अरेंज कम लव्ह मॅरेज भाग १६
मागील भागाचा सारांश: अभिराज व ऋतुजा या दोघांमध्ये चॅटिंग झालं. ऋतुजाच्या मनात गैरसमज रहायला नको, म्हणून अभिराजने तिला मॅसेज केला होता. रश्मी शिवमसाठी खूपच बदलत असल्याने ऋतुजाने तिला चार गोष्टी समजावून सांगितल्या. रणजीत अभिराजला भेटला होता.
आता बघूया पुढे….
रणजीत अभिराजला भेटून आल्यावर घरी आला. ऋतुजा व तिचे आई बाबा रणजीतची वाट बघत होते. रणजीत घरात आल्यावर ऋतुजा, आई व बाबा त्याच्याकडे आशेने बघत होते.
"रणजीत अभिराज काळे कसा वाटला?" बाबांनी विचारले.
"बाबा अभिराज मुलगा मस्त आहे. सर्वसाधारण घरातून असल्याने त्याला परिस्थितीची जाण आहे. कष्ट करण्याची त्याच्यात दानत आहे. घरात मोठा असल्याने सर्व घराची जबाबदारी त्याच्यावर आहेच, पण तो त्या योग्यतेचाही आहे. आयुष्यात कोणतीही परिस्थिती समोर आल्यावर तो त्या परिस्थिती विरोधात लढू शकेल. अभिराज उपाशी कधीचं राहणार नाही. एका मुलात जे कर्तृत्व आवश्यक असते, ते त्याच्यात आहे. बाबा तो त्याच्या फॅमिलीवर खूप प्रेम करतो म्हणजेच त्याला माणसांची आणि नात्यांची किंमत आहे. आपल्या ऋतूला तो सुखात ठेवेल.
ऋतूसाठी आपण जसा मुलगा शोधत होतो, त्या सर्व क्वालिटीज ह्याच्यात आहे. आपण दोघे ज्या पद्धतीने घरातील स्त्रियांसोबत वागतो, त्यांना जो आदर देतो, अगदी तसाच आदर अभिराजच्या मनात आहे. अभिराजचा प्रॉब्लेम एकच आहे की, तो खूप जास्त बोलतो. एकदा बोलायला लागला की, तो थांबतचं नाही." रणजीतने सांगितले.
"आता पुढे काय करायचं?" आईने विचारले.
रणजीत म्हणाला,
"अभिराज व त्याच्या फॅमिलीला आपल्या घरी बोलावून घेऊयात. आपण सगळे एकमेकांना भेटुयात, मग फायनल निर्णय घेऊयात. शेवटी त्यांचा निर्णय काय असेल? हेही बघावं लागेल. बाबा तुमचं यावर काय म्हणणं आहे?"
यावर बाबा म्हणाले,
"रणजीत तुझं म्हणणं मलाही पटतंय. तू अभिराजला त्याच्या फॅमिलीला घेऊन आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दे. त्यांना ऋतू पसंत पडली की, मग एकदा आपण त्यांच्या घरी सुरतला जाऊन सगळी खातरजमा करुन घेऊयात. आपल्याला सगळं योग्य वाटल्यावर निर्णय घेऊयात."
रणजीतने अभिराजला फोन करुन त्याला व त्याच्या फॅमिलीला घरी येण्याचे आमंत्रण दिले.
------------------------------------------------------
रणजीतने फोन करुन घरी येण्याचे आमंत्रण मिळाल्याने अभिराज थोडा सुखावला होता. अभिराजने घरी फोन करुन आई बाबांना ही बातमी सांगितली. अभिराजच्या लग्नाचं आता काहीतरी होईल या आशेने त्याचे आई बाबा पण खुश झाले होते. अभिराजने त्याचं सामान नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट केलं. घरात लागणाऱ्या थोड्याफार वस्तूंची खरेदी अभिराजने केली. प्रतिकने अडवून सुद्धा अभिराज त्याच्याकडे राहिला नाही.
पंकज येईपर्यंत अभिराज फ्लॅटमध्ये एकटाच राहणार होता. ऋतुजाच्या घरुन पुढील पाऊल उचलल्या गेल्यामुळे अभिराजच्या डोक्यात ऋतुजा बद्दल विचार सुरु झाले होते. अभिराजला अनेकदा वाटलं की, ऋतुजाला मॅसेज करुन तिच्यासोबत बोलावं, पण तिला हे आवडेल की नाही? हा विचार करुन अभिराजने ऋतुजाला मॅसेज करणे टाळले.
आठ ते दहा दिवसांनी अभिराजचे आई बाबा आणि पंकज सुरतवरुन पुण्यात येणार होते, मग ते सर्वजण ऋतुजाच्या घरी जाणार, असे ठरले होते. अभिराजने तसं रणजीतला फोन करुन कळवले होते.
------------------------------------------------------
एके दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे ऋतुजा ऑफिस सुटल्यावर पार्किंगमध्ये गाडी घेण्यासाठी गेली. रश्मी त्या दिवशी ऑफिसला आलेली नव्हती, त्यामुळे ऋतुजा एकटीच होती. गाडीजवळ जाऊन ऋतुजाने डिक्कीतून हेल्मेट काढले आणि पर्स डिक्कीत ठेवली. ऋतुजा तोंडाला स्कार्फ बांधत असताना अभिराज तिथे येऊन म्हणाला,
"हाय."
ऋतुजा अभिराजकडे प्रश्नार्थक नजरेने बघत म्हणाली,
"तुम्ही आणि इथे?"
"माझा मित्र इथेच जॉबला आहे, त्याच्याकडे थोडं काम होतं. तुम्हाला पार्किंगमध्ये येताना बघितलं, म्हणून बोलायला आलो." अभिराजने सांगितले.
ऋतुजा म्हणाली,
"अच्छा.आज तुम्ही सुट्टी घेतली होती का?"
"नाही. हाफ डे घेतला होता. आज तुमची मैत्रीण सोबत दिसत नाहीये. काय बरं नाव तिचं?" अभिराज.
"तिचं नाव रश्मी आहे. ती आज लवकर गेली." ऋतुजाने उत्तर दिले.
अभिराजला ऋतुजा सोबत पुढे काय बोलावं? हे कळत नव्हतं, म्हणून त्याने फक्त स्माईल दिली. ऋतुजाला पण काय बोलावं? हे न कळल्याने ती म्हणाली,
"चला मी निघते. घरी जायला उशीर होईल."
अभिराज थोडी हिम्मत करुन म्हणाला,
"तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल, तर आपण कॉफी घेऊयात का? घरी जायला थोडा उशीर झाला तर चालेल का?"
ऋतुजा विचार करुन म्हणाली,
"ओके चालेल. इकडून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला कॉफी शॉप आहे. आपण तिकडे जाऊ शकतो."
ऋतुजाने कॉफी प्यायला होकार दिल्याने अभिराजच्या मनात आनंदाने उकळ्या फुटल्या होत्या. ऋतुजा व अभिराज आपापल्या गाड्या घेऊन कॉफी शॉपच्या दिशेने गेले. कॉफी शॉपमध्ये जाऊन अभिराजने ऋतुजाला विचारुन कॉफीची ऑर्डर दिली.
"तुम्ही इकडे नेहमीच येतात का?" अभिराजने विचारले.
"नाही. मला कॉफी एवढी आवडत नाही. मी चहाप्रेमी आहे. रश्मी सोबत एक दोनदा आली आहे." ऋतुजाने उत्तर दिले.
अभिराज म्हणाला,
"आधी सांगितलं असतं तर आपण चहा प्यायला गेलो असतो. मी अजिबात चहाप्रेमी नाहीये. हवंतर आपण कॉफी पिऊन मग चहा प्यायला जाऊयात."
यावर ऋतुजा म्हणाली,
"नाही ठीक आहे. मी कॉफी पिते, पण मला चहा जास्त आवडतो."
पुढील पाच मिनिटे शांततेत गेली. दोघांनाही खूप बोलायचे होते, पण सुचत नव्हते. शेवटी अभिराजने पुढाकार घेण्याचे ठरवले.
"मला तुम्हाला काही विचारायचं आहे. इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा डायरेक्ट मुद्द्यावर बोललो तर चालेल ना?" अभिराजने विचारले.
"हो विचारा ना." ऋतुजाने उत्तर दिले.
अभिराज म्हणाला,
"तुमच्या दादाचा मला फोन आला होता. चार ते पाच दिवसांनी मी आई बाबांसोबत तुमच्या घरी येणार आहे. आपल्यात बेसिक बोलणं त्या दिवशी झालं होतं. आई बाबा तुम्हाला पसंत करतील, याची मला खात्री आहे. मलातर तुम्ही पहिल्या नजरेतचं आवडल्या होत्या. आता तुम्हाला मी आवडलो का? ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्या कडून पाहिजे आहे. लग्न आपल्याला करायचं आहे. आपल्या घरच्यांचे मत आपण ग्राह्य धरणार आहोच, पण आपलं मत ह्यात सर्वांत महत्त्वाचं आहे."
ऋतुजा स्माईल देऊन म्हणाली,
"तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणे माझ्यासाठी इतकं सोपं नाहीये. माझा दादा तुम्हाला भेटला आहे, पण माझ्या बाबांची आणि तुमची अजून भेट झाली नाहीये. मला तुमच्या बद्दल काय वाटतं? हे मी दादा व बाबांना सांगितल्यावर दादाने तुमची भेट घेतली. मला तुम्ही आवडला आहातचं, पण बाबांनाही तुम्ही आवडला पाहिजेत. लग्न जरी आपल्या दोघांचं होणार असलं तरी आपली दोन कुटुंब त्यामुळे एकत्र येणार आहेत. एका लग्नाबरोबर अनेक नाती जोडली जातात. आपल्याला त्या नात्यांचा विचार करावा लागतो ना."
"हो, अगदी बरोबर. आता तुमच्या बाबांना इम्प्रेस करावे लागेल. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर विचारु शकता. योगायोगाने आपली भेट झाली आहेच, तर मनातल्या शंका काढू शकतात." अभिराज म्हणाला.
"तुम्हाला काही व्यसनं आहेत का? स्मोकिंग, ड्रिंकिंग यातील काही?" ऋतुजाने विचारले.
अभिराज हसून म्हणाला,
"अरे बापरे, माझ्या बद्दल तुमच्या मनात ही शंका आहे तर. स्मोकिंग, ड्रिंकिंग यातील मी काहीच केलं नाहीये आणि करणार पण नाही. माझ्या मनाला हे पटतचं नाही. मी बारावीत असताना आमच्या शेजारी राहणारे एक काका एक्सपायर झाले होते, त्यांना ही दोन्ही व्यसनं होती, त्यांचं फुफ्फुस निकामी झाले होते. काकांची मुलं खूप छोटी होती. ते गेल्यानंतर त्या घराची झालेली दुर्दशा बघवत नव्हती. कॉलेजमध्ये मित्र फोर्स करायचे, पण काकांच्या घरच्यांची झालेली दुर्दशा डोळ्यासमोर आली की इच्छा व्हायची नाही.
आई बाबांचा दम असायचा की, कधी काही व्यसन केलं तर पुन्हा घरी यायचं नाही. आमचे बाबा निर्व्यसनी आहेत. आपल्यामुळे आई बाबांना काही दुःख होऊ नये, ही इच्छा असल्याने कधी व्यसनांकडे वळलोच नाही. जरा जास्तच प्रस्तावना दिली का?"
यावर ऋतुजा म्हणाली,
"तुम्ही दिलेली प्रस्तावना मला आवडली. चला आता निघूयात का? घरी जायला उशीर झाल्यावर तुम्ही भेटला होतात, हे मी आईला सांगू शकणार नाही. मला काही शंका वाटलीचं तर मी मॅसेज करेल."
"हो चालेल. आपली ही भेट सिक्रेट ठेऊयात. तुम्हाला इन जनरल मॅसेज केला तर चालेल का?" अभिराजने विचारले.
ऋतुजा स्माईल देऊन म्हणाली,
"हो चालेल. मला जास्त चॅटिंग करण्याची सवय नसल्याने मी थोडक्यात उत्तर देत असते, सो तुम्ही याबद्दल गैरसमज करुन घेऊ नका."
अभिराजने कॉफीचे बिल दिले. दोघेही आपापल्या गाडीवर बसून घराच्या दिशेला निघून गेले.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा