कुणाबद्दल वाईट विचार केला नाही तरीही.”
“हे बघ फोटो. त्याची पत्नी आणि बाळ.”

रमाने  त्या फोटोकडे बघितलं. 
“अरे ही तर..” ती बोलता बोलता थांबली.

तिच्या अश्या प्रतिक्रियेवर  सारंगने विचारलं.

“तू ओळखतेस तिला?”

“मी तुम्हाला काय सांगू? तेच कळत नाही आहे.”
“अग काय झालं?”

“सोडा ना, जेव्हा माझी बोलण्याची वेळ येईल ना तेव्हा बोलेल मी. तुम्ही आता शांत व्हा. कुणाचाही विचार करू नका. आणि हो मी आहे तुमच्यासोबत.” तिने त्याच्याकडे बघत हलकं स्मितहास्य केलं. 
ती किचनमध्ये गेली. गॅस वर भांड ठेवलं.
आणि तिच्याच विचारात गुंतली. सारंग सोफ्यावर लेटला होता. त्याला काहीतरी जळण्याचा वास आला.
‘काहीतरी जळल्याचा वास येतोय. काय जळलं असेल?’ स्वतःशीच पुटपुटत तो उठला.

जळल्याच्या वासेने रमा भानावर आली. तिने लगेच गॅस बंद केला आणि नकळत भांड उचलायला हात समोर केला तसा तिच्या हाताला जोरात चटका बसला.
“आई..” तिच्या तोंडून किंचाळी निघाली.
“काय करतेस रमा? अग जरा जपून कर, तुला काही झालं तर?” तो भावुक झाला.
“अहो मी बरी आहे. जरास झालंय.”

“जरास? जरास आहे हे? किती भाजलय बघ.”

“तुम्ही जर माझी अशीच काळजी करणार असाल तर मग रोज असच होऊ दे.”

“अग माझी आई तू शांत बस आता, मला मलम लावू दे.” सारंगने थोडा आवाज वाढवला. 
तशी रमा गप्प झाली. सारंगच्या चेहऱ्यावर मात्र हास्य आलं.
त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद बघून रमाला खूप बरं वाटलं.
खूप दिवसांनी असा हसरा चेहरा  बघायला मिळाला होता.

‘हे देवा, यांना असंच आनंदात ठेव मला दुसरं काही नको यांच्या जीवनातला आनंदच माझ्यासाठी सर्व काही आहे.’ ती मनातल्या मनात देवाला प्रार्थना करू लागली.


दिवस जरी छान जाताना दिसत असले तरी रमा आणि सारंगच्या मनातली घालमेल कोणालाचं कळत नव्हती. बाहेरचे, नातेवाईक येऊन बोलून जायचे, घरचे टोचून बोलायचे.
रमा आणि सारंग दोघे निमूटपणे सगळं ऐकून घ्यायचे. रमा आपल्या मनातलं सगळं सारंगला सांगायची, रडून मोकळी व्हायची. पण सारंग तो आतल्याआत  कुढत होता. त्याची घुसमट होत होती. 

तो सांगणार तरी कुणाला? रमासमोर बोलण्याचा पर्याय नव्हता कारण तिला त्याला अजून त्रास द्यायचा नव्हता. बाहेर सांगायची सोय नाही, मित्र मज्जा उडवतील, कुणी मला समजून घेणार नाही या भीतीने तो कुणाशीच काही बोलायचा नाही. आतल्या आत कुढत असायचा. 

अशातच एकदा त्याची तब्येत खराब झाली. अंगात ताप भरून आलेला. आठ दिवस, पंधरा दिवस झाले ताप काही उतरत नव्हता. औषध केले, दवाखाने केले पण ताप उतरतच नव्हता.

डॉक्टरांनी सांगितले,

“याला कशाचा तरी स्ट्रेस आहे, तो स्ट्रेस कमी व्हायला हवा. आता याचा ताप जरी उतरला तरी त्याला आनंदी ठेवण्याचं काम तुमचं आहे.” डॉक्टरांनी रमाला सांगितलं.

“आता त्यांना कुठलाही स्ट्रेस द्यायचा नाहीये, ताप जर डोक्यात गेला तर कुठल्याही रोगावर फेकू शकतो म्हणून तुम्ही काळजी घ्या.” असं डॉक्टरांनी रमाला बजावून सांगितलं.

त्या पंधरा दिवसात रमाने सारंगची खूप काळजी घेतली. त्याला हवं नको ते सगळं बघितलं.

त्या काळामध्ये दोघांचही बॉण्डिंग अजून पक्क झालं. त्यांचं नातं अधिक घट्ट झालं. रमाला सारंगच्या डोळ्यातली तळमळ दिसत होती. त्याच्या मनाची घालमेल समजत होती. पण ती ही काही करू शकत नव्हती याचं तिला दुःख होतं. तिने त्याला आनंदी ठेवायचं इतकच मनाशी ठरवलं होतं. आणि त्याच प्रयत्नात ती लागलेली होती.

सारंगला हॉस्पिटल मधून घरी आणण्यात आलं. रमाने आज त्याच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. त्याने तिला भरवलं. त्यानंतर सारंग झोपला. काही वेळाने त्याच्या कानात आवाज गुंजायला लागला.

“बाबा.. बाबा.. मी तुझी परी, मला घ्यायला येणार नाहीयेस बाबा. मला घेऊन जा ना तुझ्याकडे. बाबा मी वाट बघते आहे. मलाही या जगात यायचं आहे, हे सुंदर जग बघायचे आहे.” त्या आवाजाने सारंग दचकून उठला.

रमा धावत येऊन त्याच्या बाजूला बसली.
“अहो काय झालं? वाईट स्वप्न बघितलेत का? बोला ना काय झालं? थांबा मी पाणी देते.”
तिने त्याला पाणी दिलं, त्याच्या पाठीवरून हात थोपडला. 
“बोला ना काय झालं? वाईट स्वप्न होतं का?”

“वाईट नाही ग छान स्वप्न होतं. माझी परी मला आवाज देत होती. बाबा बाबा या ना मला घेऊन जा ना तुमच्याकडे बाबा, मला या जगात यायचं आहे मला जग बघायचं. असं म्हणत होती.” सारंग बोलता बोलता रडायलाच लागला.

“अहो तुम्ही शांत व्हा, डॉक्टरांनी काय सांगितले जास्त स्ट्रेस घेऊ नका. आता तुमची तब्येत महत्त्वाची आहे, याविषयी आपण नंतर बोलूया.” रमाने सारंगला पुन्हा बेडवर लेटवलं आणि त्याच्या माथ्यावरून हात फिरवू लागली. थोडया वेळाने त्याला झोप लागली.

काही दिवस असेच गेले, सारंग ने ऑफिस जॉईन केलं.

रमा एक दिवस त्यांच्या फॅमिली फ्रेंड डॉक्टरांकडे गेली. त्यांना त्या दोघांबद्दल हे सगळं सांगितलं. त्यांना रिपोर्टही दाखवले.
डॉक्टर बोलल्या की,
“आपण प्रयत्न करून बघूया, तू देवावर विश्वास ठेव तो नक्कीच काहीतरी छान करेल.” डॉक्टरच्या बोलण्यावरून रमाला आशेचा किरण दिसत होता.

 क्रमश:

🎭 Series Post

View all