अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ५०
मागील भागाचा सारांश: ऋतुजाला आरती एका मुलासोबत दिसली, ऋतुजाने तिला फोन लावला, पण तिने फोन कट केला. अभिराज त्याच्या आईच्या मैत्रिणीकडे वंदना आत्याकडे गेला होता. वंदना आत्त्या त्याच्या आईशी बोलली, तिने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
आता बघूया पुढे….
ऋतुजाचा स्वयंपाक बनवून झाला होता. आरती तिच्या रूममध्ये होती, तर पंकज हॉलमध्ये मोबाईल वर टाईमपास करत बसलेला होता. ऋतुजा जेवण करण्यासाठी अभिराजची वाट बघत होती.
काही वेळात अभिराज घरी आला. अभिराज दरवाजात असतानाच ऋतुजा म्हणाली,
“अभी, तू तरी जेवण करणार आहेस की बाहेरून काही खाऊन आला आहेस?”
“मी बाहेरून खाऊन आलो असतो, तर तुला आधी सांगितलं असत.” अभिराज घरात येऊन म्हणाला.
“तू फ्रेश होऊन ये. मी आपल्या दोघांना जेवायला घेते.” ऋतुजा.
अभिराज रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आला.
“या दोघांना जेवण करायचं नाहीये का?” अभिराजने विचारले.
“पंकज दादांना भूक नाहीये आणि आरती ताईंना थोडीच भूक आहे. बर या दोघांनी मला इंफॉर्म केलं नाही, मी त्यांच्या वाटेचा स्वयंपाक बनवून ठेवला आहे. उद्यापासून जेव्हा हे फोन करून जेवण करणार असल्याचे कळवणार नाही, तोपर्यंत मी या दोघांचा स्वयंपाक करणार नाही.” ऋतुजा.
“पंकज, थोडं खाऊन घे ना.” अभिराज.
“दादा, इच्छा नाहीये.” पंकज.
“तुझी तब्येत बरी नाहीये का? चेहऱ्यावरून उदास वाटतो आहेस.” अभिराज.
“मी बरा आहे.” पंकज.
अभिराजने आरतीला आवाज दिला. आरती रुम मधून बाहेर आली.
“आरती, जेवण करणार नाहीस का?”
“दादा, मी बाहेरुन खाऊन आली आहे.” आरतीने उत्तर दिले.
“अग मग आधी तसं कळवायला हवं ना.” अभिराज.
“गडबडीत राहून गेलं.” आरती.
“मी त्यांना फोन केले होते, पण त्यांनी कट केले.” ऋतुजा.
“बरं ते जाऊदेत आधी आपण जेवण करूयात.” अभिराज.
अभिराज व ऋतुजा जेवण करत होते. आरती व पंकज बाजूलाच बसलेले होते.
“दादा, ते सांगायचं राहून गेलं. काही वेळेपूर्वी आईचा फोन केला होता. ती पुढच्या आठवड्यात येणार आहे.” आरती म्हणाली.
“चांगलं आहे.” अभिराज.
अभिराजने ऋतुजाकडे बघितले, पण तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
“दादा, आई आल्यावर आपण जवळपास कुठेतरी बाहेर फिरायला जाऊयात. आईला तेवढंच बर वाटेल.” पंकज म्हणाला.
“आई आल्यावर ठरवू.” अभिराजने आत्ताही ऋतुजाकडे बघितले, पण ती शांतपणे जेवण करत होती.
आरती उठून तिच्या रूममध्ये जात असताना ऋतुजा म्हणाली,
“आरती ताई, आमचं जेवण झाल्यावर मला तुमच्या सोबत थोडं बोलायचं आहे.”
आरती पुन्हा आपल्या जागेवर बसली. जेवण झाल्यावर ऋतुजा व अभिराजने मिळून सगळी भांडी किचनमध्ये नेऊन ठेवली. भांडी घासून व ओटा स्वच्छ झाल्यावर ती व अभिराज हॉलमध्ये आले. आरती त्यांची वाट बघत हॉलमध्ये बसून होती.
“ऋतू, बोल ना. काय म्हणतेस?”आरतीने विचारले.
“आपल्या घरात पारदर्शकता नाहीये.” ऋतुजा.
