कथेचे नाव: अस्तित्व
विषय: स्त्री आणि परावलंबित्व
फेरी: राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा
"तुम्ही सांगाल तसे वागायला मी तुमच्या हातचा खुळखुळा नाही". शलाका कडाडून बोलत होती. डोळे वाहत होते, पण त्या डोळ्यांत आज अश्रू नाही अंगार फुलले होते. तिच्या बोलण्याने सगळेच अवाक झाले होते. पण आज ती थांबणार नव्हती, साक्षात दुर्गाच अवतरली होती तिच्या अंगात जणू!
शलाका प्रधान! सरस्वती विद्यामंदिर या सरकारी शाळेची मुख्याध्यापिका. अगदी कमी वयात तिने ही गवसणी घातली होती. ज्या वयात मुली नोकरीच्या शोधात वणवण करत भटकत असतात किंवा संसाराच्या वाटेवर जातात, त्या वयात शलाका मात्र इतकी मोठी जबाबदारी अगदी लीलया पार पाडत होती. आई-वडील, नातेवाईक, मित्रमंडळी साऱ्यांनाच शलाकाचा खूप अभिमान होता. काही दिवसांनी आप्तेष्टांमध्ये कुजबुज सुरु झाल्यावर शलाकाच्या वडिलांनी- विनयरावांनी शलाकाच्या लग्नाचे मनावर घेतले. ती इतकी हुशार आणि त्यात एकुलती एक, त्यामुळे तिच्याशी लग्न करायला तर कोणीही एका पायावर तयार होईल. पण विनयरावांना तिच्याइतकाच हुशार आणि समजूतदार मुलगा जावई म्हणून हवा होता. म्हणूनच त्यांचा शोध काही केल्या संपत नव्हता. एके दिवशी आपसूकच एक स्थळ त्यांच्या घरी चालून आले. सरपंच विश्वास सरपोतदार सपत्नीक विनय प्रधानांच्या घरी आले.
" विश्वासराव, या या बसा.!"
तुम्ही आज आमच्या घरी काय काम काढलेत? या पामरांच्या घरी तुमचे पाय लागणे म्हणजे भाग्यच हो आमचे.!
"असं म्हणून लाजवू नका हो विनयराव.! "
आमचेच भाग्य थोर म्हणून आम्ही आज तुमच्या दारी आलो आहोत. तुमची लाखमोलाची गोष्ट मागण्यासाठी."
विनयराव जरा चिंताग्रस्त झाले. "मी समजलो नाही. असे काय हवे तुम्हाला माझ्याकडून? तुम्ही कोड्यात का बोलताय? सांगा ना काय देऊ शकतो मी तुम्हाला?"
"तुमची मुलगी शलाका!"
विश्वासराव उत्तरले.
"काय?" विनयराव उडालेच. आतून शलाकाची आई मनीषाताईही बाहेर आल्या. "तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत हो विनयराव. माझा मुलगा सुरज आणि तुमची मुलगी शलाका यांचे लग्न!"
सुरज सरपोतदार- सरपंचांचा एकलुता एक मुलगा. हुशार, रुबाबदार व्यक्तिमत्व. मुख्य म्हणजे अमेरिकेत शिकून आता भारतात वडिलोपार्जित व्यवसायात गुंतलेला. काही व्यसन नाही, की कसला माज नाही. कुठल्याही मुलीच्या बापाला अगदी योग्य वाटेल असा हिराच जणू.!
"विश्वासराव, माझा माझ्या कानांवर अजिबात विश्वास बसत नाहीये. अहो, तुमच्या मुलाला तर कितीतरी करोडपती मुलींची स्थळे येत असतील ना? मग माझ्याच मुलीला सून करून घ्यायची कशी इच्छा झाली तुमची?
"तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे विनयराव. पण कसं आहे ना, जे रत्न आम्हाला आमच्या हिऱ्यासाठी हवे, ते फक्त तुमच्याकडेच आहे. आम्ही स्वतः शलाकाची शाळेपासूनची प्रगती पाहिली आहे. दहावी, बारावीला राज्यात पहिली आणि डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला देखील पूर्ण विद्यापीठात पहिली येऊन तिने प्रत्येक शिष्यवृत्ती मिळवली होती. इतका कमी की काय तर बी एड च्या शेवटच्या वर्षाला असतानाच शिक्षिका म्हणून राज्यातल्या सर्वोत्कृष्ट शाळेवर रुजू देखील झाली. आज त्याच शाळेची मुख्याध्यापिका झाली आहे. राज्यातली सर्वांत कमी वयाची मुख्याध्यापिका म्हणून नावलौकिक झाला आहे तिचा! करावे तितके कौतुक कमीच आहे हो शलाकाचे." पाणी पिता पिता म्हणाले. मग इतका वेळ गप्प असलेल्या कावेरीबाई, त्यांच्या पत्नी पुढे झाल्या,
"शलाका आमच्या दिसण्यात आहे. तिचा वागणं बोलणं सगळंच घरंदाज सुनेला शोभणारे आहे. आणि मुख्य म्हणजे तुमची मुलगी तुमच्या डोळ्यासमोरच राहील. तर सांगा मग काय म्हणणे आहे तुमचे? " मनीषाताईंना तर पराकोटीचा आनंद झाला होता. त्या लगेचच म्हणाल्या,
"तुम्हाला नकार देणारे आम्ही कोण?" विनयरावांनी पत्नीकडे इशारा करून त्यांना गप्प राहण्यास सांगितले आणि ते म्हणाले.
"आम्हाला थोडा वेळ हवा आहे. आधी आम्हाला शलाकाशी बोलावं लागेल. तिचा जर होकार असेल तर मग पुढे जाण्यास हरकत नसावी." विश्वासराव आणि कावेरीबाई उठले. विश्वासराव हात जोडून म्हणाले, "ठीक आहे तर मग, जर तिचा होकार असेल तर आम्हाला लगेच कळवा. येत्या रविवारी मुलगी दाखवण्याचा आणि सुपारी फोडण्याचा असे दोन्ही कार्यक्रम एकदमच आमच्या येथे करून घेऊ."
संध्याकाळी शलाका घरी आल्यावर आई बाबानी सगळं वृत्तांत तिच्या कानावर घातला. ती ही सूरजला ओळखत होतीच. तसे नकार द्यायचे कारणच नव्हते काही. मग विनयरावांनी लगेचच सरपंच साहेबाना फोन करून कळवले. रविवारी संध्याकाळी ५ वाजताच कार्यक्रम ठरवला होता. तयारीच्या घाईत आठवडा निघून गेला आणि रविवारी संध्याकाळी शलाका परिवारासोबत सरपंच निवासस्थानी पोहोचली. पाहुण्यांचे जंगी स्वागत झाले. मनीषाताईंचे तर डोळेच दिपले होते सारे वैभव पाहून! दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला. सुरज एकदम राजबिंडा दिसत होता, तर शलाका जणू अप्सराच! त्याची नजर शलाका वरून हटतच नव्हती. मोठी मंडळी गप्पांत गुंतली होती, मग कावेरीबाईनी सुरज आणि शलाकाला बाहेर बागेत पाठवले. "मला लग्नानंतरही नोकरी करण्याची इच्छा आहे." शलाकाने बोलायला सुरुवात केली. "हो कर ना. कोणाचीच हरकत नाही. फक्त आईची इच्छा आहे, की लग्नानंतर तू तुझा पूर्ण पगार आणि पैसे आईच्या हाती द्यावेस." तिच्यावरून नजर हटवत सुरज म्हणाला. शलाकाला हे ऐकून धक्काच बसला.
