असली मैत्री नको ग बाई..!!(भाग २)

मैत्रीचे सैल बंध


जसेजसे शलाकाचे बिल्डिंगमध्ये इतरांशी संबंध वाढत होते तसतसे पुनम मात्र तिच्यासोबत जरा जास्तच हटकून राहू लागली. इतरांबद्दल काहीबाही सांगून ती शलाकाला त्यांच्या जवळ जाण्यापासून रोखू लागली.

शेजारच्या प्रत्येकाची काही ना काही गाऱ्हाणी ती शलाकाला सांगू लागली. पण शलाका मात्र ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवणारातील नव्हती. असे असले तरीही जास्त कोणाशी ओळख नसल्याने ती सुरुवातीला थोडी घाबरतच होती. त्यात तिला कधीही दोन व्यक्तींच्या भांडणात जाणूनबुजून उडी घ्यायची सवयच नव्हती. ती पूनमचे बोलणे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. जो तिच्यासोबत चांगले बोलले त्याच्यासोबत तीही चांगलीच बोलायची. मनमोकळेपणाने त्यांच्याशी गप्पा मारायची.

पण सुरुवातीला शेजारच्यांबद्दल जास्त न बोलणारी पुनम आता मात्र रोजच शेजारचे लोक कसे वाईट आहेत; हे शलाकाला सांगून तीच्या मनात इतरांबद्दल विष पेरु लागली.

"अहो त्या वरच्या डॉक्टरांची बायको, खूप आगाऊ बाई आहे ती. तुम्हाला माहित नाही म्हणून सांगते, जरा जपूनच राहा तिच्यापासून. नाही, आजकाल तुमच्याशी जरा जास्तच गोड बोलते म्हणून सावध केलं तुम्हाला बाकी काही नाही.

"आणि ती अथर्वची मम्मी तीही तसलीच, जरा म्हणून वागण्या बोलण्याचं नॉलेज नाही बाईला. नवऱ्याच्या डोक्यावर लाखो रुपयांचे कर्ज आहे आणि ही मात्र फिरते दोन दोन हजाराच्या साड्या घालून. उगीच दिखाऊपणा करायला हवा नुसता. तुम्ही इथे नवीन आहात ना, तुम्हाला अजून अंदाज नाही इकडच्या लोकांचा म्हणून काही गोष्टी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. अशा लोकांसोबत जास्त संबंध वाढवूच नका.

"त्यात आपले घर मालक त्यांची बायको, ती तर स्वतःला काय समजते काय माहित? बिल्डिंग हिच्या मालकीची आहे म्हणून इतरांना हिने का तुच्छ लेखावे? आपल्याला पण काही किंमत आहे की नाही."

यावर आता काय बोलावे? तेच शालाकाला समजेना. कारण कोणी कसे का असेना पण आपण जसे इतरांशी वागतो तसेच तेही आपल्याशी वागणार ना. असे इतरांबद्दल बोलण्याचा काहीच अधिकार नाही पूनमला. पूनमचा हा स्वभाव शलाकाला अजिबात आवडला नाही. तिच्या स्वभावाची ही बाजू आज पहिल्यांदा शलाकाला समजली होती.

"देवा कुठे अडकवलं आहेस मला? यांचे आधीचे काही प्रॉब्लेम्स असतीलही कदाचित पण आता त्यात माझा बळी जातोय. विनाकारण या गैरसमजांच्या भोवऱ्यात मला अडकायचे नाही."

"पण तसेही सगळेच लोक इथे सुशिक्षित आहेत. प्रत्येकजण कसा काय वाईट असू शकतो? आणि काही बाबतीत गैरसमज पण होवूच शकतात ना?" शलाका खूपच पेचात अडकली होती. आजकाल वारंवार  शेजारच्यांबद्दल त्याच त्याच गोष्टी ऐकून तिला देखील कंटाळा आला होता.

त्यामुळे तीही आता विणाकारणच्या गोष्टींवर चर्चा करण्याचे टाळू पाहत होती. आपण समोरच्याला प्रतिसाद देतो, समोरचा दुखावला जावू नये म्हणून त्याचे पटत नसले तरी ऐकून घेतो आणि इथेच आपण चुकतो. वेळीच काही गोष्टींना आवर घालणे गरजेचेच आहे.

पण आता गरज संपल्यासारखे एखाद्याला मध्येच सोडूनही देता येत नाही. पुन्हा एकदा शलाका पूनमच्याच मनाचा विचार करत होती. पण शलाकाचे मन पुनमला मात्र अजिबात समजत नव्हते.

विणाकारणच्या गप्पा टाळण्यासाठी आता रोज सायंकाळी शलाका अर्णवला घेवून गार्डन मध्ये जावू लागली. दोनच दिवस झाले असतील शलाका बाहेर पडली पण थोडा मोकळा श्वास घेतल्याचे खूप मोठे समाधान तिला मिळाले. गार्डनमध्ये अनेक बायकांसोबत तिची ओळख झाली.

तिच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या ज्योतीसोबत देखील शलाकाची छान ओळख झाली. तिचा मुलगा अथर्व हादेखील दिड वर्षांचाच होता. दोघीही मुलांच्या हेल्दी डायेटविषयी एकमेकींचे सल्ले घेवू लागल्या. त्याचा दोघींनाही फायदाच झाला. चर्चेत मुलांचेच विषय जास्त असायचे. त्यामुळे दोघींनाही छान वाटायचे एकमेकींचे अनुभव शेअर करताना.

मुलांच्या आवडीनिवडी दोघींनाही समजल्यामुळे घरात काही जरी खावू बनवला तरी ज्योती अर्णवसाठी आवर्जून घेवून यायची. शलाका देखील मग तिच्या अथर्वसाठी काही ना काही पाठवून द्यायची.

ही ज्योती तीच जिच्याविषयी पूनमने आधीच शलाकाचे कान भरले होते. पण शलाका इतकीही हलक्या कानाची नक्कीच नव्हती, एवढ्याशा बोलण्याचा तिच्यावर परिणाम होईल.

हे सर्व मात्र पुनमला खटकत होते. ती स्पष्ट जरी बोलून दाखवत नसली तरी तिच्या बोलण्यातून शलाकाला तिचा रोष बरोबर समजायचा.

एवढे सांगूनही शलाकाने ज्योतीसोबत वाढवलेले संबंध म्हणजे पूनमला स्वतःचा अपमान झाल्यासारखे वाटत होते.

शलाका आणि ज्योतीमध्ये वाढत असलेली मैत्री पुनमला नको होती, त्यामुळे सायंकाळच्या वेळी शलाका दाराला लॉक करुन जिना उतरणार तोच पुनम मात्र तिला हटकणार हे आता वरचेवर होवू लागले. बोलण्यात ती शलाकाला इतकी गुंतवून ठेवायची की अर्धा अधिक वेळ मग तिथेच जायचा आणि बाहेर जाणे मग कॅन्सल करावे लागायचे. तिला टाळून पुढे जाणेही शलाकाला योग्य नाही वाटायचे आणि गप्पा सुरू झाल्या की थांबायचे काही नावच नाही.
त्यामुळे शलाकाच्या बाहेर जाण्यावर रोजच निर्बंध येवू लागले.

क्रमशः

आता नेमका काय असेल शलाकाचा स्टँड? जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all