Aug 09, 2022
सामाजिक

असा पाऊस पाऊस

Read Later
असा पाऊस पाऊस

#असा_पाऊस_पाऊस

वातावरणात एक आल्हाददायक गारवा आला आहे. पावसाने पाननपान धुवून निघालंय. रस्त्यांवरची धूळ निघून गेलेय. अशा वातावरणात बालपणीच्या आठवणी मनात पिंगा घालतात.

 साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात आम्ही गावाहून मुंबईला यायचो. बाबा आम्हाला आणण्यासाठी आठवडाभर आधी गावी यायचे. सिगारेट कंपनीजवळ गाडी रिकामी व्हायची. तिथून टेक्सीने घरी. पहिले एकदोन दिवस मुंबईतल्या वातावरणाशी एडजस्ट करण्यात जायचे. गावच्या ऐसपैस घराची,मालवणी भाषेची सवय झालेली असायची. तरी बरं चाळीत अर्धेअधिक मालवणीच होते.

नवीन वह्या पुस्तकं आणली जायची. मग बाबा तिघांच्याही वह्यापुस्तकांना कव्हर घालत बसायचे.अगदी काटकोनात,शिस्तबद्ध कव्हर घालणं, ते साईडचे त्रिकोण कापणे..मला बघत बसायला फार आवडायचं. बालभारतीचं पुस्तक घेऊन आधी सगळं वाचून काढायचे. कवितांना चाली लावायचा प्रयत्न करायचे व ओट्यावर खुर्चीत बसून मोठ्या आवाजात,सुरात म्हणायचे. गीताचं गाणं सगळ्या शेजाऱ्यांच्या अंगवळणी पडलेलं त्यामुळे त्यांच्या ते सवयीचं झालं होतं. 

शाळेत समरगीतं म्हणायला लावायचे तीही मग ओट्यावर बसून गायली जायची..शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती.., आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे अशी बरीच. चाळीच्या समोरुन पाण्याचा लोट वहायचा. ओट्यावर गांडूळ यायचे. मला त्यांची जाम भिती वाटायची. पावळीच्या पाण्याला बादल्या लावल्या जायच्या. त्या सरींचे पाण्यात निर्माण होणारे बुडबुडे बघायला बरं वाटायचं. 

मुलकातसून काय काय हाडलास गो असा आवाज देत बागवे आजोबा यायचे. मग आई त्यांना चहा,लाडू,खाजा वगैरे द्यायची. बाजूची आजीही यायची. शाळा सुरु झाली की रेनकोटची कसरत असायची. दोन नंबर अपत्य असल्याने रितीप्रमाणे मला ताईचाच रेनकोट मिळायचा. तो रेनकोट घालायला जाम कंटाळा यायचा. घरापासून सलूनपर्यंत जिथे आमची गाडी,स्कुलबस उभी रहायची तिथे पाठीवर दप्तर त्यावर रेनकोट या वेशात पाण्यात दबादबा पाय मारत जायचो. बसमध्ये रेनकोट काढून ठेवावा लागायचा. त्याला रुमालाने पुसून घडी करुन दप्तरात ठेवायचा..लय भानगडी. मग शाळेजवळ आल्यावर पाऊस असला की काहीजण परत रेनकोट घालायचे. मी डोक्यावर हात ठेवून धावत जायचे मग हमखास ताप भरायचा.

शनिवारची शाळा लवकर सुटायची. दुपारी आई पातळाची घडी करुन त्यावर जातं मांडी व धुवून वाळवलेले सुरय तांदूळ घावण्यासाठी दळे. बाजूची आजीही तिच्यासोबत बसे. ते पांढरशुभ्र पीठ जात्यातून सरसर पडताना बघायला मस्त वाटे. तसंच फिरत्या जात्याला बोटं लावलं की बोटाला झिणझिण्या यायच्या. कुळीद पिटीसाठी भाजले की ते गरमगरम खायला मजा यायची. कधी घाईआईने खाताना जीभेला चटका लागायचा. हे कुळीद आधी भरडून घेत मग आसडून परत पीठ करत. कुळदाचं पीठ चिमटीत धरून चाखत बसायला खूप आवडायचं.

