अस्तित्वाला तडा नकोच

She Can Do Anything
मालती एक ४५ वर्षीय गृहिणी . नवरा संतोष, मुलगी स्पृहा आणि संजोग असे चौकोनी कुटुंब. मालती कुटुंबासाठी जगणारी. संतोष, स्पृहा, संजोग हे तिचे आधार स्तंभ. हेच तिचे जीवन.

मालती आधी नोकरी करत होती. स्पृहा झाली आणि तिने नोकरी सोडली. इतर बायकांना नोकरीला जाताना पाहून हिचे मनही करायचे , बाहेर जावून नोकरी करावी. संतोषचे म्हणणे होते, मला पगार चांगला आहे. मुलांकडे लक्ष द्यायचे तेवढे बघ. मनाला नेहमी खंत लागून राहिली, इतकं शिकून घरीच आहे. त्या संसार नावाच्या चौकटीत जणू तिने स्वतःला कैद केले.


मुले लहान होती तोपर्यंत मालतीचे मन रमून जायचे. आता दोघेही मोठे झाले आणि स्वतःच्या विश्वात रमले . मित्र मैत्रिणी असे त्यांचे जग. संतोषचेही बरेच मित्र होते. तो सुद्धा अधूनमधून पिकनिकला जात असे.

मालतीला एकटेपणा नकोस झाला.

एक दिवस ती संतोषला म्हणाली
“मी घरी राहून कंटाळते , मी विचार करते आहे काही तरी काम करू , स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा विचार करते आहे.असेही स्पृहा आणि संजोग स्वतःची काळजी घेऊ शकतात तर मी घराबाहेर पडू शकते”

संतोष : “मालती , काय हे नवीन तुझे डोक्यात खूळ आहे. मी काही कमी पडू देतो का तुला ? मग कशाला उगाच उठाठेव . असंही तुझे वय बघ. नोकरी सोडून किती वर्ष उलटले ?. तुला आता ते काही जमणार नाही.नको करुस धावपळ. निवांत घरी राहा.”

मालतीला संतोषचा राग आला .
रागातच ती म्हणाली “मला जमणार नाही , इतक्या विश्वासाने कसे बोलू शकतो . संतोष तू माझा नवरा ह्या नात्याने कमीत कमी मला शा‍ब्दिक आधार देऊ शकतो . तुझ्या पडत्या काळात मी नेहमी तुला सपोर्ट केला. तुझी नोकरी सुटायच्या मार्गावर होती . तू डिप्रेशन मध्ये होता .तेव्हा मी तुझ्यातला आत्मविश्वास ढळू दिला नाही. आणि आज तू , मला तुझ्या आधाराची गरज आहे तर ..” असे बोलून ती निघून गेली.

संतोषला पाठचे सारे दिवस आठवले . खरंच , मालतीमुळे आज तो यशाच्या शिखरावर होता. तो विसरला होता. ईतक्या वर्षात हे मालतीने पहिल्यांदाच बोलून दाखवले होते.

डोळ्यासमोरून भूतकाळ गेला .
नोकरी जाणार ह्या भीतीने तो घाबरला होता.डिप्रेस झाला होता.दिवसभर बंद खोलीत राहायचा.

एक दिवस मालती मुलांना शाळेत आणायला गेली होती.

त्याने अगदी कपाटातून ओढणी बाहेर काढली होती . फासावर गेलो की सगळा त्रास नाहीसा होईल,हा सैतानी विचार डोक्याला पटला.
गळ्या भोवती त्याने ओढणी गुंडाळली . तोच बेल वाजली. मालती आली होती. त्याने लगेच ओढणी गळ्यातून काढली आणि जागच्या जागी ठेवली.
मालतीने येतानी एका काऊनसलरचा नंबर आणला होता. संतोष निराश होऊन बसला होता.
मालती “आपल्याला उद्या ह्यांच्याकडे जायचे आहे , माझ्या मैत्रीणीने नंबर दिला आहे.”
“मला कुठेही जायचे नाही” संतोष चिडक्या स्वरात म्हणाला .

“मला माहीत नाही, मी तुम्हाला घेवून जाणारच” मालती .

आधीच बैचेन झालेला संतोष अजून बैचेन झाला . त्याने तिच्या कानाखाली वाजवली . त्याला रागात कळले नाही . त्याने काय केले .
मालतीला माहीत होते , संतोष चिंतित झाला आहे. तिने स्वतःवर खूप ताबा ठेवला.
एव्हाना संतोषला स्वतःची चूक कळली होती.
तो अपराधी चेहऱ्याने मालतीच्या जवळ गेला.
“सॉरी, मालती” संतोष.
“एकाच अटीवर तुझ्या सॉरीचा मी स्वीकार करेल , तुला उद्या माझ्यासोबत यायचे आहे.” मालती.


