अस्पर्शीत रानफूल ( भाग तीन)

सोमाली माम म्हणजे स्त्री शक्तीचा एक अदभुत चमत्कार आहे. आदी शक्तिचा साक्षात् आविष्कार आहे. मनात आणलं तर एक सामान्य स्त्री देखील काय करू शकते याचं जाज्वल्य उदाहरण म्हणजे सोमाली माम.


अस्पर्शीत रानफूल ( भाग तीन )

आशेचा किरण 


हा पेरी तिच्या आयुष्यात एका देवदूता सारखा अवतरला. तो तिला घेऊन सरळ फ्रान्स मध्ये आला.  फ्रान्स मधील स्त्रिया, त्यांचे विचार स्वातंत्र्य, त्यांचे शिक्षण या गोष्टी सोमाली साठी कल्पनेपलीकडच्या होत्या. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने मिळणारे स्वातंत्र्य पाहून ती आश्चर्य चकित झाली. ईथल्या स्त्रिया उच्च शिक्षण घेतलेल्या आणि पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावुन काम करणाऱ्या होत्या. त्यांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य होते. हे सर्व शिक्षणा मुळे शक्य झाले होते ही गोष्ट सोमालीच्या लक्षात आली होती आणि या बाबतींत तर ती पूर्णपणं अडाणी होती. ती कधी शाळेत गेलीच नव्हती. पण तिने मनाशी अभ्यास करण्याचा निश्चय केला. पेरिने तिला साथ दिली.

तिने फ्रेचं आणि इंग्रजी भाषेचा अभ्यास करून पाश्चात्य जगाशी ओळख करून घेतली. या आधी तिला फक्त  तिच्या देशाची ख्मेरच भाषा येत होती.

त्याच काळात पेरीने तिच्या जवळ  विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तिने त्याला मान्यता दिली. त्या दोघांचा सुखाचा संसार सुरु होता.

सगळ काही सुरळीतपणं सुरू होत पण सोमाली मनातून खूप अस्वस्थ होती. तिच्या मनातून आपल्या गरीब देशातल्या तिच्या सारख्या अशिक्षित स्त्रियांची दयनीय अवस्था जात नसे. तिच्या देशात   आईवडीलच मुलीला देहव्यापाराला भाग  पाडत असत. गरीबीचं इतकी असे की  त्यात काही वावगं आहे असंही त्यांना वाटत नसे. शेवटी सोमालीला आपला जिविताचा मार्ग सापडला. तिने पेरीला आपण अश्या मुलींसाठी काहीतरी करू अशी विनंती केली. पेरीलाही ती कल्पना आवडली.

 दोघं पून्हा कंबोडियाला परत आली.  सोमाली म्हणते मला जसा माझा आतला आवाज सापडला होता तसा प्रत्येक पीडित महिलेला तो सापडावा म्हणून मी झपाटली गेली. तिचं कार्यही झपाट्यानं सूरू झालं. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळायला लागला.

माझ्या मित्राच्या घरातच मी अश्या दुर्दैवी मुलींसाठी आश्रय केंद्र केलं. थायलंड, व्हिएतनाम आणि लाओ या देशात कार्यकर्त्यांचं एक विशाल जाळं निर्माण केलं.  जिथून जिथून सोमालीला अशा दुर्दैवी स्त्रियांची माहिती मिळत असे तिथे तिथे ती धावून जात असे आणि स्थानिक प्रशासनाची मदत घेऊन त्या मुलींची सुटका करत असे. कितीतरी वेळा या मुली अवघ्या आठ नऊ वर्षाच्याच असतं. त्यांना कशाशीच काहीही माहिती नसे. या मुलींना घरचे लोकही स्वीकारायला तयार नसत. मग त्यांचं पुनर्वसन,  शिक्षण हे प्रश्न देखील  सोमालीलाच सोडवावे लागत. स्थानिक गुंड, दलाल यांच्या त्रासाला  सामोरं जावं लागायचं ते वेगळंच.

