Login

अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ४९

Story After Marriage
अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ४९

मागील भागाचा सारांश: पंकजने ऋतुजा निशाच्या कंपनीत जॉबला असल्याचे निशाला न सांगितल्याने ती हर्ट झालेली होती. रश्मी कंपनी सोडणार असल्याने तिच्या सोबत फेअरवेल पार्टी करण्याची इच्छा निशाने वर्तवली. अर्पिताने ऋतुजाची भेट घेऊन दोघींमध्ये झालेले गैरसमज मिटवले.

आता बघूया पुढे….

ऋतुजा नेहमीप्रमाणे कॅब मधून घरी चालली होती. सिग्नलच्या इथे कॅब थांबलेली असताना तिला आरती पुन्हा त्याच मुलासोबत नजरेस पडली. ते दोघेजण एका स्नॅक सेंटरच्या बाहेर थांबून वडापाव खात होते.

ऋतुजाने ड्रायव्हरला कॅब स्नॅक सेंटरच्या समोर नेऊन थांबवायला सांगितली. तिने आरतीला फोन लावला. आरतीने मोबाईल बघून फोन कट केला. ऋतुजाला आरतीची प्रत्येक कृती दिसत होती. ऋतुजाने दोन ते तीन वेळेस पुन्हा ट्राय केला, पण आरतीने एकदाही फोन उचलला नाही.

ऋतुजा कॅबने सरळ घरी गेली. ऋतुजाने ठरवलं होतं की, अभिराज घरी आला की, पंकज व आरतीला सगळं खरं विचारायचं. ऋतुजा घरी गेल्यावर पंकज अजून आलेला नव्हता.

फ्रेश होऊन ऋतुजा स्वयंपाक करायला लागली. अर्धा स्वयंपाक होत आलेला असताना पंकज घरी आला होता.

“वहिनी, आज मला जेवायचं नाहीये.” पंकज घरात आल्या आल्या म्हणाला.

“हे घरी येण्याआधी कळवता येत नाही का?” ऋतुजा थोडी रागातच म्हणाली.

“मी बाहेर काही खाल्लं नाहीये, पण आज जेवायचा मूड नाहीये.” पंकज.

पंकजचा चेहरा उदास दिसल्याने ऋतुजा त्याला पुढे काहीच बोलली नाही.

“आरती ताई, घरी केव्हा येणार आहेत?” ऋतुजाने विषय बदलला.

“माहीत नाही. मला वाटलं एव्हाना ती घरी आली असेल.” पंकज.

“मी त्यांना फोन केला होता, पण त्यांनी फोन कट केला आणि शिवाय पुन्हा कॉल बॅक केला नाही.” ऋतुजा अस बोलल्यावर पंकजने आरतीला फोन केला.

आरतीने फोन उचलून पाच मिनिटात घरी येईल असे सांगितले. ती बोलल्या प्रमाणे लगेच घरी आली.

“ऋतू, तू स्वयंपाक केलास पण..” आरती किचनमध्ये येऊन म्हणाली.

“तुम्हालाही जेवायचं नाहीये का?” ऋतुजाने तिच्याकडे अस बघितलं की आरतीला पुढे काही बोलताच आलं नाही.

“जास्त नाही पण थोडं खाईल.” आरती बोलून फ्रेश होण्यासाठी रूममध्ये निघून गेली.
—---------------------------------------------------

कंपनीतून निघून अभिराज एका बिल्डिंग जवळ जाऊन उभा राहिला. गाडी पार्क करून त्याने एका फ्लॅटचा दरवाजा वाजवला. दरवाजा उघडला गेला. अभिराजने स्माईल देऊन घरात प्रवेश केला.

“अभी, आज इकडची वाट कशी चुकलास. बायकोला घेऊन ये बोलले होते, तर एकटाच आला आहेस.”

“आत्त्या, आज मला तुझ्याशी ज्या विषयावर बोलायचं आहे, त्यात बायकोला सोबत घेऊन येऊ शकतच नव्हतो. तिच्यासमोर बोलता आलं नसत.” अभिराज.

“बस, मी तुझ्यासाठी चहा टाकते.” आत्त्या किचनकडे निघून गेली.

अभिराज त्याच्या वंदना आत्याकडे गेला होता. आता तो तिकडे का गेला? हे आपल्याला पुढे कळेलच.

आत्त्या चहाचे दोन कप घेऊन अभिराज जवळ येऊन बसली.

“बोल, आज कशासाठी आला आहेस?” अभिराजच्या हातात चहाचा कप देत आत्त्याने विचारले.

