अश्शी सून हवी ग बाई

कथा एका मुलाच्या आईची

अश्शी सून हवी ग बाई..




" मंथन.. झाले का आवरून? किती तो उशीर??" सुमनताईंनी आवाज दिला..

" हो आई.. झालेच.. निघायचे का?"

" हो.. आणि आताच सांगून ठेवते कि लगेच होकार द्यायचा नाही.. घरी येऊन ठरवू.." सुमनताईंनी त्याला दटावले.. मंथनने होकार दिला आणि दोघे त्याच्या गाडीत बसून मुलगी पहायला निघाले.. गेले काही महिने मंथन आणि सुमनताईंचा हा दर रविवारचा कार्यक्रम झाला होता.. सकाळी उठायचे , आवरायचे आणि मुली बघायला बाहेर पडायचे.. मंथन, सुमनताईंचा एकुलता एक लेक.. तो अगदीच लहान असताना त्याचे बाबा गेले होते.. तेव्हापासून त्यांनी अत्यंत कष्टाने नोकरी करून त्याला वाढवले होते.. हवे ते शिक्षण दिले होते.. मंथनलाही आपल्या आईने घेतलेल्या कष्टांची जाण होती. त्यामुळे त्याने कधीच आईचे मन दुखावले नाही.. प्रत्येक गोष्ट आई जसे म्हणेल तसेच करायची असा जणू त्याने मनाशी चंग बांधला होता.. त्यामुळे ऑफिस मध्ये कोणी काय काम करायचे हे ठरवणारा मंथन ऑफिसला जाताना काय कपडे घालायचे हे हि आईला विचारायचा. सुमनताई स्वतः कामाला जात होत्याच. त्या जोरावर त्यांनी मोठे घर घेतले होते.. आता मंथनने स्वतःच्या कर्तृत्वावर गाडी घेतली होती.. तो दिसायला सुंदर होता.. पगार चांगला होता.. तरिही त्याचे लग्न मात्र ठरत नव्हते.. कारण...

        सुमनताईंना सुंदर, सुस्वभावी, सुशिक्षित, सुगरण , सुशील, नोकरी करणारी त्याच बरोबर घर सांभाळणारी सून हवी होती.. आता अशी सून मिळणे थोडे कठिण झाले होते.. कारण एखादी मुलगी सुंदर असायची पण तिला नोकरी करायची नसायची.. एखादी नोकरदार असायची पण मग तिला स्वयंपाकाची आवड नसायची.. आणि सगळेच जुळून आले कि सुमनताईंना तिचे नाक नकटे दिसायचे..स्वजातीय हवी हे तर गृहितच धरले होते.. झाले.. या सगळ्यात मंथनला काय हवे आहे, हे त्यांनी ना कधी विचारले ना त्याने कधी सांगितले.. पण या सगळ्यात त्याचे वय मात्र उलटून जात होते.. याची कुठेतरी जाणीव झाल्यामुळेच कदाचित आताशा सुमनताईंनी बर्‍याच वधूवरसूचक मंडळात नाव नोंदवले होते.. पण त्यांच्या अटी मात्र कमी झाल्या नव्हत्या.. त्यामुळे दर रविवारी स्थळदर्शनाचा कार्यक्रम असायचाच.. आधी उत्साहाने मुलगी बघायला जाणारा मंथन आता मात्र जीवावर आल्यासारखा जायचा.. 

     आज ज्या मुलीला पहायला जायचे खरेतर तिचा फोटो पाहून मंथनला ती आवडली होती.. पण आईसमोर सांगायला त्याला भिती वाटत होती.. बघू तिथे जाऊन काय होईल ते बघू, असा विचार करून ते दोघे निघाले.. ते दोघे तिथे पोचले.. छोटेसेच घर, पण स्वच्छ आणि नीटनेटके होते.. ते पाहून सुमनताईंच्या कपाळावरची एक आठी कमी झाली.. 

" तुम्हाला घर सापडले ना बरोबर?" बोलायला काहीतरी सुरुवात करायची म्हणून मुलीच्या वडिलांनी प्रश्न विचारला..

