अश्रू

What really it means by A tear

अश्रू:-

अनेक वेळा कौंसेलिंग घेत असताना समोरचा माणूस व्यक्त होतो आणि त्यावेळेस त्याच्या डोळ्यात पाणी येते...अश्रू!
माझ्या समोर रडायला लागू नये म्हणून ते घट्ट पणे या अश्रूंना परत पाठवायचा काटोकाट प्रयत्न करतात...
पण मी त्यांना अश्यावेळी सांगतो की अगदी सहजतेने हे अश्रू बाहेर पडु देत....का थांबवून ठेवायचे त्यांना... रडणे हे हसण्यासारखे एक एक्सप्रेशन आहे...ते आतून येणारे फिलिंग आहे..ज्याला ते कळले तो अगदी सहजतेने या भावनेतून स्वतःला व्यक्त करतो!

अश्रू हा शब्द किती जवळचा आहे ना! आता तुम्ही म्हणाल, की जवळचा कसा? तर ज्याचा सगळ्यात जास्ती संबंध येतो ते म्हणजे आपले मन याच्याशी....मग हा शब्द तर जवळचा असेल ना!

मन व्यक्त होते ज्या माध्यमातून ते म्हणजे डोळे....कोणतेही भाव असोत आनंद, दुःख, वेदना त्या डोळ्यातून लपत नाहीत आणि व्यक्त होतात...बऱ्याच वेळेला आनंदाश्रू तर काही वेळेला दुःखाश्रु!

लहान मुलांचे रडणे हे त्यांचे लहानपणीचे शस्त्रच असते नाही का! हट्ट करायचा, काय हवे ते मागायचे... थोडा वेळ फक्त वाट पहायची आणि मग आपले शस्त्र बाहेर काढायचे ते म्हणजे अश्रू! ते बाहेर आले, दिसले कि समोरचे आपल्या खिश्यात! आपले काम झालेच समजा! त्या वेळची तरी मोहीम फत्ते!

इमोशन्स ह्या अश्रूंना बांधील असतात. नक्की कोण कोणावर राज्य करते हे त्यांचं गणित त्यांनाच माहीत असते, कारण कधी अश्रू पुढे असतात तर कधी इमोशन्स!

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर या अश्रुंचे वेगळच महत्व असते.. लहानपणी शस्त्र आणि मोठेपणी अस्त्र!
जसजसे मोठे होतो तसतसे त्याचे कार्यक्षेत्र बदलत राहते.... तरुणपणी हेच आपले रुसवे फुगवे व्यक्त करण्याचे माध्यम ठरते.

कोणतीही भावना असो कधी अपार दुःख झाले असेल तरी नकळतपणे पटकन टपोरा अश्रू बाहेर पडतो त्यावर आपले बंध राहत नाहीत. कधी अपार आनंद झाला तरी तो व्यक्त होतो त्या भरभरून आलेल्या भावना टचकन डोळ्यात पाणी येऊनच!

यश मिळाले, संपत्ती मिळाली, मनासारखे झाले आणि आनंद गगनात मावत नसेल तर पटकन भरून येतात ते डोळे. मग डोळे भरून आले की ते टपोरे मोती बाहेर पडणारच.

आपण एखाद्याला जज करतो की हा रडका, तो कुरकुरा, तो स्वछंदी किंवा आणखी काही, पण प्रत्येक आणि प्रत्येक व्यक्ती हा बांधील आहे तो भावनांच्याच ना! व्यक्त होतो तो वागण्यातून आणि ते जे कधी लपत नाही ते डोळ्यातून आणि डोळे हे सगळ्यात जवळचे ते त्याच्या व्यक्त होण्याने. व्यक्त होते ते त्यातील अश्रूंनी...

म्हणून म्हणतो की लहान असो, तरुण असो वा वयस्कर त्याला जे प्रिय जे त्याला सुद्धा कळत नाहीत जे त्यांच्या व्यक्त होण्याच सगळ्यात जवळ असलेलं प्रतीक म्हणजे अश्रू.

तर मला हेच म्हणायचे की आपल्या आयुष्यात या अश्रुंचे किती महत्वाचे स्थान आहे.

तुम्हाला वाटेल, हा असा काय विषय... पण अलीकडेच मी यावर एक छोटासा लेख वाचला. खूप हृदयस्पर्शी वाटले ते लेखन मला ज्यात एक वयस्कर स्त्री जी वृद्धाश्रमात शेवटचे दिवस कंठत होती तिची शेवटची एकाच ईच्छा होती...अगदी माफक अपेक्षा म्हणा ना की तिच्या मृत्यूनंतर कोणी तरी अश्रू गाळावे! ज्या व्यक्तीने सगळे उपभोगले आणि आता त्या संध्याकाळी फक्त वाट पहायची त्या सूर्यास्ताची पण कोणीतरी आपले असावे ही किती हळवी कल्पना.
किती ना हे मनाला टोचणारे म्हणा की भावणारे!
अश्रू हे किती अमूल्य आहेत आणि तितकेच दुर्लक्षित!

आपण नसताना आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यांत अश्रू येणे ही सगळ्यात मोठी गोष्ट ! आणि जर ही गोष्ट मोठी असेल तर त्यामागचा अश्रू ही किती महत्वाची गोष्ट असेल नाही का!

सोबतचा फोटो कुंडांमधून खळाळणाऱ्या पाण्याचा!
©®अमित मेढेकर