“म्हणजे, मला कळलं नाही.” आरती.
“मी तुम्हाला जेव्हा फोन केला, तेव्हा तुम्ही तीन वेळा कट केला. त्यावेळी तुम्ही कुठे बिजी होता?” ऋतुजा.
“मी नेटवर्क मद्धे नसल्याने फोन कट होत होता.” आरती.
“मग नंतर तुम्ही फोन का केला नाही?” ऋतुजा.
“मी केला होता, पण फोन लागला नाही. ऋतू, तू छोटयाशा गोष्टीचा बाऊ करत आहेस.” आरती.
“आरती ताई, तुम्ही एकतर धडधडीत खोटं बोलत आहात आणि वरून म्हणत आहेत की, मी छोटयाशा गोष्टीचा बाऊ करत आहे म्हणून.” ऋतुजा.
“ऋतू, एक मिनिट तुला जे बोलायचं असेल ते स्पष्ट बोल म्हणजे मलाही कळेल.” अभिराज.
“मी आज कंपनीतून येत असताना मला आरती ताई एका मुलासोबत स्नॅक्स सेंटरच्या बाहेर दिसल्या. याआधीही मी त्यांना त्या मुलासोबत बघितलं होत. आज मी कॅब थांबवून फोन केला होता. मला वाटलं होतं की, ह्यांना घरी यायचं असेल तर आपण सोबत जाऊ शकतो.
पण ह्यांनी सतत फोन कट केला. मी माझ्या डोळ्यानी बघितलं. तरीही ह्या खोटं बोलत आहेत. आपण एकाच घरातील सदस्य आहोत, जर असच सगळेजण खोटं बोलत राहिले, तर आपल घर कस टिकेल.” ऋतुजा.
“आरती, मी पण तुला एका मुलासोबत बघितलं होत. कोण आहे तो? आणि तू खोटं का बोललीस?” अभिराजने विचारले.
“दादा, त्याच नाव राघव आहे.” आरतीने राघव बद्दल सगळं काही सांगितलं.
“त्याच्या व तुझ्यात काही आहे का? म्हणजे मैत्री पलीकडे काही आहे का?” अभिराज.
“अजूनतरी नाहीये, पण मला त्याच्या सोबत बोलून छान वाटत.” आरती.
“एखाद्या दिवशी त्याला घरी घेऊन ये. तो मुलगा कोण आणि कसा आहे हे आम्हालाही कळायला हवं. तू पुन्हा एखाद्या चुकीच्या व्यक्तिमध्ये अडकू नये असं मला वाटत.” अभिराज.
“चालेल, एखाद्या दिवशी मी त्याला घेऊन घरी येईल.” आरती.
“पुन्हा खोट बोलू नकोस.” अभिराज.
आरतीने होकारार्थी मान हलवली.
“पंकज दादा, आता तुम्ही स्वतःहून काही सांगणार आहात का?” ऋतुजाने पंकज कडे बघितले.
“आता मी काय केलंय?” पंकज.
“निशा कोण आहे?” ऋतुजा.
“कोण निशा?” पंकज.
“मी तुम्हाला तिच्यासोबत बस स्टॉपवर बघितलं होत. ती माझ्याच कंपनीत आहे आणि हे तुम्ही तिला सांगितलं नाही, म्हणून ती तुमच्यावर नाराज आहे. ती नाराज असल्याने तुम्हाला जेवण करण्याची इच्छा राहिली नाहीये.” ऋतुजा.
“निशा, माझी फक्त मैत्रीण आहे. तुम्ही दोघी एकाच कंपनीत जॉब करतात हे मला तिला सांगणे गरजेचे वाटले नाही, त्यामागे काहीही एक कारण नाहीये. आता ती त्या कारणावरून रागावली आहे हे मला समजलच नव्हतं.” पंकज.
“आरती, पंकज, आज तुम्हा दोघाना मी एकच गोष्ट सांगतोय. तुमचे फ्रेंड्स कोण आणि तुम्ही कुठे फिरतात हे मला माहित असायला हवं. उगाच लपवाछपवी करू नका.” अभिराज.
पंकज व आरतीने मान हलवून होकार दिला.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा