Login

अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ५१

Story After Marriage
अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ५१

मागील भागाचा सारांश: ऋतुजाने आरतीला राघव बद्दल व पंकजला निशाबद्दल विचारणा केली. अभिराजने राघवला भेटायला बोलवण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच त्याने दोघानाही सांगितले की, तुमचं जर काही सुरू असेल तर आधी सांगायचं.

आता बघूया पुढे….

दररोजच्या रुटीन प्रमाणे ऋतुजा सकाळी तिचं आवरत होती.

“ऋतू, आज संध्याकाळी आपण इंटेरिअर डेकोरेटर कडे जाऊयात.” अभिराज म्हणाला.

“मी कॅबने तिकडे येईल, तू मला घ्यायला येऊ नको म्हणजे जास्त टाईमपास होणार नाही.” ऋतुजा.

“हो, चालेल.” अभिराज.

आपलं आवरून ऋतुजा व अभिराज आपापल्या दिशेने निघून गेले. निशा तिच्या स्टॉपवर उभी असल्याने ऋतुजाने कॅब थांबवून तिला बसण्यास सांगितले.

“काल तू पंकज भाऊजींवर जास्तच रागावली होती वाटत. बिचारे जेवले पण नाहीत.” ऋतुजा मुद्दाम म्हणाली.

“मी त्याच्यावर कशाला रागवू. मला गोष्टी लपवलेल्या आवडत नाहीत.” निशा.

“तुमच्यात अजून नॉर्मल बोलणं झालं नाही का?” ऋतुजा.

“काल रात्री त्याचा मॅसेज आला होता. आज संध्याकाळी भेट म्हणालाय, मग बघू.” निशा.

“निशा, मला एक खर सांग, तुमच्या दोघांमध्ये फक्त मैत्री आहे का?” ऋतुजाने डायरेक्ट प्रश्न विचारला.

“मॅडम, मी इमोशनल असले तरी प्रॅक्टिकल सुद्धा तेवढीच आहे. आमच्या दोघांमध्ये सध्या फक्त मैत्री आहे. पंकज आणि मी आम्ही दोघेही अलीकडे नोकरीला लागलो आहोत. पुण्यात रहायचं म्हटल्यावर दोघांची नोकरी शाश्वत पाहिजे. थोडीफार गाठीला सेव्हिंग पाहिजे. या जगात जगायचं असेल तर पैसे लागतातच.

प्रेम आहे म्हणून संसार टिकत नाही. मी काही बाबतीत खूप प्रॅक्टिकल आहे. आपण दोघी एका कंपनीत जॉब करतो आणि आपल्यात गैरसमज निर्माण व्हायला नको म्हणून मला पंकजचा राग आला होता.” निशाने उत्तर दिले.

“मला तुझा सडेतोड पणा आवडला. मैत्री व प्रेम याबाबत तुझे हे विचार आहेत, ते असेच ठेव. कोणासाठीच विचार बदलू नकोस. काही मुली मागचा पुढचा विचार न करता लग्न करून मोकळ्या होतात आणि मग पुढे जाऊन पश्चाताप करण्याची वेळ येते.” ऋतुजा.

“मॅडम, माझ्या एका जवळच्या मैत्रिणीच आयुष्य उध्वस्त होताना मी बघितलं आहे. मी कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही.” निशा व ऋतुजा बोलत असतानाच कॅब कंपनीच्या गेटजवळ येऊन थांबली.

निशा व ऋतुजा आपापल्या डेस्कच्या दिशेने निघून गेल्या. रश्मीचा नोटीस पिरियड असल्याने तिला कामाचा लोड नव्हता, पण ऋतुजाला भरपूर काम होते, त्यामुळे दोघीजणी मध्ये जास्त गप्पा होत नव्हत्या.

लंच ब्रेकमध्ये दोघीजणी जेवण करत होत्या.

“आज निशा काही आली नाही.” रश्मी.

