अशी माझी माऊली (लघुकथा)

त्या दिवशी नेमका ऑफिसला जायला उशीर झाला होता. मला माझ्याच वस्तू सापडत नव्हत्या. मी लहान-लहान कारणांवरून आईला आवाज देत होतो. आईची खूप धावपळ होत होती....


(लघुकथा)

अशी माझी माऊली...


त्या दिवशी नेमका ऑफिसला जायला उशीर झाला होता. मला माझ्याच वस्तू सापडत नव्हत्या. मी लहान-लहान कारणांवरून आईला आवाज देत होतो. आईची खूप धावपळ होत होती.....मला ऑफिसला जायला निघेपर्यंत आईने माझ्यासाठी स्वयंपाक करून ठेवला होता. फक्त ते जेवण डब्यात भरायचे राहिले होते. मला ते जेवण डब्यात भरेपर्यंत इतका ही वेळ नव्हता. मी डब्बा न घेताच ऑफिसला निघून गेलो. "ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये खाईल." असे आईला जाताना सांगितले. असे आजपर्यंत पहिल्यांदाच झाले की मी ऑफिसला येताना डब्बा आणला नाही.
जेवणाची वेळ झाली. कॅन्टीनमध्ये जाऊन सर्वांनी आपआपले डब्बे उघडले. मला कॅन्टीन मधले जेवण नको होते. ते मी कसेबसे पोटात ढकलले आणि आम्ही सर्वजण कॅंटीनच्या बाहेर आलो. तेवढ्यात तिथे आई दिसली. तिच्या हातामध्ये जेवणाचा डब्बा होता. सर्वजण तिच्याकडे पाहत होते पण तिला कोणीच ओळखत नव्हते. ती माझ्या जवळ आली. पण मला तिच्या साधेपणाची, तिची लाज वाटू लागली. मी तिला ओळखायला नकार दिला. तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली होती. काही वेळाने ती काहीही न बोलता तिथून निघून गेली.
पण नंतर मला माझ्याच वागण्याचा खूप राग आला. ती तिथून निघून गेल्यानंतर माझे कामात लक्ष लागेना. माझ्या अशा वागण्याचा मला पश्चाताप होत होता. घरी येऊन आईची माफी मागायचे मी ठरवले. पण आई माझ्याशी बोलेल की नाही ? कशी वागेल ? याची मला काहीच कल्पना नव्हती. आई माझ्यावर खूप चिडेल, खूप रागवेल. असेही राहून राहून वाटायचे; पण झाले उलटेच. संध्याकाळी घरी आलो तेव्हा आईने अगदीच नेहमीप्रमाणे पाण्याचा ग्लास आणून माझ्या हातात दिला.
ती प्रेमाने म्हणाली,
"काय रे.... डबा घेऊन आले होते, तर तोही नाही घेतलास तू. तिथल्या जेवणाने पोट भरलं ना तुझं ? मला माहितीये नसेल भरलं तुझं म्हणूनच आज तुझ्यासाठी सर्व तुझ्या आवडीचे पदार्थ बनवले आहेत. जा पटकन फ्रेश हो. मी जेवायला वाढते तुला."
ती असं म्हणाल्यावर माझे डोळे भरून आले. मी तिच्या कुशीत शिरून तिची माफी मागितली. तिने माझे अश्रू पुसले. कुठलीही तक्रार न करता मला लगेच माफ करून टाकले. मी माझी चूक सुधारायचे ठरवले. दुसऱ्याच दिवशी तिला ऑफिसमध्ये नेऊन तिची सर्वांसोबत ओळख करून दिली.
अशी आहे माझी माऊली.


समाप्त

लेखिका : कु. कोमल उल्हास पाटील