पिवळा अंगरखा

पिवळा अंगरखा

मी फ्रिज उघडला,मेथीची भाजी  डब्यातून बाहेर काढली ,

तशी बाजारातून आणल्या बरोबर निवडून , धुवून ती 

काळजीपूर्वक फ्रिज मध्ये ठेवली होती.आज मी डाळ घालून मेथीची

भाजी करणार होते. चिरतांना मला तीन चार पिवळी पानं दिसली.

लगेच मी ती काढून टाकली,फेकून देण्यासाठी. पण मनात 

एकदम धस्स झालं आणि मनात नानाविध विचारांनी थैमान

घातलं. बरोबर आहे त्या हिरव्यागार मेथीच्या भाजीतली

पिवळी पानं तर काढायलाच हवी. जी पानं उपयोगी नाही ,

ती बाजूला काढून टाकावीत लागणार ना !


म्हणजे आपणही आता मुलांच्या संसारात लुडबुड न करता..

बाजूला व्हायलाच हवं. पानांना कळत नाही पण आपल्याला..

तर समजायलाचं पाहिजे की पिकल्या पानांचा उपयोग नसतो.

झाडावरुन पिकलं पान  केव्हातरी गळून पडणारच. त्यानं...

दुसऱ्या कोवळ्या पानांना जागा रिकामी करून द्यायला हवी.

म्हणजे आपण इथून बाजूला झालं पाहिजे. हा न बोलणाऱ्या..

निसर्गाचा नियम आहे.तसं म्हातारपण म्हणजे पिकलं पान.

 ' ना जीवनाचा भरोसा आता , ना धरावी उगी आस आता '



दिवसभर ती हिरवी कोवळी ,आणि पिकली पानं माझ्या भोवती..

पिंगा धरून नाचत होती. मी बाहेर डोकावलं  , बाहेर झाडाखाली

पिवळी पानं पडलेली दिसली. काही वाऱ्याबरोबर दूर उडून गेली

होती.खाली पडलेल्या प्रत्येक पानात मला माझ्या जुन्या आठवणी

दिसू लागल्या. अनेक मैत्रिणींचे चेहरे दिसू लागले. एखादीच्या..

चेहऱ्यावर क्षीण हसू तर एखादीच्या चेहऱ्यावर दुःखाची लकेर.

तर कुणी निराश. त्या पानांमध्ये मला माझाही चेहरा दिसला.

पण त्यावर एक मोकळं समृद्ध हसू होतं.जणू ते हसू दुसऱ्यांना..

सांगत होतं की अरे हा जीवनक्रम आहे.बालपण , तरूणपण ,

म्हातारपण हे जीवनाचे टप्पे आहेत. या उतरत्या वयात दुःखी

कशाला होता ? तुम्हीही तुमच्या तरूण वयात अनेक जबाबदाऱ्या

पार पाडल्यात.कुटुंबाला सुखी केले.

 ' पेलले आव्हान मी संकटांचे जीवनी..

आता नको निराशा उगाच आणू मनी ' 

मग आज ही उदासिनता कशाला ? आता आपलं जीवनकार्य

 ( जबाबदाऱ्या ) संपलं.आता आपल्याला परत जायला 

पाहिजे. हा पिवळा अंगरखा ( पिवळी पानं ) परतीच्या प्रवासाचा..

 ' ड्रेसकोड ' आहे.आता शेवटच्या स्टेशनला नेणाऱ्या गाडीची..

वाट पाहत थांबायचं . बस एवढंच.

पिकलं पान समाधानानं खुदकन हसलं ,

अन् अलगद गळून पडलं .