असाही एक उपवास

Upvas, upavas, manoranjan, katha, laghukatha, puja, general



"मी आज बटाट्याची सुकी भाजी, साबुदाणा खिचडी, शिंगाड्याचा शिरा, वरईचा उपमा, तळलेला साबुदाण्याचा पापड हे बनवलंय उपवासाला. संध्याकाळी चहाबरोबर खायला उपवासाची कचोरी आणि शेंगदाण्याचे लाडू बनव म्हणाले हे , मग ते केले . आता उपवासाचे थालीपीठ अन रताळ्याचा कीस करते आहे खायला.  मंजिरी, तू काय काय बनवलंस आज उपासाचे ?",  मंजिरीच्या सासूबाई वत्सलाबाई रात्री फोनवर मंजिरी शी बोलत होत्या.

सासूबाईंचा प्रश्न ऐकून मंजिरी चपापली. जीभ चावत तिने मनातल्या मनात म्हटले, " शेवटी विचारलंच . कसं सांगावं आता यांना. मंजिरी तयार हो आता ऐकून घ्यायला , सासूबाई रागावणार आता ".

कशीबशी ती सासूबाईंना म्हणाली, "आई ...., अहो आज मला सकाळी साडेसहालाच ऑफिसमध्ये यायचं होतं. आमच्या प्रोजेक्ट चा रिलीज होता आज . सकाळी सातलाच डिप्लोयमेंट होतं. आणि काल सुद्धा घरी यायला बराच उशीर झाला होता दोघांनाही. एवढ्यात काम खूप आहे ना ऑफिसमध्ये प्रोजेक्ट रिलीज असल्यामुळे, त्यामुळे उशीरच होतोय गेल्या काही दिवसांपासून". सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेली मंजिरी  सध्या ऑफिसमध्ये डेडलाईन च्या टेन्शन मध्ये होती.

"अग मंजिरी, मी काय विचारतेय, तू काय सांगते आहेस?" सासूबाई.

"हो , तेच ... तेच सांगते आहे न आई...  रात्री घरी यायला उशीर झाल्यामुळे आम्ही आल्यावर कसेबसे जेवण आटपून झोपलो. सकाळी लवकर उठण्याची घाई होती ना. साबुदाणा संपला होता. तो आणून भिजवण्याची मलाही आठवण राहिली नाही आणि ह्यांनाही. त्यात आज कामवाल्या मावशींनीही सुटी घेतली होती. आणि सकाळी लवकर निघायचं असल्याने मी पटकन पोळीभाजीचा डबा बनवला सवयीप्रमाणे. धावतपळतच पोचले साडेसहाला ऑफिसमध्ये."

"काय? आज उपवासाच्या दिवशी पोळी भाजी बनवलीस तू ? वेंधळी कुठली , असं कसं लक्ष राहत नाही ग तुझं?"

"आई, सॉरी न,  पण सकाळी अंघोळ वगैरे लवकर आटपून पूजा करून मगच निघाले ऑफिसला मी. मंदिरात सुद्धा गेले अन दर्शन करून आले घरी येताना" , मंजिरी म्हणाली.

"वाटलंच मला असा गोंधळ घालून ठेवशील ते. मी इतक्या वर्षांपासून करत आले आहे उपवास. माझ्या सासूबाई सांगायच्या तसं सगळं. पण या आजकालच्या मुलींना व्रत उपवास काही करायला नको असतं. परंपरांना पाळायला नको असतं", वत्सलाबाई बोटे मोडत बोलल्या.

"या वेळी नाही जमलं आई उपवासाचे पदार्थ करायला. पण तरीही मी उपवास केलाय आज." , मंजिरी निग्रहाने म्हणाली.

"हो, उपवास केला म्हणे. असा जेवून खाऊन उपवास होत असतो का कधी?", सासूबाई उपहासाने म्हणाल्या.

"घरी आणि ऑफिसमध्ये एवढे काम असूनसुद्धा मी आज दिवसातून फक्त दोन वेळेलाच जेवणार आहे. इतर वेळी पूर्ण दिवसभर काहीही खाल्ले पिले नाही, अगदी चहा सुद्धा नाही. इतर वेळी खाण्याच्या पदार्थांकडे लक्षही जाऊ दिले नाही. मनावर संयम ठेवला. आपले काम प्रामाणिक पणे केले. दिवसभरात कोणालाही वाईट बोलले नाही किंवा कोणाचे मन कशाही प्रकारे दुखविले नाही,  मुक्या प्राण्यांना किंवा किडा मुंग्यांना देखील माझ्याकडून इजा होणार नाही याकडे लक्ष ठेवले. सकाळ संध्याकाळ मनोभावे पूजा केली. देवदर्शन केले. धार्मिक पुस्तकाचे वाचन केले. या पवित्र दिवसाचे पावित्र्य लक्षात घेऊन माझ्याकडून मनात आणि आचरणात जास्तीत जास्त पवित्रता ठेवण्याचा प्रयत्न केला. सांगा आई, केला ना मी उपवास? ", मंजिरीच्या आवाजात एक समाधान झळकत होते.

"माझ्या मते उपवास म्हणजे बाह्य गोष्टींना जास्त महत्त्व न देता अंतरंगातून प्रभूच्या चरणी लीन होऊन भावपूर्वक पूजाअर्चा करणे, आपापल्या श्रद्धेनुसार मनावर संयम ठेवून आहार आणि आचरणात पावित्र्य जपणे... यावेळी आम्ही दोघांनी असा उपवास केला आहे", मंजिरी म्हणाली.

वत्सलाबाईंनाही उपवासाचे खरे मर्म कळले होते.

© स्वाती अमोल मुधोळकर

Disclaimer:

कोणाच्याही भावना दुखविण्याचा अजिबात हेतू नाही.