समस्यांची चौकट

' समस्यांची चौकट

काकू , अहो काकू म्हणतचं अस्मिता घरात आली. ' रश्मी दिसत 

नाही काकू ' कुठे गेली ती? अग अस्मिता बस की जरा.रश्मीच्या

आईने अस्मिताला बसण्यास सांगितले. कशी आहेस गं तू ?

काय म्हणते तुझी नोकरी ? अशा गप्पा मारत रश्मीच्या आईने

अस्मिता साठी चहा ठेवला. तेवढ्यात रश्मी ही आली.

अग अस्मिता किती दिवसांनी भेटलोय आपण. खूप छान

वाटतयं.

अस्मिता आणि रश्मी दोघीही बाल मैत्रिणी. रश्मी वयाने...

अस्मिता पेक्षा चार वर्षांनी मोठी. पण दोघींचीही गाढ मैत्री.

त्यांच्या माहेरी ग्रामदैवताचा मोठा उत्सव असायचा. तेव्हा

लग्न झालेल्या मुली, परगावी राहत असलेली मुले, सुना..

आवर्जून त्या उत्सवासाठी एकत्र यायचे. अस्मिता आणि

रश्मी सुद्धा अशाच माहेरी आलेल्या. रश्मी नुकतीच

सेवानिवृत्त झालेली.

काय ग रश्मी  कसं आहे तुझं डेली रुटीन. आता तर निवांत

वेळ मिळत असेल तुला.

हो ना छान वाटतंय गं. रोजच्या धावपळीच्या जीवनाला..

पूर्णविराम मिळाला आहे जणू.

बोलता बोलता अस्मिता भूतकाळात शिरली. रश्मी दिसायला सुंदर

अगदी चुनचूनीत. पण आई-वडिलांची आर्थिक स्थिती अगदी

जेमतेमच. हो.. नाही ...करता करता ग्रॅज्युएशन पूर्ण झालं.

आता तिचं लग्न करून टाकावं म्हणून वडिलांनी स्थळ पाहायला

सुरुवात केली. आणि लवकरच तिचं लग्न झालं सुद्धा.

मुलगा शेतकरी. घरी एकत्र कुटुंब. सर्व जबाबदाऱ्या पार पाडता 

पाडता ती थकून जायची, मनात यायचं, गरीबी हा खरोखरचं...

एक शाप आहे. माझ्या वडिलांची आर्थिक स्थिती जर चांगली 

असती तर त्यांनी माझ्यासाठी चांगलं स्थळ शोधलं असतं.

पण प्रारब्ध ...

पाहता पाहता रश्मी दोन मुलांची आई झाली. हळूहळू मुलं मोठी 

झाली आता मात्र तिला या ' रांधा , वाढा, उष्टी काढा '

या चौकटीतून बाहेर पडावसं वाटत होतं. नाहीतर आपल्या 

शिक्षणाचा काय उपयोग ? आणि त्या दृष्टीने तिने प्रयत्नही सुरू केले.

आणि ' प्रयत्नांती परमेश्वर ' या उक्तीप्रमाणे तिच्या प्रयत्नांना यश 

आले. तिला एक छानशी नोकरी मिळाली.

पण खेडेगावातील चार भिंतीच्या आत राहणाऱ्या सुनेने

नोकरी करावी हे घरच्यांनाच नव्हे तर बाकीच्यांनाही पटण्यासारखे

नव्हते. इथेही अनेक अडथळ्यांची शर्यत तिला पार पाडावी लागली.

पण अगदी स्थितप्रज्ञ भूमिका घेऊन तिने घरच्या व इतरांच्या

बुरसटलेल्या विचारांची चौकट पार केली.

कुणीतरी लिहिलेच आहे...

 ' कुणी तळ्यात... कुणी मळ्यात

पण सगळ्याचं जाळ्यात...

कुणी गोऱ्या ... कुणी काळ्या...

पण सगळ्यांच्याच पायात साखळ्या...

कुणी शिकलेल्या... कुणी अडाणी...

पण सगळ्यांचीच बंद वाणी...

कुणी आज्या... कुणी आया...

पण शेवटी सगळ्याचं बाया...

कुणी सुपात... कुणी जात्यात...

पण सगळ्याचं भरडल्या जातात .

रश्मीच्या नोकरीमुळे तिच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागला.

पण तिच्या समस्या काही कमी होत नव्हत्या. तिने नोकरी 

सोडावी म्हणून सुद्धा प्रयत्न केले गेले. अशावेळी बरेचदा

तिचं मानसिक संतुलन बिघडायचं, मनात नाना तऱ्हेचे

वाईट विचार यायचे पण प्रत्येक वेळी मन आणि बुद्धी यांच्या

द्वंद युद्धात बुद्धीच विजयी ठरायची.

म्हणतात ना एखाद्याच्या जीवनामध्ये संघर्ष लिहिलेला असतो.

पण प्रत्येक काळ्या ढगाला रुपेरी कडा असते त्याप्रमाणे

हळूहळू सर्वकाही सुरळीत झालं.

अशा तऱ्हेने सर्व चौकटी पार करून रश्मी एकदाची

सेवानिवृत्त झाली.

अग अस्मिता, कसला विचार करतेस? आणि अचानक

का एवढी गप्प झालीस?

चल उठ. आज खूप मज्जा करू आपण.

असं म्हणून रश्मी आणि अस्मिता घराबाहेर पडल्या.