मुलांची मदत - वर्ग 10 वी - अस्मि ची दृष्टी

Asmis Eyes

प्रेरणादायी कथा.....एकमेका सहाय्य करू..

हा वर्ग - दहावीचा. वर्गात एकंदर 32 विद्यार्थी-विद्यार्थिनी मिळून .या वर्गातील विद्यार्थी सर्व कार्यात पुढेच पुढे. ती वर्गसजावट असो वा ग्रामसफाई. वर्गातले कार्यक्रम असोत वा स्नेहसंमेलनातील स्पर्धा. मग त्यात या वर्गातील मुलांचा सहभाग नाही म्हणजे नवलच.
अभ्यासातही या मुलांनी नंबर सोडला नव्हता.

या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत अनेक आपतग्रस्तांना मदत केली होती. पूर, वादळ, या वेळी ही यथायोग्य सहाय्य केलं होतं. त्यासाठी ते निरनिराळया युक्त्या लढवित. कधी वर्गातून वर्गणी गोळा करीत तर कधी मुलांचं एखाद नाटक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून निधी एकत्र करीत या कार्यात वर्गाचा वर्गनायक साईश याचा सिंहाचा वाटा असे; त्याला नेहमी प्रोत्साहन आणि सहकार्य मिळायचं ते शाळेच्या मुख्याध्यापकांचं.

असचं एकदा सर्व शिक्षक व मित्रांना साईश ने त्याच्या घरी दिवाळी ला फराळाचं आमंत्रण दिलं. घर लहानसच असल्यानं सर्वांची बसण्याची व्यवस्था खालीच केली. पण ती इतकी आकर्षक व स्वच्छ की कुणाचीही नजर एकदम खिळावी. सर्वांनी त्यांचं कौतुक केलं गप्पागोष्टी करीत फराळ झाला. साईश ला 1 बहीण होती. तीच  नाव अस्मि . वयानं अगदी 8 वर्षाची . पण गाण्यात मात्र पहिला नंबर नेहमीचा ठरलेला हे कळताच सा-या विद्यार्थ्यांनी तिला गाणं म्हणण्याचा आग्रह केला. अस्मि आनंदाने तयार झाली . चाचपडत, चाचपडत ती बैठकीत आली.

विद्यार्थी आणि शिक्षक आश्चर्याने पाहू लागले. अस्मि ने गायला सुरवात केली,गाणं पूर्ण झालं. साऱ्यांनी आनंदाने टाळया वाजविल्या.अस्मि ने खूप सुंदर गाणं म्हंटल होत.

साईश व त्याची आई यांच्या डोळयातून नकळत अश्रु आले. सरांनाही वाईट वाटलं एवढा मधूर आवाज असणारी मुलगी जी चंद्रावर जावू ईच्छिते ती साधं आपल्या सभोवतीचं जग बघु शकत नाही. आपल्या जन्मदात्या आईचं दर्शन घेऊ शकत नाही. चंद्र कसा आणि कुठे आहे हे ज्याला ठावं नाही ती चंद्रावर जाण्याची ईच्छा बाळगते . केवढा विरोधाभास.

क्षणभर सगळयांना वाईट वाटले. शिक्षकांनी चौकशी केली तेंव्हा कळले की जन्मत:च अस्मि आंधळी आहे. घरी करती सवरती ती आईच. त्यामुळे डोळयाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा पैसा जमत नव्हता. हे सारं कळल्यावर मुख्यध्यापकांना रहावलं नाही. त्यांनी कशाचा तरी मनाशी निश्चय केला. साईश , अस्मि आणि त्यांची आई यांचा निरोप घेवून ते निघाले.

दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांची बालसभा घेतली. एखादा उपक्रम राबवून काही रक्कम एकत्र करायची असे सांगितले. वर्ग दहावी चे विद्यार्थी ते, अगदी खुषीने तयार झाले.

मुख्यध्यापकांनी शिक्षकांतर्फे 5000 रू निधी एकत्र करण्याचे अश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे, रूपये आणून मुख्यध्यापकांजवळ दिले. एक हस्तलिखित निवेदन त्यांनी काढलं. इतर वर्गातूनही निधी जमला. निवेदनाला योग्य प्रतिसाद मिळून अवघ्या दोन तीन दिवसात पुरेसा निधी गोळा झाला.

स्वत: मुध्यध्यापक साईश व त्याच्या आईला घेवून शहरातील एका नेत्रतज्ञाकडे गेले. चाचणीनंतर अस्मि च्या डोळयांचं ऑपरेशन अगदी व्यवस्थीत पार पडलं.

आठवडयानंतर आज डॉक्टर अस्मि च्या डोळयावरील पट्टी काढणार होते. काय आनंद झाला होता तिला ? सहज गंमत म्हणून डॉक्टरांनी तिला विचारलं, अस्मि तुला आज नविन दृष्टी मिळणार. यानंतर तू सारी सृष्टी बघणार आहेस. पण त्याआधी मला हे सांग सर्वप्रथम तू कुणाला पाहू इच्छित आहेस ? या अनपेक्षित प्रश्नाने अस्मि क्षणभर गोंधळली . थोडा विचार करून ती म्हणाली , डॉक्टर , मी शाळेचे मुख्यध्यापक व दादाचा मित्रपरिवार यांना प्रथम पाहू ईच्छितो. ज्यांनी मला ही दृष्टी मिळवून देण्यास सढळ व निस्वार्थी मदत केली त्या माझ्या मोठया भावांना मी प्रथम पाहू ईच्छिते.. डॉक्टरांना पण एकदम गहिवरून आलं.

डॉक्टरांनी मुख्यध्यापक व काही विद्यार्थ्यांना आत सोडलं. डॉक्टरांनी हळूहळू डोळयावरची पट्टी सोडली. थोडया वेळात अस्मि ला दिसायला लागलं. तिने एकदम सर, दादा, आई, अशी हाक मारली. साईश ने तर तिला चक्क मिठीच मारली. त्यांची आई हा सारा प्रसंग डोळे भरून पहात होती. कोण आनंद झाला होता तिला आज! तिची  अस्मि पाहू शकत होती.

आठवडाभरातच अस्मि ला दवाखान्यातून सुटी मिळाली. ती पेढे घेऊन शाळेत आली. मुख्याध्यापकांना अस्मि ने वाकून नमस्कार केला. आपल्या चिमुकल्या हाताने त्यांना पेढा दिला. मुलांनी दिलेल्या अल्पशा मदतीतून एका मुलीला दृष्टी मिळाली. तिची चंद्रावर जाण्याची इच्छा ती आता पुर्ण करू शकणार होती.

\"एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!\" हे ब्रीद ज्यांनी अंगिकारलं ते आदर्श झालेच म्हणून समजा!

नमस्कार. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे. ( देवरुख - रत्नागिरी )