Jan 26, 2022
नारीवादी

अश्शी सासू.. हवी गं बाई!

Read Later
अश्शी सासू.. हवी गं बाई!

"अन्वीsss, ऊठ गं आता. किती वाजले आहेत बघितलेस का? कठीण आहे या मुलीचं. लग्नानंतर हिचे सासरचे आमचा उद्धार करणार आहेत. आई-वडिलांनी काही वळण लावलं नाहीये म्हणून. ए अन्वी, ऊठ गं!" शैलाताई आपल्या एकुलत्या मुलीला गदागदा हलवून उठवत होत्या. 

"आई, मस्त कटलेट कर ना, मला स्वप्न पडलं मी तुझ्या हातचे गरमा गरम कटलेट खाते आहे. तेवढ्यात तू उठवलंस." अन्वी डोळे न उघडता म्हणाली. 

"हो का? माझ्या हातचे धपाटे खातेयस असं स्वप्न पडणार आहे तुला आता आणि मी ते स्वप्न पूर्ण पण करणार आहे. ऊठ गं बाई! ९ वाजून गेले." शैलाताईंनी अन्वीला हाताला धरून उठवून बसवलं.

"मग काय झालं गं आई. मला कुठे जायचंय आता. सुट्टी चालू झालीये ना माझी." अन्वी डोळे चोळत उठून बसली.

"हो, पण ती सुट्टी तू लग्नाच्या तयारीसाठी घेतली आहेस ना? मग झोपा काय काढतेयस. चल, उठून आवर पटापट, आपल्याला दागिन्यांच्या खरेदीला जायचंय ना आज. तुझ्या सासूबाईंचा फोन येईलच इतक्यात." शैलाताई धुतलेले कपडे घडी घालून कपाटात ठेवत म्हणाल्या. 

काही महिन्यांपूर्वीच अन्वीचं लग्न ठरलं होतं, समरशी. दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तेव्हा दोघांमध्ये फारशी ओळख नसली तरी कॉलेज संपल्यावर भेटीगाठी वाढल्या आणि त्यांच्या थोड्याफार ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांचं करिअर जरा स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी घरच्यांना सांगितलं. लगेच लग्नासाठी घाई सुरु झाली. दोन्ही घरांमधलं सगळंच चांगलं असल्यामुळे काही विरोध व्हायचा प्रश्नंच  नव्हता. दोघंही एकुलते एक असल्यामुळे लग्न एकदम धुमधडाक्यात करायचं असं एकमताने ठरलं होतं. आता लग्न म्हंटलं की प्रत्येकाच्या वेगळ्या तऱ्हा, वेगळ्या अपेक्षा होत्या. त्यामुळे थोडे मतभेद होणं स्वाभविकच होतं. पण दोन्ही घरची माणसं समंजस होती त्यामुळे समारंभाला गालबोट लागेल असं कोणीच वागत नव्हतं. 

अन्वीसाठी नाही म्हंटलं तरी हा खूप मोठा बदल होता. एकुलती एक असल्यानं आत्तापर्यंत लाडाकोडात वाढली होती. आधी शिक्षण आणि मग नोकरीमध्ये बिझी असल्यामुळे शैलाताई लेकीला घरात फार काही कामं करू देत नव्हत्या. दिवसभर दमून आल्यावर कुठे पोरीला परत स्वयंपाकघरात कामाला लावायचं असं त्यांना वाटायचं. त्यामुळे सकाळच्या चहापासून रात्री जेवणानंतरच्या बडीशेपेपर्यंत सगळं अन्वीच्या हातात आयतं येत होतं. पण आता लग्न झाल्यानंतर सासरच्यांकडून अशी अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे हे शैलाताईंना कळत होतं. शेवटी ते आता तिचं घर असणार म्हणजे तिने तिकडच्या कामांना हातभार लावलाच पाहिजे आणि त्यासाठीच त्या सध्या अन्वीला, त्यांच्याकडून सोप्पे पदार्थ का होईना शिकून घ्यायचा आग्रह करत होत्या. 

"कोण एवढं सगळं करत बसेल आई! तू पण ना, आजकाल सगळ्या कामांसाठी बायका मिळतात. त्या करतील ना स्वयंपाक. मला कुठे वेळ आहे हे सगळं करायला. एक पोळी धड लाटता येत नाहीये मला." अन्वी जरा वैतागूनच म्हणाली. सुट्टीच्या दिवशी एक दिवस शैलाताई तिला पोळ्या बनवायला शिकवत असताना एकही पोळी तिला धड जमत नव्हती. 