"अरे, पण तुम्हाला पैशांची काय कमी आहे? माझा पगार म्हणजे तुमचा १ दिवसाचा खर्च असेल." "अगं हो राणी! इतकी काय घाबरतेस तू? आई जरा जुन्या विचारांची आहे. आणि तू काय मी काय, माझं जे आहे ते सगळं तुझंच तर आहे. " सुरज लाडात येऊन समजावत होता. आत सुपारी फोडली. येत्या २ दिवसात साखरपुडा आणि १५ दिवसात लग्नाची तारीखही निश्चित झाली. सगळेच आनंदात होते. सुरज दररोज भेटवस्तू पाठवत होता, कधी भेटायला येत होता, बाहेर फिरणं, सिनेमा या सगळ्यांत शलाका पगाराचा विषय विसरून गेली. लग्न एकदम धुमधडाक्यात झाले. प्रधानांनीही कसलीच कमी ठेवली नाही मुलीच्या लग्नात. सासरी गृहप्रवेश झाला आणि सासूबाईंनी दिवाणखान्यात बोलावून कसलीशी कागदपत्र शलाकाच्या हातात दिली. "घ्या सुनबाई, यावर सही करा पटकन". शलाकाने काहीच न समजून सुरजकडे बघितले. "अगं, त्याला काय बघते आहेस? पहिल्या भेटीत त्याने सांगितले होते ना तुला कि, तुझा सगळा पैसे माझ्या हाती द्यावा लागेल. बस हे तुला कायम लक्षात राहावे म्हणून हा प्रपंच!" शलाकाला काहीच सुचत नव्हते. "काय इतका विचार करते आहेस? करून टाक ना सही पटकन. आईसाठी इतकंही नाही करू शकत का तू?" सुरजचे हे बोल ऐकून शलाकापुढे काहीच पर्याय शिल्लक न राहिल्याने गपचूप तिने सही केली. पुढचे सगळे विधी हसत खेळात पार पडले. नवे जोडपे बाहेर देशात हनिमूनला जाऊन आले. तिथून आल्यानंतर शलाकाच्या चेहेऱ्यावर वेगळेच तेज आले होते. तिला काय माहित, पुढे तिला कसला सामना करावा लग्न होता ते ?
दुसऱ्या दिवशी शलाका माहेरी जायला निघाली होती, सुरज सोडायला येणार होता म्हणून जाताजाताच चांगली मिठाई आणि भेटवस्तू घेऊन जायचे तिने ठरवले. पर्स कुठे दिसेना. तितक्यात सासूबाईंनी ५०० रुपये हातावर ठेवले आणि म्हणाल्या, "जाताना मिठाई घेऊन जा. पर्स कशाला हवी माहेरी जाताना? राहूदेत माझ्याकडे. मी ठेवते सांभाळून." ती काही न बोलता गाडीत बसली. वाटेत मिठाई घ्यायला थांबली असता तिने सुरजकडे आणखी पैसे मागितले तर तो म्हणाला, "आईने दिले आहेत ना. उगाच कशाला जास्त घेतेस. दोघेच तर आहेत ते. किती खाणार?" पुन्हा ती गप्प झाली. माहेरी गेल्यावर दोघांचीही मस्त खातिरदारी झाली. निघताना रीतीप्रमाणे विनयरावांनी पैशाचे पाकीट शलाकाच्या हातावर ठेवले आणि निरोप घेऊन दोघे गाडीत बसले. "तुझ्याकडे पर्स नाही ना.? उगीच पडून जाईल." असे म्हणत लगेच सुरजने तिच्या हातातून पाकीट घेऊन खिशात ठेवले. घरी सगळे नीट होते. सुरज तिच्यावर खूप प्रेम करत होता. पैसे मात्र तिला