अरुणिमा सिन्हा.................. एका जिद्दीची कहाणी

It Is A Story Of Courageous Girl Defeat Her Physical Disability And Wins The Mount Everest

                    आपण सर्वजण आयुष्यात बरेचदा निराश होतो. थोड्या-थोड्या अपयशाने आपल्याला जीवन नकोसे होते. ज्या गोष्टींनी आपल्याला निराश वाटतं त्या गोष्टीही अगदी शुल्लक असतात , म्हणजे परीक्षेत कमी मिळालेले गुण , किंवा व्यवसायात किंवा नोकरीत न मिळवता आलेलं टार्गेट, आणि गेला बाजार अगदी फालतू गोष्टी म्हणजे,  एखाद्या दिवशी इंटरनेट स्लो असणे,  एखादा ॲप ओपन न होणे,  एखाद्या मैत्रिणीला किंवा मित्राला वारंवार फोन करून तिने फोन न उचलणे ,या सगळ्या वर कळस म्हणजे समाज माध्यमांवर टाकलेले आपले फोटो आणि त्यावर न मिळालेले लाईक्स आणि आपल्याला नको असलेल्या  कमेंट्स.

                     पण आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे 'अरुणिमाची'...................... 'अरुणिमा सिन्हा'.......... जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी जगातील पहिली (अपघातामुळे) अपंग झालेली महिला.

            23 वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू असलेली अरुणिमा 12 एप्रिल 2011 ला दिल्लीला नोकरीच्या मुलाखतीसाठी निघाली होती. लखनऊ येथून ती पद्मावती एक्सप्रेस मध्ये साध्या डब्यात चढली रात्री काही तरुण हातात चाकू घेऊन डब्यात घुसले , ते सगळ्यांना धमकावून जे मिळेल ते लुटू लागले. कोणत्याही प्रवाशाने कुठलाही विरोध केला नाही ........... अरुणिमा च्या गळ्यात एक सोन्याची साखळी होती , दरोडेखोर तिच्या जवळ आले....... एकाने तिला साखळी देण्यासाठी दरडावले............. तर दुसरा तिच्या गळ्यापाशी हात नेऊ लागला........... तिने त्यांना विरोध केला तेव्हा....... एकाने तिच्या पोटावर लाथ मारली...... तिच्या गळ्यातील साखळी ओढून घेतली.......... कोणीही विरोध करत नसताना एक मुलगी आपल्याला विरोध करते आहे हे पाहून त्या दरोडेखोरांनी भरधाव रेल्वेगाडीतून तिला ओढत दरवाजापाशी नेलं आणि बाहेर ढकलून दिलं .......... ती बाजूने जाणाऱ्या दुसऱ्या रेल्वे वर आदळली...... तिचे कमरेपासून पायाचे हाड मोडले...... चेहऱ्यावर जखमा झाल्या...... ती जेथे आदळली त्याला लागून दुसरा रेल्वे मार्ग होता दुसऱ्या ट्रॅक वरील रुळांवर तिचा पाय होता पण हाड मोडल्याने  ती पाय उचलू शकत नव्हती..... समोरून एक रेल्वे ट्रॅकवरून येत होती ती तिच्या पायावरून गेली............... रात्रभर रेल्वे  तीच्या पाया वरुन येत जात होत्या..........रुळा खालील  उंदीर तिचे पाय,  चेहरा , केस कुरतडत होते........ रेल्वेतील मलमूत्र तिच्या चेहर्‍यावर , अंगावर पडत होतं....... बऱ्याच वेळानंतर तिची शुद्ध हरपली....... सकाळी कोणालातरी ती दयनीय अवस्थेत ट्रॅक वर पडलेली दिसली..... एका प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला भरती करण्यात आले हे तिला जाणवलं....... तिचा पाय कापण्याचा निर्णय झाला . त्यामुळे तिची व्हाॅलीबाॅल ची कारकीर्द संपुष्टात येणार होती....... पण त्या प्राथमिक केंद्रात भूल द्यायची सुविधा नसल्याने अशाच परिस्थितीत अरुणिमा चा पाय कापण्यात आला........ त्यानंतर तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले......... आणि दूरचित्रवाणी माध्यमे असा प्रसार करू लागली की अरुणिमा कडे अधिकृत तिकीट नसल्याने तिने स्वतः रेल्वे बाहेर उडी मारली........ या सर्व घटनाक्रमात तिला अनेक शारीरिक आणि मानसिक आघातांना सामोरे जावे लागले........... पण तरीही अरुणिमा ने आपले मनोधैर्य गमावले नाही............. अरुणिमा ला कृत्रिम पाय लावण्यात आला...... या उलट तिने आपला कृत्रिम पाय घेऊन सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्याचे नक्की केले..............

              रुग्णालयातून भावासोबत अरुणिमा बचेंद्री पाल यांना बिहारमध्ये भेटायला गेली....... बचेंद्री पाल या पहिल्या भारतीय स्त्री माउंट एव्हरेस्टवर आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे .त्यांनी तिला प्रथम विरोध केला पण अरुणिमाची जिद्द बघून शेवटी त्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला.........

              भारतात केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येणारी एकूण चार पर्वतारोहण केंद्रे आहेत येथील प्रशिक्षण कस लावणारं असतं. अरुणिमा उत्तर काशी च्या केंद्रात दाखल झाली............ अत्यंत कठीण , कडक प्रशिक्षण सुरू झालं..... चालताना ती सगळ्यांच्या मागे राहायची कारण तिचा पाय मध्येच मांडीतून निघून जायचा...... तिला इतरांपेक्षा तीन ते चार तास उशीर व्हायचा.... पायातून रक्तही यायचं....

             या केंद्रात एक नियम असतो संध्याकाळी प्रशिक्षण आटोपल्यावर प्रत्येकाला स्वतःच्या पायावर निरीक्षण करायला सांगितलं जातं कारण  जर पायाला बारीक फोड (ज्यांना ब्लिस्टर्श )म्हणतात , ते आले असतील तर प्रशिक्षण बंद करायला सांगतात... कारण हे फोड खूप धोक्याचे असून त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो..... अरुणिमा ने आपल्या कृत्रिम पायामुळे हा सर्व त्रास सहन केला ......वेदनांवर मात करून जिद्दीने ती यशासाठी प्रयत्न करू लागली..... अरुणिमाचे एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झालं....... ती परीक्षा  A ग्रेड ने पास झाली.........

              प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तिने आपल्या अंतिम ध्येयाकडे लक्ष केंद्रित केलं..... 'टाटा स्टील' कडून तिला प्रायोजकत्व मिळालं होतं आणि अरुणिमा नेपाळ कडे निघाली........... काठमांडू पशुपतिनाथ दर्शन घेऊन दुसऱ्या दिवसापासून तिची चढाई सुरु झाली......... शेरपा तिच्या मदतीला होता,  पण जेव्हा त्याला अरुणिमाच्या पाया  याबद्दल कळलं,  तेव्हा त्याने एका अपंग मुली सोबत जाण्यास नकार दिला....... अरुणिमाने विनवण्या करून शेरपाला   राजी केलं....... ती म्हणाली , 'तुम्ही एका अपंग मुली सोबत चालला आहात असे तुम्हाला कुठेही जाणार नाही'.......

              काही दिवस चालल्यानंतर संकटं झेलीत,  मृत्यूच्या दाढेतून वाचत ती शिखरापासून काही मिनिटांवर येऊन पोहोचली........ रस्त्यात अनेक प्रेते दिसली .......तेव्हा तिच्या समोर एक जर्मन पर्वतारोही पाय घासून मृत्युमुखी पडताना तिला दिसला....... एका ठिकाणी बर्फावर रक्त सांडले दिसलं........ पुन्हा काही प्रेते दिसली..... या सर्व प्रेतांना ओलांडून ती पुढे गेली............आणि शेवटी तिने एव्हरेस्ट सर केले. एप्रिल 2011 ला तिचा अपघात झाला आणि 21 मे 2013 ला सकाळी दहा वाजून 55 मिनिटांनी ही पृथ्वीवरील सर्वात उंच जागेवर उभी होती........

                पण अजूनही एक मोठं संकट बाकी होतं....... तिचा प्राण वायू संपत आला होता...... तिला जाणीव झाली होती की ती जिवंत परत जाऊ शकणार नाही ........... किमान जगाला आपले चित्रीकरण दिसावे म्हणून तिने शिरपाला तिचे चित्रीकरण करायला सांगितलं............. परिस्थिती खूप बिकट होती........... शिखरावर भयानक वेगाने वारे वाहत होते........ लवकरच वादळ येणार होतं....... आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे प्राणवायू संपत होता...... पण तिची जिद्द बघून तो शेरपा ही नतमस्तक झाला तो म्हणाला ,'आता मी मेलो तरीही चालेल,  पण तुला एकटं सोडणार नाही , तुला जिवंत परत खाली घेऊन जाईनं'.

                  ते वेगाने परतीला निघाले पण तिचा कृत्रिम पाय सतत मांडीतून निखळत होता..... त्यामुळे तिला चालताना खूप त्रास होत होता...... तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते..... उंच ठिकाणी चालताना तोंडात लाळ निर्माण होत असते , तिच्या तोंडातील लाळ खाली पडताना 'टक' आवाज येईल कारण लाळ खाली पडे पर्यंत तिचा बर्फ होई ...... अश्रूही खाली पडताना त्याचं बर्फ होत होतं..... तिचा हात काळा निळा पडला होता .....यालाच फ्रॉस्ट बाईट बर्फ बाधा म्हणतात..... हात सुद्धा कापावा लागणार होता..... शेवटी तिने एक भयंकर निर्णय घेतला..... तिने पाय काढून टाकला...... आणि तशीच एका हातात स्वतःचा कृत्रिम पाय घेऊन ती स्वतःला घासत चालू लागली...... त्याक्षणी अरुणिमा कडे फक्त काही मिनिटांचा प्राणवायू शिल्लक होता...... दोघांनाही माहीती होतं आता तिचा मृत्यू अटळ....... आणि योगायोगाने तिला एक ब्रिटिश पर्वतारोही जास्तीचा प्राणवायू सिलेंडर सोबत दिसला....त्याला त्या सिलेंडरचा वजन होत असल्याने त्याने एक सिलेंडर तिथेच टाकून दिला होता....शेरपा धावत तिथे गेला..... सिलेंडर अर्धा भरलेला होता.... त्याने प्राणवायूचा तो सिलेंडर आणून अरुणिमाच्या पाइपला जोडला ........ अरुणिमा ला पुनर्जीवन मिळाले....

        अरुणिमा सिन्हा ला 2015 मध्ये भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तर तिला वूमन ट्रान्सफॉर्मिग  इंडिया अवॉर्डही मिळालेलं आहे..........

             अरुणिमा करता एवढच म्हणावसं वाटतं......

             अभय बैठे ज्वालामुखीयों पर

               झेंडा वही उडाते है 

               जो धुन के पक्के बंजारे

                 पानी मे आग लगाते है

       



           माहिती  आणि फोटो  -   साभार गुगल


       (सदर लिखाण हे मोबाईल मधून केलेले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व)


(वाचकांनो तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स हेच लेखकांच्या लेखणीचा स्फूर्तिस्थान असतं त्यामुळे आपले अमूल्य मत नोंदवायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर मला फॉलो करा)

🎭 Series Post

View all