" हो, तुम्ही पत्ता एवढा व्यवस्थित दिला होता, कि लगेचच घर सापडले.. तुमचे घरही व्यवस्थित लावले आहे. आवडले मला.." सुमनताई म्हणाल्या.

" ते काम आमच्या सगळ्यांचे.. आम्ही सगळे मिळून ते करतो.."

" आवडले मला.. आता मुलीला पण बोलवा बाहेर.. कारण आम्हाला इथून थोडे बाहेर जायचे आहे.."

" हो बोलावतो ना.. संजनाची आई, संजनाला घेऊन बाहेर येताय ना.." मंथन आतुरतेने दरवाजाकडे बघायला लागला.. त्याच्या मनात उगाचच धाकधूक होत होते.. खरेतर आईच्या बेसिक चाचण्या पास झाल्यानंतरच इथे येण्याचा त्यांचा निर्णय झाला होता. पण तरिही तिला प्रत्यक्ष बघायची उत्सुकता त्याला होतीच.. ती आली.. अतिशय साधे पण खुलणारे सौंदर्य.. तिच्या साधेपणाने ती त्याच्या नजरेत भरली होती.. सुमनताईंकडे बघून त्यांनाही ती आवडली आहे हे त्याला समजत होते.. मंथनच्या नकळतच तो तिला प्रश्न विचारत होता आणि ती ही न लाजता उत्तरे देत होती.. हे चाललेले पाहून थोड्याशा अवघडलेल्या सुमनताईंनी सगळे हातात घेण्यासाठी प्रश्न विचारला..

" मग लग्नानंतर नोकरी करणार ना? म्हणजे आहे तीच चालू ठेवणार कि अजून चांगली संधी मिळाली कि तिथे जाणार?"

" अजून तरी तसे काही ठरवले नाही.. मी.." तिने परत उत्तर दिले. ते उत्तर सुमनताईंना काही खास पटले नाही.. त्यामुळे त्यांनी तिथून निघायचे ठरवले. मंथन मात्र अजूनही तिच्याच विचारात होता.. गाडीत त्याने धाडस करून सुमनताईंना त्याने विचारलेच..

" आई मला संजना आवडली, होकार कळवायचा का?"

" एका भेटीतच तुला आवडली? अरे आजकालची मुले तर दोनदा तीनदा कितीतरी वेळा भेटतात.. मग ठरवतात.. तुला काय एवढी घाई आहे? तसेही तिचे वय थोडे जास्त नाही का वाटत?"

" आई जरा माझे वय पण बघ ना? ती माझ्याच वयाची आहे.. हिच्यापेक्षा कमी वयाची बघायचे ठरवले तर मग माझा बालजरठ विवाह करावा लागेल.." मंथन समजावत म्हणाला.

" आता फक्त तिला बघायला आलास तर एवढा प्रेमात आहेस तिच्या उद्या लग्न झाल्यावर मग मला तर घराबाहेर काढशील.." सुमनताई म्हणाल्या..

" आई, काहीही काय म्हणतेस? मी का तुला घराबाहेर काढीन.. तू पण ना?" मंथन वैतागला होता.. त्याने गाडी घराच्या दिशेने वळवली होती..

" हे काय? कुठे निघालास तू?"

" घरी.."

" अरे पण, आपल्याला अजून दोन स्थळे बघायची होती.. "

" या पुढे मला एकही स्थळ बघायचे नाही.. मला ना कंटाळा आला आहे या स्थळ बघण्याचा. जाऊ दे माझे लग्न."

मंथनचा चिडलेला स्वर ऐकून सुमनताई वरमल्या.. त्यांनी येत नाही असे बाकीच्या स्थळांना कळवले.. दोघे घरी आले.. मंथन विचार करत होता कि काय केल्याने आपले लग्न होईल.. आणि सुमनताई विचार करत होत्या कि मंथन आपला एकमेव आधार आहे तो सुटता कामा नये.. घरी आल्यावर दोघांनीही न बोलता आपापली कामे केली आणि दुसर्‍या दिवशीच्या कामाला लागले..