जितक्यास तितकेच मिळत असत. सुरुवातीला नव्या नवलाईचे दिवस म्हणून तिने तितके लक्ष दिले नाही. पण शाळेत जायला लागल्यावर तरी हाताशी थोडे पैसे असावे म्हणून तिने सासूबाईंना विचारले, "आई आज जरा बँकेतून थोडे पैसे काढून आणते मी. माझे पासबुक द्याल का? किंवा एटीएम कार्ड द्या." कावेरीबाईनी डोळे विस्फारले आणि म्हणाल्या, "इतकी काय गरज पडली तुला पैशांची? सरपंचांची सून पैसे काढायला गेली तर लोक शेण घालतील तोंडात. कसली कमी आहे तुला? कोणाला द्यायचे आहेत पैसे? लागतील तितके तर मी आणि सुरज देतोच आहोत ना. सोडायला आणायला गाडी, ड्राइवर सोबत असतो. जेवणाचा डब्बा तर तू घेऊन जातेस. काही वस्तू आणायला मी किंवा सुरज असतोच ना. मग कशाला लागतात तुला पैसे? नोकरी करून देतोय ना आम्ही तुला. घराण्याची रीत नसतानाही तुला बाहेर पडू देतोय हे नशीब मान तुझे." शलाकासाठी हा मोठा धक्का होता. ती नोकरीला लागल्यापासून तिने बाबांकडूनही कधीच पैसे मागितले नव्हते. आणि आज स्वतःच्याच पैशाला ती पारखी झाली होती. "आई, कधी काही अडचण वाटली तर असावे सोबत म्हणून हवे आहेत थोडे पैसे. म्हणजे तुम्हाला आवडत नसेल बाहेरून काढलेले तर तुमच्या जवळचे दिलेत तरी चालतील. तुम्ही माझ्या पगारातून घ्या मग." कावेरीबाईंना तिथून सटकायचे होते, पण ही बया अडूनच बसली होती आज, "हे घे १०० रुपये ठेव अडचणीला जवळ. बस जा आता मला काम आहे." आणि त्या निघूनही गेल्या.
शलाकाने शाळेत गेल्यावर सूरजला फोन करून हि गोष्ट सांगितली, त्याने "मी आता कामात आहे घरी आल्यावर बोलू" असे म्हणून फोन ठेवून दिला. शलाका विचार करत होती. मी इतक्या मोठ्या शाळेची मुख्याध्यापिका. इथे सगळ्यात जास्त माझा पगार आहे. श्रीमंत सासर माझे. तरीही माझ्या हातात फक्त १०० रुपये? मी कुठल्या दिखाव्याला आणि प्रेमाला भुलून हे लग्न केले नक्की? आजवर माझ्या शिक्षणासाठीचा सगळा खर्च माझ्या शिष्यवृत्तीवर झाला. बाबांनी तर कधीच कुठल्या गोष्टीची कमी जाणवू दिली नाही. बाबांचा विचार आल्यावर एकवार वाटले त्यांच्याजवळ मागावे का? पण त्यांना काय सांगणार? हे सगळं त्यांना समजलं तर किती वाईट वाटेल त्या दोघांना. मी इतकी कमावती, तरीही आज मी माझ्याच पैशासाठी दुसऱ्याकडे भीक मागावी? तिचे आज कामात बिलकुल लक्ष नव्हते. कसेतरी तास संपवून ती घरी येऊन सुरजची वाट पाहू लागली. सुरजने हळूच येऊन हिऱ्यांचा हार तिच्या गळ्यात घातला. शलाका भडकली, नको मला हा हार. माझेच पैसे मी माझ्या मर्जीने वापरू शकत नाही, काय उपयोग या सगळ्याचा?"
