असेही प्रेम हे (भाग १ ला)

अजूनही दोघांचा पाठशिवणीचा खेळ सुरूच होता. आता मात्र तिला कळून चुकले की, कोणीतरी मुद्दामहून आपला पाठलाग करत आहे. शहरातल्या त्या गर्दीच्या रस्त्यावरही तिचा मागोवा घेणाऱ्या त्याचा, तिला प्रचंड राग आला होता. बेधडक असलेल्या तिने आता मात्र त्याला भिडायचे ठरवले. नेहमीचा तलाव येताच तिने स्कुटी बाजुला घेतली. ती अशी अचानक थांबलेली पाहून तो बिथरला; पण पुढे निघून न जाता त्याने गाडी तिथेच बाजूला घेतली.
असेही प्रेम हे (भाग १ ला)

© आर्या पाटील

स्कुटीच्या साईड मिररमधून वैदेही मागच्या गाडीचा वेध घेत होती.गेली पंधरा मिनिटे ती क्रेटा गाडी अजूनही तिच्या मागेच होती. बऱ्याचदा साईड देऊनही ड्रायव्हरने ओव्हरटेक टाळले होते.

"काय मूर्ख आहे ड्रायव्हर." ती आरशात पाहत जरा जोरातच म्हणाली.

अजूनही दोघांचा पाठशिवणीचा खेळ सुरूच होता. आता मात्र तिला कळून चुकले की, कोणीतरी मुद्दामहून आपला पाठलाग करत आहे. शहरातल्या त्या गर्दीच्या रस्त्यावरही तिचा मागोवा घेणाऱ्या त्याचा, तिला प्रचंड राग आला होता. बेधडक असलेल्या तिने आता मात्र त्याला भिडायचे ठरवले. नेहमीचा तलाव येताच तिने स्कुटी बाजुला घेतली. ती अशी अचानक थांबलेली पाहून तो बिथरला; पण पुढे निघून न जाता त्याने गाडी तिथेच बाजूला घेतली.
त्याला पुढे थांबलेले पाहून वैदेही मात्र प्रचंड संतापली. गाडीवरून उतरत ती त्याच्याजवळ जाऊन पोहचली. डोळ्यांवरचा चश्मा काढत तिने काचेवर थाप मारली. आत बसलेला तो तिच्या येण्याने सावध झाला. स्वतःला सावरत त्याने गाडीची काच खाली घेतली.

" ओ मिस्टर, काही प्रॉब्लेम आहे का ?" ती रागातच म्हणाली.
तिच्या बोलण्याने पस्तिशीतल्या त्या तरुणाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य तरळले. त्याने चश्मा काढताच तिच्या मनात मात्र ओळखीची घालमेल झाली. प्राजक्तापरी काही आठवणी स्मृतीपटलावर दरवळल्या. क्षणभर ती शांत झाली. खूप वर्षांपूर्वी सुटलेलं काही अचानक, अनाहूतपणे समोर आल्याची जाणीव झाली.

" कधी काळी मला घाबरणारी तू आज चक्क मलाच घाबरवत आहे." तो हसत म्हणाला.

" अनिकेत." तिने नाव उच्चारताच तो मात्र हळवा झाला.
गाडीतून खाली उतरत त्याने दीर्घ श्वास घेतला. आठवणींच्या पावलांनी तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला.

" अजूनही लक्षात आहे माझे नाव ?" म्हणत त्याने तिच्याकडे पाहिले.

" बापरे! किती दिवसांनी भेटलास आणि तो ही असा ?" त्याच्या प्रश्नाला टाळत ती म्हणाली.

" मघाशी मार्केटमध्ये तुला ओझरतं पाहिलं. खात्री नव्हती तू अशी अचानक भेटशील.स्वप्नात असल्यासारखं वाटलं.पाठलाग केला आणि तुझ्या मागे इथे पोहचलो." त्याने हसत म्हटले.

" तुझ्या स्वप्नात मी येते ?" तिनेही लगेच 'री'ओढली.
तसा तो वरमला.

' स्वप्नात नाही, तू तर हृदयात आहेस.' तो मनातच उत्तरला.
त्याला हरवलेलं पाहून तिनेच पुढाकार घेतला.

" मग कसा आहेस ?" हस्तांदोलनासाठी हात पुढे करत तिने विचारले.

" मस्त. अगदी मजेत." त्यानेही लागलीच तिचा हात हाती घेत उत्तर दिले.

तिला एवढ्या दिवसांनी भेटून मनाला आनंदाची भरती आली होती. क्षणभरासाठी लाभलेलं सहवासाचं अत्तर त्याला आठवणीच्या कुपीत बंदिस्त करायचे होते.

" वेळ असेल तर थांबशील का ?" म्हणतांना अजूनही तिचा हात त्याच्या हातात होता.

" म्हणजे काय नक्कीच. फक्त एक मिनिट थांब." म्हणत तिने त्याच्या हातातून आपला हात सोडवला.
आपल्या स्लिंग बॅगेतून मोबाईल काढत कॉल लावला. थोड्याच वेळात पलिकडून कॉल उचलला गेला.

" हॅलो संचित, मला घरी यायला उशीर होईल. थोडं काम आहे." तिचे फोनवरचे संभाषण ऐकून त्याने बरोबर अंदाज बांधला.

" संचित. छान नाव आहे मिस्टरांचे." तलावालगतच्या बाकड्यावर बसत तो म्हणाला.
स्मितहास्याची हलकी लकेर तिच्या गालावर उमटली. आपला मोबाईल बॅगेत ठेवत ती त्याच्या बाजूला येऊन बसली.