"असं कसं सगळं झटपट होईल गं? आजच पहिल्यांदा लाटणं हातात घेतलंस आणि लगेच पोळ्या जमल्या पाहिजेत का तुला? रोज दोन तीन पोळ्या बनवल्यास की जमेल आपोआप." लेकीची समजून काढत शैलाताई म्हणाल्या. 

"मी कशाला शिकू हे सगळं? समर काही शिकतोय का? तो छान बॅचलर लाईफचे शेवटचे काही दिवस म्हणून उनाडक्या करत फिरतोय. आणि मी इकडे सुट्टीच्या दिवशी हे करत बसलेय." अन्वी हातातल्या पोळीच्या गोळ्याशी खेळत म्हणाली.

"असंच असतं बघ. लग्नानंतर दोघांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. बदल त्याच्यापण आयुष्यात होणार आहेतच की. पण मुलीची जबाबदारी जास्त असते. घराकडे लक्ष देणं, कोणाला काय हवं नको बघणं, हे सगळं जमायला हवं तुला हळूहळू. मी शिकवेन की. एवढे कठीण विषय शिकून पास झालीस मग हे न जमायला काय झालंय? तुझ्या सासूबाई पण तश्या चांगल्या वाटल्या. त्या पण शिकवतील तुला." म्हणून शैलाताईंनी अन्वीच्या हातातून कणकेचा गोळा घेऊन लाटायला सुरवात केली.

म्हणता म्हणता लग्न महिन्यावर आलं होतं. अन्वीच्या ऑफिसच्या वेळांमुळे तिला लग्नाच्या तयारीला वेळच मिळत नव्हता. म्हणून शेवटी तिने लग्नाच्या काही आठवडेआधी सुट्टी टाकली होती आणि त्या सुट्टीचा आज पहिला दिवस होता. सुट्टी आहेच तर वेळ कशाला वाया घालवायचा म्हणून शैला ताईंनी परस्पर दागिने खरेदीचा प्लॅन बनवून टाकला होता. उठून फ्रेश होऊन अन्वी बाहेर आली, तेव्हा शैला ताईंनी लेकीच्या फर्माइशीप्रमाणे कटलेट तयार ठेवले होते. 

"आई, त्या काकूंचा फोन आला होता. मंगळसूत्रासाठी कसं डिजाईन हवंय विचारायला." फोनमध्ये बघत अन्वी म्हणाली.

"कोण काकू गं?" शैलाताईंनी गोंधळून विचारलं.

"समरच्या आई गं. आता मला मंगळसूत्राबद्दल अजून कोण विचारणार आहे? तू पण कमाल आहेस हां आई!" अन्वी समोर ठेवलेल्या कटलेट्सवर ताव मारत म्हणाली.

"अगं मग आई म्हण काकू काय? तुझीच कमाल आहे हां." शैलाताई डोक्यावर हात मारत म्हणाल्या.

"असं कसं मी अचानक कोणाला पण आई म्हणू? चांगली ओळख झाली, मनातून वाटलं की म्हणेन ना. समाज सांगतो म्हणून मी काही करणार नाहीये." अन्वी म्हणाली. शैलाताई काही बोलणार तेवढयात दारावरची बेल वाजली आणि अन्वी दार उघडायला गेली.

"मितूssss!" अन्वीच्या ओरडण्याने शैलाताई बाहेर आल्या. दारात अन्वीची बालमैत्रीण उभी होती..मिताली. लग्न करून अमेरिकेला गेल्यानंतर तीन वर्षांनी पहिल्यांदाच भारतात आलेली. तिच्या लाडक्या मैत्रिणीच्या लग्नासाठी.

"माझा विश्वासच बसत नाहीये तू आलीयेस ह्यावर. इतकी खुश आहे ना मी. आता खरेदीला अजून मज्जा येईल." फ्रेश होऊन मिताली आणि अन्वी गप्पा मारत होत्या. 

"हो ना गं, मला शेवटच्या क्षणापर्यंत भरवसा नव्हता यायला मिळेल कि नाही यावर. निघताना माझ्या सासूबाईंनी अश्रू ढाळलेच. आता घराकडे कोण बघणार, सगळी कामं मला करावी लागतील वगैरे.. तुला सांगते मी अनु, घरात सगळ्या कामांसाठी मशीन आहे हां. मग फक्त स्वतःसाठी आणि मुलासाठी जेवण बनवून घ्यायला काय कष्ट आहेत गं? मी करतेच ना सगळं एरवी." मिताली आपल्या सासूच्या तक्रारी अन्वीकडे करत होती.

