Feb 28, 2024
डॉक्टर्स डे स्पेशल

अशीही एक डॉक्टर...

Read Later
अशीही एक डॉक्टर...

अशीही एक डॉक्टर..
डॉक्टर असली तरी तिलाही भावना असतातच...

©©ऋतुजा वैरागडकर

मला माझ्या बाळाला एकदा बघू द्या... प्लीज एकदा बघू द्या.

ही आर्त हाक एका आईची होती, ती पोलिसांना विनवणी करत होती, त्यांच्या हातापाया पडत होती. रडूनरडून बेहाल झाली होती. डोळ्यातले अश्रू आटत होते पण पोलिसांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. ऑन ड्युटी त्यांचाही नाईलाज होता. असे काय झाले की ती आई आपल्या बाळाला बघण्यासाठी आतुरली होती, हम्म बाळाला नाही मृत बाळाला, तिला एकदा आपल्या मृत बाळाला बघायचं होतं.

 

आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातला सर्वांत अविस्मरणीय क्षण असतो, एका आईचा दुसरा जन्म असतो. तो इवलासा जीव जेव्हा या जगात येतो, त्याच्या इवल्याश्या हातांनी जेव्हा आईला स्पर्श करतो, आईला तर आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटते, सगळं जग मुठीत सामावल्यासारखं वाटतं, पण जेव्हा मुठीतून तेच निसटतं ना तो त्रास असह्य असतो. या आईची आर्त हाक ,हाकच राहिली, कुणाच्या कानापर्यंत पोहचलीच नाही.

 

आपलं बाळ काचेच्या पेटीत सुरक्षित आहे या वेड्या आशेने तिने डोळे मिटले, आणि आपल्या गोड बाळासोबतचे स्वप्न रंगवू लागली, अचानक डोळे उघडले ते आजूबाजूच्या ओरडण्याने... ज्या वॉर्डात तिचं बाळ ठेवलं होतं त्या वॉर्डाला आग लागली होती, आणि त्या आगीच्या धुरात तिचं बाळ गुदमरून मरण पावल होत. पाच दिवसांचं ते बाळ जग बघायच्या आतच जग सोडून गेलं... त्या आईने हंबरडा फोडला... पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही, तिचे अश्रू देवाला दिसले नाहीत की त्याच्या हृदयाला पाझर फुटला नाही.

 

लग्नाच्या दहा वर्षानंतर तिच्या घरी कृष्णाने जन्म घेतला होता. पण तेही तिच्या नशिबात नव्हतं. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर अंतिम संस्कार केले, त्या आईला तिच्या बाळाला शेवटचं बघताही आलं नाही, एका स्त्री साठी यापेक्षा मोठं दुर्देव नाही.

त्याच वॉर्डात अंजलीचं बाळ होतं.
अंजली स्वतः एक डॉक्टर होती,चाईल्ड स्पेशालिस्ट. अंजलीची डिलीव्हरी तिच्याच मिस्टरच्या हातून त्याच हॉस्पिटलमध्ये झाली होती.

बाळाने पोटातच शी केल्यामुळे डिलीव्हरी होताच बाळाला   काचेच्या पेटित ठेवलं होतं.

त्या वॉर्डात आग लागली आणि सगळे धावले, तब्बल दहा मुले होती, अंजली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने त्या वॉर्डाकडे धाव घेतली. ति आत जाऊन दोन बाळांना घेऊन आली पण तिला स्वतःच्या बाळाला आणता आलं नाही. आगीने सगळ्यांना लपेटलं.  बाकीच्या बाळांसोबत अंजलीचंही बाळ गेलं.

तिने बाकीच्या आयांना सांभाळलं, ज्यांच बाळ गेलं त्यांना मानसिक आधार दिला.

"मॅडम तुमचंही बाळ गेलंय ना, तरीही तुम्ही स्वतःच दुःख कुरवाळत न बसता  इथे आमच्या दुःखात सहभागी झालात."

"एक डॉक्टर म्हणून तुम्ही तुमची कर्तव्य पार पडताय."
सगळे  अंजलीच कौतुक करत होते."

त्या सगळ्यांच बोलणं ऐकून अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं.

"मॅडम तुम्ही रडू नका."

"अग त्या डॉक्टर असल्या तरी त्यांनाही भावना आहेत, त्यांनाही वाट मोकळी करू दे."

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने दुसऱ्यांच्या बाळाला वाचवलं याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.

स्वतःच बाळ गमावून देखील, सिझेरियन झालेलं असून देखील ती महिन्याभरात तिच्या कामावर रुझु झाली. का तर तिला इतरांच्या बाळांना त्रास होऊ द्यायचा नव्हता.

धन्यवाद

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//