Login

अस्पर्शीत रानफूल ( भाग एक )

सोमाली माम म्हणजे स्त्री शक्तीचा एक अदभुत चमत्कार आहे. आदी शक्तिचा साक्षात् आविष्कार आहे. मनात आणलं तर एक सामान्य स्त्री देखील काय करू शकते याचं जाज्वल्य उदाहरण म्हणजे सोमाली माम.


अस्पर्शीत रानफूल ( भाग एक )

आशेचा किरण 


 परवा सहज म्हणून एक पुस्तकं वाचायला घेतलं. पुस्तकाचं नाव होतं...."रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स".. लेखिका होती. सोमाली मॅम. सहज म्हणून वाचायला घेतलेलं हे पुस्तक मला एव्हढं झपाटून टाकेल असं अजिबात वाटलं नाही . आज किती तरी दिवस झाले हे पुस्तक वाचून पणं तरी या पुस्तकाचा मनावर झालेला परिणाम अजुनही कणभरही कमी झालेला नाही.

मला स्पष्पणे आठवते आहे की हे पुस्तक मी गाडीत वाचत होतो. साध्या सरळ भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाने मनावर एव्हढा परीणाम केला होता की , मी पुस्तक वाचून झाले होते तेंव्हा मी  दिर्घ उसासा सोडून खिडकी बाहेर बघत डोळ्यातले अश्रू लपवत बसलो. मी कधी कल्पनाच केली नव्हती की मानवी जीवनात ईतकी अगम्य दुःख असतात की ज्याचा आपण विचार देखील करू शकणार नसतो. आणि ही दुःख निर्माण करणारा माणूसच असतो.

त्या मुळे या पुस्तकाने मला इतकं झपाटून टाकलं की या पुस्तकाच्या बाहेर आपण आयुष्यात येवू शकणार नाही याची जाणीव मला झाली.आता पर्यंत मी हजारो पुस्तकं वाचली असतील पण तरीही या पुस्तकाने मला ईतक झपाटून टाकले की न कळत सोमाली मनाच्या तळाशी जाऊन बसली.

एखाद्या व्यक्तीवर संकट येणं आपण समजू शकतो. पण अगदी जन्मल्या पासून, म्हणजे अगदी आपल्या आई वडिलांचाही आपल्याला ठिकाणा आपणास माहीत नसावा. ईतकच काय आपल्याला आपलं नावं कोणी ठेवलय हेहि माहीत नसण, आपण कुठं जन्मलो, कशासाठी जन्मलो आणि आताही का जगतो आहोत या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं माहित नसलेल्या सोमाली मॅमच आयुष्य म्हणजे वेदनांचा महाउच्चार आहे. या वेदना एकट्या सोमालीच्या नव्हे तर जगातल्या स्त्री म्हणून भोगाव्या लागणाऱ्या असंख्य स्त्रियांच्या नशीब नावाच्या प्राक्तानाची ही कहाणी आहे. जी वेळ कोणावर कधीही येवू नये. कितीतरी स्त्रियांच्या अनामिक कहाण्या या नरकात अश्रुंमध्ये संपून जातात. ज्याचा कधी थांगपत्ताही लागत नाही. अशा देहविक्रीच्या धंद्यात सोमालीला तिच्या नवऱ्यानेच ढकलल. पण आयुष्याकडून कसलीही अपेक्षा नसलेल्या सोमालीने हे तिचं प्राक्तन नशीब म्हणून स्वीकारलं. कारण लढण तिच्या स्वभावातच नव्हत.

पण कोणाच्या नशिबात काय लिहिलेलं असत हे कोण जाणू शकतो. याचं सोमालीच्या आयुष्यात पेरी नावाचा माणूस देवदूत म्हणून आला आणि तिचं जगच बदलून गेलं. पेरी मुळे तिची ओळख अशा जगाशी झाली ज्याची तिने कधी कल्पनाही केलेली नव्हती. पणं तिने आता फक्त स्वतः साठी न जगता, ज्या नरकातून आपण आलो आहोत त्यात खितपत पडलेल्या स्त्रियांची सुटका करून त्यांचं पुनर्वसन करण्याचा सोमालीने निर्धार केला.

देहविक्री करायला भाग पडलेल्या असंख्य स्त्रियांची सोमालीने सुटका केली. त्या स्त्रियांची ती जणू आईच झाली.

या तिच्या कार्याची दखल साक्षात व्हाईट हाऊसला घ्यावी लागली. एक दिवस तिला व्हाईट हाऊस मध्ये भाषण करण्याचे निमंत्रण मिळाले. एका दिवसात ही अनाथांची माय जगप्रसिध्द झाली.

कंबोडिया सारख्या छोट्या देशात जन्मलेली सोमाली एक अनाथ मुलगी.  कुठे होती आणि कुठे जाऊन पोहोचली. सगळंच अकल्पीत, अनाकलनीय आणि अकल्पनीय. प्रचंड वेदनेने भरलेलं आयुष्य, आज किती जणांना आधार ते आधार झालंय, हे  तिची ओळख झाल्याशिवाय कोणालाच कळणार नाही.

तिची करुण्यान भरलेली कहाणी जाणून घेवू या पुढील भागात.

( क्रमशः )
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all