" आज घाबरली नाहीस माझ्या बाजूला बसायला ?" तो तिच्याकडे पाहत, जुने आठवत म्हणाला.

" जुना तु पुन्हा कधी भेटलासच नाही घाबरायला." ती लागलीच उत्तरली.

तिच्या या अनपेक्षित उत्तराने तो चकित झाला.

" म्हणजे लक्षात आहे तुझ्या सगळं ?" बोलतांना तो तिच्या मधाळ डोळ्यांत पाहत होता.

त्याची आपल्या दिशेने रोखलेली नजर तिला मात्र हळवं करून गेली.
" राहणारच ना. ऐन बारावीच्या सराव परीक्षेला
भेटला होतास मला. माझा बेंच पार्टनर म्हणून. " ती हसत म्हणाली.

" त्यावर्षी पहिल्यांदाच तुम्हां सायन्स आणि आम्हां कॉमर्सवाल्यांची अशी एकत्र सराव परीक्षा झाली होती." जुने दिवस आठवत तो म्हणाला.

" तुमच्या सेक्शनचा दादा होतास तू. तुझी त्या दिवशीची, वर्गातली एण्ट्री आजही आठवते मला." तिने असे म्हणताच तो जोरात हसला.

" आता हसू येतं त्या सगळ्याचं." त्याने हसत सांगितले.

" तुझ्या मागे दादा, दादा करत फिरणारी तुझी ती चांडाळ चौकड अजूनही संपर्कात आहे का?" तिने चौकशी केली.

" हा.. वर्षा दोन वर्षांतून भेटतो कधीतरी." तो उत्तरला.

" मग अजूनही चालते का तुझी भाईगिरी ?" ती हसत विचारती झाली.

" कॉलेज सुटलं आणि सगळच संपलं." तिच्याकडे गहिरा कटाक्ष टाकत तो म्हणाला.

त्याच्या त्या कटाक्षाने तिच्या मधाळ डोळ्यांत आठवणींचे ढग दाटून आले.

" किती घाबरली होतीस तू त्यादिवशी !" विषय बदलत तो म्हणाला.

" घाबरणारच ना. तू वर्गात येण्याआधीच तुझ्या चांडाळ चौकटीने भाईगिरीचं वातावरण निर्माण करून ठेवलं होतं. तुझी वर्गातली एण्ट्रीही तेवढीच खतरनाक होती. तू वर्गात आलास आणि सगळेच उठून उभे राहिले. तुझा दबदबा पाहून मी प्रचंड गोंधळले." ती बोलत असतांना त्याला मात्र त्यादिवशीची 'ती' आठवली.

वर्गात आल्यानंतर त्याची नजर स्थिरावली ती तिच्यावरच.
बेताची शरीरयष्टी, नितळ गोरी कांती, मधाळ डोळे, लांबसडक केसांची बांधलेली वेणी आणि आपली गुलाबी ओढणी सावरणारी ती आताही त्याला जशीच्या तशी आठवली. त्या आठवणीने त्याच्या चेहऱ्यावर नवी लकाकी चढली. पुढच्याच क्षणी मात्र ,तो जवळ जाताच कमालीची घाबरलेली ती डोळ्यांसमोर तरळली. तिचे ते निरागस रूप आठवून त्याला आताही हसू आले.

" मी जवळ आल्यावर कसली घाबरली होतीस तू. सगळा वर्ग खाली बसला परंतु तू मात्र उभीच होतीस." बोलतांना तो अजूनही हसतच होता.

" एवढा मोठा भाई आपला बेंच पार्टनर आहे मग कोणीही घाबरणारच ना ?" ती हाताने त्याच्या हातावर मारत म्हणाली.

" आता मात्र चांगलीच भीड चेपली आहे तुझी." तो हात चोळत उत्तरला.

" तू तेव्हाही काही तेवढा वाईट नव्हतास." तिने आता त्याच्यावर नजर रोखली.
तिला गूढ बोलतांना पाहून त्याचा श्वास फुलला. दीर्घ श्वास घेत त्याने उसासा टाकला.

" तुला आठवते, आपल्या दोघांमध्ये पाण्याची बाटली ठेवून बसायचे मी. दुसऱ्या दिवसापासून तुही तुझी पाण्याची बाटली मधे ठेवायला लागलास." बोलतांना तिला हसू आले.

" मग काय तर. तुला खाल्लं असतं तर मी.." म्हणत तो ही जोरात हसला.

" खायला कशाला पाहिजे होतं. सुरवातीला तू नुसतं बघायचास तरी भीती वाटायची." ती मान हलवत म्हणाली.

" सुरवातीला म्हणजे ? त्यानंतर भीती गेली का ?" तो उत्तराच्या आशेने म्हणाला.

" अगदी तसं नाही; पण तुझा चांगुलपणा प्रत्ययाला आला आणि थोडे हायसे वाटले." म्हणतांना ती गोड हसली.

" चांगुलपणा ? आणि तो ही तुला कळला ? कसा गं ?" बोलतांना तो तिच्याकडे वळला.

" तुझे मित्र जेव्हा मला पुस्तकी किडा म्हणून चिडवत होते तेव्हा त्यांच्यावर किती रागावला होतास." तिने लगेच उत्तर दिले.

" ते बरोबरच होते की. तुला उगाचच चिडवत होते." तो आपली बाजू मांडत म्हणाला.

त्याच्या मित्रांनी असं बोलल्यावर रडकुंडीला आलेला तिचा चेहरा आठवला आणि तो क्षणभर स्तब्ध झाला.


क्रमश:

© आर्या पाटील

वैदेही आणि अनिकेतची भेट त्यांना अव्यक्त नात्याच्या कोणत्या वळणावर घेऊन जाते ते पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all