लहानपणची ती गोष्ट होती ना चिऊताई चिऊताई दार उघडची तर पावसात ही चिऊताई व कावळेदादा मला नजरेसमोर दिसायचे. म्हणजे अगदी कावळेदादाचं वाहून गेलेलं घर..मग तो चिऊताईला हाक मारतोय,तिच्या दारावर ठकठक करतोय व चिऊताई तिच्या बाळाला न्हाऊमाखू घालतेय,पावडरटीट लावतेय नी तो कावळेदादा बाहेर कुडकुडतोय मग चिऊताई त्याला आत घेते वगैरे. घाटातली वाट काय तिचा थाट..ही कविताही म्हणायला आवडायची. 

या पावसात मग बटाटा,कांदा,मायाळू,ओवा,वांगी अशी विविध प्रकारची भजी व्हायची. 

वटपौर्णिमेदिवशी तर दोन ट्रकभरून फणस यायचे चाळीसमोर. त्यातलाच एक आई नीट बघून आणायची कारण आमच्याकडे सगळ्यांना कापा फणस आवडतो. रसाळ मिळाला तर हिरमोड होऊ नये म्हणून नीट तपासून एकमेकींना विचारून शेजारणी शेजारणी फणस खरेदी करायच्या. पाच काळे मणी दोऱ्यात ओवून त्यांची मणीमाळ बनवायचं काम आई माझ्याकडे देई. तसेच प्रत्येक पानावर आंबा,गरा,भाजलेला काजूगर,जांभूळ,करवंद,केळं अशी पाच फळं व तो दोरा ठेवायचे. तोवर आई साडी नेसून तयार व्हायची. ती सारी वाणं ताटात घेऊन त्यावर विणलेला रुमाल घातला जायचा. सगळ्याजणी नथी व इतर दागिने घालून नटूनथटून देवळात जायच्या. देवळाच्या आवारात वडाचं झाड होतं. भटजीकाका पुजा सांगायचे व मग ह्या शेजारणी पूजा करायच्या,वडाला सात फेरे घालायच्या. भटजीकाकांना नमस्कार करुन दक्षिणा,वाण द्यायच्या. पदरात वाण धरुन एकमेकींना द्यायच्या. 

पावसात आई मसुरची आमटी बनवायची त्यासोबत मोरीचं सुकाट खायला मजा यायची. हे मोरीचं सुकाट चवीला मस्त लागतं. तसंच तिखट डाळीसोबत तव्यावर भाजलेले भोंबिल खायची मजाच वेगळी. कधी करदी भाजायची. तो सुवास पावसाळी वातावरणात पसरला की भूक अगदी प्रज्वलित व्हायची. 

शाळेतून आलं की चहा नी गरमगरम घावणे असायचे. मला ते घडी घातलेले आवडत नसत.भिड्यातला गरमगरम घावणा ताटात आला पाहिजे असा माझा आग्रह असायचा. आंबोळी,वड्यांबाबतही तसंच नी माशा़च्या तुकड्यांबाबतही तसंच. तव्यातली सुरमईची गरमगरम तुकडी ताटात घेऊन खिडकीत बसून खाण्याची सवय होती मला. आत्ता ते तळताना पुढची कामं समोर येतात नी तसं प्लेटमधे घेऊन खात बसण्याचा विचार आपसूकच बाजूला सरतो.

जोरात पाऊस आला की हमखास हिंदमाताला पाणी भरायचं. आमची शाळा लवकर सोडायचे. दादरटीटीला बससाठी यायचो. बसमध्ये आधीच माणसं लोंबकळत असायची. मग आम्ही चालत सुटायचो. हळूहळू पाऊस व पाण्याची पातळी वाढायची. साधारण क़बरभर पाणी व्हायचं. मग मी त्यात हमखास पडायचे. आमच्यातलेच दोघंजणं मग माझ्या हातांना धरुन मला त्या पाण्यातून चालायला मदत करायचे व घरी आणून सोडायचे. 

मग पुढे बदलापूरला गेलो रहायला, तेंव्हा बारावीत होते मी. बदलापूरातला पाऊस खूप भारी असायचा. आजुबाजूला डोंगररांगा होता. आमच्या बेडरुमच्या खिडकीतून पाहिलं की दूरवर फक्त अळूचं रान दिसायचं. तो पाऊस बघत रहायला खूप बरं वाटायचं. पाऊस थांबला की अळवावर खोलगट भागात साचलेलं पाणी पाऱ्यासारखं चकाकायचं. आईने गेलरीत बरीच झाडं लावलेली. सोनटक्का,मोगरा,लाल गुलाब,गावठी गुलाब..सगळी फुलं फुलायची या पावसात. शिवाय ब्रह्मकमळही फुलायचं. 

पाऊस जास्त पडला की ट्रेन बंद व्हायच्या. मग उल्हासनगरपासून ते अंबरनाथपर्यंत दोनतीनदा रुळावरुन चालत गेलोय. अंबरनाथवरुन एखादी ट्रेन मग तिकडे पाठवायचे. 

पुढे लग्न झाल्यावर गावचा पाऊस अनुभवला. तुफान पाऊस पडायचा. खळा ओलाचिंब व्हायचा. तुळस न्हाऊन निघायची. जोतकऱ्यांची नांगरणीची घाई सुरु व्हायची. बियाणं पेरलं जायचं. मग तरवा रुजून यायचा. तरवा काढायला, लावायला त्या गुडघाभर पाण्यात उभं रहावं लागे. न्याहारीला तांदळाच्या भाकऱ्या,फणसाच्या घोट्यांची भाजी,कधी कांदाजवळा असे. तेऱ्याजी भाजी केली जाई. भातावर ती पातळ भाजी घेतली की जोडीला एखाद सुकाट घ्यायचं नी भरपूर जेवायचं. 

याच पावसात कोके वर यायचे. ते एकटे करुन आणायचे. मला दाखवलेले तसे मी ते खडकावर साफ करायचे पण त्यांची चव मला विशेष आवडायची नाही. रात्री दिर खूण लावून यायचे. पहाटे मासे घेऊन यायचे. त्या माशांचं तिखलं व भाकरी मस्तच लागे. शिवाय पिटीभात,कुळदाचं मोडवणी भात होई तर कधी लालपाल्याचा रोव रुजून आला की त्याची आमटी केली जायची. कधी चुलीत आठळ्या (घोट्या) भाजल्या जायच्या तर कधी मीठ घालून त्या उकडून खायचो. अननसंही परसात असायचे. हे अननस,फणसाची भाजी,शहाळी,आंबे,जांभळं हे सारं वटपौर्णिमेच्या फराळाला असायचं. कधी काजी भाजायचे. घरभर तो भाजलेल्या काजींचा सुवास दरवळायचा. याच मोसमात एखादी गाय व्याली तर खरवस बनवला जायचा. शेजाऱ्यापाजाऱ्यांना केळीच्या पानातून वाटला जायचा. अशा वासराला पालसात फार जपतात अगदी पोटच्या पोरासारखं अंधरुणपांघरुणही घालतात. शेतकऱ्याची त्याच्या गायवासरांवरची माया शब्दांत नाही सांगता येणार.

 जरा थंडी वाजायला लागली की मांजरं हमखास आपल्या अंधरूणात येऊन झोपतात.  ओटीवरचा मोतीही पडवीत दाराजवळ येऊन बसतो. घरात गणपतीच्या तयारीची चर्चा होऊ लागते..

असा हा पावसाळा????

-------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now