झाडे लावा - झाडे जगवा

झाडे लावा- झाडे जगवा

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे..

पक्षीही सुस्वरे ,आळविती...

संत तुकाराम महाराजांनी अशा सुंदर शब्दांत

मानवाचे निसर्गाशी असलेले नाते सांगितले आहे .


आजची स्थिती पाहिली तर दिवसेंदिवस तापमानाचा..

पारा वाढतचं चाललेला आहे.बऱ्याच ठिकाणी  \" पाणीबाणी \"

सुरु आहे . वाढत्या तापमानामुळे संपूर्ण जनजीवन जणू

विस्कळीत झाले आहे.


या सर्व गोष्टींचे कारण म्हणजे पर्यावरणाचा असमतोल ,

वारेमाप होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल..

ढासळत चाललेला आहे.वनक्षेत्र कमी होत आहे.

त्यामुळे खरी गरज आहे ती वनसंवर्धनाची.


ही जबाबदारी फक्त शासनाची नसून समाजातील प्रत्येक

घटकाची आहे.वृक्षारोपन कार्यक्रम राबवले जातात ,

पण झाडे लावणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच किंबहुना

त्याहून  ही जास्त ती लावलेली झाडे वाढवणे ,

त्यांचे जतन करणेही महत्वाचे आहे.


झाडांमुळे जमीनीची होणारी धूप थांबते. झाडांची मुळे पाणी धरून ठेवतात त्यामुळे ओलावा राहातो.पशुपक्षांना आसरा मिळतो.

परंतु मानवाने चालवलेल्या वृक्षतोडीचा परिणाम आज 

सर्वांनाच भोगावा लागत आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात,

मानसा मानसा ,

कधी व्हशील मानून ,

लोभासाठी झाला ,

मानसाचा रे कानूस !!

दिवसेंदिवस वाढणारे हे तापमान एक धोक्याची घंटा आहे.

म्हणून झाडे  लावा ते जगवा.आपण लग्न , लग्नाचे वाढदिवस ,

तसेच अशाच इतर कार्यक्रमांमधे जातांना पुष्पगुच्छ देण्याऐवजी ,

एक-एक रोप भेट देऊ शकतो.


आपण जी फळे खातो त्यांच्या बीया धुवून सुकवून ठेवा, आणि 

जंगलांमध्ये , रस्त्यांच्या कडेला फेका . काही ना काही बी तर ,

रुजेलचं ना.आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे.

पर्यावरणाच्या असमतोलाचा फटका शेतकऱ्यांना बसतं आहे.

शेतकरी हवालदिल झाला आहे त्यांच्यामध्ये आत्महत्या वाढल्या आहेत.कुठेतरी वाचनात आलेल्या ओळी हृद्यस्पर्शी आहेत. 



शेतीप्रधान देशा , दे एवढेचं उत्तर...

केव्हा भिजेल अमुची ,डाळीत पूर्ण भाकर...

गावामध्ये सकाळी मी ,ऐकली दवंडी....

अश्रू पिणे शिका हो ,पाणी पूरेल कुठवर.