"आता कशाला तक्रार करतेयस? लग्न झालं तेव्हा तर कौतुक करत होतीस त्यांचं. आमच्या आई अशा आणि आमच्या आई तशा." अन्वी म्हणाली. त्या दोघींच्या गप्पा चालू असताना शैलाताई आल्या.

"चला गं लवकर, मेधाताईंचा दोनदा फोन येऊन गेला. तुमच्या गप्पा काही संपायच्या नाहीत." त्या म्हणाल्या तश्या मिताली आणि अन्वी निघाल्या. 

"अन्वी अगं जरा शांत हो. एवढी चिडचिड करणं बरं नव्हे. त्यांनी तुला फक्त सुचवलं ना, कोणी तुला जबरदस्ती केली का?" दागिन्यांच्या खरेदीवरून घरी आलेल्या शैलाताई अन्वीला समजावत होत्या.

"सुचवायचं असतं तर एकदा सुचवलं असतं त्यांनी. दहा वेळा एकच गोष्ट बोलल्यावर समोरच्या माणसावर दबाव येणारच ना? मी निवडलेलं मंगळसूत्र किती छान आणि नाजूक होतं. रोजच्या वापरासाठी एकदम परफेक्ट. पण नाही, ह्यांना नकोच होतं, दोन दोन मंगळसूत्र कशाला? हेच घे, तेच घे. स्वतःचंच खरं करायचं होतं तर आपल्याला कशाला बोलावलं? परस्पर जाऊन करून टाकायची खरेदी." अन्वी चिडून म्हणाली. 

"मी म्हणते तू तरी कशाला पडतं घेतलंस अनु? सुरवात अशीच होते मग आपल्या म्हणण्याला काही किंमत रहात नाही. माझंच बघ ना आता." मिताली म्हणाली. 

"तु ऊगाच आगीत तेल नको घालूस गं. चांगली माणसं आहेत ती, असं काही त्यांच्या मनात पण नसेल." शैलाताई दोघींची समजूत घालत होत्या. पण अन्वी तणतणत तिच्या खोलीत निघून गेली. 

रात्री जेवण झाल्यावर शैलाताई अन्वीच्या खोलीत आल्या तेव्हा ती बाल्कनी मध्ये येरझाऱ्या घालत होती. सकाळच्या प्रकाराने ती जरा अस्वस्थ झाली आहे हे शैलाताईंना कळलं होतं. 

"काय गं, लग्नासाठी वजन कमी करायला फेऱ्या मारतेयस का?" त्यांनी जरा मूड हलका करायला विचारलं. त्यावर अन्वी काहीच बोलली नाही.

"अनु, मला माहितीये बाळा, सकाळी झालेल्या प्रसंगाने तुझा जरा हिरमोड झाला आहे. तुम्हा आजकालच्या मुलींना सगळं स्वतःच्या आवडीने करायची सवय असते. अगदी आई - वडिलांनी सांगितलेलंही चालत नाही तुम्हाला. आणि त्यात चुकीचं काहीच नाही. मुलांच्या बरोबरीने नोकरी, करिअर सगळं करता तुम्ही मग लग्न झाल्यानंतर अचानक ते सगळं दुसऱ्यांच्या सांगण्यावरून बदलायचं, जरा कठीणच आहे. पण एक आई म्हणून सांगते तुला, बाकी सगळं कितीही बदललं तरी मुलं आणि मुलींचा मूळ स्वभाव बदलत नाही बाळा. लग्नानंतर मुलींनाच त्यांचं घर सोडून सासरी का पाठवतात? कारण अशी दोन विभिन्न कुटुंब जोडण्याची ताकद फक्त एका बाईमध्येच आहे. हे मला कोणी सांगितलंय माहितीये?" शैलाताईंनी लेकीकडे बघत विचारलं.

"तुझ्या आईने?" अन्वीने त्यांना विचारलं.

"नाही, माझ्या सासूबाईंनी. लग्न करून मी घरात आले तेव्हा तुझ्यासारखंच मला वाटत होतं, आता मला सगळं ह्यांच्या मनाप्रमाणे करावं लागणार, माझे आई वडील मला दुरावणार, वगैरे वगैरे.. पण माझ्या सासूबाईंनी माझ्या विचारांना एक वेगळीच दिशा दिली. त्या काय म्हणाल्या माहितीये? लग्न झालं म्हणून आपले आई-वडील आपल्याला दुरावतील असा विचार करण्यापेक्षा आपल्याला आपल्या हक्काचे अजून एक आई-वडील मिळणार आहेत असा विचार का नाही करत तू? लग्न झाल्यावर एका मुलीवर दोन घरं सांभाळायची, त्यांना जवळ आणण्याची जबाबदारी असते, पण ह्या जबाबदरीकडे ओझं म्हणून न बघता एक संधी म्हणून बघितलं तर सगळं सोप्पं होतं बघ. आजकाल मुलींच्या घरचे पण काहीबाही त्यांच्या मनात भरून पाठवतात आणि मग मुली पहिल्या दिवसापासूनच घरात रणरागिणीची भूमिका घेऊन वावरतात. त्यामुळे घराचं वृंदावन कमी आणि रणांगणंच जास्त होतं. समोरचा कितीही चांगला वागला तरी चुकीचे अर्थ काढतात. अशाने त्यांचा संसार तर चालू रहातो पण कुटुंबातला ओलावा निघून जातो." शैलाताईंच्या बोलण्याने अन्वी जरा शांत झाली होती. 

"पण आई, कुटुंब जोडायचं म्हणून काय सारखं पडतं घ्यायचं का मी? बाकीच्यांनी पण माझा विचार केला पाहिजे ना? त्या मितालीचं बघ ना आता, सगळं ऐकत राहिली दुसऱ्यांचं, आता स्वतःच्या मनासारखं काही करता येत नाही तिला. केवढं काय काय सांगत होती ती मला." अन्वी म्हणाली.

"अनु हे सगळं तुला मिताली सांगते आहे म्हणजे ती तिच्या बाजूने सांगत असणार, तिच्या सासूची बाजू तुला कधी कळणारच नाही. आणि मी असं म्हणतच नाहीये की सगळं सोप्पं असतं. माणसं आली म्हणजे त्यांचे स्वभाव आले, व्यक्ती तितक्या वल्ली. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू दुसऱ्या कोणाच्या अनुभवांवरून तुझं वागणं ठरवू नकोस. अगदी माझ्याही नाही. कोणतंही नवीन नातं म्हंटलं की तडजोडी आल्याच, मतभेद आलेच. आता मी तुझी सख्खी आई असूनही आपलंही भांडण होतंच की. म्हणून तू मला लगेच व्हिलन ठरवून मोकळी होतेस का? कुठलंही नातं बहरायला वेळ द्यावा लागतो आणि प्रयत्नही, दोन्ही बाजुंनी. आणि त्यासाठी जर आपल्याला पाहिलं पाऊल टाकावं लागलं तरी त्यात काहीच कमीपणा नाही वाटला पाहिजे." शैलाताई म्हणाल्या.

"पटतंय गं तुझं बोलणं मला. पण मला खरंच ते मंगळसूत्र आवडलं होतं." अन्वी तक्रारीच्या सुरात म्हणाली. 

"बरं, तुमच्या पहिल्या दिवाळसणाला घेईन मी तुला ते, मग तर झालं? चला झोपा आता, नाहीतर लग्नात डार्क सर्कल्स दिसतील हं." अनुच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत शैला ताई म्हणाल्या आणि अन्वी हसून त्यांच्या गळ्यात पडली.

बघता बघता लग्नाचा दिवस आला. कार्य निर्विघ्नपणे पार पडलं. सासरी आल्यावर लक्ष्मी पूजन आणि बाकीचे कार्यक्रम होईपर्यंत रात्रीचे अकरा वाजून गेले होते. अन्वी झोपायला तिच्या खोलीत जायला निघाली.

"सुनबाई, उद्या पूजा ठेवली आहे बरं का सकाळी, लवकर उठा म्हणजे झालं, नाहीतर देव वाटत बघत बसतील." समरची आज्जी म्हणजेच अन्वीच्या आज्जेसासूबाई म्हणाल्या. अन्वीने मानेनंच संमत्ती दाखवली आणि ती खोलीत निघून गेली. खरंतर ती दिवसभर एवढी दमली होती की दुसऱ्या दिवशी दहाच्या आधी उठायची तिची अजिबात इच्छा नव्हती. आपल्याच विचारात दागिने काढत असताना तिच्या खोलीच्या दारावर कोणाची तरी थाप पडली, दारात मेधाताई म्हणजेच अन्वीच्या सासूबाई उभ्या होत्या. त्यांना बघून अन्वी पटकन उभी राहिली.

"अगं असू दे गं, सकाळपासून ऊठ बस करून दमली असशील ना. बस बस. मी आपली तुला काही मदत हवीये का विचारायला आले होते. म्हंटलं आजकाल लग्नातल्या हेअर स्टाईल्स म्हणजे पिना जास्त असतात." त्या अन्वीच्या शेजारी बसत हसून म्हणाल्या. 

"नाही तुम्ही कशाला त्रास घेतलात. समरने मदत केली असती की." अन्वी अवघडून म्हणाली. 

"झालं, अगं मुलांना कुठे कळतं यातलं काही, त्या गंगावनाबरोबर तुझे खरे केस पण काढायचा डोक्यावरून." म्हणून त्या स्वतःच आपल्या जोकवर खळखळून हसल्या आणि अन्वीलाही हसायला आलं.

"बरं त्या आधी हे घे, तुला एक छोटीशी भेट माझ्याकडून, बघ आवडतंय का?" म्हणून मेधाताईंनी अन्वीसमोर त्यांनी आणलेलं गिफ्ट धरलं.

"अहो याची काही गरज नव्हती, पण थँक यु!" अन्वीने त्यांच्या हातून गिफ्ट घेत म्हंटलं आणि त्यांच्या आग्रहाखातर ते उघडलं. आत तिने त्या दिवशी पसंत केलेलं नाजूक मंगळसूत्र होतं! तिने आश्चर्याने त्यांच्याकडे बघितलं.

"आवडलं का? अगं त्या दिवशी आपण खरेदीला गेलो होतो तेव्हा मी आधीच हे तुझ्यासाठी घेतलं होतं. माझं ठरलं होतं, तू घरी येशील तेव्हा तुला द्यायचं, माझ्याकडून. आपल्या नव्या नात्याची सुरवात म्हणून. तुला आवडलं नसतं तर हे देऊन दुसरं काहीतरी आणलं असतं हां आपण. पण त्या दिवशी तूही नेमकं हेच निवडलंस आणि माझी पंचाईत झाली. म्हणून मी तुला दुसरं काहीतरी घ्यायला सांगत होते. पण खरं सांगू का? मला मनातून छान वाटलं, आपल्या दोघींची निवड जुळली म्हणून." मेधाताई अन्वीच्या डोक्यावरचं गंगावन काढत म्हणाल्या. अन्वी त्यांचं बोलणं ऐकत होती. त्यांचं बोलणं चालू असतानाच समर तिकडे आला. त्याला बघून मेधाताई तिकडून जायला निघाल्या.

"चला, खूप रात्र झालीये, दमला असाल ना दोघं. झोपा आता. आणि अन्वी, बाळा सकाळी उठायची काही घाई करू नकोस हां. मगाशी आई बोलल्या खरं, पण मी मुद्दामूनच गुरुजींना उद्या जरा उशिरा बोलावलं आहे. तू ऊठ हां आरामात." अन्वीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्या म्हणाल्या आणि तिकडून जायला निघाल्या. त्यांचं बोलणं ऐकून अन्वीला तिच्या आईचं बोलणं आठवलं, 'कुठलंही नातं बहरायला वेळ हा लागतोच आणि प्रयत्नही, दोन्ही बाजुंनी'. मेधाताईंनी पहिलं पाऊल टाकलं होतं, आता पाळी अन्वीची होती. 

"आई!", अन्वीच्या नकळत तिच्या तोंडून बाहेर पडलेल्या त्या शब्दांनी मेधाताईंनी वळून तिच्याकडे बघितलं.

"गुड नाईट! आणि गिफ्ट खूप आवडलं." अन्वी त्यांच्याकडे बघून हसून म्हणाली आणि त्यांच्या सासू-सुनेच्या, नव्हे माय-लेकीच्या नव्या नात्याला सुरवात झाली.

 

समाप्त!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Mrunmayee Kulkarni

Software Engineer

मराठी साहित्य आणि कादंबऱ्या वाचायची आवड मला लहानपणापासूनच होती, पण आपणही अशा कथा लिहू शकतो असं सध्याच जाणवलं, म्हणून म्हंटलं काय हरकत आहे प्रयत्न करून बघायला. मी काही मुरलेली लेखक नाही, पण माझ्यामते कोणीही लेखक म्हणून जन्माला येत नाही. लेखक हा घडत असतो तो त्याच्या आसपासच्या परिस्थितीने आणि लोकांच्या प्रोत्साहनाने. अपेक्षा आहे की तुम्हाला माझा हा लिखाणाचा प्रयत्न नक्कीच आवडेल आणि त्यातूनच कदाचित माझ्यातला लेखक घडेल!