"अश्विनीला"पत्र

पत्रलेखन



प्रिय अश्विनी,
२९ डिसेंबर १९९६ या पवित्र दिवशी तुझे माझ्या आयुष्यात आगमन झाले.माहेर सोडून सासरी येतांना तुझ्या डोळ्यातले अश्रू मला आजही आठवतात.तुझ्या आगमनाने जणू आमच्या घरात साक्षात लक्ष्मीनेच प्रवेश केला.
माझ्या जीवनात प्रवेश केल्यानंतर माझ्यासहित माझे आई-वडील, बहिण,माझे सर्व नातलग यांची यथायोग्य काळजी घेऊन सर्वांच्या मनात मानाचे स्थान मिळविले.
सकाळी लवकर उठणे,सर्व कामे उरकून सुग्रास जेवण बनवून सर्वांना अत्यंत आनंदाने व मनोभावे खाऊ घालते हा नित्यक्रम गत सव्वीस वर्षांपासून तू अविरतपणे जपत असतांनाच एक आदर्श स्नुषा, आदर्श पत्नी,आदर्श माता,आदर्श गृहिणी,उत्तम अन्नपूर्णा म्हणून नावलौकिक मिळविलेला आहे.
स्वतःच्या वैयक्तिक गरजांपेक्षा व सुखापेक्षा संसारातील प्रत्येक सदस्याला तु महत्व दिलेले आहे व आजही देत आहे.
दोन्ही मुलांवर यथायोग्य धार्मिक, नैतिक संस्कार करून त्यांना आदर्श नागरिक बनविलेले आहे.
हे सर्व करतांना मित्र-मैत्रिणी, शेजारी व आगंतुक मंडळींना ही यथायोग्य मानसन्मान देत असल्याने एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून समाजात प्रसिद्ध आहेस.
संसाराला हातभार लागावा व आर्थिक घडी विस्कळीत होऊ नये म्हणून स्टेशनरी व शालेय साहित्य भंडार यशस्वी उद्योजिका म्हणून सांभाळून व अत्यंत व्यस्ततेतूनही वेळ काढून तुझा चारोळी,कविता,लेख लिखाणाचा छंद "व्हाॅटसअॅप व फेसबुक वर जोपासत आहेस व अनेक बक्षिसे व प्रमाणपत्रे मिळविली आहेत व मिळवित आहेस हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
इटिव्ही वरील "चार दिवस सासूचे","भाग्यविधाता" या मालिकांची बक्षीसे,शब्दकोड्यांची बक्षिसे,पैठणी,होमथिएटर,अनेक मिक्सर, बक्षिस स्वरूपात मिळविलेले आहे.
माॅम्सप्रेसो मराठीवर तर तुझ्या लेख,कविता, व्हिडिओज, इत्यादी लिखाणामुळे तु अत्यंत प्रसिद्ध झालेली आहेस तर "ईरा" वरील अनेक स्पर्धेत बक्षिसे प्राप्त केलेली असून नुकताच Most Hardworking Caption" चा सन्मान व पुरस्कार ही मिळालेला आहे.
कोणत्याही समस्येला किंवा संकटाला न घाबरता संयमाने तोंड देऊन ध्येयाकडे व उद्दिष्टाकडे वाटचाल करुन यश खेचून आणणे यात तुझा हातखंडा आहे.
यासोबतच शिवणकामाचा छंद जोपासत आहेस.
प्रिये, तु प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर व निपुण असूनही तुला कसलाही गर्व नाही.
तुझ्यामुळे मलाही लेखनाची प्रेरणा मिळाली.
अनेक वर्षांपासून अविरतपणे व अहोरात्र झटत आहेत.
म्हणूनच आज तुला "घे विसावा या वळणावर" असे म्हणावेसे वाटते. मला माहिती आहे कि तु शांत बसू शकत नाहीस तरीसुद्धा या वळणावर तुला स्वतःला जपण्याची व विसावा घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
अश्विनी, तु माझा श्वास,प्राण,आत्मा सर्वकाही आहेस.
तुझ्या अष्टपैलू,चौफेर व सुगंधी व्यक्तिमत्वासाठी माझे शब्द अपुरे आहेत.
तरीसुद्धा तुझ्या काळजीपोटी, प्रेमापोटी मी फक्त "घे विसावा या वळणावर" एवढंच म्हणेन.
तुला व तुझ्या भावनांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याचा माझा सतत प्रयत्न चालू असतोच तरीही माझ्याकडून तुझे मन दुखावले गेले असल्यास मला क्षमा करावी.
" क्षणभंगूर आयुष्याच्या या महासागरात तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो व तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना व तुझ्या पाठीशी नव्हे सोबतच मी खंबीरपणे उभा आहे व राहीनच.
चुकभूल क्षमस्व

फक्त तुझा आणि तुझाच
सुहास

©® श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर,औरंगाबाद