“मान्य आहे मला” संतोष
दुसऱ्या दिवशी दोघेही काऊनसलरकडे गेले .

मालतीने , संतोषचा त्रास सांगितला .
त्याने त्याच्या परीने संतोषला ट्रीट करण्याचा प्रयत्न केला.
संतोष बरा झाला .

मालती सुखावली.

संतोषचे भय नाहीसे झाले. पूर्वीप्रमाणे राहू लागला .
संतोष “मालती, थॅंक यू आज तुझ्यामुळे मी पुन्हा पहिल्यासारखे आयुष्य जगतो आहे. नाही तर ..” तो थांबला
मालती : “नाही तर काय ?”
संतोष : “मी जीवंत नसतो , मी त्या दिवशी आत्महत्या करणार होतो.तितक्यात तू आली.”
हे ऐकून मालतीच्या पायाखालची जमीन सरकली.
मालतीने स्वतःला सावरले .
ती संतोष जवळ गेली आणि तिने त्याचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला . म्हणाली “तुला, माझी शपथ तू कितीही वाईट परिस्थिती आली तरी  आत्महत्येचा विचार करणार नाही”

“मालती, मी वचन देतो मी असले काही करणार नाही” संतोष .

संतोषची कामावर बढती होत राहिली . पगार वाढला. त्याने छान फ्लॅट घेतला . गाडी घेतली. सर्व स्वप्न पूर्ण केली. लक्ष्मी त्याच्या घरी नेहमी नांदत राहिली.

संतोष , मालतीकडे गेला तिचा हात अलगद हातात घेतला .
मालती त्याच्याकडे पाहू लागली.
संतोष तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागला .
“मालती, मनापासून सॉरी.मी विसरून गेलो होतो की तुलाही अधिकार आहे. तुझे वेगळे अस्तीत्व निर्माण करायचा. तुलाही अधिकार आहे , तुझी स्वप्न पूर्ण करायचा. स्पृहा झाली आणि मी तूला जणू गृहितच धरले .इतकी शिकलेली तू, नोकरी करणारी तू , आत्मविश्वासाने भरलेली तू ह्या आपल्या संसारात हरवुन गेली. मी मात्र , मला पगार चांगला आहे ह्या विचारात विसरून गेलो की तू माझी बायको होण्याआधी , मुलांची आई होण्याआधी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेस. खरंच मालती सॉरी. तू कर काम, तुला जे हवे ते कर. मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे.
मालतीला भरून आले. तिने संतोषला गच्च मिठी मारली.

मालतीने स्वताचे बुटीक सुरू केले. कामासाठी दोन मुली हाताखाली ठेवल्या.तिचा दिवस कधी निघून जात तिला कळत नसे.

मुलांनाही आईचे बदललेले रूप आवडले.घराच्या चार भिंतीची चौकट पार केल्यापासून ती स्वतःवर जास्त प्रेम करू लागली, स्वतःसाठी जगू लागली.
मालतीचा वाढदिवस होता. सगळे हॉटेलमध्ये गेले . वेगवेगळया डिश ऑर्डर केल्या . केक कट केला . वेटर बिल घेउन आला. तो संतोषकडे गेला .
संतोष मालतीकडे पाहून म्हणाला . “हे बिल मॅडम देतील”
मालतीच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होते .
मालती बिझनेस वुमन झाली होती. आज तिचा वाढदिवस खूप खास होता कारण आज पहिल्यांदा मालतीने स्वकमाइने पार्टी दिली होती.
मालतीने स्वतःच्या पायावर उभे राहून दाखवून दिले होते की जबर इच्छाशक्ती असेल तर सर्व शक्य आहे. गरज असते चौकटीच्या बाहेर जावून विचार करण्याची आणि त्याप्रमाणे वागण्याची.
निश्चय केला तर काहीही अशक्य नाही. बरोबर ना ?


एक छान शायरी आहे,

रख हौसला कदम बढाये जा
मंजिल के और पास तू आते जा
न थकना न हार मानना कभी
सिर्फ तू मेहनत किये जा ..

कथा आवडली असेल तर लाइक ,फॉलो कमेन्ट ,शेअर करून माझ्या लिखाणाचा उत्साह जरूर वाढवा.
धन्यवाद
अश्विनी ओगले.
मनातलं मनापासून
माझी कथा “त्याचे तुटक वागणं” ह्याला खूप छान प्रतिसाद दिला त्यासाठी मनापासून तुम्हा सर्वांना धन्यवाद .