“ट्रिंग ट्रिंग .. ट्रिंग ट्रिंग “
“मधुरा, डेस्क वरची रिंग कधीची वाजतेय. घे ना फोन. “
“हो हो “ म्हणत एका हाताने सेंड क्लिक करत दुसऱ्या हाताने तिने रिसिव्हर कानाला लावला.
“मधुरा ?”
“कोण बोलताय आपण ?” आवाज फारसा ओळखीचा तर वाटत नाहीये, ती मनाशी पुटपुटली.
“मी, मिलिंद. थोडं बोलायचं होत. स्वाद मध्ये येऊ शकाल का सहा वाजता?”
मिलिंद ?? ओह रविवारी बघायला आलेला. म्हणाव तर साधा म्हणावं तर तरतरीत अस काहीस मधलच व्यक्तिमत्व. तिने आवडलाय कि नाही ह्याचाही विचार केला नव्हता. आई बाबांच्या तगाद्यापोटी तुला हे कार्यक्रम करावे लागत होते.
तस तर आई-वडिलांनी पूर्ण मोकळीक दिलेली. पण अजुनही कोणी कधी क्लिक झाले नाही किंवा त्या दृष्टीने विचार केला नाही म्हणा पण आता तिच्यावर हे वर संशोधन करायचे काम लादल गेल होत. भानावर येत ती म्हणाली,
“का बर ?”
“भेटल्यावर सांगतो. प्लीज नाही म्हणू नको … “
त्याचा आवाज इतका प्रांजळ होता की पटकन तिला नाही म्हणवले नाही.
***
स्वादच्या बाहेरच मिलिंद उभा होता. फिक्कट निळा शर्ट, सडसडीत अंगकाठी, सावळा रंग बहुदा नियमित व्यायाम करत असावा. उगाच तिने डोकं चालवलं.
“दोन चहा “ तिनेच ऑर्डर दिली, “चालेल ना ?”
“हो हो “
“मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचंय. रविवारी आपण भेटलो पण आपल्याला बोलायला जेम तेम अर्धा तास मिळाला. तरीही त्या अर्ध्यातासात मला जे जाणवलं त्यावरून तू थोडी स्पष्टवक्ती, सरळमार्गी , स्वतंत्र विचारांची मुलगी वाटतेस. आणि मनापासून सांगतो मला तू खरंच आवडलीस. “
“मी अजून तितकासा विचार नाही केला पण आतापर्यंत नाही म्हणायला कारणही नाही सापडलंय हे हि खरंच.“ ती मिश्किल हसत म्हणाली.
“तू तुला हवा तेव्हढा वेळ घे. पण तुझ्या कानावर घालायचं होतं. कदाचित माझे वडील गावाहून तुझ्या घरी फोन करतील… “ चहाचा घोट घ्यायच्या निमित्ताने तो मध्येच थांबला.
मधुराला त्याच्या चेहऱ्यावर सांगू कि नको हे प्रश्नचिन्ह अगदी स्पष्ट दिसत होत.
“किती विचार करतोस? सांग काय सांगायचं ते .. “ तिच्या तोंडातून नकळत बाहेर पडल.
चहाच्या वाफेने त्याच्या चष्म्यावर एक अस्पष्ट पडदा चढला. तो पुसायला त्याने चष्मा काढला. त्याचे बोलके डोळे, लांबसडक बोटे…
“हम्म हा अगदीच काही वाईट नाहीये. बोटांवरूनआठवलं की पेटी पण वाजवतो वाटतं? “ मधुराचं मन रविवारच्या भेटीची क्षणचित्रे आठवू लागल.
इकडे मिलिंदचाही धीर एकवटला.
“माझे आई-बाबा, विशेषतः बाबा थोडे जुन्या आणि कर्मठ विचारांचे आहेत. गावाच्या बाहेर स्वतः कधी पडले नाही पण मुलाला शिकवलं. तर त्यांना माझ्या लग्नात तो सगळं खर्च भरून काढायचा आहे. मला हे अजिबात मान्य नाही आणि ह्याची पूर्ण कल्पना आहे की शिकली सवरलेली, कोणतीच स्वाभिमानी मुलगी ह्याला तयार होणार नाही’. पण मग माझे वडील हे सर्व मान्य असणाऱ्या कोणातरी मुलीबरोबर माझं लग्न लावून देतील. मला तर अशा स्वतःची मते नसलेल्या मुलीशी लग्नच नाही करायचे. कल्पना आहे हे सगळं तुझ्या आकलनाच्या पलीकडचं असू शकतं. तुला मी आवडलो असेल तर प्लीज हो म्हण. माझे बाबा काही रक्कम मागतील, किंवा लग्न असं करून द्या तस करून द्या वगैरे म्हणतील. जे ऐकून तुम्ही रागवाल, संतापाल. पण खात्री बाळग मला ह्याची आधीच कल्पना होती म्हणून मी गुपचूप पैसे साठवूंन ठेवलेत. तुम्ही त्यांना हो ला हो करा. त्यांच्या सगळ्या अटी मान्य करा. मी साठवलेले सगळे पैसे त्यासाठी खर्च करेन पण त्यांना हे पैसे मी खर्च करतोय हे सांगू नका. कारण त्यांना समजावणे म्हणजे दगडावर डोके आपटणे आहे. “
एका दमात मिलिंद बोलून मोकळा झाला.
ही संध्याकाळ एक वेगळच वळण घेत होती. एखाद्या चित्रपटाच्या कथेत शोभून दिसेल असे काही प्रत्यक्षात घडत होते. आधी सहजच म्हणून भेटायला तयार झालेली मधुरा मिलिंदच्या त्या प्रांजळ बोलक्या डोळ्यांत, पोट तिडकीने बाबांच्या कर्मठपणा विषयी बोलण्यात , मुख्य म्हणजे धीर एकवटून हे सगळं काहीशा अनोळखी मुलीला सांगण्यात तिला त्याच एक हवंहवंसं रूप दिसायला लागलं.
“पण मग पुढे काय आणि कसं होईल ?” परत तिचं तोंड डोक्याच्या आधी धावलं.
“ आई बाबा गाव सोडून कधी शहरात येत नाहीत त्यामुळे तू काळजी करू नकोस. कधी गावाला गेलो तर माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही.” मिलिंद कळकळीने बोलत होता.
***
दोन महिन्यांनी
एकुलत्या एका लेकाचं लग्न धुमधडाक्यात आपण सांगितल्या प्रमाणे लावून दिल म्हणून खुश असलेले तिचे सासरे, भरगच्चं नोटांनी भरलेलं वरदक्षिणेच पाकीट बघून लाळ टपकत होते.
इकडे लालची सासऱ्याकडे बघत खुदु खुदु हसणाऱ्या मधुराला मिलिंद डोळ्यांनीच गप्प करू बघत होता.
तर मधुराचे आई-बाबा त्यांच्या लाडक्या लेकीचं अजब जावयाबरोबरच गजब लग्न बघत सुखावत होते.
तळटीप- ही गोष्ट एका कानगोष्टी करत ऐकलेल्या खऱ्या गोष्टीवर आधारित आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा