निरोप समारंभ

निरोप समारंभ

निरोप समारंभ म्हटला तर अतिशय हळवा आणि भावनाप्रधान

प्रसंग. विशेषतः मला पहिला निरोप समारंभ आठवतो तो म्हणजे..

दहावीचा. आता आपण शाळेतील बंदिस्त जीवन सोडून

जाणार म्हणून मन अगदी भरून आले होते. पण जसजसा..

निरोप समारंभाचा दिवस जवळ येऊ लागला तस तसे मन मात्र

उदास होऊ लागले. सदैव आपल्या प्रगतीसाठी झटणारे

शिक्षक -शिक्षिका आता रोज भेटणार नाहीत. बालवाडीत असताना

शाळेत जाताना रडणारे आम्ही आज या शाळेतून जायचे आहे म्हणून

रडत होतो. आम्ही दहावी चांगल्या गुणांनी पास व्हावे म्हणून

सर्व शिक्षक वृंदांनी आमच्या कडून भरपूर तयारी करून घेतली 

होती. ज्याप्रमाणे पक्षी आपल्या पिल्लांना आकाशात उडता 

येण्यापूर्वी आपल्या मायेच्या उबदार पंखाखाली वाढवतात.

त्यांच्यासाठी कष्टाने घरटे बांधतात. चारापाणी करतात.

म्हणूनच आकाशात भरारी घेण्यास ते समर्थ असतात. त्याप्रमाणे

शिक्षकांनी आम्हाला चांगले संस्कार दिले होते. आता या सर्व

शिक्षक वृंदांना सोडून जावे लागणार ही कल्पनाच नकोशी

वाटत होती.आम्ही सर्व मित्र मैत्रिणी सुद्धा विखुरले जाणार होतो.

पण इलाज नव्हता. अशा तर्‍हने अतिशय जड अंतकरणाने आम्ही 

शाळेचा निरोप घेतला.

दुसरा निरोप समारंभ म्हणजे सेवानिवृत्ती. अनेक सहकारी

 मित्रमैत्रिणी ,अतिशय आवडते असलेले माझे 

विद्यार्थी -विद्यार्थिनी यांना आता सोडून जावे लागणार होते.

माझ्या दृष्टीने हा समारंभ सुद्धा अतिशय हळवा आणि 

भावनाप्रधान होता.

सेवानिवृत्ती छे ! छे !!

ही तर क्षणभर विश्रांती...

मनासारखे जगणे आता...

आनंदाची अनुभूती .

हे जरी खरे असले तरी ज्या शाळेने आपल्याला सामाजिक आणि

आर्थिक दर्जा दिला त्या शाळेला सोडून जावे लागणार.

पण हे तर करावेच लागते.विद्यार्थांचे हमसून हमसून रडणे..

पाहिल्यावर तर मनाला बांध घालणे जड जात होते.

 'कन्या सासूरासी जाये ,मागे परतूनि पाहे '

अशी एकंदरीत अवस्था.

खूप वर्ष वाहणाऱ्या धबधब्याचे अचानक पाणी पडणे

बंद झाल्यावर कसे एकदम आयुष्य थांबल्यागत वाटते ना !

खडकाला त्या प्रवाहाची झालेली सवय, आसपासच्या वेलींवर,

झाडांवर आणि धबधब्याच्या डोहात राहणाऱ्या जलचर प्राण्यांवर

किती परिणाम होतो हे सांगण जसं कठीण त्याप्रमाणे

सेवानिवृत्ती.