अरेंज मॅरेज १

Article On Arrange Marriage
अरेंज मॅरेज १

लग्न हा सर्वांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा प्रसंग असतो, मग ते अरेंज असो की लव्ह त्यामुळे आयुष्याला एक नवीन दिशा मिळते. 

अरेंज मॅरेज म्हणजे मुलामुलीच्या घरच्यांनी जुळविलेले लग्न. ही प्रथा आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेली आहे. मुलाचे व मुलीचे आईवडील आपल्या मुलांसाठी योग्य जोडीदार शोधतात. घरच्यांच्या उपस्थितीत कांदेपोहे कार्यक्रम होतो. दोन्ही कुटुंबाची सहमती असते.

अलीकडच्या काळात आपल्याकडे लव्ह मॅरेजचे प्रमाण वाढत्या स्वरुपात दिसून येत आहे. लव्ह मॅरेज ही संकल्पना बघायला गेलं तर पाश्चात्य देशांतील आहे. लव्ह मॅरेजमध्ये मुलगा व मुलगी एकमेकांना आधीपासूनच ओळखत असतात. तसं बघितलं तर पाश्चात्य देशांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण जास्त आहे, त्या तुलनेत आपल्याकडे घटस्फोटाचे प्रमाण अत्यल्प आहे.
का?
ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही. अश्या व्यक्ती बरोबर संसार कसा करायचा असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. लव्ह मॅरेज मध्ये एकमेकांना आधीच ओळखत असतो. मित्र मैत्रीण म्हणून ओळखणे वेगळे आणि एक नवरा बायको म्हणून एकमेकांना समजून घेणे वेगळे. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असा प्रकार असतो. अरेंज मॅरेज मध्ये आधी सगळी माहिती काढलेली असते. सहसा नातेवाईकांमध्येच लग्न जुळविली जातात, त्यामुळे सगळा इतिहास माहीत असतो. लव्ह मॅरेज मध्ये संशय जास्त घेतला जातो, तर अरेंज मॅरेज मध्ये विश्वासाचे नाते असते.

लग्न म्हणजे हे फक्त दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबांचे एकत्र येणे असते. लग्न झाल्यावर अनेक नवीन नाती तयार होतात. लव्ह मॅरेजला सहजासहजी मुला मुलीच्या घरुन परवानगी मिळत नाही, मिळाली तरी ती फक्त मुला मुलीच्या इच्छेखातर असते, त्यात त्यांचे कुटुंबीय मनातून नाराज असतात. ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्या आई वडिलांना दुःखी करुन कोणीच पूर्णपणे सुखी होऊ शकत नाही.

अरेंज मॅरेज घरचे वयस्कर मंडळी ठरवतात, त्यामुळे जुळवून घेतांना त्यांचा धाक, त्यांची पत, त्यांचा मान, त्यांचे संस्कार हे मनात खोल रुजलेले असतात. प्रेमविवाहात हे नसतं, त्यामुळे जरा काही बिनसलं की, तू तुझं मी माझं होतं.

अरेंज मॅरेजमध्ये आपल्या मुलांसाठी जोडीदार शोधताना त्याचे शिक्षण, स्वभाव, नोकरी, कुटुंब या सगळ्या गोष्टी बघून निर्णय घेतात. आपली मुलगी उरलेलं आयुष्य त्या घरात, त्या मुलासोबत आनंदात राहू शकते का? ह्या सर्वाचा सारासार विचार करुनच मुलीचे वडील लग्न जमवतात. एखादी मुलगी आपल्या घरात राहून आपले संस्कार जपू शकते का? किंवा ती आपलं घर सांभाळू शकते का? ह्याचा विचार करुन मुलाचे वडील लग्न जमवतात.

 लग्न टिकण्यासाठी प्रेम आवश्यक असतेच पण त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी बघणे सुद्धा आवश्यक असते. लग्न टिकण्यासाठी जर फक्त प्रेम आवश्यक असते तर मग लव्ह मॅरेज झालेल्या नवरा बायकोमध्ये कधीच भांडणे झाली नसती, त्यांचा कधीच घटस्फोट झाला नसता.

नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेमासोबतचं जोडीदाराबद्दल आपल्या मनात आदर, विश्वास आवश्यक असतो. नवरा बायकोचं हे नातं विश्वासावर टिकून असते. जर त्या नात्यात विश्वास नसला तर मग ते लव्ह असो की अरेंज ते टिकणार नाही.

नात्याची खरी मजा ही ते नाते उलगडण्यात असते. लव्ह मॅरेजमध्ये मुलगा व मुलगी एकमेकांना आधीपासूनच ओळखत असतात, त्यामुळे त्यांच्यात एकमेकांबद्दल फारसा आदर नसतो,त्यांना एकमेकांना जाणून घेण्याची आवश्यकता नसते, पण याउलट अरेंज मॅरेजमध्ये मुलगा व मुलगी एकमेकांना अनोळखी असतात, त्यामुळे ते एकमेकांना जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात आणि हीच त्या नात्याची खरी मजा असते. 

लग्नाचे दुसरे नाव म्हणजे तडजोड. तडजोड केल्याशिवाय हे नाते टिकू शकत नाही. अरेंज मॅरेजमध्ये दोघांनाही आपल्याला आपल्या जोडीदारासोबत जुळवून घेताना तडजोड करावी लागणार आहे, हे पहिल्यापासून माहीत असते, त्यामुळे त्यांना तडजोड करताना फार काही वाटत नाही. तर याउलट लव्ह मॅरेजमध्ये जेव्हा मुलगा व मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेव्हा त्यांच्यावर फारश्या जबाबदाऱ्या नसतात, त्यामुळे ते एकमेकांना जास्त महत्त्व देतात, पण लग्न झाल्यावर इतर नाती निभावताना ते एकमेकांना पहिल्यासारखे महत्त्व देऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. परिणामी ते नातं फारकाळ टिकत नाही.

जे लोक म्हणतात की, अरेंज मॅरेजमध्ये सगळेजण सुखी नसतात, तर मग आपले आजी आजोबा, आईवडील, काका काकू यांची उदाहरणे बघितल्यावर ते सुखी आहेत की नाही? हे लक्षात येईल. मॅरेज काऊनसेलिंग हे अलीकडच्या काळात विकसित झाले आहे. पहिल्या काळात मॅरेज काऊनसेलिंग हा प्रकार काय असतो? हेही कोणाला ठाऊक नव्हते.

थोडक्यात काय तर लव्ह मॅरेज म्हणजे फक्त्त स्वतःचा विचार करुन केलेलं लग्न आणि अरेंज मॅरेज म्हणजे आपल्यासोबतच आपल्या कुटुंबाचा विचार करुन केलेलं लग्न.

फक्त्त आपलं सुख बघायचं आणि ज्यांनी आपल्यासाठी स्वप्न बघितले त्यांना मातीमोल समजायचं हे पटतंय कां तुम्हीच बघा.

©®Dr Supriya Dighe
टीम: अहमदनगर