Feb 26, 2024
नारीवादी

अश्शी नणंद नको गं बाई.. भाग ३

Read Later
अश्शी नणंद नको गं बाई.. भाग ३
अश्शी नणंद नको गं बाई... भाग ३


"काव्या.. मी कधी असं म्हटलं?" मीरा दुःखी स्वरात म्हणाली.

"बोलायची काय गरज? वागण्यातून दिसते ना? तुम्हाला फक्त हे सिद्ध करायचे असते की मी किती चांगली आणि ही कशी वाईट."

"काव्या माझ्या मनातही असं काही नसतं."

"तरीही ते होतंच ना?"

"अगं पण तुला तिच्यावर एवढं चिडायला झालं तरी काय?" वृंदाताईंनी काव्याला विचारले.

"मलाच विचारा. तुमचंही वागणं मला दिसत नाही का? सतत आपली लेक चांगली आणि सून वाईट. माझ्या नवर्‍याचा पगार येत नाही ना म्हणून.." काव्या बोलतच होती.

"आता यात रितेशचा काय संबंध?" महेशरावांनी विचारले.

"त्याच्याचमुळे तर होतं आहे सगळं. तो जर चांगला कमावता असता तर का वेळ आली असती ही माझ्यावर?" काव्या थांबतच नव्हती. ते ऐकून मीराच्या डोळ्यात पाणी आले.

"आई, मी निघते. माझ्यामुळे तुमच्यामध्ये भांडणं नको." डोळ्यातलं पाणी पुसत मीरा म्हणाली.

"घ्या.. म्हणजे परत मीच भांडण करते. इतके दिवस मी बोलत नाही म्हणून तक्रार, आता बोलले तर मी भांडते?"
काव्या परत बोलली. तिला प्रत्युत्तर न देता मीरा बाहेर पडली. ते बघून वृंदाताई आणि महेशरावांना वाईट वाटले.

"काय मिळाले गं तुला, तिला असं दुखावून?" वृंदाताईंनी विचारले.

"मी कशाला दुखावू? खरंतर माहेरी किती हस्तक्षेप करायचा हे त्यांना समजलं पाहिजे. दर आठवड्याला आहेच इथे फेरी."

"ते ती आमच्यासाठी येते. येताना कधी रिकाम्या हाताने नाही येत. काही ना काही घेऊनच येते. यात तुला खटकण्यासारखे काय आहे? ती चालत नाही पण तिने दिलेले पैसे चालतात का?"

"मला त्यांचे पैसेही नको आणि त्याही नको." काव्या रागाने म्हणाली.

"ठिक आहे मग.. तसं तर तसं." विचार करत महेशराव म्हणाले. दिवस जात होते. मीराने घरी येणं सोडलं होतं. वृंदाताई आणि महेशराव काव्याशी जास्त बोलत नव्हते. महिना संपला. एक तारीख आली. तसा मीराचा वृंदाताईंना फोन आला.

"आई, मी तुला काही पैसे ऑनलाईन पाठवते. वापरायला जमतील ना?"

"मीरा, यापुढे पैसे पाठवू नकोस." वृंदाताई ठामपणे म्हणाल्या.

"अग पण.."

"नाही म्हटलं ना.."

"बरं.. मग औषधं येतील कुरिअरने. ती तरी घेशील?"

"नाही.. यापुढे तू काहीच पाठवायचे नाहीस." वृंदाताईंनी फोन कट केला. काव्या हे सगळं ऐकत होती. मीराची मदत घेत नाहीत हे बघून तिला बरं वाटत होतं.

"रितेश, मला महिन्याचं सामान भरायचं आहे. पैसे दे ना." काव्याने रितेशला आठवण करून दिली.

"अजून बाबांनी मला दिले नाहीत. मी कुठून देऊ?"

"तू विचार मग.."

"असं कसं विचारू?" रितेशला खूप विचित्र वाटत होतं.

"पण सामान संपेल ना, दोनतीन दिवसांत."

"बघतो बोलून." रितेश म्हणाला खरा. पण त्याला बोलायची वेळच आली नाही. तो बाहेर पडतानाच महेशरावांनी त्याला थांबवून घेतले.

"रितेश, या महिन्यापासून मला घरात पैसे द्यायला जमणार नाही." ते ऐकून काव्याला धक्का बसला.

"म्हणजे?"

"इतके दिवस मीरा आमच्या औषधांचा आणि बाकीचा खर्च करत होती. म्हणून मी माझं पेन्शन घरखर्चासाठी देऊ शकत होतो. पण आता नाही. आमच्या दोघांची औषधं, अजून काही त्या पैशातूनच करावं लागणार आहे. जास्तीत जास्त त्यातले अर्धे देऊ शकतो. त्यापुढे नाही." बोलून महेशराव आत गेले. त्यांचे बोलणे ऐकून काव्या बधिर होऊन गेली. वाणी, दूध, भाजी, लाईटबिल, फोनचे बिल, इन्शुरन्स, घरभाडे, पियुच्या बालवाडीची फी, अधूनमधून डॉक्टरची फी असे अनेक खर्च तिच्या डोळ्यासमोर नाचू लागले. रितेश आणि महेशराव दोघेही तिच्या हातात पैसे देत. त्यातून ती घर चालवत होती. त्यातच तिची ओढाताण व्हायची. आता त्यातून महेशराव पैसे देणार नाहीत म्हटल्यावर खर्च कसा करायचा हा प्रश्न पुढे आला. गेले काही दिवस तसेही तिला जाणवत होतेच की मीरा घरासाठी काय काय करत होती. तिने एकदम आखडता हात घेतल्यामुळे काव्याचे डोके बधिर झाले होते. आठपंधरा दिवसातच रितेशचा पगार संपून गेला होता. पियुची फी भरणं अजून बाकी होतं.

कसा मार्ग काढेल यातून काव्या? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//