अश्रू..

ही कथा एका शकू मावशीची..
लघुकथा
अश्रु...
©स्वप्ना..

"ए तुला ती आठवते का गं?आपल्या मेसमध्ये पोळ्या करायला येत होती शकुमावशी? कसली डॅशिंग होती ना. एकटीच राहायची. एकदम बिनधास्त आणि हसत खेळत असायची बघ. तिची वेशभुषा पण किती मस्त असायची. चोपून चापून नेसलेली गडद रंगाची,बारीक काठाची नऊवारी केसांचा अंबाडा आणि फिगर एकदम भारी आणि चालायची तर किती ठेक्यात पण मायाळू होती. आपल्याला जीव पण लावायची. तव्यावरची पहिली गरम पोळी आपल्याला खा म्हणून आग्रह करायची.

"ए पोरींनो, अगं जेवणारे मेंबर सुरू झाले की तुम्हाला खुप उशीर होतो जेवायला आणि मी थापुन गेलेल्या पोळ्या थंडगार झाल्यावर खाल तुम्ही. त्यापेक्षा अजुन दहा मिनिटं तरी आहेत मेंबर यायला घ्या खाऊन.”

असं म्हणत आग्रहाने पोळी वाढायची. सोनीचं हे वाक्य ऐकून मनी म्हणाली,

"हो आठवते गं. इतकी वर्ष झाली अजून तशीच डोळ्यासमोर येते. तिच हसणं,तिचं दिसणं आणि त्याहीपेक्षा तिचं त्या काळात तसं असणं. तुला आठवतं तिला नवऱ्याने सोडून दिलं होतं बहुतेक. पण ती खचली नव्हती. ती स्वतः धडपडत होती पण नशीब वाईट तिचं हाताशी आलेला मुलगा देखील ओढून नेला होता नियतीने. एका लेकीला तिने कष्टाने मोठं करून लग्न लावून दिलं होतं पण कधी एवढं दुःख दिसायचं का तिच्या चेहऱ्यावर? सगळं गुपचूप स्विकारून तरीही किती आनंदी होती! तिच्या डोळ्यात अश्रू नव्हतेच कारण तिचे डोळे हसरेच होते. मला तर आयुष्याच्या वळणावर ती खूपदा आठवते. प्रेरणा देणारी वाटते. आता काय माहित ह्या वीस वर्षांत कधी दिसली नाही. आपल्या त्या मेस असलेल्या गल्लीतून तर कधीच गेली ती तिची लेक तिला घेऊन गेली म्हणून ऐकायला मिळालं होतं आणि आता तर जिवंत असेल की नाही की?”


मनीच्या ह्या वाक्यावर सोनी म्हणाली,

"हो बिचारी वारली असेल तरी आपल्या मनात तिच्या व्यक्तिमत्वामुळे जिवंतच आहे. ती म्हणायची..”

पोरींचे हे वाक्य ऐकून आई म्हणाली,

"एवढं काय ग तिचं कौतुक?”

आईचं वाक्य ऐकून मनी म्हणाली,

"आई, अगं आम्ही महिनाभर भेटलो नाही म्हणून किती अस्वस्थ होते तू? तुझा लेक जास्त वेळ बाहेर राहिला तर लक्ष लागत नाही तुझं. सगळे तुला भोवती असावे वाटतात पण ती एकटी स्वतःच्या जीवाला उभारी देत जगत होती. म्हणून तिची आठवण येते. ती संपर्कातून हरवली तरी अशी माणसं मनातुन नाही हरवत अगं.. जाऊ दे कुठे असो सुखी असू दे बिचारी. फार कष्ट केले तिने.”


म्हणत मनीने विषय मिटवला. बरेच दिवस शकू मावशी हा विषय मनीच्या डोक्यात फिरत होता आणि अचानक त्या दिवशी गाडीला ब्रेक लावावा लागला. एक आजी गाडी समोरून जात होत्या. अगदी शकू मावशीसारख्या. अगदी तिच उंची, तोच बांधा..मनीने गाडी बाजूला केली. पळत त्या आजीला तिने हाक मारली.

“शकू मावशी ना?”

तश्या त्या गर्रकन वळल्या. मानेनेच ‘हो’ म्हणाल्या. मनी म्हणाली,

“मला ओळखलंत मी मेसवाल्यांची मुलगी..”

त्यावर मावशी जरा भूतकाळात गेल्यासारखी झाली. मनी म्हणाली,

"तुम्ही गरम पोळी खाऊ घालायच्या आम्हाला. सोनी, मनी खा गं.. असा हक्काने आग्रह करायच्या.”

शकु मावशीचे डोळे चमकले. त्यांनी मान होकारार्थी डोलवली. मनी त्यांना बघत राहिली. सगळे केस पांढरे झाले होते. अंगावर कळकट नऊवारी होती. हातात एक मळकी पिशवी होती आणि डोळे अगदी उदास खुप काही हरवून गेल्यासारखे होते. मनी म्हणाली,

"कश्या आहात मावशी?”

तिच्या या वाक्यावर मावशींच्या डोळ्यात कधी न दिसलेले अश्रू टपटप पडताना दिसले. रडतच त्या म्हणाल्या,

"लेकीने नेलं मला पण मला ओझं असल्यासारखी वागवते. ह्या कोरोनाने पोळ्याची कामं गेली माझी त्यामुळे तिला माझ्याकडून काही इन्कम पण मिळत नाही म्हणून चिडचिड करते. घरातुन निघून जा म्हणते. सांग कुठं जाऊ? एखादं वृद्धाश्रम असेल तर मला नेऊन सोड ना ग मने..”

तिने मनीचा हात घट्ट धरला आणि ती रडत होती. मनी गडबडली. एवढं सोपं आहे का हिला वृद्धाश्रमात नेऊन सोडणं? मनात विचार आला. तिला वाटलं पलीकडच्या कॉलनीत असलेले आश्रम आहे आपल्या ओळखीचं. बघूया विचारून.. तिने मोबाईल काढण्यासाठी पर्समध्ये हात घातला. तेवढ्यात एक बाई तिच्याजवळ आली.

अगं कुठे फिरतेस आई? चल घरी.. अशी बरी जाऊ देईल मी तुला कुठे? कशाला हवं तुला वृद्धाश्रम? मी आहे ना.. .तू फक्त मला गरम पोळ्या खाऊ घाल म्हणजे झालं.”

अशी बडबड करत तिने मनीकडे दुर्लक्ष करत मावशीला न्यायला ओढायला सुरुवात केली. शकुमावशीच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. मनीला वाटलं,

“आपल्याला कधी न दिसलेले अश्रू आता मावशीचा पिच्छा सोडत नसावे बहुतेक..”

मनीने पर्समधून दोनशे रुपये काढले मावशींच्या हातात घातले. मावशी खरंच तुम्ही खाऊ घातली तशी गरम पोळी आता कोणी खाऊ घालत नाही. बरं आठवण ठेवा. येते..”

म्हणत पटकन मनीने वाकुन नमस्कार केला. शकुमावशीचे डोळे पाणावलेच होते. मनीने पटकन गाडी काढली. आरश्यात मागे सुटत चाललेली शकू मावशी दिसत होती. मध्येच केविलवाणी,मध्येच तेव्हाची धडाडी,मध्येच हातातल्या नोटेकडे बघून लाचार हास्य चेहऱ्यावर आणणारी आणि शेवटी आजपर्यंत लपलेले अश्रू पदराने टिपणारी.. .मनीने गर्रकन गाडीचा आरसाच वळवला. आपल्या मनातलीच शकुमावशी आपण बघू या जिद्दीने,खम्बीर होऊन आंनदी ,हसरी उत्साही शकूमावशी जी आपले अश्रू लपवत जगली.

समाप्त
©स्वप्ना मुळे..


वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा,... अश्याच कथांचा संग्रह हवा असेल तर पुस्तकासाठी 7038332429 ह्या no वर msg करा,..धन्यवाद
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद