प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे

प्रयत्न
ओशोंच्या एका पुस्तकात वाचलेली ही गोष्ट
एका लहानशा गावात एका टेकडीवर छोटसं मंदिर होतं.
या मंदिरात दुरून दुरून लोक दर्शनाला येत. गावात टेकडी खाली 
राहणाऱ्या एका मुलाच्या मनात त्या मंदिराबद्दल कुतूहल निर्माण 
झालं. त्यानेही तिथे जाण्याचा निर्णय घेतला. दिवस उन्हाळ्याचे होते.
आपल्याला परतायला उशीर झाला, तर  उन्हाचा त्रास होईल,
म्हणून अगदी झुंजूमुंजू झाल्यावर जाण्याचा त्याने निर्णय घेतला.
बाहेर खूप अंधार असल्यामुळे सोबत एक कंदील घेतला.पण,
एवढ्याशा कंदीला ने आपल्याला कसे दिसेल म्हणून तो तिथेच
उभा राहिला.
तितक्यात एक म्हातारे गृहस्थ तिथे आले. त्यांच्या हातात एक 
छोटी सी चिमणी होती. चौकशी केल्यावर त्यांना त्याची समस्या 
कळली ते म्हणाले \"बेटा, तुझ्या हातात कंदील आहे.
माझ्या हातात तर छोटीशी चिमणी आहे. या अंधारात आपल्याला
पावलापुरता प्रकाश महत्वाचा, जेणेकरून आपल्याला चालता येईल.
आणि निघालोच तर वेळेत पोहोचता येईल.
या गोष्टीवरून आपल्या लक्षात येईल की प्रयत्न महत्त्वाचे.
\" थांबला तो संपला \"आपण जीवनात एखादी गोष्ट करायची ठरवली,
एखादे ध्येय साध्य करायचे ठरवले, तर अडचणी येणारच.
म्हणून त्या अडचणींना भिवून मागे यायचं कां ? नाही, आपले प्रयत्न 
सुरूच ठेवायचे. यश निश्चित मिळेल. प्रत्येक पक्षी मोरासारखा
डौलदार  चालू शकत नाही पण, म्हणून इतर पाखरांनी चालायचं
नाही का? आपण आपली महत्त्वाकांक्षा नेहमी उच्च ठेवली पाहिजे.
कारण खूप उंच उंच उडायचं ठरवलं तर आपण थोडं उंच नक्कीच
उडू शकू पण, थोडं उडायचं ठरवलं तर मात्र आपण जेमतेम
घराच्या छपरापर्यंत पोहोचू.
आयुष्यात बरेचदा आपल्या बरोबरीची माणसं योग्य विचारपूर्वक
प्रयत्न करून खूप यशस्वी झालेले दिसतात. तर कधी आयुष्यात
खूप मागे पडल्यामुळे रेंगाळलेले दिसतात. परंतु खोलवर विचार 
केला तर आपल्याला असे दिसून येईल की काहींच्या आयुष्यात
चालण्याची गती योग्य होती तर काहींची कमी होती.
पण ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न महत्त्वाचे. \"असाध्य ते साध्य
करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे.\"
अभ्यास म्हणजे प्रयत्न, मेहनत, सराव. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी,
शिकण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास.
आयुष्यातल्या अनेक गोष्टी आपण बघत, कृती करत स्वतःहून
शिकत असतो.
साधी मुंगी तोंडात अन्नाचा कण घेऊन भिंतीवरून कितीदा तरी पडते
पण आपले प्रयत्न सोडत नाही.
आर्य चाणक्य यांनी सुद्धा म्हटले आहे \"जब तक तुम दौडनेका
साहस नही जुटाओगे, तुम्हारे लिये प्रतिस्पर्धा मे दौडना
असंभव बना रहेगा.
म्हणजेच कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न महत्त्वाचे.
 \" देरे हरि पलंगावरी \"अशी इच्छा बाळगणाऱ्याला जीवनात
काही साध्य करता येत नाही. कष्टाचे फळ नेहमीच गोड असते.
म्हणून प्रत्येकाने आपापल्या कामात सातत्याने प्रयत्न करावे.
व ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा.
म्हणूनच म्हटले आहे \"प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.\"