गेल्या काही दिवसांत आई जे काही वागत होती, त्याबद्दल अभिराजने आत्त्याला सांगितले.

“आत्त्या, आई अशी वागत राहिली तर मी तरी काय स्टॅण्ड घ्यावा. ऋतू घरात नवीन आली आहे, तिच्यासमोर आई अस वागून स्वतःची चव घालवून घेत आहे. तिच्या मनातून आई उतरल्यावर मग काय करायचं? मला काहीच कळत नाहीये.”

“तुझ्या बोलण्यावरून मला एकच जाणवलं आहे की, संगीताचे वर्तन चुकीचेच आहे. आता ती अस का वागत आहे हे तिच्याशी बोलल्यावरच कळेल. मी एका वेगळ्या इव्हेंट मध्ये बिजी असल्याने माझा आणि तिचा बऱ्याच दिवसांपासून फोन झाला नाहीये.” आत्त्याने सांगितले.

“तुम्ही दोघी मैत्रिणी आहात, मग विचार केला की तू तरी तिच्याशी या विषयावर बोलू शकशील.” अभिराज.

“मला सगळं सांगितलं ते तू बरच केलंस. थांब मी लगेच तिला फोन करते.” वंदना आत्त्याने अभिराजच्या आईला लगेच फोन लावला. तीन ते चार रींग वाजल्यावर लगेच फोन उचलला गेला. वंदनाने फोन स्पीकरवर केला.

“हॅलो, वंदना. आज खूप दिवसांनी माझी आठवण काढलीस.” संगिता.

“आता तू आठवण काढत नाही म्हटल्यावर मला तर काढावीच लागेल.” वंदना.

“बोल काय म्हणतेस?” संगिता.

“तुझ्याकडे आत्ता बोलायला वेळ आहे का?” वंदना.

“हो, बोल ना.” संगिता.

“तू पुण्याला कधी येणार आहेस?” वंदना.

“उद्या येणार होते, पण कॅन्सल झालं.” संगिता.

“कॅन्सल का झालं?” वंदना.

“मोठे लेक सून हैदराबादला कामासाठी जाणार होते, मग मी येणार होते, पण त्यांचं जाणं कॅन्सल झालं, मग मी पण आले नाही. कुठं त्यांना आपली अडचण करून द्यावी.” संगिता.

“तू आल्यावर त्यांना अडचण होते, अस ते तुला बोलले आहेत का?” वंदना.

“नाही, पण मलाच नको वाटलं.” संगिता.

“आता तू अचानक आली नाहीस, तर त्यांच्या मनात तुझ्याबद्दल गैरसमज निर्माण होतील ना. विशेष करून ऋतुजाच्या. ती नवीन आहे अजून. त्यांचं लग्न झाल्यापासून तू एकदाही इकडे आली नसशीलच.” वंदना.

“वंदना, ती मोठ्या घरातील मुलगी आहे. तिला माझ्यासारखी गरीब घरातील बाई कशी आवडेल?” संगिता.

“हे तुच ठरवलं का?” वंदना.

“तिच्याशी लग्न झाल्यावर माझा अभी खूप बदलला आहे.” संगिता.

“हे तुझ्या मनाचे खेळ आहेत. ती पोरगी आजरोजी तुझ्या दोन मुलांना सांभाळून घेत आहे. एखादी आजकालची मुलगी म्हणाली असती की, मला यांच्या सोबत एकत्र रहायला जमणार नाही म्हणून पण ती अस काहीच बोलली नाही. ती इतकं सगळं ऍडजस्ट करत आहे, तरी तुझ्या नजरेत ती वाईटच ठरत आहे.

संगिता, हे असंच वागत राहिलीस, तर तू एक दिवस एकटी पडशील आणि एकट राहणं किती कठीण असत हे माझ्या पेक्षा कोणाला माहीत असेल. अजूनही वेळ गेलेली नाही, तुझं वागणं सुधार. माझ सांगायचं काम होत, तुला ऐकायचं की नाही हे तुझं तू बघ.” वंदनाने पुढे काही न बोलता फोन कट केला.

“आत्त्या, तुला आईचा राग आला आहे का?” अभिराजने विचारले.

“तिच्या विचारांचा राग आला आहे. स्वतःहून ती व्हिलन बनत आहे.” वंदना.

“बरं आत्त्या, मी निघतो. ऋतुजा घरी वाट बघत असेल.” अभिराज वंदनाच्या घरातून बाहेर पडला.