आशीर्वादाचा वरदहस्त

लघुकथा


जवळपास दहा वर्षांनंतर ते गावात परत आले होते. गावाचे रूप पालटले होते. अनेक चांगल्या सुधारणा झाल्या होत्या. गावातील काही लोकांनी आशीष आणि नीताला ओळखले. विचारपूस करून झाली आणि ते घराकडे निघाले.
माई आणि नानांनी घर सोडल्यापासून
तिकडे कोणीही फिरकलेच नाही. गावाच्या दुसऱ्या टोकाला असलेला जुना वाडा एका अस्तित्वाची साक्ष देत होता. आजुबाजुला आता फक्त जंगल झाले होते. कारण, आजुबाजुला राहणारे लोकही आता ती वस्ती सोडून इतर ठिकाणी राहायला गेले होते.
सून नीता , मुलगा आशीष आणि दोन मुले. अगदी छोटासा परिवार. सासू सासऱ्यांचा वरद हस्त नेहमी डोक्यावर राहायचा. प्रत्येक सण मग तो दिवाळी असो, नाही तर दसरा. अशा कुटुंबात आनंद, सौख्य, समृध्दी एकत्र नांदत होते. नात्यांच्या आड जिव्हाळ्याचे संबंध होते. फक्त सासू ही सासू नव्हती. तर ती सासूच्या रुपात आई होऊन गेली होती.
गावात पाय ठेवताच आशीषच्या डोळ्यांत अचानक आठवणींचे क्षण ओघळू लागले. ज्या गावात हे बालपण गेले. जिथे मित्रांच्या सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण, खोड्या मस्करी सगळं कसं एका चित्रपटाप्रमाणे सरकून गेले. एका एका पावलांवर त्याला लहानपणीचे भास होत होते.
वाड्याच्या जवळ पोहोचताच त्याने घराला नमस्कार केला आणि आजुबाजूचे वाढलेले गवत बाजुला करून त्याने कुलुप उघडले. अतिशय जुने कुलूप. उघडणार की नाही. अशी शंका मनात येतच होती. की झटक्यात कुलूप उघडले. जणू आईच्या आभासाची एक झलकच दिसली.
दरवाजाने कोणतीही किरकिर केली नाही. ज्या वाड्यात आशीषचे बालपण गेले. तो वाडा अतिशय जुना झाला होता. पण, वाड्यात असणारे कडुनिंबाचे झाड अजूनही तसेच उभे होते. नागपंचमीच्या दिवशी बांधलेला झोका आणि त्याचे मित्र खेळताना होणारा कलकलाट त्याच्या कानात पिंगा घालू लागला.
वाड्यातच एका बाजूला असलेली बारव. त्याने सहजच वाकून पाहीले. तर पाण्यात जणू माईचे प्रतिबिंब बोलत होते. "आशू, तू बाजूला हो. मी शेंदते पाणी." असे म्हणताच मी बाजूला झालेलो असायचो.
लगेच विहीरचं पाणी काढून तिच बादली अंगावर घेऊन दोन मिनीटांची आंघोळ करण्यासाठी थाटात बसलेला तो दगड. मला बघून पाण्याचे तुषार उडवून गेला.
नेहमीप्रमाणेच वाड्याच्या पहिल्या पायरीवर पाय अडकला आणि ठेच लागली. "आई ग" तोंडातून शब्द निघाला आणि कोणीतरी सावरले.
"अरे, बाळा हळू ना. धडपडलास. लागले तर नाही ना."
नाही गं. माझी माई सोबत असल्याचा परत तोच आभास होत होता.
पन्नास वर्षांपूर्वीचा वाडा. पण माळवदे अजूनही तसेच. ना कसर, ना वाळवी. थोडं पुढे जाताच... नानांचा खडा आवाज आला.
"हातात काय लपवले? बघू जरा."
पण, शेतातील चोरून आणलेल्या कैऱ्या चिंचा, बोरे . त्यांचा तो आंबटचिंबट सुगंध घेताच नाना मिशीवर ताव देत मिश्कीलपणे म्हणायचे. चला खाऊन झाले की बसा जरा अभ्यासाला.