“तिला काम असेल. सकाळी आम्ही सोबतच कॅबमध्ये आलो, तर आमचं जे बोलणं व्हायचं ते आधीच झालंय, सो ती आपल्या सोबत जेवायला न येण्याचं कारण ते नाहीये.” ऋतुजा.

“ऋतू, या विकेंडला विक्रम पुण्याला येणार आहेत. आम्ही शॉपिंगसाठी भेटणार आहोत, तर तुम्ही दोघे आणि आम्ही दोघे असा डिनर प्लॅन करूयात का? डीनरच्या निमित्ताने अभिराज व विक्रमची एकमेकांसोबत ओळख होऊन जाईल.” रश्मी.

“कल्पना छान आहे, पण एकदा अभी सोबत बोलून घेते आणि मग तुला कन्फर्म सांगते.” ऋतुजा.

“ऋतू, मला एक गोष्ट तुझ्यासोबत शेअर करायची आहे.” रश्मी.

“बोल ना.” ऋतुजा.

“विक्रम सतत त्याच्या घरच्यांबद्दल तक्रारी करत असतो म्हणजे आज आई हे बोलली, बाबा ते बोलले. त्यांचा घरातील कोणासोबतच स्पेशल असा बॉण्ड नाहीये.” रश्मी.

“मग तुला नेमकं यातून म्हणायचं काय आहे?” ऋतुजा.

“लग्न झाल्यावर माझ्यासोबत त्यांचं असच रिलेशन तयार झालं तर….” रश्मी.

“एकतर हे अस काही होईल हे आधी डोक्यातून काढून टाक. आता सध्या अभीलाही त्याच्या घरातील कोणाचेच विचार पटत नाहीयेत, पण माझं सगळं त्यांना पटत आहे.

मी तुला मागे जो सल्ला दिला होता, तोच आज पुन्हा देईल. विक्रमचे त्यांच्या घरातील लोकांसोबत जे रिलेशन असतील ते असतील. तू त्यांच्याशी तुझ्या पद्धतीने नातं जप.

नवरा आणि सासरचे लोकं कधी कसे वागतील हे आपल्याला सांगता येत नाही. आपण या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून आपलं सरळ रेषेत आयुष्य जगायचं. आपण ह्यांचा विचार करून उगाच स्वतःला त्रास करून घेतो.” ऋतुजा.

“तुझं म्हणणं मला पटलं.” रश्मी.

“चला मॅडम, माझं बरच काम पेंडिंग आहे. आज संध्याकाळी इंटेरिअर वाल्याकडे जायचं आहे. वेळेत कंपनीतून निघावं लागेल.” ऋतुजा कॅन्टीन मधून निघून गेली.

रश्मी तिथेच जरावेळ मोबाईल मध्ये टाईमपास करत बसली होती.

संध्याकाळी कंपनीतून बाहेर पडत असताना रिसेप्शन एरियात निशा व ऋतुजाची भेट झाली. गेटजवळ जाईपर्यंत दोघीजणी सोबत चालत होत्या.

“निशा, आज जेवायला आली नाहीस.” ऋतुजा.

“आज कामाचा लोड खूप होता. डिपार्टमेंटलाच दोन दोन घास खाऊन घेतले. टारगेट आज संध्याकाळ पर्यंत पूर्ण करून द्यायच होत.” निशाने सांगितले.

“ओके.” ऋतुजा.

“मी ह्याच एरियात घर शोधत आहे. आता जिथे राहतेय तो एरिया येण्या जाण्यास लांब पडतो. जवळपास रहायला असेल तर बरं पडेल. आपल्या कंपनीतील एकजण पीजीमध्ये राहतेय. तिच्या इथे बघून येते. जमलं तर लगेच शिफ्ट होऊन जाईल.” निशा.

“कंपनी पासून जवळ राहणं कधीही बेटर ठरेल.” ऋतुजा.

“मी तिचीच वाट बघते आहे. इथून वॉकिंग डिस्टन्स वर आहे असं ती बोलत होती.” निशा.

“ओके. माझी कॅब आली आहे, मी जाते.” ऋतुजा कॅबमध्ये बसून निघून गेली.