अशी पाखरे येती

Short story showing that unknowingly Birds became part of life

अशी पाखरे येती

बेडरूमच्या खिडकीत अचानक पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला आला म्हणून हळूच थोडा पडदा बाजूला करून पाहिलं, दोन साळुंख्या चिवचिवत होत्या. नवरा बायको असावीत. चाहूल लागताच दोघं उडून गेली. पडदा मुद्दामच तसाच ठेवला. पुन्हा थोड्या वेळानी ते जोडपं परत आलं. आता मात्र चोचीत गवताच्या काड्या होत्या. खिडकीत घरटं बनवायचा विचार होता वाटतं तेव्हा. म्हणूनच एवढा वादविवाद सुरू होता. 

    दिवसभर थोड्या थोड्या गवताच्या काड्या गोळा करणं सुरू होत त्यांचं. घरटं झालं नव्हतं अजून, मला वाटलं रात्रीची ही दोघं एखाद्या झाडावर गेली असतील. हळूच डोकावून पाहिलं तर तिथच होती दोघं. सकाळी जाग आली ती त्यांच्या किलबिलाटाने. मी पण मग फावल्या वेळात त्यांच काम पाहत बसायची. घरटं बांधताना मध्ये मध्ये दोघांमध्ये वाद होत असावेत बहुतेक. काय बोलत असतील, कोण काय म्हटलं असेल याचा अर्थ लावताना मनातल्या मनात खूप हसू यायचं. शेवटी ती दोघही नवरा बायको. वादविवादाशिवाय त्यांचाही संसार अपूर्णच.

   बघता बघता त्यांचं घरटं पूर्ण झालं.  एक साळुंखी त्या घरट्यात बसून राहायची. बहुतेक तिनी अंड दिलेलं असावं. रोज तिला न्याहाळत दिवस जायचा. एक दिवस त्या दोघांच्या आवाजात एक बारीक आवाज यायला लागला. पाहिलं तर एक छोटुसा पक्षी अंड्यातून बाहेर आला होता. इवली इवली चोच, इवलुसे डोळे, इवलीशी मान, दिसायला अगदी गोजिरवाणा. थोडासा आवाज झाला तरी घाबरून जायचा बिचारा. त्याचे आई बाबा त्याला प्रेमानी चोचीतून खाऊ घालत होते. तो पण मस्त खायचा. मी पण मग खिडकीत एका भांड्यात पाणी आणि दुसऱ्या भांड्यात तांदुळाचे दाणे ठेवले. दोघं पक्षी मस्त ते दाणे टिपायचे अन पाण्याच्या भांड्यातलं पाणीही खेळायचे. खूप लळा लागला होता त्यांचा. पिल्लु पण आता थोडं मोठं झालं होतं.

   एका रात्री खूपच हवा सुटली, विजा कडाडल्या आणि खूप पाऊस आला. सकाळी उठल्या उठल्या आधी घरटं पाहिलं , पिल्लू अर्ध लटकलेल्या अवस्थेत होतं. दोन्ही साळुंख्यांपैकी कोणीच नव्हतं घरट्यात. अस वाटलं की त्या पिल्लाला पुन्हा नीट आत सरकवून ठेवावं पण लहानपणी ऐकलेलं आठवलं की पक्ष्यांना माणसानी हात लावला की दुसरे पक्षी त्याला चोचीनी मार देऊन मारून टाकतात. त्या पिल्लाला हात लावायचं धाडसच होईना. 

   संध्याकाळपर्यंत एकही साळुंखी आली नाही. पक्षी किती सहज घरटं सोडून गेले. जीव लागतो आपला त्यांच्यावर, सगळं दुःखही आपल्यालाच, आपल्याच मनात ते विचार घोळत राहतात. दुसऱ्या दिवशी कामवाल्याबाईंच्या मदतीने ते घरटं काढून टाकलं. अन मनाशी पक्क ठरवलं कोणत्याच पक्षाला घरात, खिडकीत घरटं करू नाही देणार.

   विचारांच्या तंद्रीत स्वयंपाक घरात आले तर खिडकीत एक पारवा पक्ष्याचं जोडपं छोट्या काड्या चोचीत घेऊन हजर. त्यांना हाकलून लावले. दिवसभर त्यांना खिडकीत बसूच दिलं नाही. चार-पाच दिवस रोजच ते दोघं काड्या घेऊन यायचे आणि मी त्यांना हाकलून द्यायचे. दिवसातून कितीदा तरी आमचा हा उद्योग सुरू असायचा. 

   एक दिवस पारव्याचं ते जोडपं आलच नाही, आमची खिडकी बहुतेक सोडली असावी त्यांनी. मी पण मग थोडी निवांत झाले. दोन दिवसांनी पुन्हा तीच पक्षीण दिसली. दोन चार काड्या अगदी खिडकीच्या कडावर ठेवून त्यावरच बसली होती. हळूच डोकावून पाहिलं तर दोन अंडी होती. स्वतःचाच राग आला, एवढं कस निर्दयी झालो आपण. घरटं करू दिलं असत तर नीट जागा तरी झाली असती तिच्या बाळांना. पण आता ठरवलं या वेळेस मी नाही लळा लावून घेणार, तरी मी रोज लक्ष ठेऊन असायचे. काही दिवसांनी त्यातून दोन पिल्लं बाहेर आली. 

   दोन्ही पक्षी पिल्लांना चारा पाणी द्यायचे, पंखाखाली झोपवायचे. लवकरच पिल्लं मोठी झाली. दोघांना उडायच कस ते पण शिकवलं त्यांनी आणि एक दिवस ते पिल्लही उडून गेले. मागे राहिलं ते दोन-चार काड्यांच वाकडं-तिकडं घरटं.

                                             © डॉ किमया मुळावकर

फोटो-गुगलवरून साभार

(कथा कशी वाटली ते नक्की सांगा. Share करायची असल्यास लेखिकेच्या नावासहित share करू शकता.)