      सकाळी उठून सुमनताई नेहमीसारख्या स्वयंपाक करायला स्वयंपाकघरात आल्या.. त्या सुरूवात करणार तोच मंथन तिथे आला..

" आई आज डब्यात कसली भाजी देणार आहेस?"

" आज ना भेंडीची करते.." मुलगा बोलायला लागला या आनंदात सुमनताई बोलल्या..

" ओके.. पण मग ती उभी चिरून कर.. मला ती कोकम घातलेली नाही आवडत.."

" पण तू तशीच खायचास ना रे?" सुमनताई आश्चर्याने म्हणाल्या..

" हो.. कारण तुला आवडायची म्हणून. पण आज मला ती खावीशी वाटते आहे."

" बरं करते.." नाश्ता, डबा करून सुमनताई स्वतःच्या खोलीत आल्या.. तिथे मंथनने त्यांच्यासाठी साडी काढून ठेवली होती..

" मंथन ही साडी का काढलीस?"

" आई, मी ही साडी किती हौसेने घेतली होती.. पण तू कधी नेसलीच नाहीस.. आज मला असे वाटले कि तू आज ऑफिसला जाताना हि साडी नेसावीस.. म्हणून काढली.."

" अरे पण या साडीचे काठ टोचतात मला.. ऑफिस मध्ये आठ तास हि साडी नेसून बसणे अशक्य आहे.."

" आई,पण हि साडी मी तुझ्याकरता किती प्रेमाने आणली होती.." मंथन त्या साडीवरून हात फिरवत म्हणाला.

" अरे पण प्रेम एकाबाजूला.. आणि हि टोचणारी साडी दुसरीकडे.. तू आणलेली साडी नेसली म्हणजेच माझे तुझ्यावर प्रेम आहे हे सिद्ध होते का?" सुमनताई वैतागून म्हणाल्या..

" मला पण हेच सांगायचे आहे आई.. तू माझ्या आवडीची एक साडी आठ तास नेसून बसू शकत नाहीस.. आणि मी तुझ्या आवडीच्या मुलीशी लग्न करून आयुष्य घालवायचे.. मला विचार ना माझी आवडनिवड काय आहे.. मी तिच्या सोबत सुखी राहीन कि नाही.. पण इथे तुला एकही मुलगी पसंत पडतच नाही.. हिच्यात हेच कमी तर तिच्यात ते.. कोण एवढे सर्वगुणसंपन्न असते ग?"

" पण मी हे सगळे तुझ्या सुखासाठी करते आहे ना?" सुमनताईंचा आवाज थरथरत होता.

" आई, काल तुझे आणि मावशीचे बोलणे ऐकले मी.. तुला असे वाटले तरी कसे कि माझे लग्न झाल्यावर मी तुझ्याकडे लक्ष देणार नाही.. तुझे माझ्या आयुष्यातील स्थान कमी होईल.. तू माझ्यासाठी घेतलेले कष्ट मला माहित आहेत.. आणि जर तुला एवढाच माझ्यावर विश्वास असेल तर मग मला लग्नच नाही करायचे.." मंथन कळवळून म्हणाला.. सुमनताईंनी त्याला थोपटले आणि त्या उठल्या..

" नको जाऊस कुठेच.. इथेच बस.." मंथन म्हणाला..

" नको.. मला जाऊ दे.."

" तुला राग आला का माझा?"

" राग नाही रे.. पण माझी चूक तर सुधारू दे.."

" कसली चूक?"

" विनाकारण खुसपट काढायची.. स्वतःचा विचार करताना तुझ्या गरजा मी विसरूनच गेले होते रे.. पण आता त्या संजनाला सांगितलेच पाहिजे ना कि माझा लेक तयार आहे.. तुझी तयारी आहे का? तसेही तिच्या बोलण्यावरून काल अंदाज आलाच होता मला..पण डोळ्यावर पट्टी होती ना माझ्या.. बरोबर ना?" सुमनताई मंथनला टपली देत म्हणाल्या.. आणि मंथन त्यावर गोड हसला..



कथा कशी वाटली ते नक्की सांगा..


सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई