कृतज्ञता - सर्व गुरूंप्रति

कृतज्ञता

भारतीय संस्कृतीत गुरुचा महिमा अनन्यसाधारण आहे. 'गुरु शिवाय

ज्ञान नाही 'असे आपली संस्कृती सांगते. म्हणून प्रत्यक्ष परमेश्वर 

जेव्हा इहलोकात अवतार घेऊन आले तेव्हा त्यांनीही गुरु महिमा 

गायिला आहे.

आदर्श गुरू आपल्या आचार विचारातून आपल्या शिष्यांवर 

नकळत संस्कार घडवत असतात. गुरूंचे शिस्तबद्ध वागणे,

अनासक्त वृत्ती ,सर्व शिष्यांना गुरूंकडून मिळणारी समान वागणूक..

अशा अनेक गोष्टी शिष्यांच्या जीवनाला आकार देत असतात.

खरा गुरु आपल्या शिष्यांकडून झालेला पराभव आनंदाने स्वीकारतो.

शिष्य आपल्याहून वरचढ होईल अशी भीती त्याच्या मनाला...

कधीही स्पर्श करत नाही त्यामुळे आपल्या जवळील ज्ञानापैकी 

काहीही राखून न ठेवता ते आपल्या शिष्याला तयार करत असतात.

गुरु द्रोणाचार्य आणि त्यांचा शिष्य अर्जुन हे याचेच एक आदर्श 

उदाहरण. तसेच खरा आदर्श शिष्य आपली गुरुबाबतची नम्रता

कधीही ढळू देत नाही. निवृत्तीनाथ व ज्ञानदेव हे आदर्श गुरु शिष्य...

होते.

आज विज्ञानातील सर्व क्षेत्रे विकसित होत आहेत. अशावेळी

शिष्य, त्याने निवडलेल्या क्षेत्रात आपल्या गुरु पेक्षा अधिक ज्ञान

सहजतेने संपादन करू शकतो. त्या त्या क्षेत्रात अधिक नावलौकिक 

मिळवू शकतो. अर्थातच या यशाने त्याच्या गुरूला जीवन

कृतार्थ झाल्यासारखे वाटते.

हाच शिष्य पुढे कोणाचातरी आदर्श गुरु होतो. गुरु ऋण

फेडण्याचा हाच मार्ग आपल्या संस्कृतीने सांगितला आहे.

आई हा मुलांचा पहिला गुरु. मातेचे कृपा छत्र एवढे विशाल आहे,

हे उपकार एवढे अमाप आहे की 100 वेळा जन्मूनही ते...

फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे की ते 

आपल्यावर कृपाप्रसादाची खैरात सदैव करत असते.

म्हणूनच कवी म्हणतो 'आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही '

शाळा सुद्धा आपला एक गुरुच आहे. कोणत्याही माणसाच्या 

जीवनातील अत्यंत संस्कारक्षम काळ हा शाळेतच गेलेला असतो.

शाळा म्हणजे केवळ दगड, विटा, मातीची इमारत नाही तर शाळेतील

शिक्षक -शिक्षिका, मुख्याध्यापक, ग्रंथपाल, इतर सेवक विद्यार्थ्यांच्या

हितासाठी झटत असतात. मात्र कोणतीही अपेक्षा न ठेवता.

त्यामुळे विद्यार्थी जेव्हा असामान्य यश मिळवतो तेव्हा सारी शाळा

आनंदीत होते.

ग्रंथ सुद्धा आपले गुरुच आहेत मानवी गुरूंचे सहाय्य तसेच ग्रंथरूपी

गुरूंचे सहाय्यही तेवढेच महत्त्वाचे. जन्मभर कष्ट करून एखादा...

माणूस जे ज्ञान अनुभवाने, विचाराने संपादन करेल ते ग्रंथाच्या..

सहाय्याने काही तासातच मिळवता येते म्हणून ग्रंथ हे सुद्धा

मानवाचे अद्भुत गुरु होय.

   '   देणाऱ्याने देत जावे...

       घेणाऱ्याने घेत जावे...

       घेता घेता एक दिवस...

       देणाऱ्याचे हात घ्यावे. '

विंदा करंदीकर यांच्या कवितेतील या ओळी म्हणजे देणारा

देत असतो त्याने देतच राहावे, त्याने देणे कधीच थांबवू नये.

घेणाऱ्याने घेत  जावे पण एक दिवस त्याने देणाऱ्याची

 ' दान ' ही वृत्ती सुद्धा घ्यावी. ज्या ज्या गुरूंपासून आपण

ज्ञान प्राप्त केले आहे. जी शिकवण त्या त्या गुरूंनी आपल्याला 

दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे, त्यांनी दिलेले संस्कार 

पुढे चालवणे.

निसर्ग सुद्धा मानवाचा महान गुरु आहे. कडे कपाऱ्यांवरून

धावत जाणारी आणि सस्यश्यामल करणारी सरिता,

 ' दुसऱ्यांसाठी जगलास, तरच खरा जगलास ' हे सांगणारे...

वृक्ष, संपूर्ण सृष्टीला प्रकाशमान करणारा सूर्य, अंधाऱ्या रात्रीही..

आकाशात चमचमणारे चंद्र, तारे या सर्व गोष्टी नसत्या तर

माणसाला काहीतरी भव्य दिव्य करावे अशी प्रेरणा मिळाली नसती.

भूमी मानवाचा आणखी एक गुरु. भूमीत पेरलेला एक दाणा

हजारो  ओंब्या घेऊन वर येतो. पृथ्वीची ही सर्जनशीलता

मानवाला निर्मिती क्षम बनवते.

अशा तऱ्हेने ' जो जो जयाचा घेतला मी गुण, तो तो केला मी

गुरु जाण. 'या संत एकनाथांच्या उक्तीप्रमाणे आपल्या सभोवताली

असे असंख्य, आदर्श गुरु आहेत.

आज गुरुपौर्णिमा, तेव्हा या सर्व गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करणे,

त्यांना मान देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.




 साहाय्यान