आजही त्याच्या हाताची आवळलेली मुठीत तोच सुंगध आणि तोच प्रेमाचा ओलावा होता. या सर्व आभासाने त्यांचे मन ओलंचिंब झाले होते.
एवढे कमी की काय, स्वयंपाक घरातून आईच्या काचेच्या बांगड्यांची किणकिण ऐकू आली. चुलीवरच्या भाकरीचा खमंग घमघमाट पसरला होता. तिकडे पाय वळतच होते की, "आधी हात पाय धुवून घे आणि लगेच माझे पाय मोरीकडे वळले. हात पाय धुवून आलो आणि पाट घेऊन बसणार की माईने लावलेल्या उदबत्तीचा सुगंध दरवळला आणि त्या सुवासाने परत आईचा आसपास असण्याचा आभास झाला. देवघर नसतांनाही अचानक तिथे हात जोडले गेले. नकळत शुभंकरोती कल्याणं शब्द ओठांवर आले पण आवाज फुटत नव्हता. तेवढ्यात मागच्या परसदारी झालेली पानांची सळसळ जाणवली आणि काय आहे ते बघायला जाताच क्षणांतच वरूण राजाची कृपा झाली आणि रिमझिम कोसळणाऱ्या त्या जलधारांमध्ये मन आणि शरीर न्हाऊन निघाले.
"आशू, नको रे भिजू अशा पावसांत, आजारी पडशील. एकतर संध्याकाळ झाली आहे. आईचा काळजीचा स्वर. पण, बेफिकीर झालेले मन त्यामुळे ऐकूच नाही आले. मनसोक्तपणे पावसात भिजून झाले होते. हातातले काम सोडुन माझ्या प्रेमळ माईने हात धरून आत ओढले आणि स्वतःच्या पदराने चेहरा पुसत होती. तेवढ्यात एक शिंक आली आणि इकडे तिकडे बघू लागलो. नक्कीच हा आभास होता का.
इकडे तिकडे बघताच घरात कोणीच दिसले नाही. पण, जेवण झाल्यानंतर दिवसभर शाळेत आणि गावात घातलेल्या उनाडक्याची माई खबर घ्यायची.
" काय गोंधळ घातलास आज?" अरे सुमन काकू सांगत होत्या. त्यांच्या गोठ्यातील गाईच्या शेपटीला काही तरी बांधत होता."
माई , मी ते. फटाका.
काय फटाका! अरे असे मुक्या जनावरांना त्रास देऊ नये रे. माईने गालावरून हात फिरवला आणि त्या प्रेमाच्या स्पर्शाने इतका भावनिक झालो की, माई सांगत असलेली गोष्ट ऐकतांना कधी झोप लागली ते कळलेच नाही. सकाळी जाग आली ती म्हणजे काल घडलेल्या चुकीसाठी नानांनी पाठीत घातलेला एक धपाटा. कळवळून जागो झालो.
"माई गं, नानांनी मला मारले गं.
अचानक मी किंचाळलो आणि घट्ट मिटलेले डोळे उघडले. पण, समोर माई आणि नाना दोघेही नव्हते. तो वाडा नव्हता. त्या पानांच्या टाकलेल्या पायघड्या नव्हत्या. जे काही दिसलं तो फक्त आभास होता.
समोर बघीतले तर नीता आणि दोन्ही मुले माझ्या भोवती. घामाने चिंब भिजलेला चेहरा.
"मी कुठे आहे? माई ,नाना कुठे आहेत?
अहो, तुम्ही तुमच्या घरातच आहात आणि अचानक माई ,नानांची आठवण अचानक कशी काय आली?
तुम्हांला कोणते भास झाले का?
नाही गं , हा भास नव्हता. आभास होता. मी गावाकडे जाऊन आल्याचा. एका प्रेमळ स्पर्शाचा, एका आशीर्वादाचा. सगळं कसं स्वप्ना बघीतल्या सारखे वाटले.
"अहो , तुम्ही नक्की स्वप्नंच बघीतले."
आशीषने उठून माई आणि नानांच्या फोटो समोर हात जोडले आणि आशीर्वादाचा हस्त नेहमी डोक्यावर राहू द्या . अशी प्रेमळ प्रार्थना केली.

©®अश्विनी मिश्रीकोटकर