अशीही संक्रांत....

Small Story Of A Teacher
एक लघुकथा



वर्षाच्या सुरूवातीपासून घरात सुरू झालेल्या आजारपणाने ती वैतागली होती...आधी करोनामुळे नवर्‍याला ऑफिसमधून मिळालेला एका वर्षाचा ब्रेक.. आणि या वर्षी तिचे कमी झालेले इन्कम... तशी पैशांची चणचण नव्हती..पण आधीसारखा मोकळा हातही नव्हता...त्यात आलेला वर्षाचा पहिला सण.. सण साजरा करायला हुरूपच नव्हता.

मागच्या वर्षी एका दहावीच्या मुलीला मध्येच ट्युशन हवी होती.. मुलगी लर्निग डिसेबल.. पण नेहमीप्रमाणेच एक आव्हान म्हणून तिने ते स्वीकारले..त्या मुलीची परिस्थिती करोनामुळे खालावलेली.. घरच्यांनी सांगितले कि \"फि\" मिळेल कि नाही याची चौकशी कर.. पण पैशासाठी कोणालातरी शिकवायचे नाही हे तिच्या शिक्षक मनाला पटेना.. पण थोडी थोडी फी मिळत होती...


दहावीचा निकाल लागला..इतरांप्रमाणेच त्या मुलीनेही निकाल कळवला..आणि बहुतांश मुलांसारखा तिचाही शिक्षिकेशी संपर्क कमी झाला.. तीही फीचा विषय विसरून गेली.. घरातले तिला हसले, व्यवहारशून्य म्हणून तिची थट्टा केली.. पण तिचा विश्वास होता कुठेतरी स्वतःच्या चांगुलपणावर....



निकालानंतर बरोबर सहा महिन्यांनी त्या मुलीच्या वडिलांचा तिला फोन आला.. मॅडम फि द्यायची आहे.. प्रश्न पैशाचा कधीच नव्हता...पण त्या दिलेल्या फीने एक गोष्ट मात्र नक्की केली... तिचा देवावरचा, स्वतःच्या कामावरचा आणि जगातल्या चांगुलपणावरचा विश्वास शतपटीने वाढवला...


ह्या सगळ्यांना पाठिशी घेऊन तीही परत सज्ज झाली आपल्या मूल्यांसोबत नव्याने जीवन जगायला...


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई