अस्पर्शीत रानफूल ( भाग दुसरा )

सोमाली माम म्हणजे स्त्री शक्तीचा एक अदभुत चमत्कार आहे. आदी शक्तिचा साक्षात् आविष्कार आहे. मनात आणलं तर एक सामान्य स्त्री देखील काय करू शकते याचं जाज्वल्य उदाहरण म्हणजे सोमाली माम.


अस्पर्शीत रानफूल ( भाग दोन )

आशेचा किरण


सोमाली, या शब्दाचा, ख्मेर भाषेत अर्थ होतो "रानात उगवलेले अस्पर्शीत रान फुल ". आपला जन्म नेमका कधी झाला हे सुद्धा नीट  ठाऊक नसणाऱ्या सोमाली मॅमला, आपल्याला सोमाली हे नाव कोणी दिलं हे देखील ठाऊक नाही. कंबोडिया देशातल्या मोंडुलकीरी प्रांतातल्या छोट्या खेड्यात.  सत्तर एक्कात्तर च्या दरम्यान तिचा  जन्म झाला असावा असं ती म्हणते.


आपल्याला सोमाली हे नाव देण्यात पण देवाने एक क्रूर थट्टा केली आहे असं तिला वाटतं. कारण तिला तिचे आई-वडील कोण आहेत हे देखील माहित नसणाऱ्या सोमालीला, जेंव्हा ती बारा वर्षाची झाली होती तेंव्हा तिला तिच्या आजोबांच्या वयाच्या माणसाला विकण्यात आलं होतं. कोणी विकलं होतं, कशाला विकलं होतं, का विकलं होतं,  हेही तिला ठाऊक नव्हतं. कसलाच भविष्यकाळ नसलेल्या सोमालीच आयुष्य फारच खडतर होतं.

त्या आजोबा एव्हढं वय असलेल्या माणसा साठी जेवण बनवणं, पाणी आणणं वगैरे वगैरे  काम ती न कुरकुरता करतं असे. हा आजोबा खूप दारू प्यायचा आणि तिला सतत  मारहाण करत शिवीगाळ करायचा. तिला उपाशी ठेवायचा. त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं. तेंव्हा, चवदा वर्षाच्या सोमालीला त्याने एका वेश्या गृहात विकून टाकले.

तिथं एका अनोळखी माणसा सोबत तिला लग्न करावे लागले. त्या माणसानेच तिला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं. त्या काळात सोमालीला अक्षरशः पाच सहा गिर्हाइकांसोबत थोड्या पैश्यांसाठी शैयासोबत करावी लागे. त्या काळात तिने क्रूरपणाचा कळस अनुभवला.

तिला उपाशी ठेऊन गटारीच्या काठावर साखळीने बांधून ठेवले जाई. तिच्या अंगावर लाल मुंग्या सोडल्या जात. आणि शरीर विक्रीला भाग पाडलं जात असे.

दिवस असेच चालले होते. जिथं फक्त यातनामय वर्तमान काळ होता. तिला ना कोणता भूतकाळ होता ना कोणता भविष्यकाळ. सोमालीच दुर्दैव असं की तिला इतर मुलांसारखं शालेय जीवनही उपभोगायला मिळालं नव्हतं. पण तरीही तिची जीवनाबद्दल तक्रार नव्हती. कदाचित बाहेरच्या जगाची कल्पनाच नसल्याने तिला सगळी कडे असंच असतं असं वाटायचं. पण एकदिवस एक गोष्ट घडली. आणि सोमालीच्या  भावविश्वाला तडा गेला. तिच्या सोबतिणीने गिऱ्हाइकासोबत जायला नकार दिला . तेंव्हा त्या मुलीची डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली. आणि हे सगळं घडलं होतं छोट्या सोमालीच्या डोळ्यासमोर. ती तर मुळापासून हादरून गेली. तिला कळून चुकलं की ज्या जगात ती जगून राहिली आहे. त्या जगात तिची किंमत शून्य आहे. ज्या दिवशी ती कोणत्याही गोष्टीला नकार देईल त्या दिवशी तिला देखील असंच ठार केलं जाईल. तिलाच काय तिथं ज्या ज्या मुली आहेत. त्यांना देखील असंच मारलं जाईल. आणि त्या दिवसा पासून तिच्या मनात तेथून पळून जाण्याचे विचार यायला लागले.

सुदैवाने तिला पेरी नावाचा एका फ्रेंच माणसाने पळून जायला मदत केली. त्या जगातून पळून जाणं पणं ईतकी सोपी गोष्ट नव्हती. बाहेरच्या जगात काय आपल्या साठी नशिबात काय वाढून ठेवले असेल याची काहीच कल्पना नव्हती. तिने त्याच्यावर काय मोहिनी घातली होती कुणास ठाऊक पण पेरीने अक्षरशः पैसे भरून तिची सुटका केली. आणि तेथून तिच्या जीवनाला वेगळे वळण लागले.

                                                        ( क्रमशः)
                                            लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all