 हळू हळू तिच्या या कार्याची दखल शासनाला घ्यावी लागली. इसवीसन दोन हजार सात मध्ये अमेरिकेतील काही लोकांनी तिला मदती साठी हात पुढे केला. तिने एक रजिस्टर्ड संस्था स्थापन केली. AFESIP ( अफेसीप ) असं आहे या संस्थेचं नाव आहे. सोमाली म्हणते आज या संस्थेचे  हजारो कार्यकर्ते अनेक देशांमध्ये जरी कार्यरत असले तरी मी रात्रंदिवस काम करत असते. माझ्या मनात माझ्या देशातल्याच नव्हे तर जगातल्या प्रत्येक स्त्री बद्दल फक्त प्रेम आणि प्रेमच आहे. मी नेहमी त्यांच्या कल्याणाचाच विचार करते. आज मला माझ्या देशात जे भोगावं लागलं त्या भूतकाळाला मी विसरु इच्छिते.

अशा या सोमालीच्या कार्याची दखल घेऊन तिला एक दिवस व्हाईट हाऊस मध्ये भाषणाला आमंत्रित केलं गेलं. सर्व जगातली  उच्च सुसंस्कृत लोकं तिथं उपस्थित होती. सोमालीला अशा भाषणाची सवय नव्हती. डोळे मिटून ती बोलायला लागली. आणि स्वतः अनुभवलेले ते क्षण बोलता बोलता जेंव्हा ती पून्हा अनुभवू लागली. तेंव्हा स्थळाकाळाचे आणि औचित्याचे सगळे भान विसरून भाषण संपल्यावर ती हमसाहमशी रडू लागली.आणि खाली बसून गेली. 

तिच्या करुण कहाणीने आणि तिच्या सारख्या असंख्य स्त्रियांच्या व्यथा ऐकून व्हाईट हाऊस देखील सुन्न होऊन गेलं. क्षणभर सगळ्या व्हाईट हाऊसमध्ये भीषण शांतता पसरली. नंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सोमाली मात्र स्थळा काळाच भान विसरून धाय मोकलून रडत होती.

सर्व देशांमधून तिथं वार्ताहर उपस्थीत होते. त्यामुळे एका क्षणात सोमाली जगात प्रसिद्ध झाली. आणि जागतिक पातळीवर तिचं कार्याची दखल घेतली गेली. असंख्य संस्थांनी तिला मदतीचा हात पुढे केला. आणि सोमालीच कार्य जोमाने सुरू झाले.

आजही तिचं हे कार्य अखंड सुरुच आहे.जगातल्या असंख्य दिन दुबळ्या स्त्रियांची ती आई झालेली आहे.

 आज  तिच्या या कार्याची दखल आंतर राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे.

गार्डीयन हा स्त्रियांचा सर्वोच्च बहुमान तिला दिला गेलेला आहे. त्या खेरीज टाइम्स या मासिकाने तिची विसाव्या शतकातील शंभर प्रभावशाली  व्यक्तीमत्वा पैकी एकात तिची निवड केली केली आहे. इटली देशाने देखील ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी तिला आपला ध्वज हातात घेण्याची संधी दिली होती.रेगीस युनिव्हर्सिटीने तिला सामाजिक कार्याबद्दल सर्वोच्च डॉक्टरेट पदवी देऊन तिचा सन्मान केला.

आजच्या आपल्या संपन्न जीवना बद्दल सोमाली म्हणते , आज माझ्या जवळ जगातली सगळ्यात महागडी अत्तरं आणि सुगंधी द्रव्य आहेत. मी दिवसातून अनेक वेळा जगातली सगळ्यात महागड्या साबणांनी स्नान करते पण लहानपणी झालेल्या त्या घाणेरड्या स्पर्शांना मी कधीच विसरु शकत नाही. मला वाटतं तिच्या या उद्गारांत स्त्री जीवनाची चिरंतन शोकांतिका दडलेली आहे.

                                                       ( समाप्त )

                                           लेखक : दत्ता जोशी

🎭 Series Post

View all