असली मैत्री नको बाई..!!(भाग १)

मैत्रीचे सैल बंध


नवीन ठिकाणी नवीन बिल्डिंगमध्ये आजूबाजूला लोक कसे आहेत याची पुसटशीही कल्पना नसताना अचानक समोरच्या घराचे दार उघडले गेले. अनोळखी असतानाही अंदाजे पस्तिशीच्या घरातील एक बाई शलाकाची काळजीपूर्वक चौकशी करु लागली. तिची दोन लहान मुलेही उत्सुकतेने शलाकाकडे बघत होती.

पहिल्याच भेटीत शलाकाची आणि तिची एकदम छान ओळख झाली.

"नाव काय? गाव कोणते? आधी कुठे होतात? मिस्टर काय करतात? मुले किती? घरी कोण कोण असतं?" एकंदरीतच पहिल्याच भेटीत एकमेकींची ओळख व्हायला इतकी जुजबी माहिती पुरेशी होती.

शलाकालाही छान वाटले समोरच्या पूनम सोबत बोलून. कारण शेजारी चांगले असतील तर पुढचे काही दिवस चांगलेच जाणार याची शलाकाला खात्री पटली. तीही मनातून खूपच आनंदी झाली.

"चला हे एक बरं झालं म्हणजे निदान शेजारी तरी चांगले आहेत."

थोड्याफार गप्पा मारुन झाल्यावर तीही आपल्या दीड वर्षाच्या अर्णवला घेवून आत गेली.

रात्री अमेयला देखील पुनमबद्दल सर्वकाही सांगितले तिने. त्यालाही हायसे वाटले. म्हणजे आता त्यालाही शलाकाची काळजी राहिली नव्हती.

नुकतीच बदली होवून शलाका तिच्या नवऱ्यासोबत नवीन ठिकाणी शिफ्ट झाली होती. शलाकाचा नवरा अमेय वन विभागात गार्ड म्हणून नोकरी करत होता. त्यामुळे साधारणपणे पाच वर्षांने बदली ही ठरलेलीच. लग्नानंतर पहिल्यांदाच तो घरापासून दूर जाणार होता. आता अर्णवदेखील दीड वर्षांचा झाला होता. त्यामुळे अमेयने त्या दोघांनाही सोबत नेण्याचे ठरवले.

बदली होताच नवीन ठिकाणी रेंटवर त्याने एक फ्लॅट बुक केला. आधी बिल्डिंगमध्ये आजूबाजूचे लोक कसे आहेत? याची सर्व शहानिशा त्याने केली होती.

शिक्षक, डॉक्टर, पोलिस, तलाठी तर कोणी स्थानिक बिजनेसमन असे सगळे सुशिक्षित लोक होते आजूबाजूला. खाली ग्राउंड फ्लोअरवर मालक राहत होते. एकंदरीतच सगळ्या गोष्टी अगदी छान मिळाल्या होत्या. शलाकादेखील या वातावरणात लवकर रुळेल याची खात्री होती अमेयला. आणि आता अगदी त्याच्या मनाप्रमाणे घडत होते.

सुरुवातीला नवीन वातावरणात शलाका थोडी गोंधळली होती. संसाराचा जेमतेम तीनच वर्षाचा अनुभव गाठीशी. त्यात लहानाची मोठी अशा वातावरणात ती झाली होती की जिथे आजूबाजूला दूरवर फक्त आणि फक्त शेतीच पसरली होती. फ्लॅट सिस्टीमचा तर तिला दूरदूरपर्यंत गंधही नव्हता. पहिल्यांदा ती अशी राहणार होती. त्यात अनोळखी आणि तालुक्याच्या ठिकाणचा ग्रामीण भाग असला तरी थोडा जुन्या विचारांचा आणि पुरुषप्रधान तसेच जातीयवादाचा पगडा असलेला समाज होता आजूबाजूला.

शलाका पूर्णपणे विरोधी वातावरणात वाढलेली होती. ग्रामीण भागात जरी ती लहानाची मोठी झाली असली तरी अत्यंत फॉरवर्ड विचारांची होती. चांगले शिक्षण घेवून ती अमेयचा आयुष्याचा एक भाग झाली. पण अमेयची अशी फिरतीची नोकरी त्यामुळे तिने स्वतः नोकरी करण्याचा विचार कधी केलाच नाही. लग्नानंतर एकच वर्षात आईपणाचे सुख तिच्या पदरी पडले आणि त्यामुळे कधी एकदा संसारात ती रुळली ते तिचे तिलाही समजले नाही.

पण पटकन कोणावरही विश्वास ठेवणारी. तिच्याशी थोडे जरी कोणी गोड बोलले तरी लगेच तिला ते आपले वाटायचे. मग आपसूकच विचारांची देवाणघेवाण सुरू व्हायची. त्यात आधीच बडबड्या असणाऱ्या शलाकाला आता पूनमसारखी शेजारीण लाभली होती.

शेजारी राहणाऱ्या पूनमचा तिला खूपच आधार मिळाला होता. नवीन ठिकाणी सर्व माहिती होताना पूनमची तिला खूपच मदत झाली.

सासर आणि माहेरचे फोनवरून तिची चौकशी करायचे. शेजारी कसे आहेत? वगैरे वगैरे. तीही पुनमबद्दल सगळे छानच सांगायची. तिच्या मुलांची आणि अर्णवची दोनच दिवसांत घट्ट मैत्री झाली.

जाता येता आता रोजच हसूनखेळून गप्पा होवू लागल्या दोघींच्या. मुलेही कधी शलाकाच्या घरात तर कधी पूनमच्या घरात रमायची.

बघता बघता महिना होत आला शलाकाला. नवीन ठिकाणी आता तीही छानच रुळली होती. तिच्या बोलक्या स्वभावामुळे शेजारी पाजारी तिच्या ओळखीही हळूहळू वाढत होत्या.

जाता येता सर्वांशी ती छान हसूनखेळून बोलायची. एव्हाना आता बिल्डिंगमधील सर्वच बायकांशी तिची मैत्री वाढत होती.  पण हळूहळू तिला पूनमच्या काही गोष्टी खटकू लागल्या.

पण कदाचित आपणच पुनमबद्दल चुकीचा विचार करत असू असेही तिला वाटायचे. म्हणून मग तिने कोणाला काहीही न बोलता पूनमसोबतचे तिचे वागणे मात्र आहे तसेच ठेवले. पण वरचेवर पुनमच्या वागण्यातील बदल तिला जास्तच जाणवत होता.

क्रमशः

नेमके काय खटकले असेल शलाकाला पुनमच्या वागण्यात? शलाका चुकीची असेल की पुनम? जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all