सुरजने हात उगारलाच होता इतक्यात तिचा आवाज ऐकून विश्वासराव आणि कावेरीबाईही धावत आले. त्यांना पाहून सुरज जरा वरमला. विश्वासरावांनी विचारले, काय झाले सुनबाई ओरडायला? आणि हा इतका महाग हार असा का फेकला आहे? वस्तूची किंमत करायला शिका जरा महाग आहे तो. "इतकीच जर महाग आहे, तर मग आणायचीच कशाला? मला नाही या महागड्या वस्तूंचा सोस. पण तुम्हाला आहे ना माझ्या कैक हजारांची भीक लागलेली." "तोंड सांभाळून बोल शलाका", कावेरीबाई ओरडल्या, "सासरे आहेत ते तुझे. आजवर कोणाचीच हिंमत नाही झाली असा आवाज चढवून बोलण्याची. आणि तू काय ग पैशाचा हिशोब मागतेस? तुला ऐकायचं ना तुझे पैसे का घेतले आहेत आम्ही? ऐक मग. हा आज जसा आवाज चढवला आहेस ना तसा कायम आवाज चढवशील तू. पैशाचा रुबाब दाखवत फिरशील इथे. मोठी कर्तृत्व गाजवली आहेस ना? ती घरातही गाजवशील. माहेरी पैसे पुरवत राहशील, वाटेल तशी उधळपट्टी करशील म्हणून हा लगाम घातला आहे तुझ्यावर, समजलीस? या घरात राहायचे तर माझे नियम पाळावे लागतील तुझ्या शाळेचे नाही." आता मात्र शलाकाला समजले आज गप्प बसले तर संपले सगळे तुझे अस्तित्व. विजेसारखी आली शलाका,
"तुम्ही सांगाल तसे वागायला मी तुमच्या हातचा खुळखुळा नाही.!" तिच्या नेत्रात अंगार फुलला होता .
माझ्या आईवडिलांनी मला शिकवून मोठे केले, मी माझ्या पायांवर उभी राहिले ते या तुमच्या सोन्याच्या पिंजऱ्यात कैद होण्यासाठी नाही. पिंजऱ्यातील पक्षी आणि माझ्यात इतकाच फरक की, मला नोकरीसाठी बाहेर जाता येतंय. पण काय उपयोग त्याचा? मला त्याचवेळी समजायला हवं होतं, तुम्हाला इतकी शिकलेली, नोकरी करणारी सून केवळ समाजात दिखावा करण्यासाठी हवी होती. आमची सून इतकी शिकलेली, मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणारी. मुख्य म्हणजे आम्ही इतके गर्भश्रीमंत असूनही सुनेला तिची आवड म्हणून नोकरी करून देतोय, हेच दाखवायचे होते ना तुम्हाला. तिने नोकरी तर करावी, पण पैसे मात्र वापरू नये. का तर तुम्हाला भीती, ती कोणाचा हात धरून पळून गेली तर? घरंदाज म्हणाला होतात ना आई तुम्ही मला, मग इतकाही विश्वास नाही ठेवता आला? आणि सुरज तू, तुलाही स्वतःच्या प्रेमावर विश्वास नाही का? प्रेमापेक्षा पैसे जास्त महत्वाचे वाटले तुम्हाला? बाबा गावचे सरपंच तुम्ही, लोकांना सांगता आमची सून स्वावलंबी आहे, हे असे स्वावलंबन जपलेत तुम्ही माझे? नको मला हे बंधन तुमचे. घटस्फोटाची नोटीस येईल लवकरच, आज मी घर आणि ही तुमची नाती तोडून जात आहे." शलाका बॅग भरून जायला निघाली कोणीही तिला अडवले नाही.
माहेरी गेली, आईबाबांना सगळे सांगितले, त्यांनीही तिच्या निर्णयाचे स्वागत केले. घटस्फोट घेऊन निदान कोणाचे परावलंबित्व तरी नाही चिकटून राहणार अंगाला!
आजही कित्येक घरांत शलाकासारख्य घुसमटणाऱ्या स्त्रिया आहेत. स्त्रीही कितीही स्वावलंबी झाली तरीही तिला कुठे ना कुठेतरी दुसऱ्यावर अवलंबून रहावेच लागते. किंबहुना तिला तसे राहण्याची सक्ती केली जाते. स्त्रीचे परावलंबित्व हे ती स्वतःच मान्य करते. आणि मग सुरु होते तिची घुसमट कधीही न संपणारी.!
-मनाली पाटील
(ठाणे विभाग)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा