प्रबळ इच्छाशक्ती

प्रबळ इच्छाशक्ती

नुकतीच पावसाची सर येऊन गेलेली. वैशाख वणव्यात

होरपळणाऱ्या तप्त धरणीला सुखावणारी. वातावरणात पसरलेला 

मृत्तिकागंध मनाला आणखीनच धुंद करून टाकत होता.


रेडीओवर सुंदर भावगीत सुरू होतं..

  आला आला वारा , संगे पावसाच्या धारा..

  पाठवणी करा  सया निघाल्या सासुरा ,

  सया निघाल्या सासुरा .

पण एवढ्या सुखद वातावरणात पल्लवीचे मन मात्र उदास..

होते. कधी कधी उगाच मनाची विचित्र अवस्था होते.

समस्या वाटावी असे काहीच नसते. तरीही मनावर सावट येते.

पल्लवीचे आज तसेच काहीसे झालेले. कां बरं असं होत असावं ?

पल्लवी विचार करू लागली. तिची दोन्ही मुलं आपापल्या

संसारात रमलेली. पंख  फुटताचं  पाखरे उडून जायचीस ना !

मग ही रुखरुख कशाला ?

चल थोडं गार्डन मध्ये तरी फिरून येते म्हणून पल्लवी घराबाहेर...

पडली. थोड्याच अंतरावर एक साधारण 28 ते 30 वर्षाची स्त्री

तिच्याकडे कौतुकाने बघत होती. जवळ येताच ती गोड हसली.

पण तिची ओळख मात्र पटेना. एवढ्यात '  मॅडम ओळखलं 

कां मला ? 'पल्लवी थोडा वेळ विचारात पडली.


अहो मॅडम मी तुमची विद्यार्थिनी. तुम्ही आम्हाला मराठी

शिकवायच्या. आमचा पाच जणींचा  ग्रुप होता.खूप

आवडायच्या तुम्ही आम्हा सर्वांना. तुमच्या तासाला आम्ही सर्व

विद्यार्थी -विद्यार्थिनी अगदी तल्लीन होऊन जायचो. तुमचे..

शिकवणे आम्हाला इतके आवडायचे ,की आम्ही पाचही जणींनी..

ठरवले 'आपण पण शिक्षिका व्हायचे ' आणि आमच्या प्रबळ..

इच्छाशक्तीमुळे आज आम्ही पाचही जणी शिक्षिका आहोत.

ती अगदी न थांबता मनापासून भरभरून बोलत होती.


' अगबाई   !! मेघा ना तू ? '

किती बदललीस !!

आणि पल्लवी अचानक भूतकाळात शिरली. मेघाचे आई-वडील..

शेतमजूर. घरी हलाखीची परिस्थिती. मेघा मात्र अभ्यासात हुशार,

अगदी चुनचूनीत. दुर्दैवाने मेघाचे वडील वारले.तिचे शाळेत येणे..

बंद झाले. पल्लवीला मात्र करमेना. काय झालं असावं बरं ?

तिने मेघाच्या मैत्रिणींकडून मेघाची माहिती मिळवली.

आणि एक दिवस पल्लवी तिच्या घरी गेली. तिच्या 

कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. आणि आवश्यक ती मदत 

सुद्धा केली. इतकेच नव्हे तर पुढे मेघाच्या शिक्षणासाठी

सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले.

 ' मॅडम बोला ना काही ' 

मेघाच्या आवाजाने पल्लवी दचकली. तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

काय बोलावं तिला समजेना. 'अगं मेघा त्या वयात मुली 

भावुकचं असतात ' उगाचच कुठलीही शिक्षिका त्यांना आवडू लागते.

पल्लवी म्हणाली.

नाही मॅडम मी जे बोलते आहे ते अगदी खरं आहे.तुम्ही 

त्यावेळी माझ्या पाठीशी अगदी मुलीप्रमाणे उभ्या राहिल्या ,

म्हणूनच आज मी इथपर्यंत पोहोचले आहे.

आणि मेघा अक्षरशः रडू लागली.तिच्या स्वरातला भाबडेपणा

पल्लवीच्या काळजाला स्पर्श करून गेला.

तेवढ्यात मेघाचे मिस्टर सुद्धा आले. मेघाने त्यांची पल्लवी शी

ओळख करून दिली. 'अहो , याच आमच्या मॅडम ,

मी नेहमी तुम्हाला सांगायची ना ?

 '  आज मी जी  आहे ना ती या मॅडम मुळेच '

 तिथेच त्या दोघांनीही पल्लवीला अगदी वाकून नमस्कार केला.

आणि ते दोघेही निघून गेले.

पल्लवीच्या मनावरचे दडपण की उदासीनता कुठल्या कुठे पळाली.

आणि अगदी स्मित हास्य करत , मनातल्या मनात  गाणे 

गुणगुणत ती घरी परतली.